पीसीईटी संचलित पुणे बिझनेस स्कूलचा दुसरा पदवी प्रदान सोहळा उत्साहात
पिंपरी, पुणे (दि. २१ सप्टेंबर २०२४) – शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्यक्ष व्यवसायिक जगतामध्ये प्रवेश करत आहात. यापुढील जिवनात अनेक आव्हाने समोर येतील. या आव्हानांना सकारात्मक विचार करून सामोरे जा. यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त तथा पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पुणे बिझनेस स्कूलचा दुसरा पदवी प्रदान सोहळा निगडी येथील संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू डॉ. पराग काळकर, डिलॉईट कंपनीचे कार्यकारी संचालक रवी प्रताप सिंग, हॉर्टिकल्चर इन्सेक्टिसाईड इं. चे महाव्यवस्थापक प्रवीण जाधव, बीएनवाय मिलॉनचे उपाध्यक्ष बळीराम मुटगेकर, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीबीएसचे संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी त्यागी, पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते. प्रारंभी पीबीएसच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा डॉ. राव यांनी घेतला. यावेळी विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉ. काळकर म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक असतो. विज्ञान तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विकसित होत आहे. विद्यार्थ्यांनी काळानुरूप धावण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, तरच प्रगती करून भविष्य उज्ज्वल होईल. मुटगेकर म्हणाले की, जगभरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु चांगले मनुष्यबळ नसल्याने रोजगारा बरोबरच आर्थिक विकासाला मर्यादा पडतात. विद्यार्थ्यांनी स्वप्न साकारण्यासाठी मिळालेली संधी न सोडता प्रामाणिक प्रयत्न, कठोर परिश्रम घेतले पाहिजेत; म्हणजे आयुष्यात यशस्वी व्हाल, असे मुटगेकर यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली असली तरी विविध क्षेत्रात माणसाने प्रत्यक्षात काम केले तरच आपली प्रगती होऊ शकते. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता पेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले तर ते अधिक परिणामकारक आणि उपयुक्त ठरते, असे रवी प्रताप सिंग यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी ज्या विषयात शिक्षण घेतले, त्याच क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार करावा. कौशल्य विकास आणि संवाद कौशल्यावर भर देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये बदल तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सुधारणा केल्या पाहिजेत, असे मार्गदर्शन प्रवीण जाधव यांनी केले. प्रास्ताविक डॉ. गणेश राव यांनी केले. डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी आभार मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे : कात्रज येथील सरहद महाविद्यालयामधील १५१८ विद्यार्थिनींनी एकाच दिवशी तब्बल १० हजार ७५० कोरफड रोपांची लागवड करून विक्रम केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
सरहद महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त १५१८ विद्यार्थिनींनी १० हजार ७५० पेक्षा जास्त कोरफड रोपांची लागवड केली. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संगीता शिंदे, परीक्षक चित्रा जैन, सरहद संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख, सरहद महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख, उपक्रम समन्वयक वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. वर्षा निंबाळकर, सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी, स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
शैलेश वाडेकर म्हणाले, शाश्वत विकास साधायचा असेल तर पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि केवळ बोलण्यापेक्षा आणि शिकण्यापेक्षा त्यांच्या हातून कृती घडावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुज नहार म्हणाले, कारगिल मधील सुरू व्हॅली येथे निसर्गोपचारावर आधारित उपक्रम सरहद संस्थेच्या वतीने सुरू आहेत. त्या उपक्रमांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने आणि कोरफड वनस्पतीचे फायदे समजावेत, निसर्गोपचारांबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी कोरफड लागवडीचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.
डॉ. संगीता शिंदे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पर्यावरण पूरक अशा कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावण्यात आले असून विद्यार्थिनी हे रोप घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरात, घरी सोसायटीमध्ये लावणार आहेत. डॉ. स्वाती माने व कोमल शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रीराज भोर यांनी आभार मानले.
नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. ‘गुलाबी’ चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी भेटण्याची तारीख २२ नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही ‘गुलाबी’ चित्रपटगृहात पाहाता येईल.
विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला मिळणार हे नक्की!
‘गुलाबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले की, “आज गणपती बाप्पाच्या प्रसन्न वातावरणात ‘गुलाबी’ चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. गुलाबी या नावावरून सिनेमा स्त्रीप्रधान असला, तरी त्यात मनोरंजनही तितकेच आढळून येईल. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतील. ‘गुलाबी’ हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर तो विचार, वागणूक, स्वप्न आणि नाती यांचा एक सुंदर गुलाबी प्रवास आहे, जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडलेला आहे. या चित्रपटात आम्ही स्त्रीच्या भावविश्वाची, संघर्षाची आणि यशाची गाथा मांडली आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि स्वप्ने पुन्हा नव्याने जगायला प्रेरित करेल. प्रेक्षकांना त्यांच्याशी निगडित असलेल्या भावना या चित्रपटातून नक्कीच अनुभवता येतील.”
डॉ. विद्याधर कुंभार लिखित ‘होलिस्टिक ॲन्सर्स फ्रॉम आयुर्वेदा’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे : आयुर्वेद शास्त्र प्राचीन असून त्याकडे दुर्लक्ष झाले होते, परंतु गेल्या काही वर्षात आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे लक्ष वेधले गेले आहे. सर्वांगिण आरोग्य उत्तम, निरामय ठेवण्यासाठी आयुर्वेद शास्त्र उपयुक्त आहे. डॉ. विद्याधर कुंभार लिखित ‘होलिस्टिक ॲन्सर्स फ्रॉम आयुर्वेदा’ या पुस्तकाद्वारे आयुर्वेदिक शास्त्राचे समग्र ज्ञान प्राप्त होईल, असा विश्वास पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.
डॉ. विद्याधर कुंभार लिखित ‘होलिस्टिक ॲन्सर्स फ्रॉम आयुर्वेदा’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (दि. 21) ध्रुव ऑडिटोरिअम, इंदिरा कॉलेज, वाकड येथे आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर आणि संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. भटकर बोलत होते. ‘होलिस्टिक ॲन्सर्स फ्रॉम आयुर्वेदा’ या पुस्तकाचे संपादन डॉ. विजय भटकर यांनी केलेले आहे. इंदिरा कॉलेजच्या संस्थापक डॉ. तारिता शंकर, ‘इंदिरा’चे सीईओ डॉ. पंडित माळी, प्रा. चेतन वाकळकर यांची उपस्थिती होती.
शारीरिक स्वास्थ उत्तम असल्यास व्यक्ती चांगल्याप्रकारे कार्यरत राहू शकतो, असे सांगून डॉ. भटकर पुढे म्हणाले, आयुर्वेद शास्त्राची उपयुक्तता लक्षात घेऊन आयुर्वेदातील भारतीय ज्ञान प्रणालीचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर देश-विदेशात होऊ लागला आहे, ही समाधानाची बाब आहे.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असताना कामाप्रती निष्ठा ठेवल्यास त्याचा ताण जाणवणार नाही. वेळेचे योग्य नियोजन, सतत नवीन शिकण्याची उर्मी, अडणीतून मार्ग काढण्याच्या युक्त्या यावर लक्ष केंद्रीत केल्यास मनाच्या स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्यही उत्तम राहू शकते.
पुस्तक लिखाणाविषयी मनोगत व्यक्त करून डॉ. विद्याधर कुंभार म्हणाले, आजच्या काळात आपण घरगुती उपचार विसरलो आहोत. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींसाठी बरेचदा डॉक्टरकडे जाणे आवश्यक नसते. आयुर्वेदात परंपरेने सांगितलेले घरगुती उपचार केल्यास आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतो. अशा आयुर्वेदिक संकल्पनांची माहिती कळावी या करिता पुस्तकाचे लिखाण केले आहे. आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचार लाभदायी ठरू शकतात, असे मत डॉ. तारिता शंकर यांनी मनोगतात व्यक्त केले.
पुणे : पुण्याच्या वडगाव शेरी भागातील मतेनगर येथे एका सुपर मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण ८ अग्निशमन वाहने दाखल झाली असून जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मतेनगर येथे एका सुपर मार्केटला आग लागली आहे. एकुण पाच दुकानांना आग लागली असून पत्र्याची दुकाने आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाची ८ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जवानांनी सांगितले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसेच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
पुण्यातील कर्वेनगर येथील कमिन्स महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य महाव्यवस्थापक तथा क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत दिवेघाट ते हडपसर या पॅकेज 6 च्या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण लांबी 13.25 किलोमीटर इतकी असून त्याची किंमत 819 कोटी रुपये असणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे बांधकामही यावेळी सुरू करण्यात आले. या प्रकल्पाची एकूण किंमत 80 कोटी रुपये इतकी असणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना अभिवादन केले. शेकडो वर्षांचा वारीचा इतिहास असलेल्या आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या पालखी मार्गाची निर्मिती करण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद होत आहे. वारकरी संप्रदायाने जातीभेद दूर करण्याचा संदेश दिलेला असून मानवतेचा धर्म आपल्याला शिकवलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामुळे आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध झाले आहे, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की संत ज्ञानेश्वरांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरें’ हे ब्रीद आपल्या सर्वांना दिले आहे. त्यामुळे पालखी मार्गाची निर्मिती करताना तेथील वृक्षतोड टाळून 800 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. पुढील काळात शासनाने स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पालखी मार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे. हा पालखी मार्ग एक ‘ग्रीन हायवे’ बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामे सुरू करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, आगामी काळात पुणे-सातारा, नाशिक फाटा-खेड, हडपसर-यवत, कात्रज-रावेत, पुणे-शिरूर, पुणे-संभाजीनगर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्यांसह मुंबई-बंगळुरू नव्या द्रुतगती मार्गाचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याच्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाचा उल्लेख केला. मोहोळ यांचा प्रस्ताव अतिशय महत्त्वाचा असून पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव देण्याची मागणी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करून त्यासाठी पाठपुरावाही करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या विकासासोबतच केंद्र सरकारकडून देशात पेट्रोल-डिझेलऐवजी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहे. आगामी काळात 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील. यामुळे प्रदूषण कमी होऊन कमी खर्चात नागरिकांना प्रवास करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुण्यातील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रिपदाच्या गेल्या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग तयार झाले. नितीन गडकरी यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून पुणे विभागात सध्या 1 लाख 25 हजार कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत.
गेल्या 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात महामार्गांचे जाळे उभारले आहे. 2014 पूर्वी देशात प्रतिदिन केवळ 12 किलोमीटर रस्ते तयार होत असत. आज हा आकडा अडीचपटांनी वाढून प्रतिदिन 28 किलोमीटर रस्ते देशात तयार होत आहे. आज देशात 1 लाख 46 हजार किलोमीटरचे रस्त्यांचे नेटवर्क असून नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात हे नेटवर्क 60 टक्क्यांनी वाढले आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुण्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर असून लवकरच सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा असलेले शहर अशी ओळख पुण्याला प्राप्त होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच पालखी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य महाव्यवस्थापक तथा क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले. तर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करत नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले. अखेरीस, प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सर्वांचे आभार मानले.
वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि.२१: पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे.
एनएचएआय मार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरुर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामे करण्यात येतील. मुंबई- बेंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात वारीचे महत्व मोठे आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता वर्षांनुवर्षे, शतकानुशतके अडचणीचा सामना करुन वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतात. वारीत पोहचू न शकणारे भाविक आपआपल्या देशातून दर्शनाचा लाभ घेतात, त्यामुळे आपली वारी आता वैश्विक झाली आहे. वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते रुंद झाले पाहिजे, पालखी मार्ग वेगळा करुन त्या मार्गावर सर्व प्रकारच्या सोई असल्या पाहिजे यादृष्टीने काम होत आहे. वारकऱ्यांना पालखी तळावरही विविध सोई-सुविधा देण्याकरीता त्याठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने कामे करण्यात येईल. येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार मार्गाबाबत आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुण्याहून सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत औद्योगिक विकासाला लागणाऱ्या पूरक बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात विविध पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता मोठ्या प्रमाणात ई-बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आगामी काळात १ हजार ई-बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळात सर्व सोई-सुविधांयुक्त महत्त्वाचे शहर म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. पुणे नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नामकरण करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल, आणि केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. पुण्याच्या मेट्रोचे एक एक टप्पे पूर्ण करण्यासोबत नवीन टप्पे मंजूर करण्याचे काम सुरु आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी ३ लाख ५० हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. हे पाहता पुणे शहराला मेट्रोची आवश्यकता लक्षात येते. त्यामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करण्याचे काम करण्यात येत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ म्हणाले, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग निर्माण झाले आहेत, असेही श्री. मोहोळ म्हणाले.
सहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, पुणे शहर एक मोठे केंद्र झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता पुणे ते छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच तळेगाव ते चाकण रस्त्यांची प्रलंबित कामे करुन प्रश्न मार्गी लावावी. देहू, आळंदी आणि पंढरपूर विकास आराखड्याला गती देण्याकरीता केंद्र शासनाने सहकार्य करावे, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पालखी महामार्गांवरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत; दिवसेंदिवस वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पालखीतळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी निवारा आणि शौचालयाची व्यवस्था करावी, अशी सूचना करुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करण्यात येईल, असे श्री. पाटील म्हणाले.
यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी, श्रीमती सुळे व आमदार श्री. तापकीर यांनीही विचार व्यक्त केले. श्री. श्रीवास्तव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ अंतर्गत दिवेघाट ते हडपसर या पॅकेज ६ च्या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी असून त्याची किंमत ८१९ कोटी रुपये असणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे, या प्रकल्पाची एकूण किंमत ८० कोटी रुपये इतकी असणार आहे, या कामांचे कळ दाबून आभासीपद्धतीने भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
पुणे, दि. २१: प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते.केंद्रीय मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले आहेत. त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला आहे. शुद्ध पाणी घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी झाला. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती देण्यात येत आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. जगाच्या १८ टक्के लोकंसख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक पाणी केवळ ४ टक्के उपलब्ध आहे. भविष्यात देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पर्याप्त पाणी उपलब्ध होऊ शकेल. पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी कामे सुरु आहेत. यास समाजाचाही पाठिंबा आवश्यक आहे. पुढील काळात प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेले काम यादृष्टीने अत्यंत प्रशंसनीय आहे.
जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये ‘नाम’ फाउंडेशनचा मोठा वाटा -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाम फाउंडेशनने राज्यातील सर्वाधिक दुष्काळी भागात परिवर्तन घडवून आणले. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये नाम फाउंडेशनचा मोठा वाटा आहे. देशातील सर्वांत जास्त मोठी धरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील ५५ टक्के भाग अवर्षणप्रवण आहे. महाराष्ट्रातील पाणी समस्येवरील उपाय शोधण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाची शासनाने आखणी केली. या कार्यक्रमाला नाम फाऊंडेशनने लोकचळवळीत रुपांतरीत केले. ते म्हणाले, नाम फाउंडेशनने एक हजार पेक्षा जास्त गावांमध्ये वेगवेगळी कामे केली. दुष्काळी भागातील जलसंधारणाची कामे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, मुलींचे लग्न, महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम त्यांनी केले. सर्वसामान्यांची दुःखे आत्मसात करुन नाम कार्य करत आहे. महाराष्ट्रात जोपर्यंत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणार नाहीत, पाण्याचा थेंब न थेंब जोपर्यंत जमिनीत मुरणार नाही, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. हे ओळखून शासनाने जलयुक्त शिवार ही योजना प्राधान्याने राबविली. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी साठवण झाली. अनेक गावे पाणीदार झाली आहेत. जलसंधारणामुळे शेती समृद्ध झाली. हे काम अव्याहत चालणारे असून जलसंधारणाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी नाम फाउंडेशन सारख्या अन्य संस्थानी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन श्री फडणवीस यांनी केले.यावेळी नाम फाऊंडेशनबद्दल बोलताना ते म्हणाले, नाम फाऊंडेशनने लोकांची मानसिकता बदलली. लोकांना पाण्याचे इंजिनिअरिंग शिकविले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यात सामान्य माणसाचे दु:ख जगण्याची क्षमता असल्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. त्यांच्या संस्थेचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजपरिवर्तन घडवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
नाम फाऊंडेशनचे काम भविष्यातील कार्याला उर्जा देणारे- उद्योगमंत्री उदय सामंत नाम फाऊंडेशनचे कार्य अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शी असून कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान असून त्यांचे काम भविष्यातील कार्याला उर्जा देणारे आहे, असे गौदवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले. नाम फाऊंडेशनने विविध क्षेत्रात केलेल्या विधायक आणि पारदर्शी कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा. कंपन्यांनी त्यांना मिळणारा सीएसआर फंड सामाजिक उपक्रमांना मोठ्या प्रमाणात द्यावा असे आवाहन श्री. सामंत यांनी केले. यावेळी श्री. सामंत यांच्या हस्ते नाम फाऊंडेशनचे विश्वस्त, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी,एनडीआरएफच्या जवानांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. निंबाळकर, नाम फाऊंडेशचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान
मुंबई, दि. २१ – प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब आहे. सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरात गेले पाहिजे तसेच सागर किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे, असे सांगून सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानात राज्याचे पूर्ण सहकार्य असेल, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. राज्यातही ‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला असून राज्यात ४५०० ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्याला ७२० किलोमीटर लांबीमध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, पावसाळ्यानंतर ते नियमित सुरू राहणार असल्याचे सांगून यामुळे प्रदूषणात मोठी घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, शासनाच्या सर्व यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून हे शहर आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी जगभर जागृती अभियान राबविले जात आहे. देशात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाईफ या संकल्पनेतील स्वच्छ भारत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या ‘एक पेड मॉं के नाम’ या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी किमान एक झाड लावावे, असे त्यांनी सांगितले. पाण्याच्या पुनर्प्रक्रिया करणाऱ्या स्टार्टअपसाठी केंद्र सरकार मार्फत मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
प्रधान सचिव श्री. दराडे यांनी समुद्र किनारा स्वच्छतेबाबत माहिती देऊन मुंबईतील सर्व चौपाट्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून स्वच्छ केल्या जात असल्याचे सांगितले. तर तन्मय कुमार यांनी केंद्र सरकार मार्फत केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी किनारा स्वच्छतेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्री. ढाकणे यांनी या अभियानात सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले.
राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर, सामाजिक संस्था, विद्यार्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आदींनी यावेळी आधुनिक सामग्रीच्या साहाय्याने जुहू किनाऱ्याची स्वच्छता केली.
नवी दिल्ली-आतिशी यांनी शनिवारी दिल्लीचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज निवास येथे एलजी विनय सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. आतिशी दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. आतिशी यांच्यानंतर सौरभ भारद्वाज. गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हे एकमेव नवीन चेहरा आहेत. 43 वर्षीय अतिशी कालकाजी मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत. आतिशी यांनी केजरीवाल यांचा दिल्लीचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मोडला आहे. अतिशी 43 वर्षांच्या आहेत, तर केजरीवाल 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा 45 वर्षांचे होते. 17 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आप आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांचे नाव निश्चित केले होते.आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आतिशी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
अतिशी पाच महिन्यांपेक्षा कमी काळ मुख्यमंत्री राहतील दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. सध्याच्या सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या तारखेपूर्वी निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतो. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 15(2) मध्ये असे म्हटले आहे की विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या 6 महिन्यांपूर्वी निवडणुकीची अधिसूचना काढता येत नाही.याचा अर्थ निवडणूक आयोगाला पाच महिन्यांत दिल्लीत विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. मात्र, राजीनामा जाहीर करताना केजरीवाल यांनी दिल्लीत लवकर निवडणुका घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले होते. लेफ्टनंट गव्हर्नर आणि निवडणूक आयोग तयार असल्यास विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच दिल्लीत निवडणुका होऊ शकतात. त्यानुसार आतिशी पाच महिन्यांपेक्षा कमी काळ मुख्यमंत्री राहतील.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असंख्य रुग्णांना कोट्यवधीची मदत
पुणे-नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मधील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून कोट्यावधींची मदत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील रुग्णांना झाली आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सेवेमुळे कोथरुड मधील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य व गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदत गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. या व्यवस्थेमुळे लाखो रुग्णांना संजीवनी मिळाली असून, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांना याचा जास्तीतजास्त लाभ व्हावा; यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाने वेळोवेळी पाठपुरावा करुन कोथरुड मधील असंख्य रुग्णांवर उपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत चार कोटी ४२ लाख ७० हजार २५० इतका निधी कोथरूड मधील रुग्णांना उपलब्ध झाला असून, दुर्धर आजारावर उपचार करण्यात आले आहेत.
पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी गोंधळ:भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली आहे. मी कधीच जय श्री राम म्हणत नाही. मी नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी सुळें यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. दरम्यान या गोधळानंतर बोलताना सुप्रिया सुळेंनी आपण इथे पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानन्यासाठी आलो आहेत असे म्हटले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना जोरदार घोषणाबाजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाषण करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या. त्याच वेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरवात करताच खासदार सुळेंनी आपण पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानन्यासाठी इथे जमल्याचे म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण पक्षासाठी नाही आलो तर आपण गडकरी साहेबांचे आभार मानायला आलो आहोत. त्यांच्याबरोबर बरेच वर्षे संसदेत काम करायची संधी मिळाली. सुसंस्कृत नेता कोण असेल तर माननीय गडकरी साहेब आहेत. त्यांच्याकडे कधीही गेलो तर ते कधी पक्ष बघत नाही. ते काम बघतात. माझ्या मातदार संघात जी रस्त्याची कामे सुरु आहेत, ती चांगल्या दर्जाची होत आहे. गडकरी साहेबांनी माझ्या मतदार संघासाठी सर्वात महत्वाचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपचे नेते ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी भाषणे करतात,गृहमंत्री त्या विधानांना डिफेंड करतात, त्यावरून काय बोलणार? हे दुर्दैवी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सारख्या गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. रोज हिट अँड रन, ड्र्ग्स, कोयता गँगच्या बातम्या दिसतात. आता धारावीत तणावपूर्ण वातावरण… हे सातत्याने का होत आहे? भाजप, त्यांचे सहकारी, पदाधिकारी, मित्र पक्ष विधान करत आहेत. भाजप सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर या राज्यात कसे येतात ? याचाही अभ्यास केला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हा बाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय सुरू आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या, नसता विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. या संदर्भात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. या तुतारी चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी शरद पवार गट करत आहे. मात्र, तत्पूर्वी अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ या चिन्हाबाबत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या चिन्ह बाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अथवा घड्याळ हे चिन्ह विधानसभा निवडणुकीपुरते गोठवून ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली असली तरी अनेक मतदारसंघांमध्ये तुतारी चिन्हा सारखे इतर चिन्ह असल्यामुळे शरद पवार गटाला त्याचा फटका बसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने आता ही इतर चिन्हे गोठवण्यात आली आहेत. त्याचा फायदा आता आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला होऊ शकतो. मात्र दुसरीकडे अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ या चिन्हाचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. त्यासाठीच आता शरद पवार गटाने घड्याळ या चिन्हाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह मध्यवर्ती बँकेने त्यांच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्याची घसघशीत व बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त कपात जाहीर केली. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेवरही व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यासाठी दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था व्याजदर कपातीला सामोरे जाण्यास तयार आहे किंवा कसे या शक्याशक्यतेचा घेतलेला आर्थिक वेध.
-प्रा नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)
भारतीय अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षात जास्त सशक्त व बळकट होत चाललेली आहे. किंबहुना जागतिक पातळीवरही सर्वाधिक वेगाने आणि चांगल्या पद्धतीने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारत अभिनंदनास पात्र ठरला आहे. परंतु प्रचलित बँकेचे व्याजदर हे अर्थव्यवस्थेमध्ये काहीसे अडचणीचे ठरताना दिसत आहे. एका बाजूला रिझर्व्ह बँकेला महागाई व भाववाढीवर नियंत्रण ठेवायचे आहे तर दुसरीकडे आर्थिक विकासाचा दर वाजवी ठेवण्याची त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला पतधोरण ठरवताना तारेवरची कसरत करावी लागते. देशांतर्गत महागाई आटोक्यात आणणे किंवा नियंत्रणात ठेवणे हे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. फेडरल रिझर्व्ह च्या निर्णयामुळे डॉलर क्षीण होऊन रुपया वधारू शकतो. निर्यातीला जास्त वाव मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे परदेशी वित्तीय गुंतवणूक ही भारतात मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षातील भाव वाढीची टक्केवारी पाहिली तर त्यात हळूहळू का होईना पण सकारात्मक सुधारणा होत आहे. 2022-23 या वर्षात 6.4 टक्क्यांवरील ग्राहक किंमत निर्देशांक 2023-24 मध्ये 5.2 टक्यांवर तर चालू 2024-25 या वर्षात सरासरी 4.2 ते 4.6 टक्क्यांच्या घरात राहील अशी अपेक्षा आहे. अगदी ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी पाहिली तर ग्राहक किंमत महागाई निर्देशांक 3.7 टक्के होता. जुलै महिन्याचा विचार केला तर हा निर्देशांक 3.6 टक्के होता व त्यात अगदी थोडीशी वाढ झाली. त्याच वेळी जुलैमध्ये असलेली अन्न महागाई (फूड इन्फ्लेशन) 6.8 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 10 टक्क्यांच्या घरात गेले. आत्ता सप्टेंबर महिन्यातील सणासुदीचा कालावधी लक्षात घेता महागाईच्या आकडेवारीत वाढ होऊन ती 4.8 टक्क्यांच्या घरात जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे भारतातील महागाईचा दर हा चार टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे हे रिझर्व बँकेला काहीसे अवघड जात आहे.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर लक्षणीय रित्या घसरलेले आहेत. सध्या एका पिंपाचा दर 71 डॉलर इतका खाली आलेला आहे . म्हणजे डिसेंबर 2021 पासून गेल्या तीन वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा दर इतका खाली आलेला आहे. ब्रेंट क्रुड तेलाचा दर 2023-24 या वर्षाच्या तुलनेत जवळजवळ 10 टक्के खाली आहे. यामुळे नजीकच्या काळात भारतातील पेट्रोलियम पदार्थांच्या किरकोळ किमतींमध्ये काहीशी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर पर्यायाने वाहतुकीचा खर्च कमी होऊन महागाईचा आकडा थोडासा नियंत्रणाच्या टप्प्यात येऊ शकेल.
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ठरवताना प्रमुख उद्दिष्ट असते ते महागाईचा दर चार टक्क्याच्या आत नियंत्रित करणे. त्यामुळेच देशांतर्गत व्याजाचे दर बराच काळ जास्त राहिलेले होते. ते दर कमी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने जाणीवपूर्वक घेतला नाही.
दुसरीकडे अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग किंवा दर काही प्रमाणात कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही मध्ये आर्थिक विकासाचा दर हा 6.7 टक्के इतका होता. हाच दर गेल्या वर्षीच्या म्हणजे 2023-24 यावर्षीच्या अखेरच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत 7.8 टक्के इतका होता. त्या वर्षातील आर्थिक विकासाचा सरासरी दर 8.2 टक्क्यांच्या घरात होता. देशातील व्याजदर कमी न झाल्यामुळे हा विकासाचा दर चालू आर्थिक वर्षात निश्चित रित्या खाली घसरलेला आहे. दुसरीकडे मोसमी पावसाची सरासरी उत्साहवर्धक आहे. सध्या पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत 8 टक्के जास्त आहे. प्रादेशिक पातळीवर त्यात थोडाफार असमतोल जाणवतो. दक्षिण व मध्य भारतात तो तुलनात्मक दृष्ट्या जास्त असून देशाच्या अन्य भागात अजूनही सरासरीपेक्षा कमी आहे. तरीही देशातील खरीप आणि रब्बी पिकांच्या दृष्टिकोनातून चालू वर्षाचा मोसमी पाऊस निश्चित शेतकऱ्यांना हात देणारा आहे. देशातील अन्नधान्याच्या किंमती नाममात्र का होईना कमी होताना दिसत आहेत.त्यात भाजीपाला तसेच डाळी व कडधान्ये यांचाही दर कमी होताना दिसत आहे. देशातील आंतरराज्य पुरवठा हा आणखी सुरळीत झाला तर अन्नधान्याची महागाई अजून एक दोन महिन्यात खूप नियंत्रणात येईल असे चित्र आहे.
केंद्र सरकार विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांची ज्या पद्धतीने निर्मिती करत आहे ते लक्षात घेता केंद्र सरकारचा खर्च निश्चित वाढत असून त्याचा फायदा अर्थव्यवस्था वाढीसाठी होत आहे. केंद्र सरकार त्याच वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देत असल्यामुळे बँकिंग क्षेत्राची द्रवता वाढलेली आहे. यामुळेच रिझर्व बँकेला प्रचलित व्याजदरात थोडीशी का होईना कपात करायची दिशा मिळालेली आहे. एकाच वेळेला देशांतर्गत पतधोरण आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी यांचे यांची सांगड घालताना रिझर्व बँकेसमोर जो महत्त्वाचा पर्याय आहे तो व्याजदर कपात करण्याचा आहे. सध्या अमेरिकेकडे नजर टाकली असता त्यांचा महागाईचा दर दोन टक्क्यांच्या घरात जात आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात हा दर 2.5 टक्क्यांच्या घरात होता. त्यामुळे या सप्ताहात फेडरल रिझर्व्ह बँकेने अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे. अमेरिकेच्या अगोदर ब्रिटिश मध्यवर्ती बँकेने त्यांचा व्याजदर थोडासा कमी करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. युरोपातील मध्यवर्ती बँकेचा अलीकडचा निर्णय हा व्याजदर कपातीला झुकते माप देणारा आहे. याचाच सकारात्मक परिणाम होऊन जगभरातील शेअर बाजार तेजीकडे झुकताना दिसत आहेतच. भारतीय शेअर बाजारावरील तेजीची घोडदौड हे त्याचेच प्रतीक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीवर सहा सदस्य असून त्यांची चार वर्षांची मुदत ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येत आहे. या समितीत तीन बाहेरचे सदस्य असून त्यापैकी दोघेजण व्याजदर कमी करण्याच्या बाजूने नाहीत. हे सदस्य ऑक्टोबर मध्ये जरी बदलले गेले तरी नव्याने आलेले सदस्य सध्याचा व्याजदर कमी करतील अशी शक्यता नाही. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने निर्णय घेतल्याने डॉलर रुपया विनिमय दरावर होणारा परिणाम लक्षात घेतला पाहिजे. ते लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात व्याजदर कपात कमी करण्याची शक्यता नसली तरी डिसेंबर अखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था व्याजदर कपातीसाठी “पिकलेली” असेल असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे व्याजदर कपातीचा निर्णय डिसेंबर मध्येच होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे– -लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी २० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची पाहण्यास गर्दी झाली होती. तर तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकार्यांना ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले.
यासंदर्भात पुणे महापालिकेने म्हटले आहे कि,’शुक्रवार दिनांक २०/ ९ /२४ रोजी पुणे बुधवार पेठ, बेलबाग चौक येथील सिटी पोस्ट आवारा मध्ये ड्रेनेज चोकअप बाबत समर्थ पोलीस स्टेशन कडून भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयास तक्रार आली होती, त्यानुसार ड्रेनेज कोठी ,भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयामार्फत ड्रेनेज स्टाफ व Recycler Suction (MH 42 .HQ. 6171) पाठवून या ठिकाणचे ड्रेनेज चोकअप बाबत तक्रारीचा निवारण करण्यात आले.या ड्रेनेज क्लिनिंग चे काम करून recycler suction machine सिटी पोस्ट च्या आवारातून बाहेर पडत असताना अचानक मागच्या बाजूने जमीन खचुन तयार झालेल्या विहीर सदृश्य गोल खड्ड्यांमध्ये पडली. या दरम्यान गाडीच्या ड्रायव्हरने गाडी बाहेर उडी मारुन बाहेर आला. या घटनेची माहिती फरासखाना पोलीस स्टेशन कार्यालयामार्फत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयास दुपारी ४:१५ वां. मिळाली . घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेकडील अग्निशामक दल व क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी, उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ डॉ.चेतना केरुरे , खातेप्रमुख पथ विभाग अनिरुद्ध पावसकर, गोजारे , सुहास जाधव, महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय श्रीकिसन दगडखैर महापालिका सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय , अग्निशामक अधिकारी कमलेश चौधरी व इतर सर्व संबंधित कर्मचारी घटना स्थळावरुन पोलिस प्रशासन , आवश्यक क्षमतेच्या क्रेन , विद्युत विभाग यांचे समन्वयानेअंदाजे २० फूट खड्ड्यात गेलेल्या पंधरा टनाच्या recycler suction machine ला बाहेर काढण्याकरिता प्रत्येकी 15 टन क्षमता असलेले दोन क्रेन मागवण्यात आले.सिटी पोस्ट ऑफिस हे शहरातल्या गजबजलेल्या रहदारीचा परीसर असल्याने तसेच सायंकाळचे खूप ट्रॅफिक च्या कारणाने सदरील दोन्ही क्रेन पुणे मनपाकडील अग्निशामक दलाचे RESCUE VAN ने एस्कॉर्ट करत ट्रॅफिक पोलीस च्या मदतीने रहदारी थांबून घटनास्थळी आणण्यात आली. त्यानंतर दोन्ही क्रेन च्या साह्याने recycler suction machine व एक दुचाकी खड्ड्याच्या बाहेर काढण्यात आली. सघटनास्थळी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पाहणी करून घटनेची कारणमिमांसा जाणुन घेण्यासाठी सिटी पोस्ट ऑफिस तसेच मेट्रो व पुणे महानगरपालिकेकडील तांत्रिक अधिकारी प्राथमिक चौकशी करुन शहानिशा करतील असे सुचित केले. ही घटना सिटी पोस्ट या कार्यालयाच्या प्रांगणात घडलेली असल्याने आयुक्तांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना पुढिल आवश्यक कार्यवाही करणे बाबत आदेश दिले.
हा टँकर खड्ड्यात कसा गेला? सिटी पोस्टची इमारत 1925 साली उभी करण्यात आली होती. त्यावेळी त्या इमारतीसमोर आणि आसपासच्या भागात विहीर आणि हौद होते. आता ज्याठिकाणी गणपतीच्या 10 दिवसात दगडूशेठ गणपती मंदिर आहे . त्याठिकाणी पेशवेकालीन हौद होते. तर सिटी पोस्टच्या समोरच्या गल्लीतही हौद बांधण्यात आले होते. सिटी पोस्टच्या समोर श्रीकृष्ण टॉकीज आहे.त्याच्या खाली विहीर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सिटी पोस्टची इमारत हे इंग्रजांनी केलेले बांधकाम आहे. त्याकाळात विहीर आणि हौद यांचा विचार करूनच त्यांनी या वास्तू उभ्या केल्या आहेत. त्यानंतर मात्र सिटी पोस्टमध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीच्या दृष्टीने याठिकाणी महापालिकेने रस्ता बांधला होता. त्यावेळी अवजड वाहनांची रहदारी याठिकाणी नव्हती. परंतु काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार याठिकाणी पोस्टाचे ट्रक येण्यास सुरुवात झाली. पालिकेने रस्त्याची दुरुस्ती करताना त्याठिकाणी विहिरीवर स्लॅब टाकला. व पेव्हर ब्लॉकचा रस्ता याठिकाणी करण्यात आला. पेव्हर ब्लॉक टाकताना अवजड वाहनांचा विचार केला गेला नाही. तरीही या रस्त्यावरून पोस्टाचे ट्रक ये – जा करत होते. त्यामुळे ते पेव्हर ब्लॉक कमकुवत झाल्याची चर्चा स्थानिकांकडून ऐकायला मिळाली.