परभणी-भाजपचे बीडच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी संतोष देशमुख हत्याकांडावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. अजितदादांच्या वादाचे काय झाले? त्यांनी यांना (धनंजय मुंडे) आतमध्ये (मंत्रिमंडळात) का घेतले? त्यांनी बीडमधील संगीत दिघोळेपासून संतोष देशमुखांपर्यंतच्या हत्यांची बेरीज करून हिशेब करावा. या हत्या कुणी केल्या? त्यांचा मास्टरमाइंड कोण? हे त्यांना माहिती नसेल तर त्यांनी आपली माणसे आमच्याकडे पाठवावी. त्यानंतर त्यांना बीडमध्ये अठरा पगड जातींना कोणती वागणूक मिळते हे समजेल, असे ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मस्साजोग प्रकरण व पीकविमा घोटाळ्यावरून थेट निशाणा साधला. विशेषतः त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून त्यांनी अजित पवारांवरही उपरोधिकपणे टीका केली.
सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी आका व आकाच्या आकाचे काय – काय सांगावे? सरकारने या प्रकरणी माझ्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील एखादा आरोपी चुकून पोलिसांच्या चौकशीतून सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकेल. या आरोपींना मोका लागला पाहिजे. या आरोपींना एकदा मोका लागला की, ते 4-5 वर्षांसाठी आत जातील. त्यानंतर ते पुन्हा माघारी येणार नाहीत. या प्रकरणातील आका आत गेलाच पाहिजे. पण आकाच्या आकानेही या प्रकरणी काही केले असेल तर तो ही आत गेल्याशिवाय राहणार नाही.
या लोकांचे लफडे माणसे मारण्याचे आहेत. त्यांनी अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांना मारले. इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारले होते, त्याच पद्धतीने हाल – हाल करून संतोषला मारण्यात आले. त्यांनी यांचे एवढे काय बिघडवले होते? एका दलित समाजाच्या पोराची बाजू घेतल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ आकाने किंवा त्याच्या आकाने पाहिला असेल तर त्यांनी तुरुंगात जावेच लागेल. आकाच्या आकाने (धनंजय मुंडे) यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पण त्यांनी अगोदरच आपल्या लोकांना नीट वागण्यास का सांगितले नाही हा माझा प्रश्न आहे.
सुरेश धस यांनी यावेळी क्या हुआ तेरा वादा म्हणत अजित पवारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, अजितदादा, तेरा वादा क्या हुआ रे. काय कू इसको अंदर लिया. ये अंदर लेने जैसा नहीं हैं. तुम्ही संगीत दिघोळेपासून संतोष देशमुखांपर्यंतच्या हत्यांची बेरीज केली तर तुम्हाला हिशेब समजेल. या हत्या कुणी घडवल्या? त्याचा मास्टरमाइंड कोण? कुणी हे उद्योग केले? हे तुम्हाला माहिती नसेल, तर परभणीला तुमची माणसे पाठवा. बारामतीची माणसे आमच्याकडे पाठवा. त्यानंतर तुम्हाला बीडमध्ये अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते हे तुम्हाला समजेल.
रत्नाकर गुट्टे आज या मोर्चाला आले नाही. त्यामुळे ते या प्रकरणी दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सिद्ध होते. त्यांचे हे वागणे चांगले नाही. मी अजित पवारांना प्रकाश सोळंके, राजेश विटेकर यांना मंत्री करण्याची सूचना केली होती. ते ही जमत नसेल तर बुलढाण्याच्या कायंदेला मंत्री करा असे सांगितले होते. आमचा जिल्हा बिनमंत्र्यांचा राहिला तरी काही फरक पडत नाही.
सुरेश धस यांनी यावेळी पीकविमा घोटाळ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, परभणी जिल्ह्यातील 40 हजार हेक्टरवर पीकविमा भरण्यात आला आहे. राहुल पाटील यांचा मतदारसंघ शहरी आहे. पण त्यांनीही आपल्या मतदारसंघात हा घोटाळा झाला आहे का? हे तपासून पहावे. राजेश विटेकर यांच्या सोनपेठ तालुक्यातही 13 हजार 190 हेक्टरवर पीकविमा भरण्यात आला.
या लोकांनी बंजारा समाजाच्या लोकांचा गैरवापर केला. त्यांना हे लोक निवडणुकीपूरते चालतात, पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आली की त्याकडे दुर्लक्ष करतात. परळी तालुक्यातील लोकांनी सोनपेठ तालुक्यात पीकविमा भरला. हा घोटाळा करणाऱ्यांवरही सरकारने मोकाची कारवाई केली पाहिजे. राजेश विटेकरांवर कुणाचा तरी दबाव आहे. त्यामुळे ते या प्रकरणी बोलत नाहीत. पण त्यांनी हा दबाव झुगारून पत्रकार परिषद घेऊन या विषयाला वाचा फोडली पाहिजे. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगले पाहिजे. दुसऱ्यांच्या जमिनीवर पीकविमा भरणे हा नवा परळी पॅटर्न सुरू झाला आहे.
सुरेश धस यांनी यावेळी परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेचा मुद्दाही उपस्थित केला. परळीच्या राखेचा प्रश्न सोडवण्यासाठी आकाच्या आकाच्या नेतृत्वात एक बैठक लावण्यात आली होती. ही राख परभणीच्या सोनपेठपर्यंत उडत येते. ती गंगाखेडपर्यंतही पोहोचते. परभणीतही येते. हे लोक या राखेची हैदराबादपर्यंत उघडी वाहतूक करता. त्यामुळे त्याचा त्रास त्या भागातील नागरिकांना होतो.
हे लोक अवघे थर्मलच उपसून नेत आहेत. या लोकांचा परळी थर्मलमध्ये नंगानाच सुरू आहे. तेथील काही अधिकारी रिटायर होईपर्यंत एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. सरकारी कर्मचारी एका ठिकाणी 20 वर्षे राहतात का? पण परळीत हे होताना दिसते. परळीचा हा पॅटर्न सरकारने महाराष्ट्रभर राबवावा अशी विनंती मी सरकारकडे करणार आहे, असे ते उपरोधिकपणे म्हणाले.
दरम्यान, सुरेश धस यांनी यावेळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. प्रस्तुत प्रकरणात अशोक घोरबांड नामक एक कुणीतरी पीआय आहे. तो स्वतःला एसपी समजतो. अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो. हा जिथे जातो तिथे काहीतरी करतो, अशी तक्रार आहे. त्यामुळे हा घोरबांड केवळ निलंबित होऊन चालणार नाही. त्याला सेवेतून काढून टाकण्याची गरज आहे. त्याची न्यायालयीन चौकशीही झाली पाहिजे. माझा त्याला पाठिंबा असेल, असे सुरेश धस म्हणाले.