मुंबई, दि. 25 : विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी काल संबंधितास दिले.
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात श्री. मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. श्री. देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यावेळी उपस्थित होते.
श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत ही मोहीम राबवावी. एखाद्या मतदाराचा संपूर्ण पत्ता असूनही तो चुकीच्या सेक्शन ॲड्रेसमध्ये जोडण्यात आला असल्यास तो दुरूस्त करावा. शक्य असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वेगळा सेक्शन ॲड्रेस तयार करावा.
श्री. देशपांडे म्हणाले की, या मोहीम काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक यादी भागाचा बारकाईने आढावा घ्यावा. विशेषत: नवीन इमारतींबाबत जास्त गोंधळ आढळून येतो. तो टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेवून नवीन सेक्शन ॲड्रेस संकलित करून मतदार नोंदणी अधिकारी यांनी यादी भागात पत्त्यानुसार सेक्शन तयार करून त्या ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची नावे नोंदविली जातील, याची दक्षता घ्यावी.
श्री. कुरुंदकर यांनी सांगितले की, सेक्शन ॲड्रेससंदर्भात शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी यात स्वत: लक्ष घालावे. काही नगरपालिका क्षेत्रातही अशा तक्रारी असतात. तेथे देखील दक्षता घेण्यात यावी.