गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीच्या स्टेट पॅव्हेलियनमध्ये ‘न उलगडलेले माणिपूर’ हा विभाग चित्रपट निर्माते, कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. माणिपूर मध्ये येऊन चित्रपटाचे चित्रीकरण करावे, असे आवाहन या ‘माणिपूर अनएक्पलोअर्ड’ मधून केले जात आहे. सृष्टिसौंदर्याने संपन्न अशा माणिपूरमध्ये चित्रीकरणासाठी राज्य सरकारकडून काय काय सुविधा दिल्या जातील, अशी विचारणा, अनेक चित्रपट निर्माते, या स्टेट पॅव्हेलियनमध्ये जाऊन करत आहेत.
यंदाच्या इफ्फीमध्ये, माणिपूरी सिनेमाची पन्नास वर्षे देखील साजरी केली जात आहेत. 9 एप्रिल 1972 रोजी, पहिला माणिपूरी चित्रपट (फीचर फिल्म) माताम्गी माणिपूर प्रदर्शित झाला होता. देबकुमार बोस यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतरचा गेल्या पांच दशकातला माणिपूरी चित्रपटाचा प्रवास, अतिशय धाडसी आणि आश्चर्यकारक राहिला आहे. चित्रपटासाठी लागणाऱ्या संसाधनांचा अभाव, आवश्यक त्या तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक नसणे, तसेच चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची यंत्रणा किंवा मार्केटिंग तंत्रज्ञानाचा अभाव, अशा सगळ्या सगळ्या अडचणींवर मात करत माणिपूरी सिनेसृष्टीने आपली 50 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.
इफ्फीमध्ये यंदा पहिल्यांदाच विविध राज्यातल्या चित्रपट उद्योगांनी, आपापल्या राज्यांमध्ये निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी आवाहन करण्यासाठी फिल्म बझारच्या स्टेट पॅव्हेलियनमध्ये आपापले स्टॉल्स लावले आहेत. यात, बिहार, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली आणि पुद्दुचेरी या राज्यांचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत.
यातच, असलेल्या माणिपूर पॅव्हेलियनची संकल्पना, ‘न उलगडलेले माणिपूर’ अशी आहे. माणिपूर राज्य चित्रपट विकास संस्थेकडे या पॅव्हेलियनची जबाबदारी आहे. हे पॅव्हेलियन उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना, माणिपूरमध्ये येऊन या ‘लँड ऑफ ज्वेल्स’ मध्ये, येऊन इतिहास, पुरातत्व, संस्कृती आणि नैसर्गिक वारशावर चित्रपट तयार करा, असं आवाहन करत आहेत. जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांना आपल्या राज्यात चित्रीकरणासाठी आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या पॅव्हेलियनमध्ये माणिपूरचे निसर्गवैभव असलेल्या लोकटक तलाव आणि जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान, केबुल लामजाओ नॅशनल पार्क यांसारख्या जागा दाखवल्या जात आहेत. पॅव्हेलियनमध्ये, माणिपूरमधले जगप्रसिद्ध इमा मार्केट- जो महिला चालवलेला जगातील एकमेव बाजार आहे, त्याचीही प्रसिद्धी केली जात आहे.
मणिपूर राज्य चित्रपट विकास महामंडळाचे सचिव सुंझू बचस्पतीमायुम यांनी अधोरेखित केले की मणिपुरी संस्कृतीत कथा-कथनाची समृद्ध परंपरा आहे. त्यांनी माणिपूरमधली प्राचीन बालगीत गायन परंपरा ‘खोंजोम पर्व’ चे उदाहरण दिले.
2020 मध्ये, मणिपूर सरकारने राज्य चित्रपट निर्मिती धोरण आणले आहे. इतर गोष्टींबरोबरच या धोरणाचा उद्देश चित्रपट निर्मिती प्रक्रियेत स्थानिक लोक आणि भागधारकांच्या हिताचा समावेश करणे हा आहे.