बुलढाणा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढेच महायुतीच्या वाचाळवीर नेत्यांना खडेबोल सुनावले. संविधानानुसार प्रत्येकाला आपापली मते व विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही वाचाळवीर नेत्यांनी वेडेवाकडे बोलून महायुतीच्या घटकपक्षांना अडचणीत आणण्याचे काम करू नये, असे ते म्हणाले. त्यांचा रोख भाजप आमदार नीतेश राणे, खासदार अनिल बोंडे व शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडे होता.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावर अजित पवारांनी बुलढण्यात भर सभेत कान टोचले आहेत. महायुतीचा बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहणार, असे आश्वासन देखील दिले आहे.
अजित पवारांनी संजय गायकवाड यांचे नाव न घेता म्हणाले, मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळविरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, असा सवाल
अजित पवार म्हणाले, समाजाच्या सर्व महिलांना त्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या असो एकही माझी बघिणी त्यात वंचित राहता कामा नये, जिचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. परंतु विरोधकांना हे बघवत नाही. कोर्टात जात आहेत, योजना बंद करा म्हणून सांगायला. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करण्याची भाषा हे लोक वापरत आहेत. तुमची द्यायची दानत नाही, जे देत आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय.
पुढे अजित पवार म्हणाले, काही महिला मला म्हणाल्या की दादा तीन हजार रुपये आमच्या खात्यात आले त्याचे राखी तयार करण्यासाठी त्यातून साहित्य आणले. त्यानंतर आम्ही त्याच्या राख्या तयार करून विकल्या आणि त्यातून 20 हजारांची कमाई केली. एवढा विश्वास त्या महिलेच्या मनात निर्माण झालेला आहे. तिला आम्हाला सबल करायचे आहे. तिला आम्हाला सक्षम करायचे आहे. समाजात तिला आम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलेच आहे. परंतु आर्थिक बाबतीत ती कुठे कमी पडू नये, अशा प्रकारची भावना या महायुती सरकारची आहे. त्याच्यातून आपण पुढे जात आहोत.
जिजाऊ मातेच्या मातीत आज हा कार्यक्रम होत आहे. याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. गणारायचे आगमन झाले, काल त्याचे विसर्जन केले. मंगलमय वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिले. शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. काही झाले तरी माझी माय-माऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे. विरोधक आमच्यावर टीका करतात. तुम्ही माय-माऊलींना ओवाळणी द्यायच्या ऐवजी सुरक्षित करा, अरे सुरक्षित करायचे काम देखील आमचेच आहे, आम्ही कुठे म्हणतो नाहीये? आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय त्यामुळे जर यदाकदाचित एखादी विकृत, एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा द्यायला हे सरकार मागे-पुढे बघत नाही, अशी खात्री अजित पवारांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले, माझ्या बांधवांना वीजमाफी दिली. मला देवेंद्र फडणवीस सांगत होते, अजित पवार आता आपल्याला बिल द्यायचे आहे. बघा तुम्हाला किती रुपयांचे बिल येत आहे. अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे सरकार तुमचे आहे. सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतात हे सरकार तुमचे आहे, हे सरकार शेवटच्या माणसाचे आहे, हे सरकार माझ्या माय-माऊलींचे आहे, हे सरकार गरीब माणसाचे आहे. समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत.
अजित पवार म्हणाले, या योजना सुरू ठेवण्याचे काम देखील तुमच्या हातात आहे. ते कसे? उद्याच्याला विधानसभेच्या निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील, जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या माय-माऊलींनी, माझ्या बांधवांनी धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ हे चिन्ह जिथे कुठे असतील ते बटन दाबा आणि या योजना पुढील पाच वर्षांपर्यंत चालू राहतील, असा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजित पवारचा वादा आहे. मी खोटे बोलणार नाही. या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, आपल्याला पुढचे पैसे द्यायचे आहेत. काल मी 4600 कोटींच्या चेकवर सही करून आलो आहे. सातत्याने तुम्हाला दर महिन्याला हे पैसे मिळणार आहेत. भाऊबीजेला देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्ही विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नका.