पुणे-
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ टाटा सेंट्रल अर्काइव्जने एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. भारताचे स्वातंत्र्य आणि टाटा समूहाची भूमिका यावर हे प्रदर्शन आधारित आहे.

‘टाटा-भारत वाटचाल‘ या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमधून उलगडण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व वसाहतकाळ, स्वातंत्र्योत्तर काळातील एकत्रीकरण व दृढीकरण आणि उदारीकरणानंतरचे विस्ताराचे युग असे वेगवेगळे टप्पे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या काळांमध्ये टाटा समूहाने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कंपन्या, पार केलेले अनेक टप्पे आणि त्यातून देशाच्या जडणघडणीत व प्रगतीमध्ये देण्यात आलेले योगदान असा संपूर्ण प्रवास याठिकाणी पाहता येईल. क्रीडा व लोकोपकारी उपक्रमांमध्ये टाटा समूहाने दिलेल्या लक्षणीय योगदानाची माहिती देखील या प्रदर्शनामध्ये घेता येईल.
टाटा समूहाने भारताच्या विकासात दिलेले अतुलनीय योगदान दर्शवणारी अनेक छायाचित्रे, पत्रे आणि इतर अनेक रोचक, माहितीपूर्ण कागदपत्रे प्रत्येक विभागामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत.
टाटा सेंट्रल अर्काइव्जने विशेष तयार केलेल्या या प्रदर्शनाला भेट देऊन भारताचा आगळावेगळा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळवा.
सोमवार १२ सप्टेंबर २०२२ पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.
ठिकाण: टाटा सेंट्रल अर्काइव्ज, १, मंगलदास रोड, पुणे ४११००१