मुंबई-
ICICI बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBIने सोमवारी व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. या प्रकरणी सीबीआयने गत आठवड्यातच आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आयसीआयसीआय बँकेने 2012 मध्ये व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज मंजूर केले होते. हे कर्ज नियमबाह्य देण्यात आल्याचा आरोप आहे. चंदा कोचर यांच्या हाती आयसीआयसीआय बँकेची सुत्रे असताना व्हिडिओकॉनला हे कर्ज देण्यात आले होते. या मोबदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्यूएबलला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली होती.
मुंबईच्या विशेष न्यायालयाने शनिवारी ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना 3 दिवसांच्या (24 ते 26 डिसेबंर) सीबीआय कोठडीत पाठवले होते. चंदा व दीपक कोचर यांना शुक्रवारी अटक केली होती. व्हिडिओकॉन समुहाला रेग्युलेशनविरोधात जाऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.
आरोप आहे की, चंदा कोचर यांनी देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असणार्या आयसीआयसीआय बँकेची सुत्रे सांभाळल्यानंतर व्हिडिओकॉनच्या विविध कंपन्यांना 6 कर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी 2 कर्ज प्रकरणे चंदा कोचर सदस्या असणार्या समितीने मंजूर केली होती. त्यांच्यावर व्हिडिओकॉन समुहाला कर्ज मंजूर करण्यासाठी अन्य समित्यांवर प्रभाव टाकल्याचाही आरोप आहे.