पुणे– -लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी २० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची पाहण्यास गर्दी झाली होती. तर तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकार्यांना ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले.
यासंदर्भात पुणे महापालिकेने म्हटले आहे कि,’शुक्रवार दिनांक २०/ ९ /२४ रोजी पुणे बुधवार पेठ, बेलबाग चौक येथील सिटी पोस्ट आवारा मध्ये ड्रेनेज चोकअप बाबत समर्थ पोलीस स्टेशन कडून भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयास तक्रार आली होती, त्यानुसार ड्रेनेज कोठी ,भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयामार्फत ड्रेनेज स्टाफ व Recycler Suction (MH 42 .HQ. 6171) पाठवून या ठिकाणचे ड्रेनेज चोकअप बाबत तक्रारीचा निवारण करण्यात आले.या ड्रेनेज क्लिनिंग चे काम करून recycler suction machine सिटी पोस्ट च्या आवारातून बाहेर पडत असताना अचानक मागच्या बाजूने जमीन खचुन तयार झालेल्या विहीर सदृश्य गोल खड्ड्यांमध्ये पडली. या दरम्यान गाडीच्या ड्रायव्हरने गाडी बाहेर उडी मारुन बाहेर आला.
या घटनेची माहिती फरासखाना पोलीस स्टेशन कार्यालयामार्फत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयास दुपारी ४:१५ वां. मिळाली . घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेकडील अग्निशामक दल व क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी, उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ डॉ.चेतना केरुरे , खातेप्रमुख पथ विभाग अनिरुद्ध पावसकर, गोजारे , सुहास जाधव, महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय श्रीकिसन दगडखैर महापालिका सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय , अग्निशामक अधिकारी कमलेश चौधरी व इतर सर्व संबंधित कर्मचारी घटना स्थळावरुन पोलिस प्रशासन , आवश्यक क्षमतेच्या क्रेन , विद्युत विभाग यांचे समन्वयानेअंदाजे २० फूट खड्ड्यात गेलेल्या पंधरा टनाच्या recycler suction machine ला बाहेर काढण्याकरिता प्रत्येकी 15 टन क्षमता असलेले दोन क्रेन मागवण्यात आले.सिटी पोस्ट ऑफिस हे शहरातल्या गजबजलेल्या रहदारीचा परीसर असल्याने तसेच सायंकाळचे खूप ट्रॅफिक च्या कारणाने सदरील दोन्ही क्रेन पुणे मनपाकडील अग्निशामक दलाचे RESCUE VAN ने एस्कॉर्ट करत ट्रॅफिक पोलीस च्या मदतीने रहदारी थांबून घटनास्थळी आणण्यात आली.
त्यानंतर दोन्ही क्रेन च्या साह्याने recycler suction machine व एक दुचाकी खड्ड्याच्या बाहेर काढण्यात आली.
सघटनास्थळी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पाहणी करून घटनेची कारणमिमांसा जाणुन घेण्यासाठी सिटी पोस्ट ऑफिस तसेच मेट्रो व पुणे महानगरपालिकेकडील तांत्रिक अधिकारी प्राथमिक चौकशी करुन शहानिशा करतील असे सुचित केले. ही घटना सिटी पोस्ट या कार्यालयाच्या प्रांगणात घडलेली असल्याने आयुक्तांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना पुढिल आवश्यक कार्यवाही करणे बाबत आदेश दिले.
हा टँकर खड्ड्यात कसा गेला?
सिटी पोस्टची इमारत 1925 साली उभी करण्यात आली होती. त्यावेळी त्या इमारतीसमोर आणि आसपासच्या भागात विहीर आणि हौद होते. आता ज्याठिकाणी गणपतीच्या 10 दिवसात दगडूशेठ गणपती मंदिर आहे . त्याठिकाणी पेशवेकालीन हौद होते. तर सिटी पोस्टच्या समोरच्या गल्लीतही हौद बांधण्यात आले होते. सिटी पोस्टच्या समोर श्रीकृष्ण टॉकीज आहे.त्याच्या खाली विहीर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सिटी पोस्टची इमारत हे इंग्रजांनी केलेले बांधकाम आहे. त्याकाळात विहीर आणि हौद यांचा विचार करूनच त्यांनी या वास्तू उभ्या केल्या आहेत. त्यानंतर मात्र सिटी पोस्टमध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीच्या दृष्टीने याठिकाणी महापालिकेने रस्ता बांधला होता. त्यावेळी अवजड वाहनांची रहदारी याठिकाणी नव्हती. परंतु काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार याठिकाणी पोस्टाचे ट्रक येण्यास सुरुवात झाली. पालिकेने रस्त्याची दुरुस्ती करताना त्याठिकाणी विहिरीवर स्लॅब टाकला. व पेव्हर ब्लॉकचा रस्ता याठिकाणी करण्यात आला. पेव्हर ब्लॉक टाकताना अवजड वाहनांचा विचार केला गेला नाही. तरीही या रस्त्यावरून पोस्टाचे ट्रक ये – जा करत होते. त्यामुळे ते पेव्हर ब्लॉक कमकुवत झाल्याची चर्चा स्थानिकांकडून ऐकायला मिळाली.