ठाण्यातील महिलांच्या एका कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ठाण्यातील त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. रामदेवबाबांनी महिलांबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही त्या गप्प कशा बसल्या? असे वक्तव्य करणारा कुणीही असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसल्या पाहिजेत.
रामदेवबाबांचे नेमके वक्तव्य काय?
“माझ्यासारखा आपण (महिला) काहीही परिधान केले नाही तरीही चांगले दिसतात!”, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात केले होते. त्यावरून रामदेवबाबांवर आता टीका करण्यात येत आहे.
ऐकून कसे घेतले?
खासदार संजय राऊत म्हणाले, रामदेवबाबांनी केलेले विधान अतिशय लज्जास्पद आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरे तर मुख्यमंत्रीच आहेत. त्यांच्या पत्नी अमृता वहिनीदेखील रामदेवबाबांच्या या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांनी हे वाक्य ऐकून कसे घेतले? एकीकडे महिला रक्षण, सबलीकरणाच्या गप्पा करता, यावर ज्ञान पाजळता. दुसरीकडे, असंख्य महिलांसमोर भगव्या वस्त्रातील एक जण महिलांचा असा अपमान करतो. असे वक्तव्य करणारा कुणीही असो त्याच्या कानाखाली बसली पाहीजे.
जीभ दिल्लीला गहाण ठेवली
मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना राऊत म्हणाले, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगलीतील काही गावांवर दावा केला, तेव्हाही शिंदे शांत बसले. आता भाजपचे प्रचारक असलेले रामदेवबाबा महिलांविषयी त्यांच्याच जिल्ह्यात अभद्र बोलत आहेत. तरीही शिंदे काही बोलत नाहीत. त्यांनी जीभ दिल्लीला गहाण ठेवली आहे का?