पुणे, 21 सप्टेंबर 2024
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसेच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
पुण्यातील कर्वेनगर येथील कमिन्स महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य महाव्यवस्थापक तथा क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत दिवेघाट ते हडपसर या पॅकेज 6 च्या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण लांबी 13.25 किलोमीटर इतकी असून त्याची किंमत 819 कोटी रुपये असणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे बांधकामही यावेळी सुरू करण्यात आले. या प्रकल्पाची एकूण किंमत 80 कोटी रुपये इतकी असणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना अभिवादन केले. शेकडो वर्षांचा वारीचा इतिहास असलेल्या आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या पालखी मार्गाची निर्मिती करण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद होत आहे. वारकरी संप्रदायाने जातीभेद दूर करण्याचा संदेश दिलेला असून मानवतेचा धर्म आपल्याला शिकवलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामुळे आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध झाले आहे, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की संत ज्ञानेश्वरांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरें’ हे ब्रीद आपल्या सर्वांना दिले आहे. त्यामुळे पालखी मार्गाची निर्मिती करताना तेथील वृक्षतोड टाळून 800 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. पुढील काळात शासनाने स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पालखी मार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे काम हाती घ्यावे. हा पालखी मार्ग एक ‘ग्रीन हायवे’ बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामे सुरू करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, आगामी काळात पुणे-सातारा, नाशिक फाटा-खेड, हडपसर-यवत, कात्रज-रावेत, पुणे-शिरूर, पुणे-संभाजीनगर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्यांसह मुंबई-बंगळुरू नव्या द्रुतगती मार्गाचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याच्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाचा उल्लेख केला. मोहोळ यांचा प्रस्ताव अतिशय महत्त्वाचा असून पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव देण्याची मागणी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करून त्यासाठी पाठपुरावाही करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या विकासासोबतच केंद्र सरकारकडून देशात पेट्रोल-डिझेलऐवजी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहे. आगामी काळात 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील. यामुळे प्रदूषण कमी होऊन कमी खर्चात नागरिकांना प्रवास करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुण्यातील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रिपदाच्या गेल्या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग तयार झाले. नितीन गडकरी यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून पुणे विभागात सध्या 1 लाख 25 हजार कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत.
गेल्या 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात महामार्गांचे जाळे उभारले आहे. 2014 पूर्वी देशात प्रतिदिन केवळ 12 किलोमीटर रस्ते तयार होत असत. आज हा आकडा अडीचपटांनी वाढून प्रतिदिन 28 किलोमीटर रस्ते देशात तयार होत आहे. आज देशात 1 लाख 46 हजार किलोमीटरचे रस्त्यांचे नेटवर्क असून नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात हे नेटवर्क 60 टक्क्यांनी वाढले आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुण्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर असून लवकरच सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा असलेले शहर अशी ओळख पुण्याला प्राप्त होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच पालखी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य महाव्यवस्थापक तथा क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले. तर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करत नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले. अखेरीस, प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सर्वांचे आभार मानले.