‘ब्रम्हांडनायक’ रंगावली प्रदर्शन : शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथावर आधारित रंगावली ; रंगावलीकार शारदा अवसरे आणि ३२ कलाकारांचे सादरीकरण
पुणे : लोकमान्य टिळकांच्या अकोला येथील व्याख्यानात मंडपात उंच स्थानी येऊन बसलेले गजानन महाराज… गजानन महाराजांनी नारायणाला आवाहन केल्यानंतर कोरड्या विहिरीला फुटलेला झरा.. महाराजांनी शांत केलेला अती द्वाड घोडा ही….शिंगावर मुलामाणसांना घेवून तुडविणारी गाय समर्थांपुढे येऊन दिनवाणी झाली आणि समर्थांना वंदन केले तो क्षण…अशा श्री गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित भक्तीकथा रांगोळ्यांच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांनी मिळाली.
शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित ‘ब्रम्हांडनायक’ या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रसिद्ध रंगावलीकार महादेव गोपाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रख्यात रंगावलीकार अक्षय शहापूरकर, ज्येष्ठ रंगावलीकार जगदीश चव्हाण, प्रदर्शनाच्या आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे उपस्थित होते.
नर्मदा नदीतील बुडणारी नाव महाराजांनी काठाला लावली…भक्ताची शिदोरी खाण्यासाठी चार प्रहर उपाशी राहिलेले महाराज आणि शेवटी चार प्रहरांनातर भक्ताने दिलेली भाजी भाकरी खातानाचा क्षण…विठ्ठलाच्या रूपात गजानन महाराजांनी भक्ताला दिलेले दर्शन या रांगोळ्या कलाकारांनी अतिशय बारकाईने साकारल्या आहेत.
शारदा अवसरे म्हणाल्या, प्रदर्शनामध्ये एकूण २३ रंगावलींचा समावेश आहे. गजानन विजय या ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित २१ व २ सर्वत्र पाहिले जाणारी अशी एकूण २३ रूपे साकारण्यात आली आहेत. सर्व रंगावली काढण्याकरिता एकूण ३० किलो रंगावली व रंगाचा वापर करण्यात आला आहे.
प्रदर्शनाकरिता श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे अक्षय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत प्रदर्शन विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी यावे,असे आवाहनही शारदा अवसरे यांनी केले आहे.