पुणे-३६ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी ’नाईट मॅरेथॉन‘ म्हणून संपन्न होत असून, ४२.१९५ कि.मी. च्या या मॅरेथॉनमधील विजेत्या धावपटूंना पुणे महानगरपालिके तर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनची पूर्वतयारी पूर्ण होत आली असून सुमारे १५,००० हून अधिक महिला व पुरुष धावपटूंचा सहभाग यंदा या मॅरेथॉनमध्ये असेल. तसेच ८० हून अधिक परदेशी महिला व पुरुष धावपटूंचा देखील सहभाग अपेक्षित आहे, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, या मॅरेथॉनच्या आयोजनातील विविध विभागांचे प्रमुख, तांत्रिक अधिकारी, पंच, डॉक्टर्स, नर्सेस, व्हॉलेंटिअर्स, रायडर्स इत्यादींच्या बैठका नियमीतपणे होत असून यंदाच्या मॅरेथॉनच्या टी-शर्टचे अनावरण पुण्याचे ज्येष्ठ ऑलिंपिक धावपटू बाळकृष्ण अक्कोटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, गेम डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉइंट डायरेक्टर रोहन मोरे आणि जॉइंट डायरेक्टर गुर्बंस कौर उपस्थित होते. गुरुवार १ डिसेंबर पासून परदेशी धावपटूंचे आगमन होण्यास सुरुवात होणार असून, १ डिसेंबर पासून ३ डिसेंबर दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत सहभागी धावपटूंना घळीं देण्यात येणार आहे. यामध्ये चेस्ट क्रमांक, बॅग, टी-शर्ट, रनर्स चिप इत्यादी दिले जाईल.
ते पुढे म्हणाले की, या मॅरेथॉनच्या वेळी आवश्यक वैद्यकीय सेवांचा आढावा घेण्यासाठी सर्व सहभागींची व्यापक बैठक कालच घेण्यात आली असून, या वैद्यकीय सुविधेत मॅरेथॉनच्या मार्गावर क्रमांक १०८ यंत्रणेतील १५ अॅम्ब्युलन्स, सुमारे २०० डॉक्टर्स, २०० अधिक नर्सेस यांचा समावेश असेल. यामध्ये संचेती हॉस्पिटल, सिम्बॉयोसीस, काशीबाई नवले फिजिओथेरपी सेंटर, भारती विद्यापीठ, चखढ कॉलेज ऑफ नर्सेस यांचा मोठा सहयोग लाभला आहे. अनेक स्पेशलिस्ट डॉक्टर्सही यामध्ये सहभागी असून, त्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे. सणस गाऊंड येथे १ डिसेंबर पासून मीनी हॉस्पिटल्स व फिजीओ थेरपी सेंटर उभारले जाणार आहेत.
प्रत्यक्ष मॅरेथॉनच्यावेळी धावपटूंना मार्गदर्शन करणारे रायडर्स यांची रिअर्सल पुर्ण झाली असून, संपुर्ण मार्गावरील स्पॉट, एल.इ.डी लाईटस् यांच्या जागा आदिही निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पोलीस व वाहतूक पोलीस यंत्रणांबरोबर बंदोबस्त व समन्वय साधण्यासाठी बैठका घेण्यात आल्या असून, या नाईट मॅरेथॉनला देखील दरवर्षी प्रमाणे मोठा प्रतिसाद लाभत आहे. पुणेकर नागरिकांनी देखील या पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गावर धावपटूंचे स्वागत मोठ्या प्रमाणात करावे असे आवाहन अॅड. अभय छाजेड यांनी केले.