Home Blog Page 694

सशक्त व सुरक्षित भारतासाठी युवकांचा पुढाकार हवा : रक्षा खडसे

विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे : गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे विकसित भारत योजनेचे उद्दिष्ट आहे. विकसित भारत योजनेअंतर्गत देशाची आर्थिक उन्नती, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य आहे. विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित असून त्यांचा सशक्त व सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी हातभार लागावा, अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. ‌‘माय भारत‌’च्या माध्यमातून युवा पिढीने राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी; कारण राजकारण हे क्षेत्र वाईट नाही, असेही त्यांनी सूचित केले.
विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आज (दि. 20) विकसित भारत ॲम्बॅसेडर : युवा कनेक्ट प्रोग्रामअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री खडसे बोलत होत्या. विवकर्मा समूहाचे अध्यक्ष भरत अग्रवाल, व्हीआयटी, पुणेचे संचालक डॉ. राजेश जालनेकर, विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे, उत्पादन-विकास संचालक डॉ. विवेक देशपांडे, माजी विद्यार्थी व जनसंपर्क विभाग अधिकारी प्रा. मुकुंद कुलकर्णी, युथ आयकॉन बिष्णू हजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात विकसित भारत योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण, पायाभूत सुविधा, शासकीय योजनांमधील पारदर्शकता, अर्थव्यवस्था, जनधन, मुद्रा योजना, शेतीविषयक धोरणे, उज्वल योजना, स्वच्छ भारत, जलजीवन, पंतप्रधान गृह योजना, डिजिटल इंडिया, गती-शक्ती, उडान योजना, सांस्कृतिक वारसा, खेलो इंडिया तसेच युवांचे सक्षमीकरण याविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना खडसे यांनी अवगत केले.

खडसे पुढे म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्याला 2047 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारने दूरदृष्टी ठेवून अनेक योजनांचे विस्तारीकरण केले आहे. केंद्र सरकार राबवित असलेल्या योजनांमध्ये युवकांनी सहभाग नोंदवून विकसित भारताचे स्वप्न साकर करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. या योजनांमध्ये युवक सहभागी झाल्यास भविष्यात युवकांनाच त्याचा लाभ होणार आहे.
अवकाश संशोधन क्षेत्रात युवकांना मोठ्या प्रमाणावर संधी असून या योजनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचे पाठबळ मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात युवा पिढीचा मोठ्या प्रमाणात सहभाग तसेच मार्गदर्शक सूचनांचे स्वागत असेल असेही खडसे म्हणाल्या.
शिस्तबद्धता, मानसिक ताणतणावातून मुक्ती, उत्तम आरोग्य तसेच आयुष्यात सर्वांगिण समतोल साधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात सक्रिय रहावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंच्या यशामागील गमकही त्यांनी सांगितले. राजकारण, क्रीडा, महिला सक्षमीकरण याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना खडसे यांनी उत्तरे दिली.
भरत अग्रवाल यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने संस्था विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
विकसित भारत उपक्रमाविषयी कृतिका भंडारी यांनी माहिती सांगितली. बिष्णू हजारी यांनी मनोगत व्यक्त केले.
क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींसह संस्थेच्या आवारात रक्षा खडसे यांनी वृक्षारोपण केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू व महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्य भिवपतकी, तसेच स्मार्ट इंडिया हायकेथॉनमधील यशस्वी विद्यार्थ्यांशी खडसे यांनी संवाद साधत त्यांच्या संकल्पनांचे कौतुक केले.
रक्षा खडसे यांचे स्वागत भरत अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुकुंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. आशुतोष कुलकर्णी यांनी मानले.

अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन, निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल: नाना पटोले.

नरेंद्र मोदी देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा मोदींना अधिकार नाही.

शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी म्हणणाऱ्या मोदींचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा खोटा.

मुंबई, दि. २० सप्टेंबर २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे दाखवण्याचा प्रकार आहे. २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत ह्याच टेक्सटाईल पार्कचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते झाले. या टेक्सटाईल पार्कची अद्याप एक विटही रचली नाही. एकाच प्रकल्पाचे दोनदा भूमिपूजन करून भाजपा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी हे खोटे बोलणारी मशिन असून महात्मा गांधी यांच्या तपोभूमीतूनही ते खोटे बोलले. महाराष्ट्राला प्रकल्प दिल्याचे भासवले जाते पण दिल्लीतील गुजरात लॉबी महाराष्ट्र कमजोर करत आहेत. नागपूरातील १८ हजार कोटींचा सोलर प्रकल्पही गुजरातला गेला आहे. पण तो प्रकल्प गुजरातला गेला नाही असे उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे सांगत आहेत. केंद्रातील गुजरात लॉबीच्या आदेशाने महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प गुजरातला पळवले जात असून महाराष्ट्रात बेरोजगारी वाढवली जात आहे, त्याला भाजपा सरकार जबाबदार आहे, भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. वेदांता फॉक्सकॉनचा सेमिकंडकर चीप प्रजोक्ट गुजरातला पळवल्यानंतर महाराष्ट्राला त्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ असे सत्ताधारी सांगत होते त्याचे काय झाले?
काँग्रेस व गांधी कटुंबावर नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, देशातील सर्व भ्रष्टाचारी नरेंद्र मोदींनी भाजपात घेतले आहेत, त्यांना भ्रष्टाचारावार बोलण्याचा काही एक अधिकार नाही. मविआ काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हे सर्व भ्रष्टाचारी चक्की पिसिंग करताना करतील. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा खोटा आहे. माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान चा नारा दिला होता पण पंतप्रधान मोदींनी जवान व किसान दोघांना बरबाद केले आहे. गांधी कुटुंबावर बोलण्याचा तर नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा काही अधिकार नाही.
कर्नाटकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणपतीच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यापासून गणपती बप्पाच्या मूर्तीला वाचवून विधिवत पूजा अर्चना करून मूर्तीचे विसर्जन केले. अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि फॅक्ट चेक करणा-या वेबसाईट्सनी या संदर्भातले सत्य सांगितले आहे. पण पंतप्रधानापासून भाजपचे सर्वच नेते यासंदर्भात फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही फेक न्यूज पसरवणा-या राज्यातील भाजपा नेत्यांविरोधात काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांचे जास्त ऐकू नका, विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढवल्या जात आहेत. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते घेतील असेही नाना पटोले म्हणाले.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री अमित देशमुख, डी. पी. सावंत, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, एम. एम. शेख, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक -डॉ.सुरेश खाडे

पुणे, दि. २०: कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे केवळ १ रुपयांमध्ये नोंदणी करता येत असून या मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी नोंदणी करावी असे आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

चिंचवड येथे रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित नोंदीत घरेलू कामगारांना गृहउपयोगी वस्तुसंच वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, सदाशिव खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उप आयुक्त अभय गिते, घरेलू कामगार विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. खाडे म्हणाले, घरेलू कामगारांना या गृहोपयोगी वस्तूसंचाच्या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केली असून मंडळामार्फत घरेलू कामगार महिलांना दोन अपत्यापर्यंत ५ हजार रुपये प्रसुती लाभ, सन्मानधन योजनेत वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांना १० हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. तसेच संसार उपयोगी भांडी, अंत्यविधीसाठी वारसास २ हजार रुपये सहाय्य देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

बांधकाम कामगारांनाही विविध लाभ देण्यात येतात. कामगारांची नोंदणी सुलभतेने होण्यासाठी नुकतेच तालुकास्तरावर ३०४ सेतू केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शासन सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असून योजनांच्या माध्यमातून शासन आपल्या घरापर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन तीन हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्रीमती सिंघल म्हणाल्या, घरेलू कामगारांना हक्काच घरं, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, महिलांच्या आरोग्याची काळजी तसेच घरेलू कामगारांना पेन्शनची सोय करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. घरेलू कामगार मंडळाकडे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करावी व इतरांनाही नोंदणीसाठी प्रेरित करावे. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना लाभ देणे शक्य होईल. मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या लाभासाठी नोंदणीचे नुतनीकरण आवश्यक असल्याचे सांगून हे शासन लोकाभिमूख असून कामगारांना मदतीचा हात देत आहे असे त्या म्हणाल्या.

कामगार मंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील १ हजार ८२० घरेलू महिला कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंचाचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार उमा खापरे व अमित गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात शैलेंद्र पोळ यांनी मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

आजची कॉंग्रेस महात्मा गांधींची नाही,कॉंग्रेस का मतलब झुट,धोकादारी बेईमानी :PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

वर्धा – पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आजची कॉंग्रेस महात्मा गांधींची नाही,कॉंग्रेस का मतलब झुट,धोकादारी बेईमानी असाच आहे,काँग्रेसमधील देशभक्तीची भावना संपली आहे. परदेशातून बसून ते अजेंडा चालवतात. आता त्यांना गणपती बाप्पाचीही चीड येऊ लागली आहे. मी गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली होती, असा आरोप त्यांनी केला.महाराष्ट्रातील वर्धा येथील सभेत मोदींनी संबोधित केले. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. पंतप्रधान म्हणाले की, जुन्या सरकारमध्ये कामगारांच्या कौशल्याचा आदर केला जात नव्हता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी/एसटीला दडपून ठेवले. त्यांना पुढे जाऊ दिले नाही.आमच्या सरकारने कौशल्य मंत्रालयाची निर्मिती केली. पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत एका वर्षात 8 लाख लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.पीएम मोदी म्हणाले की, ज्या पक्षाला आपल्या आस्था आणि संस्कृतीचा किंचितही आदर आहे तो कधीच गणपती पूजेला विरोध करू शकत नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेचा तिटकारा आहे. मी गणेशपूजनाच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत उठले. काँग्रेसने गणपती पूजेला विरोध सुरू केला. वास्तविक, पंतप्रधान मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनासाठी गेले होते. ज्याला विरोधकांनी विरोध केला होता.

पंतप्रधान म्हणाले – महाराष्ट्रात अनेक दशके काँग्रेस आणि नंतर महाविकास आघाडी सरकारने कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद बनवण्याऐवजी त्यांना संकटात ढकलले, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले आणि भ्रष्टाचार केला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कचे काम सुरू झाले.काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी जाणूनबुजून एससी, एसटी आणि ओबीसी लोकांना पुढे जाऊ दिले नाही. काँग्रेसची ही दलित आणि मागास विरोधी विचारसरणी आम्ही सरकारी यंत्रणेतून काढून टाकली आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारीवरून असे दिसून येते की, एससी, एसटी आणि ओबीसी समाज विश्वकर्मा योजनेचा लाभ घेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हीच काँग्रेस आहे जी तुकडे तुकडे गँग आणि शहरी नक्षलवादी चालवत आहे. आज देशातील सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट घराणे म्हणजे काँग्रेसचे राजघराणे आहे. हे लोक परकीय भूमीतून आपला अजेंडा चालवतात. वास्तविक, पंतप्रधान मोदींनी अलीकडेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये ते म्हणाले होते की कलम 370 बहाल करण्याबाबत पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स मत समान आहे.

राहुल गांधीचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका

काही लोक विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. जोपर्यंत देशात नरेंद्र मोदी आहेत, तो पर्यंत कोणीही देशातून आरक्षण संपवू शकत नसल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.नरेंद्र मोदी बेमिसाल असून ते विकासाची नवी ‘मिसाल’ असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आता शंभर दिवस पूर्ण झाले असून अजून खुप मोठा टप्पा आपल्याला गाठायचे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

विकसित भारत हे तरुणांचे लक्ष्य असले पाहिजे

 युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे मत :  भारत शासनाच्या क्रिडा आणि युवा कार्यक्रम मंत्रालयाच्या वतीने आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहयोगाने माय भारत विकसित भारत २०४७ युवा कनेक्ट महाराष्ट्र अध्यायाची सुरुवात
पुणे : देशाला विकसित बनविण्यासाठी तरुणांनी पुढे या, हे तरुणांचे कर्तव्य आहे. श्रम करा, त्यापासून पळू नका. तुम्ही कुठेही जा तुमची प्राथमिकता देश असली पाहिजे. जिथे असाल तिथे देशाप्रती कसे योगदान द्याल याचा विचार करायला पाहिजे. विकसित भारत हे तरुणांचे लक्ष्य असले पाहिजे, असे मत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले.

भारत शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहयोगाने माय भारत विकसित भारत २०४७ युवा कनेक्ट महाराष्ट्र अध्यायाची सुरुवात  शिक्षण प्रसारक मंडळीच्या लेडी रमाबाई सभागृहात झाली. यावेळी मा. केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती रक्षा खडसे, नेमबाज स्वप्निल कुसाळे, शि. प्र. मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष एस. के. जैन,  नियामक मंडळ सदस्य ॲड. दामोदर भंडारी, नियामक मंडळ सदस्य तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री अशोक वझे, संस्थेच्या सचिव डॉ. राधिका इनामदार इ. उपस्थित होते.

डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, आपला देश सामर्थ्यवान देश आहे. बौद्धिक आणि मनुष्य शक्तीची आपल्या देशात कधीच कमी नव्हती. ज्या गतीने आपण प्रगती करायला हवी होती, ती पूर्वीच्या सरकाराच्या काळात झाली नाही. विकसित भारताचा रोड मॅप नरेंद्र मोदी यांनी दिला.

आपली कर्तव्यनिष्ठा जपत युवकांनी देशाच्या विकासात आपले योगदान दिले पाहिजे. देशाच्या प्रती कर्तव्य भावनेने काम करा तर भारत विकसित होईल. एक विचार, एक संकल्प घेऊन देशातील जनता पुढे येईल तेव्हा भारत १४० कोटी पावलांनी पुढे जाईल आणि भारत विकसित होईल.

रक्षा खडसे म्हणाल्या, पुणे हे युवकांचे शहर आहे. शिवरायांची कर्मभूमी, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांचा इतिहास शहराला लाभला आहे. म्हणून पुण्यापासून विकसित भारत महाराष्ट्र अध्यायाची सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या आधीच्या पिढीने चळवळ उभी केली. देशाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज आपला देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांच्यानंतर विकसित भारतासाठी योगदान देणे ही आता आपली जबाबदारी आहे. पुढे येणारे भविष्य आपले आहे त्यामुळे प्रत्येकाचा वाटा यात असला पाहिजे. विकसित भारत या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अनेक गोष्टी युवा शिकणार आहे. ज्यामुळे देशाच्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल. देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल तर युवकांचा सहभाग असायला पाहिजे.

नेमबाज स्वप्निल कुसळे म्हणाला, कोणतेही क्षेत्र असो आहार आणि फिजिकल फिटनेस नीट ठेवा. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. जिद्द आणि ध्येय ठेवा तर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असेही त्याने सांगितले. ॲड. एस. के. जैन यांनी मान्यवरांचे स्वागत करून संस्थेची ओळख करुन दिली. डॉ. माधुरी देशपांडे व डॉ. मधुरा थिटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

गजानन विजय ग्रंथावरील रंगावलीतून साकारल्या गजानन महाराजांच्या भक्तीकथा

 ‘ब्रम्हांडनायक’ रंगावली प्रदर्शन : शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथावर आधारित रंगावली ; रंगावलीकार शारदा अवसरे आणि ३२ कलाकारांचे सादरीकरण
पुणे :  लोकमान्य टिळकांच्या अकोला येथील व्याख्यानात मंडपात उंच स्थानी येऊन बसलेले गजानन महाराज… गजानन महाराजांनी नारायणाला आवाहन केल्यानंतर कोरड्या विहिरीला फुटलेला झरा.. महाराजांनी शांत केलेला अती द्वाड घोडा ही….शिंगावर मुलामाणसांना घेवून तुडविणारी गाय समर्थांपुढे येऊन दिनवाणी झाली आणि समर्थांना वंदन केले तो क्षण…अशा श्री गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित भक्तीकथा  रांगोळ्यांच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांनी मिळाली.

शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित ‘ब्रम्हांडनायक’ या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रसिद्ध रंगावलीकार महादेव गोपाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.  यावेळी प्रख्यात रंगावलीकार अक्षय शहापूरकर, ज्येष्ठ रंगावलीकार जगदीश चव्हाण, प्रदर्शनाच्या आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे उपस्थित होते.  

नर्मदा नदीतील बुडणारी नाव महाराजांनी काठाला लावली…भक्ताची शिदोरी खाण्यासाठी चार प्रहर उपाशी राहिलेले महाराज आणि शेवटी चार प्रहरांनातर भक्ताने दिलेली भाजी भाकरी खातानाचा क्षण…विठ्ठलाच्या रूपात गजानन महाराजांनी भक्ताला दिलेले दर्शन या रांगोळ्या कलाकारांनी अतिशय बारकाईने साकारल्या आहेत.

शारदा अवसरे म्हणाल्या, प्रदर्शनामध्ये एकूण २३ रंगावलींचा समावेश आहे. गजानन विजय या ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित २१ व २ सर्वत्र पाहिले जाणारी अशी एकूण २३ रूपे   साकारण्यात आली आहेत. सर्व रंगावली काढण्याकरिता एकूण ३० किलो रंगावली व रंगाचा वापर करण्यात आला आहे.

प्रदर्शनाकरिता श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे अक्षय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत प्रदर्शन विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी यावे,असे आवाहनही शारदा अवसरे यांनी केले आहे.

मुहंमद पैगंबर यांना अभिवादन!

पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थांच्या वतीने हजरत मुहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त विद्यार्थ्यांची अभिवादन मिरवणूक आज २० सप्टेंबर रोजी सकाळी  भव्य स्वरूपात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ. पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटी’चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.

मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांनी हजरत मुहम्मद पैगंबरांच्या शिक्षण, सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षणाचे संदेश असलेले फलक हातात घेतले होते. या मिरवणुकीने पुण्याच्या प्रमुख भागांतून प्रवास करत शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकतेचे संदेश दिले. संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख, एस.ए.इनामदार,साबीर शेख,मशकूर शेख,आसिफ शेख,अफझल खान,वहाब शेख, बबलू सय्यद,शाहीद शेख आणि अन्य पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

ही मिरवणूक आझम कॅम्पस येथून सुरू होऊन डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट,ट्राय लक हॉटेल,कोहिनुर हॉटेल,बाटा चौक,सरबतवाला चौक,क्वार्टर गेट,पद्मजी पोलीस चौकी,निशात थिएटर,भगवानदास चाळ,चुडामण तालीम,पूना कॉलेज मार्गे पुन्हा आझम कॅम्पस येथे समाप्त  झाली.हे अभिवादन मिरवणुकीचे २० वे वर्ष असून, दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे महामानव छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हजरत मुहम्मद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारच्या मिरवणुका काढल्या जातात. यामधून महामानवांचे सामाजिक आणि शैक्षणिक संदेश जनतेपर्यंत पोहोचवले जातात.

Apple Store वर iPhone-16 सिरीज उपलब्ध:प्रो मॅक्स मॉडेल भारतात अमेरिकेच्या तुलनेत सुमारे 44 हजार रुपयांनी महाग

आयफोन भारतात तयार असूनही इथे महाग का ?
Apple फोन भारतात iPhone 15 च्या काळापासून असेंबल केले जात आहेत. तैवानच्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने चेन्नईजवळील श्रीपेरंबदुर येथे असेंबलिंगसाठी प्लांट उभारला आहे. त्याचे विविध भाग आयात केले जातात, ज्यावर कस्टम ड्युटी लावली जाते.उदाहरणार्थ, आयफोन डिस्प्ले सॅमसंगने तयार केला आहे, ज्यावर 20% आयात शुल्क लागू केले आहे. याशिवाय सर्किट बोर्ड, ट्रान्झिस्टर, प्रोसेसरवर आयात शुल्क आणि जीएसटी लागू आहे. हे सर्व एकत्र ठेवल्यास, अंतिम उत्पादनाची किंमत जास्त होते.तर प्रो सीरीज भारतात जमलेली नाही. हे पूर्णपणे आयात केले जात आहेत. यावर सरकार 22% आयात शुल्क आणि 2% सामाजिक कल्याण अधिभार लावते. 18% GST देखील लागू आहे. यामुळे एकूण कर सुमारे 40% होतो.

नवी दिल्ली-आयफोन 16 सीरिजचे फोन आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होऊ लागले आहेत. भारतात, ॲपलचे दिल्ली आणि मुंबईतील11 वाजता उघडणारी दोन्ही अधिकृत स्टोअर्स सकाळी 8 वाजता उघडले.ॲपलची नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी दोन्ही दुकानांत गर्दी पाहायला मिळते आहे.

कंपनीने सोमवारी (९ सप्टेंबर) वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंट ‘इट्स ग्लोटाइम’ मध्ये AI वैशिष्ट्यांसह iPhone 16 मालिका लॉन्च केली.यामध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. Apple ने त्यांची बुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. ग्राहक अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवरून फोन बुक करू शकतात.
iPhone-16 Pro Max ची किंमत अमेरिकेपेक्षा भारतात ₹44,000 अधिक आहे
मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीय ग्राहकांना अजूनही आयफोन घेणे महाग वाटते. तर, आयफोन-16 मालिकेचे मॉडेलही भारतात असेंबल केले जात आहेत. प्रो मॅक्स मॉडेल भारतात अमेरिकेच्या तुलनेत सुमारे 44 हजार रुपयांनी महाग आहे.

त्याच वेळी, आयफोन-16 मॉडेलमध्ये सुमारे 13 हजार रुपयांचा फरक आहे. भारतात iPhone 16 ची सुरुवातीची किंमत ₹ 79,900 आहे आणि Pro Max ची किंमत ₹ 1,44,900 आहे. तर अमेरिकेत तेच iPhone-16 मॉडेल $799 म्हणजेच ₹67,100 आणि Pro Max $1199 म्हणजेच ₹1,00,692 मध्ये उपलब्ध आहे.

iPhone 16 स्वस्तात खरेदी कसा कराल ?

कर आणि आयात शुल्काच्या अभावामुळे भारतासह इतर अनेक देशांच्या तुलनेत अमेरिका आणि कॅनडामध्ये iPhones नेहमीच स्वस्त राहिले आहेत. जर तुमचा कोणी मित्र किंवा कुटुंबातील सदस्य अमेरिका किंवा कॅनडामध्ये राहत असेल, तर तुम्ही त्याला तेथून तुमच्यासाठी iPhone खरेदी करण्यास सांगू शकता आणि त्याच्या पुढच्या भेटीत तो भारतात आणू शकता.
त्याचप्रमाणे दुबईहून आयफोन-15 खरेदी करणे स्वस्त होणार आहे. ड्युटी फ्री पोर्ट असल्याने दुबईमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्ही हंगामी सवलतींची प्रतीक्षा करून पैसे वाचवू शकता. अमेरिकेत, ब्लॅक फ्रायडे आणि दुबई शॉपिंग फेस्टिव्हल दरम्यान iPhone-16 सह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत उपलब्ध आहे.
अनेक बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या आयफोनवर सूट देतात. तुम्ही त्यांच्या ऑफर तपासू शकता. याव्यतिरिक्त, अशा अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या आहेत ज्या कॅश-बॅक इन्सेन्टिव्ह, प्रमोशनल क्रेडिट्स किंवा पॉइंट प्रदान करतात ज्याचा उपयोग भविष्यातील खरेदीसाठी केला जाऊ शकतो. हे पण तपासा.
नवीन iPhone मालिका रिलीझ झाल्यानंतर लगेच खरेदी करण्यासाठी घाई करणे टाळा. कारण, नवीन मॉडेलची किंमत त्याच्या सुरुवातीच्या रिलीजनंतर काही महिन्यांत कमी होते. जर तुम्ही थोडी प्रतीक्षा करू शकत असाल तर तुम्ही तुमच्या खरेदीवर चांगली रक्कम वाचवू शकता.
iPhone-16 सह सर्व गॅजेट्स आजपासून उपलब्ध होतील
iPhone-16 मालिकेव्यतिरिक्त, कंपनीने आपल्या ग्लोटाइम इव्हेंटमध्ये Apple Watch Series 10 देखील सादर केला, ज्यामध्ये 30% मोठा स्क्रीन क्षेत्र आहे. हे ॲपलचे आजपर्यंतचे सर्वात पातळ घड्याळ आहे (9.7 मिमी). त्याची सुरुवातीची किंमत 46,900 रुपये आहे.

याशिवाय वॉच अल्ट्रा 2 चे नवीन कलर देखील लाँच करण्यात आले. हे खेळाडूंसाठी तयार करण्यात आले आहे. हे घड्याळ कमी पॉवर मोडमध्ये 72 तास चालेल. त्यात सर्वात अचूक जीपीएस उपलब्ध आहे. Apple ने AirPods 4 आणि AirPods Max चे नवीन रंग लॉन्च केले होते. ॲपलचे सर्व नवीन गॅजेट्स आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

पुण्याहून दुबईला रोज तर बँकॉकसाठी ८ दिवसातून ३ दिवस विमानसेवा

यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून बँकॉकसाठी आणि दुबई साठी विमान सेवा सुरु होते आहे .केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे कि,’पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’; पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे ! पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर, २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बॅंकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.


पुणे ते बँकॉक दरम्यान पूर्वी विमानसेवा सुरू होती. मात्र कोविडच्या सुरवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सेवा बंद झाली. त्यावेळी बँकॉकची सेवादेखील बंद झाली. ती अद्याप सुरू झालेली नाही. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्याने यंदाच्या विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. यात पुणे ते बँकॉक विमानसेवेचा देखील समावेश असण्याची शक्यता अधिक आहे

सध्या दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे
पुणे विमानतळावरून दोन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू आहेत. यात दुबई व सिंगापूरचा समावेश आहे. बँकॉकसाठी विमानसेवा सुरू झाल्यावर पुण्याहून थायलंड हा देश जोडला जाईल. यानिमित्ताने तिसरा देश पुण्याला जोडला जाईल. यामुळे पुण्याची कनेकटव्हीटी वाढण्यास मदत होईल.

दैनंदिन ९५ विमानांचे उड्डाण

  • पुण्याहून दोन्ही टर्मिनल मिळून सध्या सुमारे १९० विमानांची वाहतूक होत आहे
  • यात दैनंदिन सरासरी ९५ विमानांचे उड्डाण व ९५ विमानांचे लँडिंग होते
  • प्रवासी संख्या : सरासरी ३५ हजार (दैनंदिन)

पुण्याहून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्लॉटबद्दल विचारणा झाली आहे. पुणे विमानतळावर स्लॉट उपलब्ध होत असल्याचे संबंधित विमान कंपनीला कळविले आहे.

  • संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये:वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई-मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आज मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संजय पांडे यांच्यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार वर्षा गायकवाड यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी मंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व्ही बी व्यंकटेश, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, युवराज मोहिते, खजिनदार संदीप शुक्ला, अखिलेश यादव, अशोक गर्ग, इब्राहिम भाईजान, मोहसिन हैदर , आदी उपस्थित होते.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यावेळी म्हणाले की, काँग्रेस हा एक परिवार असून १४० वर्षांचा जुना व अनुभवी पक्ष आहे. खासदार राहुल गांधी यांनी डरो मतचा संदेश दिला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. काँग्रेस पक्षाच्या विचार महत्वाचे असून अनेक पक्षातून ऑफर असतानाही काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याचा निर्णय पक्का होता असे सांगितले.

यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची भूमिका मांडली आहे म्हणूनच ४०० पार चा नारा दिलेल्या भाजपाला २४० वर रोखले, यात महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे योगदान आहे. मागील काही वर्षात महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला ठेच पोहचवण्याचे काम केले जात आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत पंतप्रधान व विरोधी पक्ष नेत्याचे पदही तितकेच महत्वाचे आहे, त्या पदाचा मान राखला पाहिजे पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.महाराष्ट्रातील युती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. लाडका मित्र योजना जोरात सुरु आहे. काँग्रेस पक्षात लोकशाही आहे आणि काँग्रेसने भारत जोडण्याचे काम केले आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेकजण काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहनही खासदार वर्षा गायकवाड यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यात ५६ महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. 19: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दुरदृष्यप्रणालीद्वारे २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता उद्घाटन होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (पिंपरी), नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (तळेगाव दाभाडे), कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (इंदापूर), शंकरराव भेलके महाविद्यालय (नसरापूर), शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शारदानगर-बारामती), अण्णासाहेब मगर कॉलेज (हडपसर), डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्नोलॉजी आणि बायोइनफोरमॅटीक इन्स्टिट्युट (ताथावडे), सेंट व्हिन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स (पुणे), जे.एस.पी.एम भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक (वाघोली), शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (अवसरी खुर्द), वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (पुणे), स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर (बारामती), समर्थ पॉलिटेक्निक (बेल्हे) सुभाष बाबुराव कुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (केडगाव), एसव्हीपीएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग (माळेगाव), सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (किवळे), विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (भिगवण), गिरिजाई नर्सिंग कॉलेज (शिरुर), जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी (वडगाव सहानी), टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (खडकी), श्री जैन विद्या प्रसारक मंडळ सांगवी केशरी कला व वाणिज्य महाविद्यालय (पिंपरी), प्रीतम प्रकाश कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (भोसरी), प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज (पिंपरी), इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन (पुणे), एमकेएसएसएस मनीलाल नानावटी व्होकेशनल इन्स्टिट्युट फॉर वमेन (कर्वे नगर), नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निक (नायगाव-नसरापूर), भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (नर्हे), श्री. फत्तेचंद जैन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (पिंपरी), सौ. ताराबाई शंकरलाल मुथ्था कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (पिंपरी), एशियन कॉलेज ऑफ फार्मसी (धायरी), गर्व्हेन्मेंट पॉलिटेक्निक (पुणे), शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय (बारामती), एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (धायरी), हरिभाई देसाई कॉलेज (पुणे), लोटस बिझनेस स्कूल (मुळशी), डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ एमबीए (कृषी-व्यवसाय) (बारामती), डॉ. प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज (आकुर्डी), श्रीमती. गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय, (चिंचवड), एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (पुणे), समर्थ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (बेल्हे), मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलिटेक्निक (पिंपरी-चिंचवड), कृषी विकास प्रतिष्ठान शारदाबाई पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शारदानगर, बारामती), अनंतराव थोपटे महाविद्यालय व संशोधन केंद्र (भोर), इरा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन (आर्वी), कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (खेड-शिवापूर), डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस (वराळे-तळेगाव), बी.डी.काळे महाविद्यालय (घोडेगाव), पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी पॉलिटेक्निक (बारामती), एमकेएसएसएस ॲकॅडमी ऑफ इनफोर्मेशन टेक्नोलॉजी (कर्वेनगर), शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (शारदानगर, बारामती), डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (आकुर्डी), एमकेएसएसएस महेंद्रा नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ लेसर टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन्स (कर्वे नगर), राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक (भोर), विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक कॉलेज (इंदापूर) महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, स्किल डेव्हलपमेंट सेंटर (कर्वे नगर) व अरहम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज (पुणे) या महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्धाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या उद्धघाटनप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी मार्गदर्शन करणार आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व मान्यवरांनी नजीकच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

वेडेवाकडे बोलून महायुतीला अडचणीत आणू नका:अजित पवारांनी शिंदे, फडणवीसांपुढे’त्या’२ आमदारांना सुनावले खडेबोल

बुलढाणा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढेच महायुतीच्या वाचाळवीर नेत्यांना खडेबोल सुनावले. संविधानानुसार प्रत्येकाला आपापली मते व विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही वाचाळवीर नेत्यांनी वेडेवाकडे बोलून महायुतीच्या घटकपक्षांना अडचणीत आणण्याचे काम करू नये, असे ते म्हणाले. त्यांचा रोख भाजप आमदार नीतेश राणे, खासदार अनिल बोंडे व शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडे होता.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावर अजित पवारांनी बुलढण्यात भर सभेत कान टोचले आहेत. महायुतीचा बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहणार, असे आश्वासन देखील दिले आहे.

अजित पवारांनी संजय गायकवाड यांचे नाव न घेता म्हणाले, मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळविरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, असा सवाल

अजित पवार म्हणाले, समाजाच्या सर्व महिलांना त्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या असो एकही माझी बघिणी त्यात वंचित राहता कामा नये, जिचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. परंतु विरोधकांना हे बघवत नाही. कोर्टात जात आहेत, योजना बंद करा म्हणून सांगायला. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करण्याची भाषा हे लोक वापरत आहेत. तुमची द्यायची दानत नाही, जे देत आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय.

पुढे अजित पवार म्हणाले, काही महिला मला म्हणाल्या की दादा तीन हजार रुपये आमच्या खात्यात आले त्याचे राखी तयार करण्यासाठी त्यातून साहित्य आणले. त्यानंतर आम्ही त्याच्या राख्या तयार करून विकल्या आणि त्यातून 20 हजारांची कमाई केली. एवढा विश्वास त्या महिलेच्या मनात निर्माण झालेला आहे. तिला आम्हाला सबल करायचे आहे. तिला आम्हाला सक्षम करायचे आहे. समाजात तिला आम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलेच आहे. परंतु आर्थिक बाबतीत ती कुठे कमी पडू नये, अशा प्रकारची भावना या महायुती सरकारची आहे. त्याच्यातून आपण पुढे जात आहोत.

जिजाऊ मातेच्या मातीत आज हा कार्यक्रम होत आहे. याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. गणारायचे आगमन झाले, काल त्याचे विसर्जन केले. मंगलमय वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिले. शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. काही झाले तरी माझी माय-माऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे. विरोधक आमच्यावर टीका करतात. तुम्ही माय-माऊलींना ओवाळणी द्यायच्या ऐवजी सुरक्षित करा, अरे सुरक्षित करायचे काम देखील आमचेच आहे, आम्ही कुठे म्हणतो नाहीये? आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय त्यामुळे जर यदाकदाचित एखादी विकृत, एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा द्यायला हे सरकार मागे-पुढे बघत नाही, अशी खात्री अजित पवारांनी दिली आहे.

अजित पवार म्हणाले, माझ्या बांधवांना वीजमाफी दिली. मला देवेंद्र फडणवीस सांगत होते, अजित पवार आता आपल्याला बिल द्यायचे आहे. बघा तुम्हाला किती रुपयांचे बिल येत आहे. अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे सरकार तुमचे आहे. सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतात हे सरकार तुमचे आहे, हे सरकार शेवटच्या माणसाचे आहे, हे सरकार माझ्या माय-माऊलींचे आहे, हे सरकार गरीब माणसाचे आहे. समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत.

अजित पवार म्हणाले, या योजना सुरू ठेवण्याचे काम देखील तुमच्या हातात आहे. ते कसे? उद्याच्याला विधानसभेच्या निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील, जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या माय-माऊलींनी, माझ्या बांधवांनी धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ हे चिन्ह जिथे कुठे असतील ते बटन दाबा आणि या योजना पुढील पाच वर्षांपर्यंत चालू राहतील, असा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजित पवारचा वादा आहे. मी खोटे बोलणार नाही. या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, आपल्याला पुढचे पैसे द्यायचे आहेत. काल मी 4600 कोटींच्या चेकवर सही करून आलो आहे. सातत्याने तुम्हाला दर महिन्याला हे पैसे मिळणार आहेत. भाऊबीजेला देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्ही विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नका.

ऑटोरिक्षा मीटर तपासणीच्या जागेत बदल

पुणे,दि. १९ : ऑटोरिक्षा चालकांच्या सोयीकरिता १९ सप्टेंबर पासून रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नं.३ व अलंकार पोलीस चौकीसमोर, कर्वेनगर, पुणे येथील ट्रॅकवर ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज तात्पुरत्या स्वरुपात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आल्याची माहिती पुणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मीटर तपासणीची मुदत संपलेल्या ऑटोरिक्षा चालक, मालक यांच्या सोयीकरिता ऑटोरिक्षा मीटर तपासणीकरिता रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलवर्ग कंपनी, लंन नं.३ व इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर, खराडी हे दोन नविन ट्रॅक निश्चित करण्यात आलेले होते.

तथापि, सदर ट्रॅकपैकी खराडी येथील ट्रॅक ऑटोरिक्षा चालकांसाठी गैरसोयीचा असल्याने तो बंद करून त्याऐवजी अलंकार पोलीस चौकी चौकी समोर, कर्वेनगर, पुणे येथे टेस्ट ट्रॅक सुरु करावा अशी मागणी ऑटोरिक्षा संघटनांनी केली होती.

सर्व ऑटोरिक्षा परवानाधारक, चालक यांनी १९ सप्टेंबर पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पासून रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नं.३ व अलंकार पोलीस चौकीसमोर, कर्वेनगर, पुणे येथील ट्रॅकवर सकाळी ७ वाजता सुरु होणार असून, ज्या ऑटोरिक्षाधारकांना त्यांची वाहने मीटर तपासणीकरिता सादर करावयाची आहेत, त्यांनी सकाळी १० वाजण्यापूर्वी वाहने स्टार्ट पॉइंटला उपस्थित ठेवावीत, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

कर्णबधिर प्रवर्गातील दिव्यांग मतदारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु

पुणे, दि. १९ : कर्णबधिर (मुकबधिर) प्रवर्गातील दिव्यांग मतदारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत ९२२६३६३००२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केलेला असून या हेल्पलाईनवर कर्णबधिर मतदारांनी त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती तसेच ईव्हीएम मशीन्सद्वारे मतदान कसे करावे याची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे.

कर्णबधिर व्यक्तींना समजू शकणा-या सांकेतिक भाषा (साईन लाग्नवेज) येणाऱ्या कर्णबधिर विद्यालयातील दोन शिक्षकांची नियुक्ती १८ सप्टेंबर पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ या वेळे दरम्यान निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. कर्णबधिर मतदारांनी व्हिडीओ कॉल द्वारे हेल्पलाईन क्रमांक ९२२६३६३००२ वर संपर्क करावा, असेही जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातले राजकारणच गँगवॉर बनलेय- राजू शेट्टींचा आरोप

पुणे- मागील पाच वर्षात महायुती व महाविकास आघाडी सरकार मी जवळून पाहिले आहे. अनेक सामाजिक प्रश्न उभे राहिले, महिला अत्याचार, बेराेजगारी, शेतकरी आत्महत्या, असंघटित कामगार प्रश्न, महागाई आदी प्रश्न तसेच आहे. करदात्याने दिलेल्या कराचा विनियाेग्य खर्च करण्याची त्यांची इच्छा आहे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. प्रस्थापितांना शह देण्यासाठी व राज्याचा सातबारा हा काेणा एका पक्षाची, नेत्याची मक्तेदारी नाही हे दाखवून देत आहे. राज्यात टाेळीयुध्दा प्रमाणे राजकारण सुरु असून राजकारणाचा स्तर रसातळाला गेला आहे असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

शिवाजीनगर येथील स्वराज भवन येथे छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा.राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरराव धाेंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश यांनी भेट घेऊन चर्चा केली. सर्व नेत्यांची एकत्रित व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे गुरुवारी बैठक हाेऊन पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

या वेळी संभाजीराजे म्हणाले की, निवडणुकीत लाेकांना वेगळा पर्याय पाहिजे आहे त्यादृष्टीने आम्ही समविचारी सर्व संघटना, पक्ष एकत्रित येत आहे. शेतकरी संघटनेचे अनेक नेते आमच्यासाेबत आहे सर्वांचा मिळून एकसमान धाेरण ठरविण्याबाबत चर्चा केली जात आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात अनेकजण वेगवेगळया पक्षात साेईनुसार उड्या मारत आहे. देश कृषीप्रधान असून शेतकऱ्यांनाच त्रास हाेत असेल तर विकासाकडे आपण जाणार कसे आहे. शेतकरी नेते विविध संघटनाचे ते एकत्रित यामाध्यमातून येत असून परिवर्तन आघाडी यापुढे कार्यरत असेल. राज्यात एक सक्षम पर्याय तिसरी आघाडी माध्यमातून देण्यात येईल.

राजू शेट्टी म्हणाले की, देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र मध्ये हाेत आहे. शेतकरी अडचणीत सापडलेला असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगवेगळे नेते एकत्रित येत आहे. पुण्यात सर्वांची एकत्रित बैठक घेऊन सक्षम पर्याय व आश्वासक चेहरा निवडून त्यामागे ताकद उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आमच्यासाेबत येण्याचा काेणता प्रस्ताव आलेला नाही. स्वत:चे अजेंडे मागे ठेवून समान धाेरण कार्यक्रमावर एकत्रित यावे असे प्रयत्न केले जातील हा प्रश्न यंदा यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.