डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत पोषण आहारानिमित्त अभिनव उपक्रम
पुणे-सफरचंदाची खीर, गवारीच्या पुर्या, बदामाची पुरी, ज्वारीचे नुडल्स, कुळीथ पीठाचे लाडू, पंढरपुरी डाळीचे तंबीट, बदामयुक्त खरवस, नारळाच्या दुधातील तांदळाच्या कुरडया आदी पारंपरिक, पौष्टिक आणि महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील खाद्यपदार्थ आजीबाईंनी सादर केले.
राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत या अनो‘या ‘पौष्टिक आहार स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. दीडशेहून अधिक आजींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पदार्थातील पोषणतत्त्व, पारंपरिकता, सादरीकरण, लागलेला वेळ आणि खर्च हे स्पर्धेसाठी निकष होते. डॉ. सायली पेंडसे, आहारतज्ज्ञ सायली पटवर्धन यांनी परीक्षण केले.
बदलत्या जीवनशैलीत नवीन पिढीचा फास्टफूडकडे ओढा असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आपल्या पारंपरिक आहार पद्धतीत शरीराला आवश्यक असणारी पोषणतत्त्वे मिळतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वसा नवीन पिढीकडे संक्रमित व्हावा आणि आहार व आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी दिली.
चांगले आरोग्य, मजबूत रोगप्रतिकार शक्ती आणि दीर्घकाळ निरोगी शरीरासाठी संतुलित आहार महत्त्वाचा असल्याचे मत डॉ. पेंडसे यांनी व्यक्त केले. शरीराला पोषण मिळावे, चवीचा कंटाळा येऊ नये आणि मानसिक स्वास्थ्य व चांगल्या जीवनशैलीसाठी पारंपरिक, पोषणयुक्त आहार महत्त्वाचा असल्याचे मत पटवर्धन यांनी व्यक्त केले.
