पुणे शहरासह, पिंपरी-चिंचवड व 13 तालुक्यांचे पदाधिकारी जाहीर
पुणे, दि. 8 ऑगस्ट : संपूर्ण पुणे जिल्ह्यात विस्तार असलेल्या पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीने आज पदभार स्वीकारला. व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना असलेल्या कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीय यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण समारंभ पार पडला. पुणे शहरासह, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील 13 तालुक्यांचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना पदग्रहणाची शपथ देण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभ सिंहगड रस्त्यावरील परिणय मंगल कार्यालयात आज झाला. याप्रसंगी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीय, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे, कॅट महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष ज्योती अवस्थी, संघटनेचे सरचिटणीस नवनाथ सोमसे, उपाध्यक्ष विकास मुंदडा, उपाध्यक्ष अजित चंगेडिया, सचिव उमेशचंद्र यादव, पुणे शहराध्यक्ष विजय नरेला, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रमेश चौधरी, महिला विभाग अध्यक्ष शिल्पा भोसले व उपाध्यक्ष संगीता पाटणे, हवेली तालुकाध्यक्ष उमेश चौधरी, शिरुर तालुकाध्यक्ष प्रवीण चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्या हितासाठी सदैव काम करण्यासाठी कटीबद्ध असलेली पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना आहे. पदग्रहण केलेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये पुणे जिल्ह्यातील प्रत्येक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व देण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ ही एकमेव संघटना आहे. पदग्रहण समारंभावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.