Home Blog Page 693

पुण्यात धडक मोहिम: १४ लाखाचे दुध, खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, चटर व नमकीन जप्त

पुणे, दिनांक २०: गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयामार्फत पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनेच्या १०१ तपासण्या करण्यात आल्या असून या मधून दुध, खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, चटर व नमकीन इत्यादी अन्न पदार्थाचे एकूण ११७ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामध्ये अन्न पदार्थाचा एकूण ९ लाख १९ हजार ५२० रुपयांचा किंमत्तीचा साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्हा व पुणे विभागात असे एकूण १४ लाख ३५ हजार ९५८ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

या मोहिमेत जिल्ह्यात अन्न आस्थापनेच्या ४८ तपासण्या करण्यात येऊन दुध, खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, बटर व नमकीन इत्यादी अन्न पदार्थाचे एकूण ५३ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या विश्लेषण अहवाला मार्फत प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करून भेसळीच्या संशयावरुन विविध अन्न पदार्थाच्या धाडी घालुन जप्ती करण्यात आली. या कालावधीमध्ये पुणे कार्यालयाने गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाचा एकूण ५ लाख १६ हजार पेक्षा अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.संबधीत कारवाई अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सर्व सहायक आयुक्त या अन्न सुरक्षा अधिकारी यांचे मार्फत सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन राज्य पुणे तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आली, सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणा-या अन्न पदार्थामध्ये भेसळी संदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे पुणे यांनी केले आहे.

CM साहेब, प्रत्येकी २५ लाख घेऊन ब्लड बँकाना मान्यतेचा प्रस्ताव.. तुमच्या मंत्र्यांना समज द्या – रोहित पवारांचे CM शिंदेंना पत्र

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे . रक्तपेढ्यांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी प्रत्येक प्रस्तावाकरिता २०-२५ लाख रुपयांची लाच घेणे संबंधित मंत्र्यांना शोभत नाही. नियमबाह्य पद्धतीने काम करण्यास अधिकाऱ्यांचा विरोध असला तरी राजकीय दबावामुळे अधिकाऱ्यांचा नाईलाज होत आहे. गेल्या वर्षी नाकारलेल्या प्रस्तावांना येत्या सोमवारी होणाऱ्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या बैठकीत नियमबाह्य पद्धतीने मान्यता देण्यात येणार आहे. संबंधित मंत्र्यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्री साहेबांनी आवर घालून समज द्यायला हवी. अन्यथा आरोग्य विभागाच्या असंवेदनशील कारभारामुळे रक्तदानासारख्या पवित्र क्षेत्रावर जनतेचा विश्वास राहणार नाही. असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात नेमके रोहित पवार यांनी काय म्हटलेय ते वाचा जसेच्या तसे ….

मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई

विषय- रक्तपेढ्‌यांना नियमबाह्य पद्धतीने मान्यता दिली जात असल्याबाबत

महोदय महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रक्तपेट्‌या असलेले राज्य असून राज्यात जवळपास ४०० हून अधिक रक्तपेढ्‌या आहेत. महाराष्ट्राला वार्षिक जवळपास १२ लाख रक्त पिशव्याची गरज असताना सद्यस्थितीला राज्यात वीस लाखाहून अधिक पिशव्या संकलित होतात. महाराष्ट्र हा रक्तसंकलनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतानाही राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून नवीन रक्तपेढ्या स्थापन करण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. परिणामी रक्तदानासारख्या पवित्र क्षेत्राचे व्यापारीकरण होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी राज्य रक्त संक्रमण परिषदेने नाकारलेले रक्तपेढ्‌यांचे प्रस्ताव यंदा गैरमार्गाने व नियमबाह्य पद्धतीने मजूर करण्यात येत आहेत. तसेच राज्य संक्रमण परिषदेच्या पुढील आठवड्‌यात नियोजित ५१ व्या बैठकीत अनेक प्रस्तावांना नियमबाह्य पद्धतीने मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती आहे. नियमबाह्य पद्धतीने मान्यता देण्यास अधिकाऱ्यांचा विरोध असला तरी राजकीय दबावापोटी अधिकान्यांचा नाईलाज होत आहे. सदरील प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी प्रत्येक प्रस्तावासाठी २० ते २५ लाख रुपये घेतले गेले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. रक्तदानासारख्या पवित्र क्षेत्रात अशाप्रकारे दलालखोरांची घुसखोरी होऊन व्यापारीकरण होणे योग्य नाही. रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार, mechanised cleaning मध्ये झालेला गैरव्यवहार, अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना होत असलेली पैशांची देवाणघेवाण, CHO चे पगार काढताना घेतली जाणारी लाच यासर्व प्रकारांमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आधीच बदनाम असून आता रक्तपेढ्‌यांच्या प्रकरणाची त्यात भर पडत आहे. आरोग्य विभागाच्या या असंवेदनशील कारभारामुळे समाजाचा रक्तदानासारख्या पवित्र कार्यावरील विश्वास उडण्याची शक्यता आहे. तरी आपण संबंधित मंत्री महोदयांना समज द्यावी तसेच यापूर्वी नाकारण्यात आलेल्या प्रस्तावाना नियमबाह्य पद्धतीने मान्यता देण्यासाठी फेरविचार न करण्याची व रक्त संक्रमण परिषदेच्या नियोजित बैठकीचे इतिवृत सार्वजनिक करण्याचे आदेश अधिका-यांना द्यावेत हि नम विनती. धन्यवाद.

के रहेजा ग्रुप तर्फे येरवडा जेल मधील सुविधांसाठी ७०.८१ लाख रुपयांचा फंड

पुणे- के रहेजा ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी तसेच अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, अत्याधुनिक रुग्णवाहीका व इतर मुलभुत सोई-सुविधांसाठी ७०.८१ लाख रुपयांचा सी एस आर फंड कारागृह विभागास देण्यात आला. त्यानूसार काम सुरु करण्यासाठी पहिला २० लाख रुपयांच्या हफ्त्याचा धनादेश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गोसावी यांचे हस्ते कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना हस्तांतरीत
करण्यात आला.
कारागृहातील बंदी व अधिकारी / कर्मचारी यांना मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याची अभिनव संकल्पना राबविणेसाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ, अति. अधीक्षक पी पी कदम, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ सी आर सांगळे, व रेहजा ग्रुपचे सहयोगी उपाध्यक्ष नरेंद्र वडनेरे यांनी कामकाज पाहीले.
सदर उपक्रम प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमास स्वाती साठे, . नितिन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे, सुनिल एन ढमाळ, . अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा जिल्हा खुले कारागृह, श्रीमती. पी पी कदम, अति. अधीक्षक विजय कांबळे, उपअधीक्षक, काउमनि कार्यालय तसेच अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्यावेळी चोखपणे कर्तव्य बजावावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि.२०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असून त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्वांनी दक्ष राहून चोखपणे कर्तव्य बजावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक विषयक सर्व समन्वय अधिकारी, संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत. त्यामध्ये प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करुन प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करावा.
जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखड्यातील वेळापत्रकाप्रमाणे कामे करावीत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मतदार जागृती मोहीम राबवावी. मतदान केंद्रातील बदलाबाबत मतदारांना अवगत करावे. या बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करून स्वीप व्यवस्थापन कक्षाने जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवावे.

भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्यात.

यावेळी श्रीमती कळसकर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी करावयाच्या कामाकाजाबाबत माहिती दिली.

बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया, मतदान केंद्र, कायदा व सुव्यवस्था, निवडणूकविषयक खर्च व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ, साधनसाम्रुगी, ईव्हीएम स्ट्रॉंग रुम, वेबकास्टिंग, संपर्क आराखडा, मतदार जनजागृती, माध्यम कक्ष, विविध कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

महापालिका शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच; ‘आप’ची तक्रार

पुणे- महापालिकेच्या बोपोडी येथील श्री सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा बोपोडी शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या , चकणा पाकीट, डोक्या इतके गवत. भिंतीवर गावात आणि झाडे अशी दुरवस्था असल्याचा आरोप करत काही व्हिडीओ आम आदमी पार्टीने शेअर करत महापालिकेच्या शाळांची दुरवस्थेचा विषय चव्हाट्यावर आणला आहे.

आम आदमी पार्टी चे पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला उपाध्यक्ष अँन अनिश, संघटन सह मंत्री विकास चव्हाण, रितेश निकाळजे शाळेत येऊन काम करून घेत आहेत.प्रवक्ते,मुकुंद किर्दत,सतीश यादव, महासचिव, विकास लोंढे, प्रभाग अध्यक्ष यांनीही येऊन प्रशासनाकडून काम करून घेतले. कार्यकर्त्यांनी म्हटले आहेकी येथे भले मोठे मैदान आहे पण फक्त साफ सफाई, आणि सुरक्षे अभावी सारे निरुपयोगी ठरते आहे आम्ही शाळेत आल्यावर धक्कादायक परिस्तिथी समोर आली आहे, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, स्वच्छ्ता होत नाही, टॉयलेट मध्ये पाणी नाही, मच्छर ची फवारणी नाही, सुरक्षा रक्षक अपुरे, रात्री मद्यपी शाळेत बसून दारू पितात.शाळेतील मुख्याध्यापकाला प्रश्न केला असता समजते की अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिका प्रशासनाकडून दाद मिळत नाही.पुणे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकतं, देशात सुरक्षाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तरीही पालिका प्रशासन जागे होत नाही. मनपा प्रशासन फक्त नागरिकांकडून टॅक्स वसूल करते पण मूलभूत सुरक्षा आणि शाळा सुद्धा उपलब्ध करून देत नाहीत.जोपर्यंत वरील प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी चे सर्व कार्यकर्ते हे शाळेत येऊन काम करून घेतील.असे त्यांनी कळविले आहे .

भालबा केळकर नाटिका व राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धा जानेवारीत

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 10 ते दि. 12 जानेवारी तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा दि. 13 ते दि. 21 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहेत.

5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 32वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांमधील शिक्षक प्रतिनिधींची पहिली सभा आज (दि. 20) इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी, अप्पा बळवंत चौक येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात शिक्षकांना संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी माहिती दिली.
भालबा केळकर नाटिका स्पर्धेसाठी 36 तर राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेसाठी 26 शाळांनी अर्ज घेतले.
नाटिका आणि एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांमधील शिक्षक प्रतिनिधींसाठी नोव्हेंबर मध्ये कार्यशाळा घेतली जाणार आहे.

नाट्य क्षेत्रासाठी प्रवीण तुपे यांचे मोलाचे योगदान – प्रशांत दामले

पिंपरी, पुणे (दि. २० सप्टेंबर २०२४ ) ”कलाप्रेमी प्रवीण तुपे यांनी महापालिकेत अधिकारी असताना नाट्यगृहात काय हवे, काय नको, याबाबत कलाकारांची मते विचारात घेऊन प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची निर्मिती केली. त्यामुळे नाट्यगृह आजही सुस्थितीत आहे. तुपे यांचा फोन आला की कोणत्याही कलाकारांकडून घेतला जात नाही असे कधीच होत नाही. लगेच फोन स्वीकारला जातो. नाट्य क्षेत्रात तुपे यांना ओळखत नाही अशी एकही व्यक्ती नाही. कलाकारांना सहकार्य करण्यात ते सदैव तत्पर असतात”, असे गौरोद्वगार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त, सायन्स पार्कचे संस्थापक, संचालक प्रवीण तुपे यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात दामले बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शिवसेनेच्या जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, माजी महापौर नितीन काळजे, तुपे यांच्या सौभाग्यवती रजनी तुपे, महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मनोज शेटीया, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी नगरसेवक अमित गावडे, अरुण बो-हाडे, पंडित गवळी, वसंत नाना लोंढे, संतोष कुदळे, सायन्स पार्कचे शैक्षणिक अधिकारी सुनील पोटे, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे जवाहर कोटवानी, खगोल वैज्ञानिक डॉ. प्रकाश तुपे, संकेत तुपे आदी उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेच्या अभियंता सुरेखा कुलकर्णी यांनी प्रवीण तुपे यांच्यावर कविता सादर केली. त्यांच्या कार्याची ध्वनीफीत दाखविण्यात आली. सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता संजय कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. मानपत्र, पगडी देऊन तुपे यांचा सत्कार केला.
प्रशांत दामले म्हणाले, ”की माझी आणि प्रवीण तुपे यांची २२ वर्षांची मैत्री आहे. नाट्य परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून ब-याच वेळेला मंत्रालयात जाणे होते. त्यामुळे नाही कसे म्हणायचे हे अधिका-यांकडून मला शिकता आले. नाही कसे म्हणायचे हे तुपे यांना चांगले जमते. त्यामुळेच त्यांचे कोणी शत्रू नाही. मलाही त्यांनी एक-दोन वेळा नाही सांगितले आहे. शिक्षणाचा वेगळा पगडा त्यांच्यावर आहे. त्यामुळे बोलताना शब्द कोणता, कसा आणि कोणासमोर सूर कसा वापरायचा हे त्यांना जमते. त्यांनी उत्तम शिक्षणच घेतले नाही तर ते प्रत्यक्षात उतरवले. चिंचवड येथील अत्याधुनिक प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह हे केवळ तुपे यांच्यामुळे उत्तम स्थितीत दिसत आहे. नाट्यगृहात काय हवे, काय नको, हे प्रत्यक्ष उभा राहून, कलाकारांना विचारुन त्यांनी दर्जेदार, टिकाऊ काम केले. नाट्यगृह गळत नाही. आसन व्यवस्था, साउंड यंत्रणा व्यवस्थित आहे. त्यांच्या संकल्पनेतून सायन्स पार्क तयार केले. परंतु, याची महाराष्ट्रात फारशी जाहिरात झाली नाही. लोकांनी यायला पाहिजे, बघायला पाहिजे. शासनाची मदत न घेता ही संस्था स्वत:च्या पायावर उभी आहे. हा प्रकल्प देशभरात पोहोचला पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची” ग्वाहीही दामले यांनी दिली. तसेच ”आकुर्डीतील गदिमा नाट्यगृहात सुधारणा करण्यासाठी तुपे यांनी प्रयत्न करण्याचे” आवाहनही केले.
आमदार गोरखे यांनी मनोगतात, ”प्रवीण तुपे हे चांगले अभियंता आहेत. त्यामुळे अभियंत्याला जोडणे आणि तोडणे चांगले जमते. त्यामुळे कोणतीही जोडतोड न करता त्यांनी काम केले. कधी काय केले पाहिजे हे त्यांना चांगले समजते. त्यांचा अनुभव शहराच्या विकासासाठी उपयोगी होईल”.
आमदार खापरे यांनी तुपे यांचे मार्गदर्शन घेऊन राजकीय वाटचाल सुरु केल्याचे सांगत पुण्यात सांस्कृतीक कार्यक्रम होतात. तर, पिंपरी चिंचवडमध्ये का नाही म्हणून तुपे यांनी स्वरसागर महोत्सव सुरू केला. त्यामुळे अनेक दिग्गज कलाकार शहरात येऊन गेले. महापालिकेने नकार दिल्यानंतरही स्वरसागर महोत्सव सुरू ठेवला. त्यांनी शहरवासीयांचा सांस्कृतीक भूक भागविली”. ‘प्रवीण तुपे यांच्या मनात काय आहे, हे भल्याभल्यांना कळले नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ते शांतपणे खुलासा करत असे. नातीगोती असूनही त्यांनी सर्वांसोबत चांगले संबंध जोपासले. पाण्यात राहून कोरडे राहिले’, असे उबाळे म्हणाल्या.
वैद्य म्हणाले, ”की पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरीत कला रुजविण्यासाठी तुपे यांनी प्रयत्न केले. शहराला सांस्कृतीक वारसा दिला. शहरातील सांस्कृतीक चळवळीची गरज तुपे यांनी भागविली”. तुपे यांनी राजकारणात यावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी केले. पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे जवाहर कोटवानी यांनीही मनोगत व्यक्त केले.

सांस्कृतीक शहर होण्यासाठी काम करण्याचा मानस –
प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम २०० कामगारांच्या मदतीने अवघ्या पाच महिन्यात पूर्ण केले. देशासाठी, शहरासाठी आपण काय केले या विचाराने काम केले. स्वरसागर महोत्सव सुरू केला. सागर हा आनंद देणारा असल्याने स्वरसागर हे नाव दिले. माणूस गुणदोशासह स्वीकारायचा असतो. पुढील पिढीला विज्ञानाची माहिती व्हावी, विज्ञानाचा प्रसार व्हावा या भूमिकेतून सायन्स पार्कची निर्मिती केली. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून अतिशय जागतिक दर्जाचे तारांगण उभारले. गेली ११ वर्षे महापालिकेकडून एक रुपयाही मदत न घेता सायन्स पार्क, तारांगण चालविले जात आहे. परंतु, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे नेहमी सहकार्य असते. नागरिकांचा रोष पत्करुन पाणी मीटर बसविले. स्काडा प्रणालीचा अवलंब केला. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीएला सोबत घेऊन वाहतुकीची समस्या सोडविणे, नदी प्रदूषण मुक्त करणे आणि शहराची सांस्कृतीक नगरी अशी ओळख व्हावी यासाठी काम करण्याचा मानस असल्याचे तुपे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे, आभार प्रतिमा चव्हाण यांनी मानले.

स्कूल व्हॅन चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान -कारवाईची आम आदमी पक्षाची मागणी

धायरी सिंहगड परिसरात पालक हैराण

पुणे:
धायरी, सिंहगड रोडखाजगी स्कूल व्हॅन चालकांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त झाले आहेत.तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.धायरी येथील डिएसके स्कूल मधील खाजगी स्कूल व्हॅन चालकांची अरेरावी सुरू आहे तर इतर शाळांतील खाजगी स्कुल बस, व्हॅन तसेच रिक्षा चालक पालकांना वेठीस धरत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. या प्रकारामुळे पालक हैराण झाले आहेत.संबंधित शिक्षण संस्था, शिक्षण विभाग व वाहतूक पोलीस,परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खाजगी स्कूल व्हॅन चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीआम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनीकेली आहे ‌
याबाबत बेनकर यांनी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.बेनकर म्हणाले,या परिसरात नामांकित शिक्षण संस्थाही इतर खाजगी संस्थांच्या पन्नासहून अधिक शाळा आहेत.शिक्षण संस्था,शिक्षण विभाग व वाहतूक पोलीस, परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे खाजगी स्कूल व्हॅन चालक अरेरावी करत आहेत. पालकांना वेठीस धरत असुन आर्थिक लुबाडणूक करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे

बेनकर यांनी असे म्हटले आहे कि,’ आज ड्रायव्हर नाही,व्हॅन बंद पडली आहे, बाहेरगावी गेलो आहे. त्यामुळे व्हॅन येणार नाही असे सांगून अधुनमधून व्हॅन चालक पसार होत आहेत. एका वॅन मध्ये क्षमतेपेक्षा चार पट अधिक मुलं कोबत आहेतत्यामुळे विद्यार्थ्यांना ऐनवेळी खाजगी वाहनाने शाळेत जावे लागते. काही विद्यार्थी शाळेतही जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
पालकांकडून मात्र संपूर्ण महिन्याचे भाडे मात्र व्हॅन चालक वेळेवर वसुल करत आहेत.पालकांकडून अगोदर प्रवास भाड्याची अनामत रक्कम घेतली जाते. महिना पूर्ण होताच उर्वरित सर्व भाडे घेतले जाते असे असताना व्हॅन चालक पालकांना अचानक रात्री मोबाईलवर उद्या गाडी नाही असा मेसेज पाठवून पसार होतात. पालकांनीकारण विचारले तर दुसरी गाडी बघा.विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील फक्त दहा महिनेच शाळेत व तेथून घरी सोडले जाते. या शिवाय महिन्यात रविवार व इतर सुट्ट्यां मिळुन पाच ते सात दिवस सुट्ट्या असतात. असे असताना संपूर्ण महिन्याचे भाडे घेऊन व्हॅन चालक पालकांना वेठीस धरत आहेत.
याबाबत शाळेत तक्रार दखल घेतली जात नसल्याचे पालकांनी सांगितले.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा सोमवारी ७वा दिक्षांत समारंभ

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत २९७२ विद्यार्थ्यांना बहाल होणार पदवी

पुणेः एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभाचे सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वा. आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सी.पी.राधाकृष्णन (राज्यपाल, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली लोणी काळभोर येथे पार पडणार आहे. यंदा विद्यापीठातील २९७२ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे. 

यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ, गांधीनगर, गुजरातचे कुलगुरू, पद्मश्री डॉ.जयंतकुमार एम.व्यास यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाने सन २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. यंदाच्या दिक्षांत समारंभात, २२ विद्यार्थ्यांना पीएचडी, ५३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर १९४ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह जवळपास ८ हजारपेक्षा अधिक लोक देशभरातून उपस्थित राहणार आहेत. 

विद्यापीठाने परीक्षेसाठी संपूर्ण डिजीटल प्रणाली अवलंबली असून, त्यामुळे परिक्षेची अंमलबजावणी निर्विघ्न होते. यासह वेळेत अचून निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता ओळख बनली आहे.

विद्यापीठाच्या आजपर्यंत झालेल्या ६ दिक्षांत समारंभात .नितीन गडकरी, विनोद तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ.जी.सतीश रेड्डी, इस्त्रोचे विद्यमान चेअरमन डॉ.एस. सोमनाथ यांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे यंदा आम्ही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे विद्यापीठात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, अशी माहिती विद्यापीठाचे, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ.ज्ञानदेव नीलवर्ण, मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता प्रिया सिंग यांनी यावेळी दिली आहे. 

“यंदाच्या दिक्षांत समारंभात २२ पीएचडी, ५३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांसह एकूण २९७२ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यपाल मा.श्री. सी.पी.राधाकृष्णन व पद्मश्री. पद्मश्री डॉ.जयंतकुमार एम.व्यास विद्यापीठात प्रथमच येत असल्याने, त्यांचे स्वागतासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. ”

– प्रा.डॉ. मंगेश कराड,  कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.

तिसरी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धायुवान वालिया व आद्या बाहेतीयांना अजिंक्यपद

0

संभाजीनगर दिनांक २० सप्टेंबर
युवान वालिया (मुंबई महानगर जिल्हा) व आद्या बाहेती (परभणी) यांनी अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला आणि तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे अकरा वर्षाखालील मुले व मुली गटात विजेतेपदावर मोहोर नोंदविली.

 टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ संभाजीनगर यांनी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात संभाजीनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुलांच्या अंतिम फेरीत युवान (मुंबई महानगर जिल्हा) याने आलम सिद्दिकी (बीड) याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. त्याने हा सामना ११-३, ८-११,११-५,११-५ असा जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. या सामन्यातील दुसरी गेम घेत सिद्दिकी याने उत्सुकता वाढवली होती मात्र नंतरच्या दोन्ही गेम्स मध्ये युवान याने आपल्या खेळावर नियंत्रण राखले आणि विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात आद्या हिने अजिंक्यपद पटकावित अव्वल मानांकन सार्थ ठरविले. मात्र अंतिम सामन्यात तिला जिनया वधान या ठाण्याच्या द्वितीय मानांकित खेळाडू विरुद्ध संघर्ष करावा लागला हा सामना तिने २-११,१२-१०,११-९,९-११,११-५ असा जिंकला.

मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात टी एस टी मुंबई संघाच्या झैन शेख याने विजेतेपद मिळवित अग्रमानांकन सार्थ ठरविले. त्याला अंतिम सामन्यात त्याचाच सहकारी व द्वितीय मानांकित खेळाडू आरव व्होरा याने चुरशीची लढत दिली. हा सामना शेख याने १०-१२,११-७,६-११,१३-११,११-५ असा घेताना चॉप्स पद्धतीचा बहारदार खेळ केला. मुलींच्या गटात अग्रमानांकित मायरा सांगळेकर या टीएसटी मुंबईच्या खेळाडूने सहज विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम सामन्यात ठाण्याची खेळाडू धनश्री तरडे हिच्यावर ११-५,११-९,११-७ अशी मात करताना परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला.

मातंग समाजाच्या २ वर्ष वयाच्या अल्पवयीन पिडीतेला तात्काळ न्याय द्या अन्यथा … अविनाश बागवेंचा इशारा

भोर येथील अत्याचारप्रकरनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करा

पुणे — मौजे वरदे ब्रु. ता. भोर जिल्हा पुणे येथील मातंग समाजाच्या २ वर्ष वयाच्या अल्पवयीन अत्याचार झालेल्या मातंग समाजातील अल्पवयीन मुलीला तत्काळ न्याय द्या अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी दिला आहे .आज त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले आहे .यावेळी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ही मागणी त्यांनी केली आहे .यावेळी मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे ,विठ्ठल थोरात,अॅड. राजश्री अडसूळ,अध्यक्ष पुणे शहर मं.ए. आ महिला,अध्यक्ष पुणे शहर सौ. सुरेखा खंडाळे ,सरचिटणीस दयानंद अडागळे, शहर कार्याध्यक्ष रमेश सकट, डॉ. रमाकांत साठे यासह पुणे शहरतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या निवेदनात असे म्हटले आहे कि,’ मागील काही महिन्यापासुन सातत्याने पुणे शहर व जिल्हयातील वेगवेगळ्या भागामध्ये अल्पवलीन मुलींवरील अत्याचारामध्ये मोठया प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असुन ही बाब अत्यंत चिंताजनक, निंदनिय व माणुसकिला काळीमा फासनारी असुन यापुर्वी अशा प्रकारच्या घटना कधीही घडत नव्हत्या व घडलेल्या नाहीत अलीकडच्या काळामध्ये असे सरास प्रकार दररोज पाहायला मिळतात कारण महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे विस्कळीत झालेली असुन गुन्हेगारावरती पोलिस प्रशासनाचा वचक राहीलेला नाही म्हणुन अशा प्रकारच्या निच व वाईट प्रवृत्तीला जो पर्यंत कठोरातली कठोर शिक्षेची तरतुद कायदयामध्ये होत नाही आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय अशा प्रकारच्या घटनेला आळा बसणार नाही. तेव्हा या प्रकरणातील आरोपी प्रद्युम्म संतोष शेलार यास बाल लैंगिक अत्याचार कायदयानुसार जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेकडुन आम्ही मागणी करीत आहोत.तसेच कुमारी हिचे पालक तकार दाखल करण्यास गेल्यानंतर तेथील संबधीत पोलिस अधिकारी यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात न घेता तकार दाखल करून घेण्यास टाळटाळ केली अशा संबधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करावी हि विंनती. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने या विरोधात तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे .

वीजबिलांच्या थकबाकीसह मासिक बिलांची १०० टक्के वसूली क्रमप्राप्त

वाढणारी थकबाकी हा कर्तव्यात कसूरच-महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश

पुणे, दि. २० सप्टेंबर २०२४: पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिलपासून लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या मासिक वीजबिलांच्या थकबाकीत सातत्याने वाढ होत आहे. वसूलीअभावी महावितरण सध्या आर्थिक प्रश्नांना सामोरे जात आहे. त्यामुळे वीजबिलांची सतत वाढणारी थकबाकी हा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातील कसूर आहे. थकबाकी वसूलीच्या उद्दिष्टासह मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली करणे क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये हयगय चालणार नाही अशा सूचना महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी दिला.

गणेशखिंड येथील प्रादेशिक कार्यालयाच्या ‘प्रकाशभवन’ सभागृहात शुक्रवारी (दि. २०) पुणे परिमंडलातील वीजबिल वसूली व इतर कामांचा आढावा घेताना श्री. खंदारे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. सिंहाजीराव गायकवाड, श्री. विजयानंद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक श्री. खंदारे म्हणाले की, पुणे परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ८ लाख ६१ हजार लघुदाब ग्राहकांकडे सध्या २६१ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर मासिक बिलांपोटी ९०५ कोटी रुपयांचा महसूल वसूल करायचा आहे. थकबाकीसह चालू मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली करण्यात कोणतीही कुचराई करू नये. तसेच महावितरणकडून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या जागांची तपासणी सुरु आहे. या विशेष मोहिमेत थकबाकी असलेल्या जागेवर विजेची चोरी आढळल्यास तात्काळ कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.

महावितरण अभय योजनेतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवरील थकबाकी शून्य करणे, मागणीनुसार नवीन वीजजोडणी देणे या कामांना आणखी वेग द्यावा. तसेच अतिप्रमाणात वीजगळती असलेल्या वीजवाहिन्यांचे पर्यवेक्षण करून वीजहानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरोधात आक्रमक कारवाई करण्याची सूचना प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केली. या बैठकीला पुणे परिमंडल अंतर्गत सर्व कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी आदींची उपस्थिती होती.

विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्ये करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

-माजी आमदार मोहन जोशी यांची पोलीसांत फिर्याद

पुणे – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन, त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करणारे भाजपचे नेते तरविंदर सिंग मारवा, रेल्वे राज्यमंत्री रवनीत बिट्टू, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराज सिंग, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हे दाखल करा, अशी फिर्याद माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (शुक्रवारी) पोलीसात केली आहे.

पोलीस उपायुक्त आर.राजा यांना भेटून मोहन जोशी यांनी फिर्याद दाखल केली. यावेळी रमेश अय्यर, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, सुनील मलके, खंडू सतिश लोंढे, ॲड.निलेश गौड आणि सौ.पल्लवी सुरसे यावेळी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरूद्ध खोट्या बातम्या आणि प्रचार जाणीवपूर्वक करीत आहेत, असे मोहन जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भाजपचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसा व्हिडिओ त्यांनी एक्स या समाज माध्यमावर प्रसारित करून गंभीर गुन्हा केला आहे. बी एन एस कायदा कलम ३५१, ३५२, सह ६१ प्रमाणे गंभीर गुन्हा केला आहे. तसेच रेल्वे राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी मीडियासमोर मुलाखत देताना ‘राहुल गांधी टेररिस्ट है, देशका बडा दुष्मन है’, अशी विधाने करून अब्रुनुकसानीचा गुन्हा केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी एका पब्लिक मिटिंगमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ कापून आणेल त्याला ११लाख रुपये बक्षीस देऊ, असे गुन्हेगारी वक्तव्य केले. महाराष्ट्रातील सार्वजनिक शांतता भंग करण्याचा गुन्हा केला आहे. तसेच बी एन एस कायदा कलम ४६, ५५, १९२, १९६ सह ६१ प्रमाणे गंभीर दखलपात्र गुन्हा केला आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराज सिंग यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिकरित्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात, धर्म, वंश, जन्मठिकाण याचा उल्लेख करून समाजात तेढ निर्माण केली. बी एन एस कायदा कलम १९२, ३५६, १९६ सह ६१ प्रमाणे दखलपात्र गुन्हा केलेला आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत, असे विधान केले. बी एन एस कायदा कलम ४६, ५५, १९२, १९६ सह ६१ प्रमाणे गंभीर दखलपात्र गुन्हा केलेला आहे.

आरोपी संजय गायकवाड, तरविंदर सिंग मारवा, रवनीत बिट्टू, रघुराज सिंग, अनिल बोंडे यांनी आपापसात फौजदारी कट रचून संगनमत करून दखलपात्र गुन्हे केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातील विधाने टीव्ही वर प्रसारित केली. आरोपींच्या बोलण्यामध्ये व्यापक कटकारस्थान रचल्याचे दिसून येते. आरोपींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत खोटी विधाने करून बी एन एस कायदा कलम ४६, ५५, १९१, १९२, १९६, १५१,३५२, ३५६ सह ६१ प्रमाणे दखलपात्र गुन्हा केला आहे, असे मोहन जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

व्हिडिओ वरून सकृतदर्शनी आरोपींनी दखलपात्र गुन्हा केल्याचे पुराव्यानिशी दिसून येत आहे. या गुन्ह्यांची माहिती मी, आपणास लेखी स्वरूपात देत आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरूद्ध उत्तर प्रदेश सरकार व इतर (२०१३) १४ एस.सी.आर ७१३ मधील न्यायनिवाड्याप्रमाणे एखाद्या पोलीस अधिकाऱ्यास दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यास सदर पोलीस अधिकाऱ्यास एफ.आय.आर. नोंदवून घेणे बंधनकारक आहे. या नुसार मी दिलेल्या लेखी माहितीच्या आधारे आरोपींविरोधात त्वरित एफ.आय.आर नोंदवावा आणि दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी. एफ.आय.आर नोंदवून न घेतल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होईल, असे मोहन जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

अहो ऐकलत काय ? पुण्यात काय घडलंय ?पहा नेमके काय घडलंय ….(व्हिडीओ)

पुणे- शहराच्या अत्यंत वर्दळीच्या गजबजलेल्या आणि मध्यवर्ती भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सिटी चौक परिसरातील समाधान चौक येथे रस्त्याला भगदाड पडले आहे. या खड्ड्यात पुणे महानगरपालिकेचा ट्रक पडलेला दिसतोय. त्यासोबतच दोन ते तीन दुचाकीही या खड्ड्यात पडल्याचे समोर आले आहे.ट्रक बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.अचानक हा खड्डा पडल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. जवळपास 30 ते 40 फूट खोल हा खड्डा पडल्याची माहिती आहे. पुणे मनपाच्या ट्रकसह दोन दुचाकीही या खड्ड्यात पडल्याची माहिती आहे. ही घटना आज चार वाजताच्या सुमारास घडली.हा ट्रक ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी बोलावण्यात आला होता. त्यावेळी ट्रक मागे घेत असतांना हा खड्डा पडला आणि ट्रक हळुहळू त्या खड्ड्यात फसत गेला. वेळीच प्रसंगावधान साधून चालकाने उडी मारल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही.

आता पुण्यात घडलेल्या ‘त्या’ किस्स्याचे सीसी टीव्ही फुटेज पहा

माझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव

अखिल मंडई मंडळातर्फे गणेशोत्सवात राबणाऱ्या ४०० हून अधिक कष्टकरी हातांचा सन्मान : सन्मान सोहळ्याचे २७ वे वर्ष
पुणे : पुण्यात जेव्हा महामारीची साथ सुरू झाली तेव्हा कष्टकरी कामगारांनी रजा काढल्या नाहीत किंवा पळून गेले नाहीत. ते कामावर हजर राहिले, शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला. कष्टकरी बांधव तोंडावर मास्क ठेऊन कामावर येत होते. माझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

अखिल मंडई मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूकीदरम्यान आणि गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवणाऱ्या ४०० हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वंचित आणि उपेक्षितांसाठी संस्था चालविणाऱ्या संस्थाचालकांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, विक्रम खन्ना, सुरज थोरात, राजेश कारळे उपस्थित होते. उपरणे, श्रीफळ, शारदा गजाननाची प्रतिमा, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.

डॉ.बाबा आढाव म्हणाले,  कष्टकरी वर्गाचा सन्मान करून विधायक काम मंडळ करीत आहे. सत्कार घ्यायला ज्या भगिनी आलेल्या आहेत, मंडईच्या पायाची जमीन सुद्धा त्यांच्या नावाची आहे. कष्टकरी कचरा उचलतात ते महानगर पालिकेचे नोकर नाहीत. काच, प्लास्टिक, लोखंड गोळा करून पुनर्निर्मिती होते आणि त्यातून त्यांच्या पोटाला आधार मिळतो.

हर्षद झोडगे म्हणाले, दरवर्षी सफाई कामगारांचा सन्मान करून सामाजिक भान अखिल मंडई मंडळाच्या वतीने जपले जाते. सामाजिक कार्याला लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी तर्फे नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, यापुढेही मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.

अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात आणि विसर्जन मिरवणुकी नंतर देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण शहर स्वच्छ राहते. कोणतीही रोगराई न पसरण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाला खूप महत्त्व आहे. एक दिवस त्यांनी सफाई केली नाही तर शहराची काय अवस्था होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या कष्टकरी वर्गाच्या कामाचे मोल लक्षात घेऊन मागील २७ वर्षांपासून त्यांचा सन्मान गणेशोत्सवानंतर करण्यात येतो.