Home Blog Page 706

टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वन विभागाला निर्देश

पुणे

कोथरूड मधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले.  कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडे नष्ट झाली. याची गंभीर दखल घेत नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे आहे. शहरातील टेकड्या फुफ्फुसे असल्याने टेकड्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. हरित कोथरूडसाठी ६५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करुन, महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून, त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबी वैयक्तिक व्यवस्थेतून करण्यात आल्या आहेत. तसेच, याच्या देखरेखीसाठी सात माणसांची नेमणूक केली आहे.

मात्र, काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असून; म्हातोबा टेकडीवर शनिवारी तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्याने येथील वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.

नामदार पाटील म्हणाले की, टेकडी हा पुण्याचा श्वास आहे. टेकड्यांवर चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, कोथरूड मधील टेकड्यांवर काही टवाळखोर वनसंपदेचं नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन; कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले.

दरम्यान, या घटनेचं गांभीर्य ओळखून नामदार चंद्रकांतदादा पाटील सोमवारी सकाळी ७ वा. म्हातोबा टेकडीची पाहणी करणार आहेत. तसेच, अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. तसेच, वृक्ष संवर्धनासाठी पर्यावरण प्रेमींशी संवाद साधणार आहेत.

अनुभवातून रुजली कथाबिजे : विश्वास पाटील

पहिल्या रोटरी साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांचा उलगडला साहित्य प्रवास
पुणे : कोल्हापूरमधील छोट्याशा खेड्यात माझे बालपण गेले. भाषा शिक्षकांमुळे वाचनाची गोडी लागली. वडिलांच्या सल्ल्यामुळे लेखानाच्या क्षेत्रात प्रगती केली. शासकीय नोकरीत व्यस्त दिनचर्या असूनही लिखाणाची आवड असल्याने नेटाने लेखन केले. अनेक अनुभवातून मनात कथाबिजे रुजली गेली. त्या कथांमधून कैवल्याचा आनंद मिळाला, अशा भावना पहिल्या रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केल्या.
रोटरी क्लबतर्फे आयोजित पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याशी रोटेरियन वैशाली वेर्णेकर आणि रोटेरियन अभय जबडे यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर मधील छोट्याशा खेड्यात आपले बालपण गेले असल्याचे सांगून विश्वास पाटील म्हणाले, लेखनाला पूरक असे वातावरण गावात नव्हते; परंतु गावात निसर्गसौंदर्य मोठ्याप्रमाणात होते. गावाच्या एका बाजूला विशाळगड तर दुसऱ्या बाजूला पन्हाळगड होता. गुरे राखायला जाताना त्यांचे निरिक्षण करत असे. इतिहासाची आवड असल्याने गावातील लवलवत्या गवताच्या पात्यात मला शिवाजी महाराजांचे शूर सैनिक दिसत असत. शालेय वयातच वीर धवल कादंबरी वाचनात आली. यातून वाचनाची आवड निर्माण झाली. नववीत असताना एका वर्षात अडीचशेहून अधिक पुस्तके वाचली. शाळेतील मराठीचे शिक्षक उत्तम शिकवित असत; त्यामुळे अभ्यासाची गोडी वाढली. आई निरक्षर तर वडिल फक्त पाचवीपर्यंत शिकलेले होते; परंतु त्यांचा बाणा लढवय्या होता. त्यांच्या प्रेरणेनेच लघुकथा लिखाण सोडून कादंबरी लेखनाकडे वळलो.
खूप लहान वयातच भावलेल्या विषयांवर लिखाण सुरू केले. पुढे स्पर्धा परिक्षेत यश मिळाल्याने सरकारी अधिकारी झालो. अतिशय व्यस्त दिनचर्या असतानाही घरी गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ लेखनात घालवत असे. शनिवारी-रविवारच्या सुट्टीत जणू भूमिगत होऊन लिखाण करत असे. लिखाण करताना मी सरकारी अधिकारी असल्याचे दडपण न घेता विविध विषयांवर मोकळेपणाने लिखाण केले. त्यावेळी हात आखडता घेतला नाही. नाहीतर शब्द माझ्यावर प्रसन्नच झाले नसते, अशा भावनाही पाटील यांनी या वेळेला व्यक्त केल्या.
ऐतिहासिक लिखाण करण्यासाठी भरपूर वाचन केले, अभ्यास केला, घटनास्थळांना भेटी दिल्या. त्यामुळे मी केलेल्या ऐतिहासिक लिखाणात वास्तवता आली. तर काही प्रसंगांना प्रतिभेतून कल्पनेची जोड दिली.
सामाजिक लेखन करताना प्रत्यक्ष अनुभवांचा मोठा आधार लाभला. अधिकारी म्हणून कार्यरत असताना जनसंपर्क अफाट असल्याने अनेक अनुभव आले. त्यातूनच सामाजिक स्वरूपाचे लेखन झाले.
सरकारी नोकरीत असताना लेखक म्हणून सहकाऱ्यांनी कौतुक केले; परंतु अनेकदा मत्सरालाही सामोरे जावे लागले. परंतु वयाच्या अवघ्या 32व्या वष साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने त्यांची तोंडे बंद झाली. अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वाङ्मय चौर्य, जीवनातून उठविण्याचा प्रयत्नही झाला; परंतु त्यातूनही सहीसलामत बाहेर पडलो.
आजच्या वाचन संस्कृतीवर भाष्य करताना विश्वास पाटील म्हणाले, मराठी साहित्यावर अनेक आक्रमणे झाली; पण त्यातून मराठी भाषा तावून-सुलाखून बाहेर पडली आहे. आजचा जमाना रिल्सचा असला तरी सुजाण वाचक आत्म्याचा आवाज ऐकून पुन्हा एकदा साहित्य-संस्कृतीकडे वळतील असा आशावादही त्यांनी दर्शविला.

‘मराठीत बोलणार नाही’ म्हणत अरेरावी करणाऱ्मया एअरटेल टीम लीडरला मनसेने चोपले

पुणे- मराठीत बोलणार नाही म्हणत मराठी कर्मचाऱ्यावर अरेरावी करणाऱ्या एअरटेल कंपनीच्या एका टीम लीडरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने चोप दिला आहे. या घटनेमुळे मुंब्रा येथे घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली आहे.मुंब्रा येथे एका मराठी तरुणावर मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे माफी मागण्याची वेळ आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असताना पुण्यात एअरटेलच्या कार्यालयात असाच एक प्रकार घडला आहे. या प्रकरणात कंपनीच्या एका टीम लीडरने मराठी बोलणार नाही असे म्हणत मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय केला होता. वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. ही खबर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर गेली. त्यानंतर त्यांनी तत्काळ एअरटेलच्या कार्यालयात जाऊन सदर टीम लीडरला जाब विचारला. तसेच त्याला आपल्या पद्धतीने चोपही दिला.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, सदर टीम लीडर मराठी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. फ्लोअरवर हिंदीचे बोलायचे, मराठी बोलल्यास कामावरून कमी करणे, सनावारांना सुट्टी नाकारण, 2-2 महिने पराग न देणे असे प्रकार हा व्यक्ती करत होता. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. त्याची माहिती मिळताच शाहबाज अहमद नामक सदर व्यक्तीने पुन्हा त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली.

त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी एअरटेलच्या वाकडेवाडी परिसरातील कार्यालयात आपला मोर्चा वळवला. त्यांनी शाहबाज अहमदकडे या प्रकरणी जाब विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसेच येत्या सोमवारपर्यंत मराठी कर्मचाऱ्यांचे पगार जाले नाही, तर एकाचवेळी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील कंपनीचे कार्यालय फोडले जाईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी संबंधितांना दिला.

मुंब्रा प्रकरणात विशाल गवळी नामक एका मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे माफी मागण्याची वेळ आली होती. विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळे आणण्यासाठी गेला होता. त्याने फळविक्रेत्याकडे मराठीत फळांचा भाव विचारला. त्यावर फळविक्रेत्याने संतापून मला मराठी येत नाही, तू हिंदीत बोल असे त्याला सांगितले. त्यावर विशाल गवळीने महाराष्ट्रात राहून तुला मराठी येत नाही का? प्रतिप्रश्न केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान भांडणात होत असताना तिथे मोठा जमाव जमला. त्यानंतर जमावाने त्याला कान पकडत हिंदीत माफी मागण्यास भाग पाडले.

सैफी बिझनेस एक्स्पोचे पुण्यात शानदार उद्घाटन संपन्न

फत्तेचंद रांका, उमेश शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत एक्स्पोचा शुभारंभ

पुणे :-  दाऊदी बोहरा समाजातर्फे आयोजित सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो २०२५ चे पुण्यातील डेक्कन काॅलेज ग्राऊंड वर शनिवार ४ जानेवारीला  शानदार उद्घाटन संपन्न झाले। दाऊदी बोहरा समाजाचे परमपुज्य सैयदना मुफद्दल सैफुद्दीन साहब यांचे चिरंजीव  हुसैन बुऱ्हानुद्दीन यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या उद्घाटन समारोहाला किर्लोस्कर न्यूमेटिक्सचे चेअरमन राहुल किर्लोस्कर, आयकर आयुक्त डाॅ. नितिन वाघमोडे, पुणे व्यापारी महासंघाचे  अध्यक्ष फत्तेचंद रांका, भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख उमेश शाह यांच्यासह मोठ्या संख्येने दाऊदी बोहरा समाजाचे उद्योगपती-व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना एक-दुसऱ्यांसोबत कनेक्ट करण्याच्या उद्देशाने या बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आलेले आहे.

उद्घाटन सत्रापूर्वी पुण्याच्या दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने फत्तेचंद रांका आणि उमेश शाह यांना सन्मानित करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी एक्स्पोची पाहणी केली आणि विविध स्टाॅल्सना भेटी देऊन त्यांच्या व्यवसायांची माहिती घेतली.

सोमवार ६ पर्यंत चालणाऱ्या या बिझनेस एक्स्पोमध्ये पुणे आणि महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील तसेच विदेशातून आलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांचे स्टाॅल्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये एमएसएमईज, स्टार्टअप्स, वुमेन आंत्रप्रेन्योर, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, एज्युकेशनल इन्स्टीट्यूट्स, हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोफेशनल्स यांचे १७० स्टाॅल्स आहेत।

पहिल्याच दिवशी बोहरा समाजाच्या नागरिकांसह सर्वसामान्य पुणेकरांनी भेट देणे सुरू केले. येथे आल्यानंतर नागरिकांनी विविध स्टाॅल्सवर जाऊन विविध वस्तूंची माहिती घेतली यामध्ये फर्निचर, हार्डवेअर, गृह सजावटीच्या वस्तूंची खरेदीदेखील केली. एक्स्पोसंदर्भात दाऊदी बोहरा समाजाच्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

हरित आणि प्रदूषणमुक्त पुणे करण्याच्या उद्देशाने एक्स्पोच्या आयोजकांकडून या एक्स्पोला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वृक्ष भेट देण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

बिझनेस एक्स्पो संदर्भात बोलताना फत्तेचंद रांका म्हणाले की, दाऊदी बोहरा समाज हा नेहमीच उद्योग-व्यापारात अग्रगण्य राहिला आहे. या बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून या समाजाची उद्यमशीलता आणखीनच चांगल्याप्रकारे समोर आली आहे. हा एक्स्पो विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देणारा आहे. या एक्स्पोमध्ये देशभरातील विविध मॅन्यूफॅक्चरर्सचे आणि वस्तूंचे स्टाॅल्स लागलेले आहेत. याचा फायदा रिटेलर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने या एक्स्पोला पूर्ण सहकार्य देण्यात आलेले आहे.

उमेश शहा म्हणाले की, सैफी बुरहानी एक्स्पो हा दाऊदी बोहरा समाजाचा एक अनोखा व्यावसायिक उपक्रम आहे. दाऊदी बोहरा समाजाने या माध्यमातून आपल्या व्यावसायिक कार्याला एका उंचीवर नेण्याचे कार्य केले आहे. या एक्स्पोमधून पुण्याच्या व्यापार-उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी या एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

शेतकऱ्यांच्या धरतीवर कर्जबाजारी रिक्षा चालकांचे कर्ज माफ करा

आत्महत्याग्रस्त रिक्षा चालकाच्या कुटुंबास वीस लाखाची आर्थिक मदत देण्याची मागणी

पिंपरी-

सावकाराच्‍या त्रासाला कंटाळून साईबाबा नगर चिंचवड स्टेशन येथील रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्‍महत्‍या केल्‍याची घटना घडली. त्‍या बाबत संबंधीत सावकारावर कठोर कारवाई हवी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. त्‍याबरोबरच शासकीय पातळीवरच रिक्षा चालकांना आधार मिळावा, यासाठी धोरण हवे, असे प्रतिपादनही बाबा कांबळे यांनी केले.

पिंपरीत नुकतेच रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्‍महत्‍या केल्‍याची घटना माध्यमांद्वारे समोर आली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या घटनेचा निषेध व्‍यक्‍त केला. प्रसिद्धीपत्रकात कांबळे यांनी नमूद केले की, रिक्षा चालकांच्‍या अन्‍यायाला अनेक जण कारणीभूत आहेत. ओला उबेर सारख्या कंपन्‍या एकूण भाड्याच्या ४० टक्‍के कमिशन घेते. त्‍यामुळे दिवसभर रिक्षा चालवूनही रिक्षा चालकांच्‍या हाती तुटपुंजी रक्‍कम येते. त्‍यामुळे अशा भांडवलदार कंपन्यांवर कंपन्‍यांवर कारवाई करा. शासनाने मुक्त रिक्षा परवाना धोरण सुरू केले आहे. त्‍यामुळे शहरात पुर्वी पाच हजार रिक्षांची असणारी संख्या सध्या ४० हजारांवर पोचली आहे. त्‍यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि नफाही होत नाही. त्‍यामुळे मुक्‍त रिक्षा परवाना हे धोरण बंद करा, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली. इलेक्ट्रिक रिक्षाला देखील परमिटच्या कक्षेत आणा. इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट नसल्यामुळे नव्याने इलेक्ट्रिक रिक्षांची देखील संख्या वाढत आहे. त्‍यांना आळा घालण्याची मागणी बाबा कांबळे यांनी केली.

यावर आळा न घातल्‍याने रिक्षा चालक-मालकांच्‍या हाती काहीच नफा उरत नाही. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते सावकाराचे अथवा खासगी बँकांकडून जादा व्‍याज दराने कर्ज घेतात. त्‍याची परतफेड करणे शक्‍य न झाल्‍याने रिक्षा चालकांवर आत्‍महत्‍या करण्याची वेळ येत आहे. हे होऊ नये, यासाठी शासनाने लक्ष देणे आवश्‍यक आहे, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.

रिक्षा चालकांचे कर्ज सरसकट माफ करा –
रिक्षा चालकांचे कर्ज माफ करा, अशी भूमिका बाबा कांबळे यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले. त्याच धर्तीवर कर्ज बाजारीपणाला कंटाळून रिक्षा चालक आत्महत्या करत आहेत. त्यांच्‍याही डोक्‍यावरचे सरसकट कर्ज माफ करा. रिक्षा चालकांच्या कुटुंबाला वीस लाख रुपये आर्थिक मदत द्या, असे आवाहन कांबळे यांनी शासनाला केले.


रिक्षा चालकांच्‍या आत्‍महत्‍या होऊ नयेत, यासाठी शासनाने पाऊले उचलावीत. सरकारी बँकांमध्ये कमी व्‍याजदारात कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच मुक्‍त रिक्षा परवाना बंद करावा. इलेक्‍ट्रिक रिक्षांना परमिट सक्‍तीचे करावे. ओला उबेर कंपन्‍यांवर कारवाईचा बडगा उगारावा. यासह रिक्षा चालकांच्‍या मृत्‍युला कारणीभूत असलेल्‍या सर्वांवर कडक कारवाई करावी.

  • बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंयाचत.

विचार भिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही आपली समस्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  • पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवा निमित्त विशेष गौरव

पुणे : देशात विचार भिन्नता ही समस्या नाहीये. तर विचार शून्यता ही समस्या आहे. आपली कशा सोबत बांधिलकी आहे, हे लोकांना माहीत असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचा माणुस म्हणून विचार करायला हवा जो केला जात नाही. अलीकडे सत्ता येईल तिकडे नेते पळतात, सत्ता गेली की तिथून दुसरीकडे उड्या मारतात, जीवनात पैसा हा महत्त्वाचा असला तरी सर्वस्व नाही. त्याच प्रमाणे आरोग्यालाही महत्त्व द्यायला हवे असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

मराठा सेवा संघ व युगनायक मा. पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव गौरव समिती यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय घोगरे (अध्यक्ष मराठा सेवा संघ,महाराष्ट्र,अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव समिती) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर,माधवराव पाटील शेळगावकर, ज्येष्ठ कवि इंद्रजित भालेराव, कर्नाटक मधील आमदार डॉ. मारोतराव मुळे, माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके, व्यंकटराव गायकवाड (निवृत्त सचिव जलसंपदा विभाग), हेमंतकुमार देशमुख (मुख्य अभियंता), विठ्ठलराव गायकवाड, गिरीश जोशी (मुख्य अभियंता, अमरावती), आमादार शंकर जगताप, राजेंद्र पवार, रवींद्र माळवदकर, माजी आमदार विलास लांडे,राजेंद्र डूबल आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मदन पाटील लिखित ‘क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, समाजातील अस्पृश्यता, जातीयता, विषमता संपुष्टात आली पाहिजे. कारण तुमची गुणवत्ताच तुम्हाला श्रेष्ठ बनवते. ज्यामुळे जातपात, भाषा, राज्य आणि पंथाच्या पलीकडे जावून तुम्हाला ओळख मिळते. ही गुणवत्ता ज्ञानातून मिळते. आज जर भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर ज्ञान महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मी माझ्या आई – वडिलानंतर शिवाजी महाराजांना मानतो. कारण प्रत्येक पायंड्यांवर त्यांच्या सारखा आदर्श राजा दुसरा कोणी नाही. ते खऱ्या अर्थाने सेक्युलर होते. कारण सर्वधर्म समभाव असणारे ते एकमेव राजे होते. त्यांनी स्वराज्याचा विस्तार करताना दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडली नाहीत, कोणत्याही महिलांवर अन्याय, अत्याचार केले नाहीत असेही गडकरी यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेतला, एक शासकीय अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून सामाजिक संघटन कसे वाढविले व नोकरीत असताना तरुणांना रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून दिल्या याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर बनबरे यांनी केले. ‘क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे विवेचन इंद्रजीत भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा खेडेकर यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना – अनुश्री पाटील यांच्या जिजाऊ वंदनेने झाली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ खेडेकर,संतोष शिंदे,उत्तम कामठे,अविनाश मोहिते,चंद्रशेखर घाडगे,मनोज गायकवाड,अविनाश घोडके,प्रशांत धुमाळ यांनी केले.

समाजातील ११ कर्तृत्ववान ज्येष्ठ मातांचा सन्मान

पुणे : आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्यांना शिक्षण देत उंच आकाशात भरारी घेण्याची स्वप्न पाहणारी आई…आपल्या सारखे दिवस आपल्या लेकरांनी पाहू नये यासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करणारी आई आपल्या मुलांसाठी देवतास्वरुप असते…अशा समाजातील कर्तृत्ववान मातांचा सन्मान सोहळा साजरा झाला. आईचा सन्मान करत मुलांनी आईला पेढा भरविण्याचा हृदयस्पर्शी क्षण उपस्थितांनी यावेळी डोळ्यात साठविला.
मातृगौरव न्यास, ज्ञानेश्वरी वाचन मंदीर, अखिल मंडई मंडळ, सेवा मित्र मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने ११ कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे यंदा २५ वे वर्षे होते. अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी लीला गांधी, भालचंद्र पुरंदरे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे हर्षद झोडगे, विनायक मोडक, दत्ता सागरे, पराग ठाकूर यावेळी उपस्थित होते. शेखर कोरडे, विश्वास भोर, अनील रुपनूर, सारंग सराफ यांनी संयोजनासाठी सहाय्य केले. स्मृतिचिन्ह, महावस्त्र, श्रीफळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते.
श्रीदेवी हवालदार, कुमुदिनी गुजराती, शुभलक्ष्मी डाखवे, सिंधू डेंग, पार्वतीबाई चव्हाण, सुभद्राबाई लांडे, शालिनी यादव, जयश्री परचुरे, सीता जावळकर, माधुरी मुकेरकर, रत्नप्रभा मुंगळे या मातांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सुचित्रा खुटवड, अंजली घुले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
भालचंद्र पुरंदरे म्हणाले, सर्व मातांच्या चरित्रांचे शब्दांकन करुन त्याचा ग्रंथ करायला हवा. पुढच्या पिढीला हे ग्रंथ मार्गदर्शनाचे काम करतील. तरुणांनी देखील यातून प्रेरणा घ्यायला हवी. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश पोटफोडे यांनी आभार मानले.

ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवली हिंदी-मराठी गीतांची सुरेल संध्याकाळ

निसर्गछाया ज्येष्ठ नागरिक केंद्राच्या वतीने आयोजन ; गायक  जितेंद्र अभ्यंकर आणि स्वरदा गोडबोले यांचे सादरीकरण 
पुणे : ‘विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे,’ ‘ऋतु हिरवा,’  ‘मोह मोह के धागे,’ ‘बाहो में चले आओ,’ ‘पुकारता चला हूँ मैं,’ आणि ‘अभी न जाओ छोड़कर’ या हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणांनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. गायक व संगीतकार जितेंद्र अभ्यंकर आणि स्वरदा गोडबोले यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भूगाव येथील “निसर्गछाया”   ज्येष्ठ नागरिकांच्या केंद्रात संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या संगीतमय मैफलीचा आस्वाद घेतला. केंद्राच्या संचालिका अमृता देवगांवकर आणि मंदार देवगांवकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 ‘अश्विनी ये ना,’ ‘धुंदमधुमती नाच रे नाथ रे,’ ‘कानडा राजा पंढरीचा, देहाची तिजोरी,’ आणि ‘कळीदार कपुरी पान’ या मराठी गाण्यांबरोबरच ‘गाता रहे मेरा दिल,’ ‘होठों पे ऐसी बात,’ ‘इन्ही लोगो ने,’ या गीतांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. ज्येष्ठ नागरिकांकरिता पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संचालिका अमृता देवगांवकर यांनी सांगितले. 

…तर धनंजय मुंडेला रस्त्याने फिरु देणार नाही:परभणीतील मोर्चात मनोज जरांगे संतापले; घरात घुसून बाहेर काढण्याचा इशारा

परभणी- धनंजय देशमुख हे पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना धमकी देण्यात आली. मात्र, यापुढे त्यांच्या कुटुंबीयांना आणि धनंजय देशमुखांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने देखील फिरु देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आजपर्यंत आम्ही त्यांचे नाव देखील घेतले नाही. मात्र देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर एकाला देखील रस्त्याने फिरू देणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या पुढच्या काळात लोकांना त्रास दिला तर परभणी जिल्हा असो किंवा धाराशिव जिल्हा, त्यांना फिरु देणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. परभणीमध्ये आयोजित सर्वपक्षीय मूक मोर्चात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आम्हाला माज किंवा मस्ती नाही. मात्र जर आमची लेकरे उघड्यावर पडत असतील तर आम्ही थांबणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यात नेमके कोणी सांभाळले? सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ​​​​​​सरकारमधील मंत्रीच आरोपींना सांभाळत असल्याचे दिसते, असा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.

आम्ही संतोष देशमुख यांना न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. हे नवीन षडयंत्र असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मात्र, यातील एकही आरोपी बाहेर आला तर सरकारला सोडणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आमच्या समाजावर अन्याय होत असेल तर आम्हाला त्यांना घरात घुसून बाहेर काढावे लागणार आहे. आता आमच्या समोर दुसरा कोणताच मार्ग नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सहन करायची देखील एक सीमा असते. आपणच संयम का ठेवायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. समाजावरती आणि माता माऊलींवर अन्याय होत असेल तर जशाला तसे उत्तर द्यायचे, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले आहे.

संदीप क्षीरसागर, आणि सुरेश धस यांच्या भूमिकेवर देखील मनोज जरांगे यांनी विश्वास व्यक्त केला. याच नाही तर कोणत्याही पक्षाच्या आमदाराने आपली बाजू घेतली तर महाराष्ट्रातील मराठा समाजाने त्या नेत्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

अजितदादा,क्या हुआ रे तेरा वादा…

परभणी-भाजपचे बीडच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी संतोष देशमुख हत्याकांडावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. अजितदादांच्या वादाचे काय झाले? त्यांनी यांना (धनंजय मुंडे) आतमध्ये (मंत्रिमंडळात) का घेतले? त्यांनी बीडमधील संगीत दिघोळेपासून संतोष देशमुखांपर्यंतच्या हत्यांची बेरीज करून हिशेब करावा. या हत्या कुणी केल्या? त्यांचा मास्टरमाइंड कोण? हे त्यांना माहिती नसेल तर त्यांनी आपली माणसे आमच्याकडे पाठवावी. त्यानंतर त्यांना बीडमध्ये अठरा पगड जातींना कोणती वागणूक मिळते हे समजेल, असे ते म्हणाले.

संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मस्साजोग प्रकरण व पीकविमा घोटाळ्यावरून थेट निशाणा साधला. विशेषतः त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून त्यांनी अजित पवारांवरही उपरोधिकपणे टीका केली.

सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आका व आकाच्या आकाचे काय – काय सांगावे? सरकारने या प्रकरणी माझ्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील एखादा आरोपी चुकून पोलिसांच्या चौकशीतून सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकेल. या आरोपींना मोका लागला पाहिजे. या आरोपींना एकदा मोका लागला की, ते 4-5 वर्षांसाठी आत जातील. त्यानंतर ते पुन्हा माघारी येणार नाहीत. या प्रकरणातील आका आत गेलाच पाहिजे. पण आकाच्या आकानेही या प्रकरणी काही केले असेल तर तो ही आत गेल्याशिवाय राहणार नाही.

या लोकांचे लफडे माणसे मारण्याचे आहेत. त्यांनी अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांना मारले. इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारले होते, त्याच पद्धतीने हाल – हाल करून संतोषला मारण्यात आले. त्यांनी यांचे एवढे काय बिघडवले होते? एका दलित समाजाच्या पोराची बाजू घेतल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ आकाने किंवा त्याच्या आकाने पाहिला असेल तर त्यांनी तुरुंगात जावेच लागेल. आकाच्या आकाने (धनंजय मुंडे) यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पण त्यांनी अगोदरच आपल्या लोकांना नीट वागण्यास का सांगितले नाही हा माझा प्रश्न आहे.

सुरेश धस यांनी यावेळी क्या हुआ तेरा वादा म्हणत अजित पवारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, अजितदादा, तेरा वादा क्या हुआ रे. काय कू इसको अंदर लिया. ये अंदर लेने जैसा नहीं हैं. तुम्ही संगीत दिघोळेपासून संतोष देशमुखांपर्यंतच्या हत्यांची बेरीज केली तर तुम्हाला हिशेब समजेल. या हत्या कुणी घडवल्या? त्याचा मास्टरमाइंड कोण? कुणी हे उद्योग केले? हे तुम्हाला माहिती नसेल, तर परभणीला तुमची माणसे पाठवा. बारामतीची माणसे आमच्याकडे पाठवा. त्यानंतर तुम्हाला बीडमध्ये अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते हे तुम्हाला समजेल.

रत्नाकर गुट्टे आज या मोर्चाला आले नाही. त्यामुळे ते या प्रकरणी दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सिद्ध होते. त्यांचे हे वागणे चांगले नाही. मी अजित पवारांना प्रकाश सोळंके, राजेश विटेकर यांना मंत्री करण्याची सूचना केली होती. ते ही जमत नसेल तर बुलढाण्याच्या कायंदेला मंत्री करा असे सांगितले होते. आमचा जिल्हा बिनमंत्र्यांचा राहिला तरी काही फरक पडत नाही.

सुरेश धस यांनी यावेळी पीकविमा घोटाळ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, परभणी जिल्ह्यातील 40 हजार हेक्टरवर पीकविमा भरण्यात आला आहे. राहुल पाटील यांचा मतदारसंघ शहरी आहे. पण त्यांनीही आपल्या मतदारसंघात हा घोटाळा झाला आहे का? हे तपासून पहावे. राजेश विटेकर यांच्या सोनपेठ तालुक्यातही 13 हजार 190 हेक्टरवर पीकविमा भरण्यात आला.

या लोकांनी बंजारा समाजाच्या लोकांचा गैरवापर केला. त्यांना हे लोक निवडणुकीपूरते चालतात, पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आली की त्याकडे दुर्लक्ष करतात. परळी तालुक्यातील लोकांनी सोनपेठ तालुक्यात पीकविमा भरला. हा घोटाळा करणाऱ्यांवरही सरकारने मोकाची कारवाई केली पाहिजे. राजेश विटेकरांवर कुणाचा तरी दबाव आहे. त्यामुळे ते या प्रकरणी बोलत नाहीत. पण त्यांनी हा दबाव झुगारून पत्रकार परिषद घेऊन या विषयाला वाचा फोडली पाहिजे. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगले पाहिजे. दुसऱ्यांच्या जमिनीवर पीकविमा भरणे हा नवा परळी पॅटर्न सुरू झाला आहे.

सुरेश धस यांनी यावेळी परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेचा मुद्दाही उपस्थित केला. परळीच्या राखेचा प्रश्न सोडवण्यासाठी आकाच्या आकाच्या नेतृत्वात एक बैठक लावण्यात आली होती. ही राख परभणीच्या सोनपेठपर्यंत उडत येते. ती गंगाखेडपर्यंतही पोहोचते. परभणीतही येते. हे लोक या राखेची हैदराबादपर्यंत उघडी वाहतूक करता. त्यामुळे त्याचा त्रास त्या भागातील नागरिकांना होतो.

हे लोक अवघे थर्मलच उपसून नेत आहेत. या लोकांचा परळी थर्मलमध्ये नंगानाच सुरू आहे. तेथील काही अधिकारी रिटायर होईपर्यंत एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. सरकारी कर्मचारी एका ठिकाणी 20 वर्षे राहतात का? पण परळीत हे होताना दिसते. परळीचा हा पॅटर्न सरकारने महाराष्ट्रभर राबवावा अशी विनंती मी सरकारकडे करणार आहे, असे ते उपरोधिकपणे म्हणाले.

दरम्यान, सुरेश धस यांनी यावेळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. प्रस्तुत प्रकरणात अशोक घोरबांड नामक एक कुणीतरी पीआय आहे. तो स्वतःला एसपी समजतो. अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो. हा जिथे जातो तिथे काहीतरी करतो, अशी तक्रार आहे. त्यामुळे हा घोरबांड केवळ निलंबित होऊन चालणार नाही. त्याला सेवेतून काढून टाकण्याची गरज आहे. त्याची न्यायालयीन चौकशीही झाली पाहिजे. माझा त्याला पाठिंबा असेल, असे सुरेश धस म्हणाले.

भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे लक्तरे दूर झाली असे नाही – ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली खंत

पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे उत्स्फूर्त प्रतिसादात उद्घाटन

पुणे : मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण प्रत्यक्षात मराठी भाषेची लक्तरे तशीच आहेत. शहरे, गावे, खेडी, वस्त्यांमधून मराठी भाषेची विदारक वस्तुस्थिती लक्षात घेऊन, योग्य उपाययोजना करायला हव्यात, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी शनिवारी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. काही कोटी रुपये मिळाले म्हणजे भाषा समृद्ध होत नसते, त्यामुळे अनावश्यक हुरळून जाण्याची गरज नाही, अशा शब्दातही त्यांनी कान टोचले.
सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते आज (दि. 4) झाले. त्या वेळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून विश्वास पाटील बोलत होते.

कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजीव बर्वे, मधुमिता बर्वे, रोटरीचे प्रांतपाल शीतल शहा, रागिणी शहा, उपप्रांतपाल मोहन पालेशा, अभय गाडगीळ, यजमान क्लब अध्यक्ष सूर्यकांत वझे, तसेच संमेलनाचे सह आयोजन करणाऱ्या रोटरीचे अन्य पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले.

विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषेच्या परंपरेचा आढावा घेत आणि बुजुर्ग लेखकांची उदाहरणे देत मराठी भाषेच्या वास्तवाचे दर्शन घडवले. ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकरांनी मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी भीक मागते आहे आणि तिच्या अंगावर लक्तरे आहेत, असे विधान केले होते. त्याचा संदर्भ देत पाटील यांनी, मराठी भाषेच्या अंगावरील लक्तरे अद्यापही तशीच आहेत, अशी टीका केली. “अभिजात दर्जा मिळाला म्हणून लगेच मराठी समृद्ध झाली, असे नाही. मराठीच्या समृद्धीसाठी आधी खेड्यातून, गावांतून शाळा, ग्रंथालयांमधून प्रयत्न झाले पाहिजेत. तिथे दयनीय अवस्था आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. ग्रंथपालांना लाजीरवाणे मानधन दिले जाते. मराठी भाषेतील ग्रंथव्यवहार चिंताजनक आहे. साहित्याचा आवाज हा मानवी आत्म्याचा आवाज असतो आणि भाषेच्या माध्यमातून तो अभिव्यक्त होतो. ती भाषा जपली पाहिजे, वाढली पाहिजे, व्यवहारात आली पाहिजे, ज्ञानभाषा झाली पाहिजे. भाषा आणि ती बोलणारी, लिहिणारी, वाचणारी माणसे, हे मोठे बळ असते. पण आज मराठी भाषा ते सामर्थ्य हरवून बसली आहे. एके काळी साहित्यिकांच्या शब्दांना शस्त्रांचे बळ होते, ते पिढ्यांना प्रेरणा देत होते. आता तेच शब्द जातीपातीत अडकून पडले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठी माणसांनी आपली दृष्टी विशाल केली पाहिजे. त्यासाठी संशोधनाची गरज आहे. केंद्राने दर्जा दिला, काही कोटी रुपये मिळतील. अंगावर घालायला कोट दिला आहे, पण त्यातून गंजिफ्रॉकची भोके लपत नाहीत, ती दडवण्यात अर्थ नाही, असे ते म्हणाले. ‌‘लाडक्या बहिणींना जरूर साह्य करा पण आपल्या मराठी भाषा, संस्कृतीसाठी कष्ट करणाऱ्या, झटणाऱ्यांचाही गांभीर्याने विचार करा‌’, असा सल्लाही पाटील यांनी दिला.
चंदू बोर्डे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्यांविषयी कौतुकाचे उद्गार काढले. रोटरीने या संमेलनाच्या निमित्ताने भाषा, साहित्य, संस्कृतीच्या विश्वातही नवी दिशा देणारे, प्रेरक आणि नव्या पिढीला भाषेकडे आकर्षित करणारे काम करावे, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी भविष्याचा वेध घेणारा नवा उपक्रम, अशा शब्दांत रोटरीच्या साहित्य संमेलनाचे स्वागत केले. राज्य सरकारतर्फे मराठी भाषा विभाग, मराठी भाषा भवन, मराठी विद्यापीठ, मराठी वाचन पंधरवडा, ग्रंथ उत्सव, शैक्षणिक शुल्कमाफी असे अनेक उपक्रम भाषेच्या संदर्भात सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आता ज्ञान हाच वारसा आहे, तीच खरी मालमत्ता आहे, संपत्ती आहे आणि भाषेच्या, साहित्याच्या माध्यमातून ती प्राप्त करता येते. संमेलनासारखे उपक्रम यासाठी महत्त्वाचे ठरतात, असेही ते म्हणाले.
कार्याध्यक्ष राजीव बर्व्ो यांनी संमेलनामागील भूमिका सांगताना अभिजात दर्जा मिळणे, ही जबाबदारी वाढल्याची जाणीव असल्याचा उल्लेख केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आणि वाचनसंस्कृतीचा बळ मिळावे आणि चांगला समाज घडवण्यासाठी पाठबळ मिळावे, हा संमेलनामागील हेतू आहे‌’, असे ते म्हणाले.

स्वागताध्यक्ष विनोद जाधव म्हणाले, भाषा आपल्या अस्मितेशी, अस्तित्वाशी आणि जगण्याशी निगडीत असते. व्यवहारात मराठी भाषा वाढावी, अधिकाधिक व्यापक अनुभवविश्व भाषेतून व्यक्त व्हावे आणि मराठीचा प्रसार वाढावा, त्यासाठीच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहू.
मोहन पालेशा म्हणाले, रोटरीने सदैव सामाजिक बांधीलकी जपत कार्य केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने भाषिक मैत्र दृढ व्हावे, ही अपेक्षा आहे. सूर्यकांत वझे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
यावेळी रोटेरियन आणि लेखक म्हणून उत्तम योगदान देणाऱ्या दीपक शिकारपूर, सुधीर राशिंगकर आणि अभिजीत जोग यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कविता अभ्यंकर यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेश वंदना सादर केली.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला:3 जवान शहीद, 3 जखमी

10 दिवसांपूर्वीही अपघातात 5 जवानांचा मृत्यू झाला होता
श्रीनगर :जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी दुपारी लष्कराचा एक ट्रक खाडीत पडला. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला. 3 जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एसके पायीन भागात हा अपघात झाला. येथे ट्रक रस्त्यावरून घसरला आणि खाडीत पडला. बचावकार्य सुरू आहे. या घटनेचा तपशील काही वेळानंतर लष्कराच्या प्रवक्त्यांकडून जाहीर केला जाऊ शकतो.यापूर्वी 24 डिसेंबर रोजी पुंछ जिल्ह्यात लष्कराची व्हॅन 350 फूट खोल दरीत पडली होती. व्हॅनमध्ये 18 सैनिक होते. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला होता. अपघातात सहभागी झालेले सर्व जवान 11 मराठा रेजिमेंटचे होते.

लष्कराने सांगितले की, ताफ्यात 6 वाहने होती, जी पुंछ जिल्ह्याजवळील ऑपरेशनल ट्रॅकवरून बनोई भागाकडे जात होती. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन खाडीत कोसळली.यापूर्वी नोव्हेंबरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जवान शहीद झाले होते. 4 नोव्हेंबर रोजी राजौरी येथे झालेल्या अपघातात दोन जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्याच वेळी, 2 नोव्हेंबर रोजी रियासी जिल्ह्यात तीन जवानांची कार खड्ड्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे दि. ०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक महिला संघटनेच्या प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ४ थे महिला धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधींचे चार गट स्थापन करणार असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन IAS अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांनी केले. तसेच, बैठकीमध्ये श्रीमती मिनी बेदी डेव्हलपमेंट सपोर्ट टीम, श्री. शिरीष फडतरे उपाध्यक्ष मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर, श्रीमती सुधा कोठारी चैतन्य संस्था, श्रीमती वसुधा सरदार कार्यकारी विश्वस्त नवनिर्माण न्यास यांनी आपले विचार मांडले.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या बैठकीमध्ये असे सांगितले की, “महिला धोरणाची अमंलबजावणी योग्यप्रकारे होणे आवश्यक आहे. तसेच यामधील विविध टप्प्यांवर शासन व सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे. तसेच, चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शासन गंभीर आहे. जिल्ह्यामध्ये विकासाच्या अनुषंगाने जिल्हा विकास समिती असते तशी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा महिला विकास समिती स्थापन कराण्यासाठी प्रयत्न करणार. या समितीमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या महिला प्रतिनिधी असतील व प्रत्येक तीन महिन्यातून एकदा या समितीची बैठक व्हावी व महिलांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती करण्याबाबत प्रयत्न केले जातील.”

श्रीमती मिनी बेदी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शहरी भागामध्ये महिलांचे बचत गट स्थापन करण्यासाठी येत असलेल्या अडचणी बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, पुणे शहरातील महिला बचत गट यांची सविस्तर प्रशासकीय व आर्थिक माहिती वेबसाईटद्वारे सार्वजनिक केलेली आहे. यामध्ये या महिला बचत गटांची सर्व माहिती बँकांनाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असे सांगितले. श्री. शिरीष फडतरे यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षण व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये त्यांनी राज्यातील ३५०० शाळा व कॉलेजेस यांच्या फी ठरवण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यांनी राबवलेली सुंदर माझी शाळा या उपक्रमाबाबत सांगितले. तसेच, सर्व महिलांनी चांगले शिक्षण घ्यावे व आपण करत असलेल्या चांगल्या कामाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करावा यावर जोर दिला. महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर, श्रीमती सुधा कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ग्रामीण स्तरावरती ग्रामपंचायत विकास समिती स्थापन करावी. तसेच, महिला धोरणाचे अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने या समितीमध्ये सविस्तर निर्णय घेण्यात यावेत. या समितीमार्फत चांगली कामे होऊ शकतात हा विश्वास महिलांमध्ये जागृत करणे आवश्यक आहे.

श्रीमती वसुधाताई सरदार कार्यकारी विश्वस्त नवनिर्माण न्यास यांनी आपल्या मनोगतामध्ये स्त्रियांचे आरोग्य व दर्जेदार आहार मिळावा याबाबत सविस्तर विवेचन केले. अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करत असताना अन्नधान्याचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. रासायनिक खतांच्या वापरामुळे नागरिकांच्या शरीरातील अनेक संस्था अकार्यक्षम होत आहेत यावरती त्यांनी भर दिला. महिलांच्या घरगुती कामाचेही आर्थिक मूल्यमापन व्हावे असा विचार त्यांनी यावेळी मांडला.

श्रीमती रसिका चिट्ठी गुप्ता यांनी त्या करत असलेल्या एकल महिला व कातकरी समाजाच्या महिलांच्या प्रश्नांबाबत आपले विचार मांडले. तसेच या महिलांकडे कोणतीही शासकीय कागदपत्रे नाहीत व त्यांना शासकीय कार्यालयापर्यंत जाण्यामध्ये येणाऱ्या अडचणीबाबतचा मुद्दा मांडून लक्ष वेधले. श्रीमती गायत्री पाठक यांनी बालगृहातून बाहेर पडलेल्या मुले व मुलींच्याबाबतचे प्रश्न सविस्तरपणे मांडले.

यावर पुढे बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “अनाथ बालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कमिटी स्थापित केली जाईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचे सहकार्य लाभेल असा मला विश्वास आहे.”

यावेळी बारामती, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेतील प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली 2025 चा मसुदा नागरिकांच्या विचारार्थ प्रकाशित, 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत अभिप्राय / सूचना पाठवण्याचे आवाहन

मुंबई- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, 2023 (DPDP Act) च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, 2025 चा मसुदा तयार केला आहे. नागरिकांच्या डिजिटल स्वरुपातील वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत करण्याच्या हेतूने ही नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये आवश्यक तपशील आणि कारवाईबाबतचा मसुदा यांचा समावेश आहे. संबंधित नागरिकांनी या नियमावलीच्या मसुद्याविषयीचे आपले अभिप्राय आणि सूचना सादर कराव्यात असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.  

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, 2025 मसुदा पाहण्यासाठी येथे क्लिक करा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली 2025 मधल्या नियमांबाबतचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

SARAL मसुद्याप्रमाणेच या मसुद्यात सोपी भाषा, अनावश्यक विरोधी संदर्भ टाळणे, संदर्भ व्याख्या व उदाहरणे इत्यादी तत्त्वे अनुसरण्यात आली आहेत.  हे नियम वाचून, समजून घेण्यासाठी  ही नियमावली सुलभ स्पष्टीकरणासह

मसुदा नियमावलीवर दृष्टीक्षेप

मसुद्याच्या नियमावलीमध्ये विविध अंमलबजावणी पैलूंच्या, जसे की  डेटा फिड्युशियरीद्वारे प्रत्येक व्यक्तींना सूचना,  नोंदणी आणि संमती  व्यवस्थापकासाठीची  दायित्वे, अनुदान जारी करण्यासाठी वैयक्तिक डेटाची प्रक्रिया, लाभ, सेवा इ., तसेच राज्यांनी व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक डेटाच्या उल्लंघनाची पूर्वसूचना देऊन त्यांना त्यांच्या  वैयक्तिक अधिकार बजावण्याच्या तरतुदींबाबतचे तपशील पुरवून सुरक्षा सावधगिरीसाठी लागू करण्यासंबंधीचे योग्य नियम, बालक किंवा दिव्यांग व्यक्तीच्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया, डेटा संरक्षण मंडळाची स्थापना, नियुक्ती आणि बोर्डाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नोकरीच्या परिस्थिती, डिजिटल कार्यालय म्हणून मंडळाचे कामकाज, अपील न्यायाधिकरणाकडे अपील करण्याची प्रक्रिया, अशा इतर गोष्टींचा समावेश असतो.

मसुदा नियमांसाठी अभिप्राय/टिप्पण्या

या संदर्भात, खालील लिंकवर MyGov पोर्टलद्वारे अभिप्राय/टिप्पण्या नोंदविता येऊ शकतील: https://innovateindia.mygov.in/dpdp-rules-2025  त्या सादर करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2025 अंतिम तारीख आहे.

भारताच्या राष्ट्रपतींची संमती प्राप्त झालेला DPDP कायदा डिजिटल वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेबाबत नियमांच्या चौकटीची आखणी करतो. यामुळे कायदेशीर बाबींसाठी अशा वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्याच्या गरजेसह वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्याच्या व्यक्तीच्या अधिकाराचे संतुलन करतो.

ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार:पॉर्न स्टारला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याचे प्रकरण

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने 50 राज्यांमधील 538 जागांपैकी 312 जागा जिंकल्या आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना कडवी झुंज देऊनही केवळ 226 जागा जिंकता आल्या. निवडणुकीत एकूण 538 जागा होत्या. बहुमतासाठी 270 चा आकडा आवश्यक आहे.आता डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा 20 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटल बिल्डिंगमध्ये होणार आहे. परंपरेनुसार, कॅपिटल इमारतीत येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेण्यासाठी व्हाईट हाऊसला भेट देतील.

वाशिंग्टन –अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी नव्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. NYTच्या म्हणण्यानुसार, पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला सायलेंट करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. शुक्रवारी, या प्रकरणातील न्यायाधीश, जुआन मार्चेन यांनी सांगितले की, शिक्षेच्या वेळी ट्रम्प वैयक्तिकरित्या किंवा व्हर्च्युअली न्यायालयात हजर राहू शकतात.
गेल्या वर्षी मे महिन्यात मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांच्यावर 34 आरोप निश्चित केले होते, ज्यात पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे देण्याच्या आरोपाचा समावेश होता. हे पैसे 2016 मध्ये देण्यात आले होते जेणेकरून स्टॉर्मीने तिचे ट्रम्पसोबतचे लैंगिक संबंध सार्वजनिक करू नयेत.

ट्रम्प यांनी मर्चंटला कट्टरपंथी आणि पक्षपाती म्हणून वर्णन केले आणि म्हटले-हा बेकायदेशीर राजकीय हल्ला आणि फसवणुकीशिवाय काहीही नाही. हे आपल्या संविधानाच्या विरोधात आहे.ट्रम्प यांचे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग यांनी या निर्णयाचा निषेध केला आणि म्हटले की हा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिकारशक्तीच्या निर्णयाचे आणि न्यायशास्त्राचे थेट उल्लंघन आहे. हे बेकायदेशीर प्रकरण कोर्टात कधीच आणायला हवे होते. ती तत्काळ फेटाळण्यात यावी, अशी संविधानाची मागणी आहे.या प्रकरणात कोणतीही शिक्षा होऊ नये, असे च्युंग म्हणाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सर्व संपेपर्यंत या फसवणुकीशी लढत राहतील.