Home Blog Page 87

कोथरूडमध्ये जपला महामानवाच्या समरसतेचा वारसा

पुणे: राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचारांची पेरणी होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुण्याच्या कोथरूडमध्ये असेच एक ‘समरसतेचे’ चित्र पाहायला मिळाले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केवळ औपचारिक अभिवादन न करता, आपल्या ‘देवाशिष’ निवासस्थानी समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र आणून एक नवा आदर्श निर्माण केला.

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला ‘समानता आणि बंधुभाव’ हा मंत्र केवळ भाषणांतून न सांगता, चंद्रकांतदादांनी तो आपल्या कृतीतून दाखवून दिला. कोथरूडमधील सफाई कामगारांपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत आणि कष्टकरी महिलांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजणांना एकाच छताखाली एकत्रित आणून महामानवाला अभिवादन केले.

याप्रसंगी भन्ते डॉ. हरिषबोधी महाथेरो, भिक्खू हर्षवर्धन थेरो, भिक्खू आनंद मेत्ता, भिक्खूणी धम्म दर्शनी आणि भिक्खूणी महाबोधी मेत्ता यांनी उपस्थित राहून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आशिर्वाद दिले. ना. पाटील यांनीही भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धेने ‘चिवरदान’ करून आपला आदर व्यक्त केला. यानंतर उपस्थित सर्व भन्ते आणि भिक्खूंनी सर्व अनुयायांना तसेच नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या.”

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कोणतीही मोठी व्यासपीठे की लांबलचक भाषणे नव्हती. तर फक्त आपुलकी आणि संवाद होता. आलेल्या प्रत्येक नागरिकाशी दादांनी वैयक्तिक विचारपूस केली. तसेच, बाबासाहेबांचे विचार आपल्या आचरणात येणे हेच त्यांना अभिवादन आहे, हा संदेश त्यांनी उपस्थितांवर बिंबवला.

या कार्यक्रमास उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आणि सामाजिक कार्यकर्ते एस. के. जैन, रिपाइं गटाचे सचिन खरात, रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, संजय सोनवणे, अशोक धिवरे, अविनाश साळवे, रत्नाकर गायकवाड, डॉ. विजय खरे, अतुल साळवे, डॉ. प्रशांत पगारे, ॲड. भाई विवेक चव्हाण, राहुल डंबाळे, यशवंत नडगम, सिताराम गंगावणे, ॲड. महेश सकट, हिमाली कांबळे, नगरसेविका पल्लवी जावळे, अश्विनी भंडारे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, संजय सोनावणे, रावसाहेब राखपसरे, राजू जाधव, महेंद्र कांबळे, उमेश चव्हाण यांच्यासह पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारामुळे कोथरूडमध्ये ‘एकता आणि समतेचा’ एक नवा आदर्श प्रस्थापित झाला. दादांच्या या संवेदनशील पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “हेच आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण,” अशी भावना उपस्थितांनी याप्रसंगी व्यक्त केली.

असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य

राज्यात रिक्षांचा आकडा १३ लाखांपार; परप्रांतीयांची मुजोरी रोखण्यासाठी मोहीम

पुणे-येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता-बोलता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते.

भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कर्नाटक, तामिळनाडूनंतरचे तिसरे राज्य ठरेल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालये विशेष तपासणी मोहीम राबवतील. छत्रपती संभाजीनगर मुंबई महानगर क्षेत्र, नागपूर आदी शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मराठी भाषा सक्तीचा हा निर्णय निव्वळ प्रशासकीय नाही, तर यात उद्धवसेनेचा ‘मराठी अस्मिता’ कार्ड हायजॅक करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मास्टरस्ट्रोक खेळी आहे. “खरी शिवसेना तीच, जी मराठी माणसासाठी प्रत्यक्ष कृती करते,’ हे शिंदेसेनेने या निर्णयातून ठणकावून सांगितल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ नुसार १ जानेवारी २०२५ रोजी राज्यात १२,२२,८४० रिक्षा होत्या. १ जानेवारी २०२६ पर्यंत हा आकडा १२,९६,४३० वर पोहोचला, तर टॅक्सी ७७ लाख आहेत. रिक्षा संख्येत सुमारे ६ टक्के वाढ महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याकडे अंगुलीनिर्देश करते. बहुतांश परप्रांतीय मराठी भाषिकांशी मुजोरी करतात, अशा तक्रारी आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठीच परवाना रद्दची मोहीम आहे.

कायदा १९८८ चा, अंमलबजावणी ३७ वर्षांनी

परवाना रद्दचा कायदा आहे का?
-महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४ आणि २७ (४) नुसार, रिक्षा, टॅक्सी, बस चालवण्याच्या परवान्यासाठी मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. ‘मोटार वाहन कायदा १९८८’ च्या कलम ८६ नुसार आरटीओला परवाना निलंबन किंवा रद्दचा अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी आता ३७ वर्षांनंतर होईल असे दिसते.
परीक्षा लेखी की तोंडी?
-आरटीओ निरीक्षक चालकाला मराठी समजते की नाही याची तोंडी प्रश्न विचारूनच खातरजमा करतील. जुन्या चालकांची लेखी, तोंडी परीक्षा घेण्याचे निर्देश नाहीत, परंतु नव्या परवान्यासाठी ही प्रक्रिया कडक केली जाणार आहे.
आतापर्यंत परीक्षा कशी होती?
-परवान्यासाठी अर्ज करणाऱ्याला निरीक्षक मराठीत प्रश्न विचारत किंवा रस्ते चिन्हांचे फलक वाचायला सांगतात. दहावीत मराठी विषय पास असलेल्यांना बऱ्याच वेळा सवलत मिळते. कारण त्यांचे १० वीपास प्रमाणपत्र भाषेच्या ज्ञानाचा पुरावा मानले जाते.
जुन्यांना मराठी येत नसेल तर?
जुना परवाना असलेल्यांना मराठीत येत नसल्यास आधी ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली जाऊ शकते. ठरावीक मुदतीत तो मराठी शिकला नाही तर आता नव्या निर्णयानुसार परवाना रद्द होऊ शकतो.
केवळ १५ दिवसांत लाखो चालकांची परीक्षा घेणे शक्य आहे?
तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. १ मेपासूनची मोहीम प्रामुख्याने ‘जागरूकता’ आणि नवीन परवाना वितरणावर लक्ष केंद्रित करेल. आरटीओ कार्यालयांना केवळ कडक अंमलबजावणीचे आदेश आहेत.

देशात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ३३ % महिला आरक्षण राजीव गांधी यांनीच दिलेले: काँग्रेस’चा दावा !

सरकारच्या ‘निवडणुक’जीवी राजकारणामुळे देशाचे नुकसान !
‘सामाजिक मागासलेपणाच्या ऊध्दारा’च्या डॅा बाबासाहेबांच्या हेतुला, तिलांजली देण्याचा भाजप’चा विधेयकाद्वारे प्रयत्न…
– काँग्रेस’ची प्रखर टिका

पुणे

संविधानीक, लोकतांत्रिक, प्रजासत्ताक भारताचे दैवत, घटनाकार डॅा बाबासाहेब आंबेडकर यांची देशभर जयंती साजरी होत असतांना, डॉ बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक समतेला व उर्वरीत मागासवर्गीय महिला आरक्षणाला’ तिलांजलि देण्याचा घाट मोदी सरकारने ‘नारी शक्ति वंदन’ संशोधन – दुरुस्ती विधेयक आणून घातल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, “पश्चिम बंगाल व तामिळनाडू” या २ राज्यांमध्ये निवडणुका असल्याने व विशेष करून बंगाल मध्ये श्रीमती “ममता दिदींच्या विरोघात, महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी व महिलांसाठी काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी ‘एकाच महिला विधेयकात ३० महिन्यांनी पुन्हा बदल करण्याचा घाट’ मोदी सरकार घालते हे केवळ ‘निवडणूकजीवी व सत्ताभिलाशी राजकारणाचे द्योतक’ असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,
२०२४ ची लोकसभा निवडणूक जवळ आली असताना, २८ मे २०२३ रोजी (नव्या संसद भवनात) ‘लोकसभा व विधानसभां’त महिलांना ‘२०२९ पासून व जातिगत जनगणनेनुसार’ ३३ % आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक मांडण्यात आले, त्यास काँग्रेस’ची महिला विधेयकास समर्थनात्मक प्रथम पासुनच भुमिका असल्याने, काँग्रेस’ने पाठिंबा दिला.
देशात सर्व प्रथम “स्थानिक स्वराज्य संस्था’मध्ये ३३ % महिला आरक्षण” तत्कालीन दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिल्याचा दावा देखील त्यांनी केला.
मोदी सरकारने २०२३ मध्ये मान्य करून घेतलेले “नारी शक्ती वंदन विधेयक” हे अमलात मात्र येणार होते २०२९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत.. कारण २०२१ ची सतत लांबणीवर पडलेली जनगणना आणि त्या ‘जनगणनेच्या आधारावर’ होणारी लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचनेची delimitation प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर..!
मागासवर्गीय, इतर मागास वर्गीय, ओबीसी महीला आरक्षण व या सर्वांचा ‘संविधानिक आधार असलेली जातिनीहाय जनगणने’वर सावट दर्शवणाऱ्या वृत्त लेखातून ‘संसदीय कांग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
कांग्रेस नेत्या सोनियाजी गांधींनी म्हटले की, केंद्र सरकारने‌ महिला आरक्षण‌ विधेयकाच्या अनुषंगाने संसदेचे अधिवेशन हे केवळ राजकिय लाभासाठीची घाई असून, खरा मुद्दा ‘मतदारसंघाच्या फेररचनेचा’ आहे.
महिला आरक्षणात अनुसूचित जाती ,अनुसुचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण दिले जाणे आवश्यक असून, नव्या जनगणने सोबत ‘प्रस्तावित जातीनिहाय जनगणना’ टाळण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा कांग्रेस प्रवक्त्यांनी आरोप केला.
बिहार आणि तेलंगणाने सहा महिन्यात जातीनिहाय जनगणना पूर्ण केली, तर मग केंद्रसरकार का विलंब करत आहे (?) असा प्रश्नही उपस्थित होतो.
लोकसभा सदस्य संख्या वाढविण्यासाठी पुनर्रचना ही केवळ अंकगणिताची नसावी तर ‘राजकीय दृष्ट्या न्यायसंगत असावी’ असे काँग्रेसने म्हटले असून, “ज्या छोट्या दक्षिणेकडील राज्यांनी साक्षरता व लोकसंख्या नियंत्रणाचे” चांगले काम केले आहे, त्यांचे नुकसान होता कामा नये, अशी ही श्रीमती सोनियाजी गांधी यांची भूमिका असल्याचे काँग्रेस वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

काँग्रेस राज्य प्रवक्ते पुढे पुढे म्हणाले की,
केंद्रात एच. डी. देवेगौडांचे सरकार असताना १२ सप्टेंबर १९९६ रोजी महिलांना ‘लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले ८१ वी घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले, तेव्हा महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात गदारोळ माजला व ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले आणि कालांतराने लोकसभेची मुदत संपून ते रद्द झाले. त्यानंतर थेट डॅा मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या पुढाकारानेच, राज्यसभेत विरोधी गदारोळात, महत्प्रयासाने ९ मार्च २०१० रोजी काँग्रेससह १८६ मतांनी महीला विधेयक पारीत झाले होते याची आठवण ही काँग्रेस प्रवक्त्यांनी करून दिली.

वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट, 9 कामगारांचा अंत

रायपूर: छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराय येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी एक भीषण दु्र्घटना घडली. कारखान्यातील बॉयलरचा मोठा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत ३० ते ४० मजूर गंभीर जखमी झाले. या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षकांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जणांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगढच्या फोर्टिस रुग्णालयात पाच जणांची प्राणज्योत मालवली. त्यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. गंभीररित्या जखमी झालेले १८ मजूर फोर्टिसमध्ये दाखल आहेत. काही जखमींना रायगढच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच घबराट पसरली. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.मंगळवारी दुपारीच्या दोनच्या सुमारास कारखान्यात स्फोट झाला. त्यावेळी सगळे मजूर कारखान्यात काम करत होते. अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. कामगारांची पळापळ सुरु झाली. आक्रोश आणि आरडाओरडा सुरु झाला. स्फोटानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं.

‘आधी कोण झोपणार?’ यावरुन दोन सुरक्षा रक्षकांत जोरदार वाद, एकाने दुसऱ्याला कायमचंच झोपवलं

पुणे : पुण्यातल्या खराडी भागात एक मोठी घटना घडली आहे. रात्रपाळीत काम करत असताना ‘आधी कोण झोपणार?’ या साध्या कारणावरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये एवढा मोठा वाद झाला की त्यातून थेट हत्येची घटना घडली. पांडुरंग खारवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) आणि सुदर्शन काळे (वय २२, रा. खराडी) हे दोघे एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. दि. १२ एप्रिल रोजी रविवारी रात्री दोघांची एकत्र रात्रपाळी होती. काम करताना थोडा आराम मिळावा म्हणून त्यांनी आधीच ठरवलं होतं की रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत आळीपाळीने तीन-तीन तास झोप घ्यायची.’आधी कोण झोपणार?’
पण रात्री उशिरा ‘आधी कोण झोपणार?’ यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा साधा वाद होता, पण हळूहळू तो चांगलाच पेटला. दोघेही एकमेकांवर ओरडायला लागले. राग अनावर झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. संतापाच्या भरात सुदर्शन काळे याने आपल्या गळ्यातील गमजा काढला आणि तोच गमजा खारवणे यांच्या गळ्याला घट्ट आवळला. काही क्षणातच खारवणे खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. हा प्रकार पाहून काळे घाबरला.घाबरलेल्या अवस्थेत त्याने तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खारवणे यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छोट्याशा कारणावरून एका व्यक्तीचा जीव गेला, यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुदर्शन काळे याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान छोट्या गोष्टींच्या रागातून असे विकृत कृत्य होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रगच्या अतिसेवनामुळे एमबीएच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू….जैन,खंडेलवाल,पटेल,पांडे, कुरूप पोलीस कोठडीत

सनी जैन, बालकृष्ण कुरुप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतिक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी

मुंबई -गोरेगाव येथे एका कार्यक्रमात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला. ही घटना नेस्को सेंटरमधील आहे, जिथे 11 एप्रिलच्या रात्री एक संगीत मैफल होती. मृत युवक आणि युवती एमबीएचे विद्यार्थी आहेत. मृतांनी कोणते मादक पदार्थ घेतले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मुंबईतील वनराई पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 6 लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यापैकी एक व्यक्ती या कार्यक्रमाशी संबंधित आहे.पोलिसांनी दावा केला आहे की, मृतांना ड्रग्ज देणारा व्यक्ती देखील विद्यार्थी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सहा ते सात गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत
ही घटना 11 एप्रिलची आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होता. या कार्यक्रमासाठी सुमारे 4,000 लोक जमले होते, ज्यांनी 2000 रुपये प्रवेश शुल्क दिले होते.

यामध्ये काही लोकांनी अंमली पदार्थ घेतले होते. पोलिसांच्या सूत्रांनुसार, त्यांनी प्रतिबंधित एमडीएमए (MDMA) औषध घेतले होते.
त्यानंतर रात्री 12 वाजता 3 लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे 2 जणांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर आहे.

एका विद्यार्थ्याने कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी टॅक्सीमध्ये एक गोळी घेतली होती, तर नंतर कार्यक्रमादरम्यान दुसरी गोळी घेतल्याने त्याला ओव्हरडोज झाला.
नेस्को सेंटरने सांगितले की, ते तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेतो. सत्य लवकर समोर यावे यासाठी अधिकाऱ्यांना शक्य ती सर्व माहिती आणि मदत देत आहोत.वनराई पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 105 (सदोष मनुष्यवध) सह इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत इव्हेंट ऑर्गनायझर विहान उर्फ आकाश सामल, नेस्को इव्हेंट ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंटशी संबंधित सनी विनोद जैन, अंतर्गत सुरक्षा पथकाचे सदस्य बालकृष्णन बलराम आणि इतर दोन विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

सनी जैन, बालकृष्ण कुरुप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतिक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी ….

मुंबईत एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अशाप्रकारे ड्रग्जचे सेवन करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबई सारख्या शहरात अशाप्रकारच्या घटना घडूच कशा शकतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित म्युझिक कॉन्सर्टमध्ये हायप्रोफाईल तरुण-तरुणी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजार तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांची गर्दी होती. यापैकी काही जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याची माहिती आहे. ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याने एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी हे मुंबईतील नामांकीत कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, अशी माहिती समोर येत आहे. तसेच एका विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
या घटनेची गंभीर दखल गोरेगावच्या वनराई पोलिसांनी घेतली आहे. वनराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सनी जैन, बालकृष्ण कुरुप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतिक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये आयोजकाचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यापैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एक जणावर उपचार सुरु आहेत. संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे”, अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी दिली.

फुले-आंबेडकरांचा प्रगतशील विचार मनामनात रुजावा- सतीश राऊत

आंबेडकर जयंतीनिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन

पुणे: “चांगल्या शिक्षणातून व संस्कारातून माणूस घडतो. जाती, धर्म व लिंगभेदाच्या भिंती बाजूला सारून सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य उभारले. त्यांनी दिलेला प्रगतिशील विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची, त्यांच्या विचारांचा अंगीकारून त्या मार्गाने चालण्याची गरज आहे,” असे मत अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी व्यक्त केले. गावकुसाबाहेर साजरी होणारी आंबेडकर जयंती सर्वसमावेशक व मुख्य प्रवाहातही साजरी होतेय, याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘गौरव कार्याचा… उगवत्या ताऱ्यांचा’ या सन्मान सोहळ्यात सतीश राऊत बोलत होते. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे ‘मनाची मशागत’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सिंहगड रस्त्यावरील मॉंटेरोसा सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे कमांडर कवींद्र कुमार, निरीक्षक रामदास यशवंते, उद्योजक तुषार गोसावी, पुणे महानगरपालिकेतील नाव समितीच्या अध्यक्षा पल्लवी जावळे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका ज्योती गोसावी, पुष्पा कांबळे आदी उपस्थित होते. 

सतीश राऊत म्हणाले, “महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या, शिक्षणाच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची आज अधिक गरज आहे. हा प्रगतशील विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजवला पाहिजे. बालपणी जातीभेदाच्या विरोधात बंड करण्याची प्रेरणा मला याच विचारांनी दिली. आजही समाजात असलेली असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी हा विचार पुढे नेला पाहिजे. रंगावरून कोणत्याही माणसाची ओळख निर्माण होऊ नये.”

राजेश पांडे म्हणाले, ” डॉ. आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन अवघ्या विश्वाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा आपण नवीन पिढीला द्यायला हवा. अशा कार्यक्रमांतून समाजातील संवाद आणि विचारांची देवाणघेवाण वाढते. तरुणांनी वाचनाला प्राधान्य द्यावे. शिक्षण, चांगले वाचन यातूनच प्रगल्भ समाजाची निर्मिती होईल.”

संभाजी कदम यांनी यशाच्या शिखरावर पोहोचले, तरीही माणसाने मुळांना विसरू नये, असे सांगत संविधान हा देशाचा आत्मा असून, त्याच्या बळावरच भारत प्रगती करत आहे, असे त्यांनी नमूद केले. डॉ. भोई यांनी महामानवांच्या जयंती डीजेमुक्त होण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले. सचिन ईटकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर भाष्य करीत मनोगत व्यक्त केले. कवींद्र कुमार यांनी आम्ही संविधानाचे रक्षक असून, देशसेवेचे काम करत आहोत, याचा अभिमान वाटतो, असे नमूद केले.

फाउंडेशनचे माध्यम सल्लागार जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. पद्मा फाउंडेशनतर्फे शशिकांत कांबळे यांनी आभार मानले.

कोंढव्यात प्रथमच बाबासाहेबांचा भव्य २५ फूट पूर्णाकृती पुतळा :अत्यंत दिमाखात १३५वी जयंती साजरी – आयोजक अॅड. तोसिफ शेख

पुणे-कोंढवा खुर्द येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त प्रथमच २५ फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारून जयंती उत्सव अत्यंत दिमाखात साजरा करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, कोंढवा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक १३/०४/२०२६ रोजी रात्री ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समता सैनिक दल व भीम सैनिकांकडून मानवंदना, सामूहिक बुद्ध वंदना तसेच फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच मंगळवार दिनांक १४/०४/२०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन व मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून भव्य लाईट शो, भव्य पुतळा, फायर शो तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे ठिकाण नरवीर तानाजी मालुसरे चौक, ज्योती हॉटेल जवळ, कोंढवा खुर्द येथे असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमाचे आयोजन अॅड. तोसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, नगरसेवक पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.समस्त कोंढवा खुर्द ग्रामस्थ, मुस्लिम समाज तसेच बहुजन समाज यांच्या विशेष सहभागातून हा जयंती उत्सव सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.

‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत मृत व्यक्तींच्या ८८९ वारसदारांना शासकीय नोकरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक प्रगतीसाठी अंमलात आणणे आवश्यक-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे : अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचारग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मृत झालेल्या व्यक्तींच्या ८८९ पात्र वारसदारांना शासन सेवेत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागात आयोजित कार्यक्रमात मिसाळ बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्ह्यातील १८ वारसदारांना मिसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

आमदार बापू पठारे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहआयुक्त प्रमोद जाधव, प्रादेशिक आयुक्त वंदना कोचूरे, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती.

मिसाळ म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या १९८९ च्या ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्तांना आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची तरतूद करण्यात आली होती. राज्यात १९९५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. गरजेनुसार त्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या.”

मिसाळ पुढे म्हणाल्या, “२०१६ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार खून किंवा मृत्यू झाल्यास पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला अर्थसहाय्य किंवा एका व्यक्तीला आवश्यक असल्यास नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार २०१२ ते २०२५ या कालावधीत एकूण ३२० प्रकरणात वारसदारांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी ४४ वारसांना नोकरी २६६ वारसांना निवृत्तीवेतन, एका वारसाला जमीन आणि १० वारसांना घरकुल देण्यात आले.”

कायद्यातील तरतुदी पुरेशा स्पष्ट नसल्याने पीडितांच्या वारसांना नोकरी देण्याचे प्रमाण खूपच कमी होते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार जुलै २०२५ अखेर राज्यात प्रलंबित असलेल्या ८८९ प्रकरणासंबंधी एक वेळची विशेष बाब म्हणून ‘ड’ संवर्गातील शासकीय पदांवर नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली. आज पुणे जिल्ह्यातील १८ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे मिसाळ यांनी सांगितले.”

“महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष, संत गाडगेबाबा यांचे १५० वे जयंती वर्ष आणि चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष राज्यात सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.–माधुरी मिसाळ

श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्‍या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक समता सप्‍ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, महामानवांचे कार्य, त्‍यांचे विचार, आपल्‍याकडून अपेक्षित असलेले वर्तवणूक तसेच समाज कल्‍याण विभागामार्फत विविध योजनांची माहिती दिली.

सहआयुक्त प्रमोद जाधव यांनी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतक-यांसाठी केलेले कार्य” या विषयावर व्‍याख्‍यान दिले.

श्रीमती कोचुरे यांनी समाज कल्‍याण कार्यालयाच्‍या अंतर्गत असणाऱ्या वसतिगृह, निवासी शाळांमध्‍ये ८ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्‍ये सामाजिक समता सप्‍ताहानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

श्री. लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरीकांना शुभेच्‍छा संदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रेरणादायी विचार घेवून जीवनाची वाटचाल यशस्‍वी करावी, असे आवाहन केले.

यावेळी समाज कल्‍याण विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख व गृहपाल तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते.

पुणे विमानतळावर १५ नवीन फ्लाइट स्लॉट्सची भर; कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे, दि. १४ एप्रिल २०२६ : पुणे विमानतळाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, १५ अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्सची वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. या वाढीमुळे प्रवासी हालचाली अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम होणार असून विमान कंपन्यांना अधिक उड्डाणे सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन स्लॉट्सच्या उपलब्धतेमुळे पुणे शहराला मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या हवाई मार्गांनी जोडले जाणार आहे. या नव्या मार्गांमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर पर्यटन, व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. विशेषतः सोलापूरसारख्या शहराला थेट हवाई जोडणी मिळाल्याने मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हा महत्त्वपूर्ण विकास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे पुणे विमानतळाच्या क्षमतेत वाढ होत असून, शहराच्या वाढत्या हवाई प्रवासाच्या गरजांना समर्थपणे प्रतिसाद दिला जात आहे.

या संदर्भात मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळावरील स्लॉट्सची वाढ ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी आहे. नवीन उड्डाणांमुळे उद्योग, आयटी, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. केंद्र सरकारच्या UDAN योजनेच्या माध्यमातून आम्ही दुर्गम आणि मध्यम शहरांनाही हवाई नकाशावर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.”

पुणे विमानतळ ‘रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS–UDAN)’ अंतर्गत सध्या नांदेड, किशनगढ, सिंधुदुर्ग आणि जळगाव या महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. या मार्गांमुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत होत असून, संतुलित प्रादेशिक विकासाला गती मिळत आहे. तसेच, वाढत्या प्रवासी संख्येला लक्षात घेता विमानतळावर सुविधा उन्नत करण्याचे कामही सुरू आहे, ज्यामध्ये प्रवासी सोयी, सुरक्षा व्यवस्था आणि ऑपरेशनल क्षमता यामध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे.

१ मे २०२६ पासून नव्याने सुरू होणाऱ्या उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, यामुळे पुणेकरांना अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुणे विमानतळ प्रशासन भविष्यातही अधिक मार्ग, वाढीव उड्डाणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असून, पुण्याला देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन आणि कनेक्टिव्हिटी हब बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल; जिद्दीच्या बळावर उभारला स्वतःचा उद्योग..

यशकथा

महिला सक्षमीकरण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निर्णयप्रक्रियेत समान संधी उपलब्ध करून देणे हे सशक्त समाजनिर्मितीसाठी आवश्यक मानले जाते. भारताच्या राज्यघटनेने महिलांना समान हक्क दिले असून, त्यांच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना आणि उपक्रम सातत्याने राबवत आहे. स्वयंसहाय्यता गट, कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता प्रोत्साहन तसेच आरोग्य व सुरक्षाविषयक योजनांमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला आहे. या योजनांचा योग्य लाभ घेत महिलांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासातही सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज अधोरेखित होत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात राहणाऱ्या श्रीमती गंगा दिलीप गाढवे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर उद्योजकतेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फ्लेक्स प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग, इको प्रिंटिंग आणि एलईडी बोर्ड निर्मिती या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा त्यांनी ध्यास घेतला.

व्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झीब्युशन सेंटरला भेट दिली. मात्र, भांडवलाच्या अभावामुळे व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार करणे आव्हानात्मक ठरत होते.


अशा परिस्थितीत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ या योजनेअंतर्गत कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. त्यांच्या चिकाटीला यश मिळाले आणि युनियन बँक ऑफ इंडिया, हिंजवडी शाखेकडून त्यांना २१ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पावर २५ टक्के अनुदानही प्राप्त झाले.

या आर्थिक सहाय्याच्या बळावर श्रीमती गंगा गाढवे यांनी स्वतःचा उद्योग उभारला आणि आज त्या यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या उद्योगातून दरमहा सुमारे ३.५ ते ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःपुरते यश मर्यादित न ठेवता इतरांसाठीही रोजगारनिर्मिती केली असून सध्या ४ ते ५ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

श्रीमती गाढवे यांचा हा प्रेरणादायी प्रवास स्पष्टपणे दाखवून देतो की योग्य मार्गदर्शन, शासकीय योजनांचा प्रभावी वापर आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती आत्मनिर्भर बनू शकते. त्यांच्या यशातून इतर महिलांनी आणि बेरोजगार तरुणांनी प्रेरणा घेऊन स्वतःचा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करावा, हा सकारात्मक संदेश मिळतो.

याबाबत जिल्हा उद्योग केंद्र, पुणेच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी सांगितले की, ग्रामीण व वंचित भागातील महिलांपर्यंत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास महिलांचे सक्षमीकरण अधिक व्यापक होऊ शकते. महिलांसाठी दिली जाणारी शासकीय मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून त्यांच्या आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढविण्याचा एक महत्त्वाचा आधार ठरते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा राज्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असून त्याचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. १० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन प्रकल्प तसेच ५ लाख रुपयांपेक्षा जास्त सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही अनुदानित शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. उत्पादन उद्योगासाठी कमाल मर्यादा १ कोटी रुपये तर सेवा व कृषीपूरक उद्योगांसाठी ५० लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत मार्गानेच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, पुणे येथे संपर्क साधता येईल.

संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवानदन.

पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कलेक्टर कचेरी जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘डॉ. आंबेडकरांचा हा दिमाखदार जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो. सर्वात प्रथम, त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण, कायदा, तत्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान संपादन केले. शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्यांनी आपले आयुष्य केवळ वाचन-अभ्यास आणि ग्रंथालयात व्यतीत केले नाही. त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली, कारण ते शोषित वर्गातील आपल्या बधुंना विसरले नाहीत. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
त्यांचा जीवन इतिहास पाहिल्यावर, त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिकता अभ्यासणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आणि योग्य आहे. एका मतप्रवाहानुसार तीन मुद्दे आजही अधिक महत्त्वाचे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज आजही अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांना तोंड देत आहे. या समस्या सोडवण्यामध्ये, डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कृती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
यावेळी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, रफिक शेख, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, ॲन्थोनी जेकब, राज अंबिके, फिरोज शेख, अभिजीत महामुनी, सिमा सावंत, सुंदर ओव्‍हाळ, विशाल जाधव, अकबर शेख सुरेश नांगरे, फैय्याज शेख, मनोहर गाडेकर, नितीन वायदंडे, मुन्ना खंडेलवाल, विनोद चौरे आदी उपस्थित होते.

गोरेगावमधील नेस्को संकुलातील ड्रग्ज पार्टीची भनक पोलिसांनी कशी लागली नाही; टक्केवारी, हप्ते व ‘वसुली’ एवढ्याच कामासाठी यंत्रणा आहेत का?

देवेंद्र फडणवीसांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा कारभारही झेपेना; जमत नसेल तर खुर्ची खाली करा पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका…

मुंबई, दि. १४ एप्रिल २०२६..

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे नाटक सुरु आहे पण मुंबईतील एका भागात चार ते पाच हजार तरुण तरुणांची ड्रग्ज पार्टी होते, याची भनक पोलीसांना कशी लागली नाही. मुंबईतील ही घटना दोन मृत्यूमुळे उघड झाली पण मुंबईतच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात ड्रग्जचा काळा धंदा सरकारच्या आशिर्वादाने सुरु असून भाजपा महायुतीच्या निर्लज्ज व नालायक सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकली, असल्याचा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस व सरकारी यंत्रणाच्या नाकावर टिच्चून अशा ड्रग्ज व दारुच्या पार्ट्या खुलेआम होत आहेत, हे गृहविभाग व सर्व यंत्रणाचे मोठे अपयश आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकण्यास भाजपा महायुती सरकारचा आंधळा कारभार जबाबदार आहे. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या शेतातच ड्रग्जचा कारखाना सुरु असतो, तो उघड होऊनही थातूर मातूर कारवाई करून प्रकरण दडपले जाते. मुख्यमंत्री फडणवीसही त्याला क्लीन चिट देऊन टाकतात हे अत्यंत गंभीर आहे. राज्यात ड्रग्जचा धंदा खुलेआम सुरु असल्याचे नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथील घटनांवरून याधीच उघड झाले पण सरकार काही झोपेतून जागे झाले नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटील असो, नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण असो वा साताऱ्यातील ड्रग्जचा कारखाना…या सर्वांचे धागेदोरे सरकारमधील बड्या धेंड्यांशी असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. ड्रग्जने आणखी किती मृत्यू होईपर्यंत फडणवीस सरकार गप्प बसून फक्त क्लिन चिट वाटत बसणार ?

नेस्कोतील चार-पाच हजार विद्यार्थ्यांच्या अशा पार्टीला परवानग्या कोणी दिल्या, सरकार व पोलीस कोणाला पाठीशी घालत आहे, हे समजले पाहिजे. सरकारने पोलीस व सर्व यंत्रणांना फक्त टक्केवारी, हप्ते वसूली करणे व सर्वसामान्य जनतेकडून कायद्याचा गैरवापर करत ‘वसुली’ करणे याच कामाला जुंपल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मोठमोठ्या गप्पा मारत असतात पण फडणवीस यांना गृहखातेच काय महाराष्ट्राचा राज्यकारभारही हाकता येत नाही. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

उत्तम साहित्य निर्मितीसाठी मनाची मशागत आवश्यक : स्वाती महाळंक

वल्लरी प्रकाशनच्या ‘गुलबक्षी’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे : मनात दाटलेले कागदावर उमटते तेव्हा रिते वाटते, हे रितेपण समाधान घेऊन येते, ही अनुभूती कविता लिहिल्यावर येते. उत्तम काव्याची निर्मिती होण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत, मनाची चांगली मशागत व्हायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशनतर्फे ‘गुलबक्षी’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी महाळंक बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, कवयित्री कांचन सावंत, मानसी चिटणीस, यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.

‘गुलबक्षी’मध्ये सुरेखा मिसाळ, रत्नाकर खरोटे, माधवराव देशमुख, प्रितम गाडगीळ, तुषार देशमुख, रेखा बारी, पूजा बोटे, अर्चना पाटील, डॉ. चैताली भिडे, पौर्णिमा चिकणे, निर्मला गिरासे अशा अकरा कवींचा समावेश आहे.  यावेळी सह्याद्री नॅशनल स्कूलचे विद्यार्थी आर्या जगदाळे, गणेश कळसे आणि माया कल्याणकर यांनीही कवितांचे सादरीकरण केले.  समारंभाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले. 

महाळंक पुढे म्हणाल्या, ‘‘कविता हे व्रत आहे. कवीच्या अंतरंगात, मनात उमटणारा भावनांचा उत्स्फूर्त, सशक्त अविष्कार म्हणजे कविता होय. गेल्या काही वर्षात कवींचे पीक आले आहे, असे सातत्याने म्हटले जाते, पण या कवींमध्ये किती कस आहे हे तपासून पाहायला हवे. येत्या काळात स्वत:ला कवी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. गझलकार म. भा. चव्हाण यांनी यावेळी विविध धाटणीच्या गझल, कविता सादर केल्या.

कांचन सावंत म्हणाल्या, स्वत:चे भावविश्व रसिकांसमोर उलगडणे म्हणजे कविता सादर करण्याची प्रक्रिया होय. कविता लिहिणाऱ्यांनी शब्दांच्या पलिकडचे वाचायला शिकले पाहिजे. यमकाचा अभ्यास, छंद, शब्द, लय यांचे भान कवीला असायला हवे. रियाजाने कविता चांगली होत जाते, त्यामुळे कवितेचा रियाज आवर्जून करायला हवा.

व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविकात वल्लरी प्रकाशनाची भूमिका सांगितली. ते म्हणाले, मागील ३ वर्षातील हा २२वा कविता संग्रह असून महाराष्ट्राच्या विविध भागांतील कवींना चांगले व्यासपीठ निर्माण करून देणे हे आमचे ध्येय आहे. हृदयातून उमटते आणि हृदयापर्यंत पोहोचते ती खरी कविता असते. साहित्याला जेव्हा ममतेचा स्पर्श होतो तेव्हा ती कलाकृती खऱ्या अर्थाने उत्तम होते. मराठी साहित्यिक बरेचदा स्वप्नरंजनात अडकतात. मात्र वास्तववादी आणि रसिकांना आवडेल अशा साहित्याची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मानसी चिटणीस यांनी कविता संग्रहाची प्रक्रिया सांगून कवितांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संपादिका प्रज्ञा कल्याणकर यांनी केले. 

साहित्याच्या क्षेत्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींचा मला सहवास लाभला. व. पु. काळे यांनी मला बोलते केले तर सुरेश भट यांच्यामुळे मी लिहिता झालो. या दोन व्यक्तींमुळे मी खऱ्या अर्थाने घडलो.

–      म. भा. चव्हाण

टाटा स्मॉल कॅप फंडमध्ये एक रकमी गुंतवणूक पुन्हा सुरू

मुंबई, 14एप्रिल 2026: टाटा म्युच्युअल फंडने ६ एप्रिल २०२६ पासून ‘टाटा स्मॉल कॅप फंड’मध्ये ‘लम्पसम’ आणि ‘स्विच-इन’ द्वारे सर्व नवीन गुंतवणूक पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्मॉल-कॅप श्रेणीतील निधीचे योग्य नियोजन आणि लिक्विडिटी (तरलता) राखण्यासाठी फंड हाऊसने एकरकमी गुंतवणुकीवर तात्पुरती बंदी घातली होती, जी आता उठवण्यात आली आहे. हा बदल भविष्यातील गुंतवणुकीसाठी लागू असेल आणि तो योजनेच्या माहिती पुस्तिकेचा (SID आणि KIM) अविभाज्य भाग राहील.
 
याविषयी बोलताना टाटा एसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर आनंद वरदराजन म्हणाले, गुंतवणूक पुन्हा सुरू करण्याचा आमचा निर्णय हा सध्याच्या बाजारपेठेतील संधींवरील आमचा विश्वास आणि मजबूत आर्थिक स्थिती  शाश्वत वाढ असलेल्या कंपन्या निवडण्याच्या आमच्या क्षमतेवर आधारित आहेया श्रेणीत चढउतार होणे स्वाभाविक असलेतरी अलीकडच्या घसरणीमुळे दीर्घकालीन फायद्यासाठी योग्य स्तरावर गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.”
 
बाजारातील अलीकडच्या चढ-उतारामुळे स्मॉल-कॅप शेअर्सच्या किमती आणि व्हॅल्युएशनमध्ये सुधारणा झाली आहे, ज्यामुळे या सेगमेंटमधील गुंतवणुकीचा दर आता अधिक वाजवी स्तरावर आला आहे. या बदलामुळे मूलभूतपणे भक्कम कंपन्या आता चांगल्या किमतीत उपलब्ध आहेत, जे आमच्या ‘बॉटम-अप’ गुंतवणूक पद्धतीसाठी योग्य आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना स्मॉल-कॅप क्षेत्रात गुंतवणुकीची संधी मिळावी यासाठी ही योजना एकरकमी गुंतवणुकीसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे.
 
योजनेच्या इतर सर्व अटी आणि शर्ती, तसेच रिस्क-ओ-मीटरमध्ये कोणताही बदल होणार नाही. गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करावी, कारण म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते आणि गुंतवणुकीपूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.