सरकारच्या डिजिटल जाहिरातीसाठी ९० कोटी तर SMS साठी २४ कोटींचे टेंडर.
मुंबई, दि. १० ऑक्टोबर भारतीय जनता पक्ष, शिंदे सरकारचे शेवटचे दिवस राहिल्याने घाईघाईने जेवढे लुटता येईल तेवढे लुटण्याचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यवधी रुपयांची टेंडर मंजूर करून मलिदा लाटण्याची लगीनघाई सुरु आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढले असून पाच दिवसांत हे ९० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यंत SMS द्वारे पाठवण्यासाठी २३ कोटींच्या दुसऱ्या टेंडरलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. जाता जाता महाभ्रष्ट युती सरकार जनतेच्या पैशांची महाउधळपट्टी करत असल्याचा, हल्लाबोल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राज्यावर आठ लाख कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज आहे तरिही सरकार मात्र टेंडर काढा आणि कमिशन घ्या या धोरणानुसार बेफाम होऊन उधळपट्टी करत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय जनतेपर्यंत एसएमएसद्वारे पाठवण्यासाठी हे सरकार २३ कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे, या SMS साठी टेंडर मागवले जाणार आहे. आधीच लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी ४५० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करुन इव्हेंटबाजी केली जात आहे. या योजनेच्या कार्यक्रमातून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार त्यांच्या पक्षाचा प्रचार करत आहेत. अवघ्या अडीच वर्षांच्या काळातच भाजपा शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा केला आहे असे लोंढे म्हणाले.
पुणे-कर्वेनगर – वारजे प्रभागातील नागरिकांच्या सेवार्थ आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई आरोग्य तपासणी केंद्र, पुणे मनपाचा अधिकृत दवाखान्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मनपाचे सर्व आरोग्य अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते .
या संदर्भात कोथरूड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले कि,’ भविष्यात या दवाखान्याच्या माध्यमातून तेरा सुविधा मोफत उपलब्ध केल्या जात असून यामुळे नागरिकांच्या उत्तम आरोग्याबद्दल आपण जागरूक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा सूर नागरिकांतून उमटत होता. अधिकारी वर्गाने याप्रसंगी उपस्थितांना या सुविधांबद्दल सविस्तर माहिती देत संवाद साधला आहे .यानंतर दवाखान्याच्या लगत असणाऱ्या वसंत कमल विहार सोसायटी, लभडे गार्डन आणि दत्त दिगंबर कॉलनी परिसरातील नागरिकांशी हितगुज साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी नागरिकांनी संवाद साधत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांबद्दल पुणे मनपाच्या आयुक्तांशी चर्चा करावी, अशी विनंती केली असता त्वरित सुप्रिया सुळे यांनी फोनवरून महापालिका आयुक्तांशी संवाद साधला आणि रस्त्यांबाबत सूचना केल्या.
यावेळी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या पुणे मनपामध्ये सार्वत्रिक निवडणूक न झाल्याने प्रशासक कार्यरत आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अडचणींचेही निराकारण करणे दुरापास्त होत आहे. यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास त्वरित दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेत नागरिकांचे लोकशाहीने दिलेले अधिकार अबाधित राखले जातील, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिल्याचे दुधाने यांनी सांगितले .
या कार्यक्रमाला दुधाने यांच्यासह माजी नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कार्याध्यक्ष त्रिंबक मोकाशी, पुणे शहर महिला अध्यक्ष स्वातीताई पोकळे, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी, माजी कोथरूड युवा अध्यक्ष प्रमोद शिंदे, खडकवासला विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष मीनल ताई धनवटे, विनोद हनवते, सुरज शिंदे, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे हे उपस्थित होते.
पुणे : संजय काकडे अपक्ष म्हणून राज्यसभेवर गेल्यावर त्यांनी सहयोगी सदस्य बनून भाजपच्या राजकारणात प्रवेश केला.गेली दहा वर्षे संजय काकडे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत,मोर्चा,सभा,निवडणुका अशा विविध स्तरावर त्यांनी आपली जबाबदारी मोठ्या हिकमतीने पार पडून पक्षाला वेळोवेळी बहुमोल मदत केल्याचे कोणी नाकारणार नाही.पण आता हेच संजय काकडे भाजपने आपल्यासाठी मात्र काही केले नाही म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या काही माध्यमातील वृत्ताने पुण्याच्या राजकारणात चर्चेला बहर आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच अनेक माजी नगरसेवकांच्या आशा काकडे यांच्यामुळे एका वेगळ्याच दिशेने पल्लवित होऊ पाहत आहेत.
एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी भाजपाला मागोमाग धक्के देण्यास सुरुवात केली. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता पुण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.दसऱ्यानंतर ते अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत असेही या वृत्तात म्हटले आहे,हे जर खरे ठरले तर मात्र भाजपला मोठा धक्का बसणार आहे हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज उरणार नाही.
भाजपानं काकडे यांचा वापर केला असा प्रचार माध्यमातून होतो आहे तो खराही आहेच,आणि आता मराठा समाज देखील जरांगे यांच्या आंदोलनाने विचारात पडू लागला आहे.या पार्श्वभूमीवर काकडे यांनी जर भाजपा खरोखर सोडून पावरंना साथ दिली तर विधानसभा आणि नंतर महापालिका अशा दोन्ही निवडणुकात त्यांची चुणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. पण काकडे हे देवेंद्र फडणवीस यांचे आणि अमित शहा यांच्या नजीकचे सहकारी मानले जातात ते या राजकीय हालचाली करतील काय ? हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे हे निश्चित.
दरम्यान त्यांचे समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक शंकर पवार यांनी पर्वती विधानसभा मतदार संघातून आपली इच्छुकता दर्शविली आहे . स्थायी समिती अध्यक्ष,महापौर,खासदार आणि थेट केंद्रीय मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या वेगवान कारकीर्दीमागे नशिबाची साथ जरी मानली जात असली तरी या मुळे असंख्य नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.आणि अमोल बालवडकर यांच्या सारख्या नगरसेवकाने देखील कोथरूड मधून चंद्रकांत दादांच्या विरोधात शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. नशिबाने मिळत नसेल तर प्रयत्नांनी,मेहनतीने का मिळविण्याचा प्रयत्न का करू नये असा एक सूर भाजपच्या अनेक नगरसेवक मंडळीत उमटू लागला आहे एकीकडे बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तयारी सुरु केली आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या पर्वती विधानसभा मतदार संघात श्रीनाथ भिमालेंनी आपला प्रचारही सुरु केला आहे.आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांनाही ताप दिला जाऊ लागला आहेच.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेचे देखील आखाडे बांधत संजय काकडे यांच्या मागे मराठा आणि बहुजन समाजाचा स्थानिक नेता स्तरावरील मोठा वर्ग उभा राहिल्यास नवल वाटणार नाही.आणि ज्याचा तोटा निश्चितच भाजपला होईल असे कार्यकर्त्यांकडून बोलले जाते आहे.
पुणे, दि. १० : मुंबई येथील टाटा स्मारक रुग्णालय, परेल येथे सुरक्षा सहायक आणि सुरक्षा रक्षक या पदाकरीता अर्ज मागविण्यात आले असून माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या संकेतस्थळावर २१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
पदासाठीचे नियम, शैक्षणिक व इतर पात्र आदी अधिक माहितीकरीता मानव संसाधन विभाग भर्ती ०२२-२४१७७००० विस्तार क्रमांक ४६२७ / ४६१३ वर संपर्क साधावा. अधिकाधिक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
पुणे-गृहप्रकल्पातील भागीदाराने धमकावल्यामुळे एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्याच्या धायरी परिसरात घडला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर मनोहर बेटटीगिरी (52) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी सविता किशाेर बेटटीगिरी (वय-४८) यांच्या तक्रारीनुसार आराेपी सुरेंद्र बाबुराव लायगुडे, संग्राम सुरेंद्र लायगुडे व सागर सुरेंद्र लायगुडे (सर्व रा.धायरी,पुणे) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएल असाेसिएटस तर्फे किशाेर बेटटीगिरी व त्यांचे भागीदार सुरेंद्र लायगुडे यांनी बारंगणी मळा, धायरी, पुणे येथे संयुक्तरित्या भागीदारीत राजवीर अवेन्यू नावाने बांधकाम करार केला हाेता. सदरचे बांधकाम करताना मेसर्स स्वाती कन्सल्टन्सी, धायरी यांच्या तर्फे आराेपींनी मयतास 91 लाख रुपयांचे कर्ज स्वरुपात दिले हाेते. त्याबदल्यात व्यैक्तिकरित्या मयताने 80 लाख रुपयांची परतफेड केली हाेती. परंतु आराेपींनी सदरचे बांधकाम दाेन-तीन वेळा बंद पाडले. तसेच सदर साईटवरील किशाेर बेटटीगिरी यांना मिळणारे 2 व्यापारी गाळे परस्पर ताब्यात घेतले. किशाेर यांनी याबाबत सुरेद्र लायगुडे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माझी पाेरं तुला हिशाेब मागणार, ताे तुला द्यावाच लागेल असे बाेलून जमेत नसेल तर जा जीव दे जा असे बाेलले. तसेच सदर गाळे भाड्याने देऊन त्याबाबत नाेटीस पाठवून किशाेर यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांनी आत्महत्या केली. याबाबत पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत.
“मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा”; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील ‘त्या’ प्लांटमध्ये आजही काम सुरूच
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते आणि त्यांना वयोमानानुसारचे आजार होते.टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे ठेवण्यात आले होते. येथून त्यांची शेवटची यात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहोचली. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह राजकारण, क्रीडा आणि व्यवसायातील अनेक व्यक्तींनी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, एक युग संपले आहे
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गुरुवारी रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. मंत्रिमंडळाने आपला प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. मंत्रिमंडळाने म्हटले की, देशाने एक महान समाजसेवक, दूरदर्शी आणि देशभक्त नेता गमावला आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2024
अमित शहा म्हणाले की, मी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतो, रतन टाटाजींशी माझी वैयक्तिक ओळख राहिली आहे, पण ते भारतीय आणि जागतिक उद्योगात मोठे नाव होते. टाटा समूहाचे नेतृत्व करणे ही एक मोठी गोष्ट आहे. अनेक बदल करणे आवश्यक असताना त्यांनी टाटा समूहाचे नेतृत्व हाती घेतले. अत्यंत संयमाने, अचूकतेने आणि अभ्यासाने त्यांनी टाटा समूहाचे उद्योग आणि त्यांची कार्यपद्धती बदलून टाकली.
टाटा समूह हा भारतीय उद्योगक्षेत्रातील एका ध्रुव ताऱ्यासारखा आहे, त्यात रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे. आपल्या उद्योगाचा सचोटीने विकास करणे, देशाच्या सर्व नियमांचे पालन करून आपला उद्योग प्रमुख स्थानावर ठेवणे आणि आपल्या विश्वासाच्या माध्यमातून देशाच्या समस्या सोडवणे, याला टाटा समूहाने खूप महत्त्व दिले आहे चांगले केले आहे. रतन टाटाजी आज नसले तरी त्यांनी सोडलेला वारसा देशाच्या उद्योगासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल.
#WATCH | Speaking at an event in Delhi, Union Home Minister Amit Shah remembers veteran industrialist Ratan Tata
He says, "Shri Ratan Tata passed away yesterday. I extend my heartfelt tributes to him. He was a respected industrialist not just in India but the world. He took on… pic.twitter.com/mvEAOGvpxZ
रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीमधील स्मशानभूमीमध्ये विद्यूत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पारंपारिक दख्माऐवजी (dakhma) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीमध्ये आजही काम सुरु : रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासहित उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. पण, पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीमध्ये आजही काम सुरु ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज पुण्यातील कंपनीतील कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांच्या आठवणी सांगितल्या, यावेळी कर्मचारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.कंपन्यांतील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत काम आजही चालू ठेवण्या मागचे कारण सांगितले. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या या टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये आजही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. कारण, ‘मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वतः टाटांनी इथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं आणि आम्ही त्यांच्या सूचनेनुसार आजही काम करतोय, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना कामगारांना अश्रू अनावर झाले.
पिंपरी चिंचवड शहरातील टाटा मोटर्स युनिटमधील कामगारांनी उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधील टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्ती घोषित केली होती, याची आठवणही कर्मचाऱ्यांनी काढली. टाटा प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी बोलताना कर्मचारी म्हमाले, टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड येथे रतन टाटा नेहमी यायचे, इथल्या प्रत्येक कामगाराला ते भेटायचे त्यांच्याशी बोलायचे.
सुझलॉन आणि जिंदाल रिन्यूएबल्सतर्फे स्टील उत्पादनाच्या डिकार्बनायझेशनसाठी ४०० मेगावॉट अंतर्गत पवन उर्जा व्यवहार
पुणे – सुझलॉन समूह पवन उर्जेच्या क्षमतेचा वापर करून ग्रीनहाऊस उत्सर्जन कमी करण्यास अवघड असलेल्या क्षेत्रांच्या डीकार्बनायझेशनसाठी योगदान देण्यासाठी सज्ज आहे. जेएसपी ग्रीन विंड १ प्रा. लि.कडून (जिंदाल रिन्यूएबल्स पॉवर प्रायव्हेट लिमिटेजची एसपीव्ही) मिळालेल्या ४०० मेगावॉटच्या लक्षणीय कंत्राटाद्वारे हे योगदान दिले जाणार आहे. हे लक्षणीय कंत्राट या क्षेत्रातील सर्वात मोठे सी अँड आय काम असून त्यावरून सुझलॉनचे बाजारपेठेतील आघाडीचे स्थान आणि भारताचे हरित उर्जेच्या दिशेने स्थित्यंतर अधोरेखित झाले आहे. या मोठ्या कंत्राटामुळे सुझलॉनचे एकूण ऑर्डर बुक जवळपास ५.४ जीडब्ल्यूवर गेले आहे.
सुझलॉनद्वारे १२७ अत्याधुनिक विंड टर्बाइन जनरेटर्स (डब्ल्यूटीजी) हायब्रीड लॅटिस ट्युब्युलर (एचएलटी) टॉवर्सच्या माध्यमातून पुरवठा करूणार असून प्रत्येकाची रेटेड क्षमता कर्नाटकातील कोप्पल प्रदेशात ३.१५ मेगावॉटची आहे. त्यातून निर्माण होणारी उर्जा छत्तीसगढ आणि ओडिशातील स्टील प्लँट्सच्या अंतर्गत वापरासाठी वापरली जाणार आहे. पर्यायाने त्यांची कामकाजातील शाश्वतता वाढेल आणि भारताच्या हरित उर्जा उद्दिष्टांना चालना मिळेल.
सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, ‘कमी- कार्बनच्या भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी, स्टील उत्पादनात क्रांती आणण्यासाठी पवन उर्जेचा वापर करण्यासाठी जिंदाल समूहासह भागिदारीत धाडसी पाऊल उचलताना अभिमान वाटत आहे. या क्रांतीकारी सहकार्यामुळे औद्योगिक शाश्वततेची समीकरणं नव्यानं प्रस्थापित होतील, शिवाय ती भारताच्या २०७० नेट- झिरो व्हिजनशी सुसंगत आहे. एकत्रितपणे आम्ही विकासाला चालना देणाऱ्या शाश्वत पद्धतींमध्ये नवा मापदंड प्रस्थापित करत आहोत तसेच पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहोत.’
जिंदाल रिन्यूएबल्सचे अध्यक्ष भारत सक्सेना म्हणाले,‘हरित उर्जा सुविधांप्रती आमची बांधिलकी जपण्यासाठी कंपनीतर्फे स्टील उत्पादनात हरित उर्जेचा समावेश केला जात आहे. त्यातून संपूर्ण समूहाचे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास तसेच दीर्घकालीन शाश्वतता जपणे शक्य होईल. या भागिदारीमुळे शाश्वत स्टील उत्पादनात नवी सुरुवात होणार असून २०४७ पर्यंत समूहाची नेट झिरो उद्दिष्टाप्रती बांधिलकी जपता येईल.’
सुझलॉन समूहाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जेपी चालसान म्हणाले,‘स्टील क्षेत्रातील डीकार्बनायझेशन अवघड असून भारताचे अक्षय उर्जेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यावर उपाययोजना शोधणे महत्त्वाचे आहे. दोन बलाढ्य भारतीय समूह पुनर्मूल्यांकन आणि स्टील उत्पादन सक्षम करण्यासाठी एकत्र येत असून ही भागिदारी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे. मला खात्री आहे, की ही भागिदारी उद्योग क्षेत्रातील इतर कंपन्यांना त्यांच्या कामकाजाचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रेरणा देईल आणि सर्वांना एकत्रितपणे अधिक शाश्वत भविष्याकडे जाता येईल.’
जाधवर इन्स्टिटयूटसच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या हिंदीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन पुणे : लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर यांची नावे पुण्यात शिक्षण क्षेत्रात संस्था सुरु करण्यात घेतली जातात. मात्र, काही वर्षात पुण्याबाहेरून आलेले संस्थांचालक शिक्षण क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात करीत आहेत. यांच्या योगदानाने विदयेच्या माहेरघराची परंपरा कायम राखली जात आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा हे अध्यक्षस्थानी होते. तर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या हिंदीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात झाले. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांना, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ अॅड.सुभाष मोहिते यांना सहकार क्षेत्रातील पुरस्कार, कर्नल विनोद मारवाह यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार काका हलवाई ग्रुपचे युवराज गाडवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते. शेखर मुंदडा म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात होणारी वृद्धी, विकास आणि यश यामध्ये फरक आहे. केवळ वृद्धी नाही तर शिस्त, मानवता, संस्कार ही जीवनात महत्वाचे असतात. मला आयुष्यात केवळ वृद्धी मिळविण्यापेक्षा यशस्वी आयुष्य जगायचे होते, त्यानुसार मी सामाजिक जीवनात देखील वाटचाल केली. जीवनात चांगले कार्य करीत सकारात्मकता असायला हवी. तसे जीवन प्रत्येक व्यक्तीने व्यतीत केल्यास नक्कीच यश मिळू शकेल. अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, शिक्षण संस्था चालविणे हे सोपे काम नाही. केवळ शैक्षणिक संस्थेचा विचार करण्यापेक्षा समाजाचा व देशाचा विचार करणे ही धारणा निर्माण करणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षणाचा बाजार झाला आहे, ही केवळ चर्चा ऐकतो. आता केवळ पदवी घेऊन उपयोग नाही, तर कौशल्याधिष्ठित शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याने घेणे ही गरज निर्माण झाली आहे. कर्नल विनोद मारवाह म्हणाले, आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील प्रत्येकाने करायला हवा. त्यासाठी आपला विचार पक्का असणे गरजेचे आहे. समाजमाध्यमे ही आपला वेळ वाया घालविण्याची माध्यमे आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून सकाळी लवकर उठून अभ्यास व आपली कामे करायला हवीत. अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, सैन्यदल आणि रुग्णवाहिका चालकांच्या मुलांना केजी ते पीजी पर्यंतच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येते. तसेच ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत शिष्यवृत्तीच्या रुपात दिली जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु असतात, असेही ते म्हणाले. युवराज गाडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
पुणे-पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात सहभागी होत ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी श्री लक्ष्मी मातेचे दर्शन घेतलेशिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात उषा मंगेशकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली .यावेळी आबा बागुल आणि जयश्री बागुल यांनी त्यांचे स्वागत केले जयश्री बागुल यांनी उषाताई यांची ओटी भरून त्यांना शुभेच्छ्या दिल्या .
त्यानंतर महिला महोत्सवातील पाककला स्पर्धेत जुन्या पदार्थांना उजाळा देण्यात आला
बटाटा रोल, जीत वडा, रोटी पांसरी, पडवळ पॅटिस, भाजणी थालपीठ, आणि हेल्दी स्प्राऊट चॅट यांना उजाळा देत पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात संपन्न झाली. यात तिखट पदार्थांप्रमाणे गोड भागात आयुर्वेदिक लाडू, खरवसाचा लाडू, लाह्यांचा लाडू आणि केळ्याचा लाडू असाही विभाग होता. २५० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धक महिलांनी सुंदर सजावट करीत तयार करून आणलेले पदार्थ मांडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाचल होत्या. परीक्षक म्हणून पल्लवी शहा आणि वसुधा पारीख यांनी काम पाहिले.
पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – वर्षा दोभाडा, द्वितीय क्रमांक – राजश्री सिध्देश्वर, तृतीय क्रमांक- स्वाती पंडित, उत्तेजनार्थ – शितल जैन आणि लिना ईनामदार यांनी पटकावला. तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – सीमा नलावडे, द्वितीय क्रमांक – अनिता काळे, तृतीय क्रमांक – पुनम परमार, उत्तेजनार्थ – वर्षा तेलंग आणि उल्का ओझरकर यांनी पटकावला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात रु. ७ हजार, रु. ५ हजार, रु. ३ हजार असे बक्षिसाचे स्वरूप होते.
पुणे, दि. १०: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे येथून ७२९ जेष्ठ नागरिक व ७१ सहायक अशा ८०० यात्रेकरुंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली भारत गौरव पर्यटन रेल्वे श्रीराम जन्मभूमी अयोध्येकडे रवाना झाली. राज्यात ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने शासकीय दुखवटा जाहिर झाल्याने साधेपणाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अयोध्येकडे रवाना होणाऱ्या तीर्थयात्रेकरुंना चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आय.आर.सी.टी.सीचे जनरल मॅनेजर गौरव झा, क्षेत्रीय अधिकारी गुरुराज सोना तसेच समाजकल्याण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
या तीर्थयात्रेच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या चित्रफित शुभेच्छा संदेशात म्हणाले. ही योजना राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून सुरु झाली आहे. तीर्थदर्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले.
यावेळी ‘जय श्रीराम, जय श्रीराम’ या जयघोषात पुणे रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन ८०० यात्रेकरु तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे मार्गस्थ झाले.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे आयोजन ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उपस्थिती
पुणे : महिलांवरील वाढते अत्याचार… स्त्री भ्रूण हत्या… स्त्री शक्तीचे महत्व आणि महात्म्य भोंडल्याच्या वेळी झालेल्या खेळांतून शिक्षकांनी उलगडले. भोंडल्याची पारंपरिक गाणी व खेळ श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात सादर करण्यात आले. शिक्षक पारंपरिक वेशात स्पर्धेत सहभागी झाले होते. धारेश्वर विद्यालयाच्या संघाने शिक्षक महाभोंडला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात शिक्षक महाभोंडला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डॉ. मनोरमा आवारे, ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अगरवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, स्पर्धेचे परीक्षक श्रुती पंडित, साधना कानिटकर आदी उपस्थित होते. धारेश्वर विद्यालयाला ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. विश्वकर्मा विद्यालयाच्या शाळेच्या शिक्षक संघाचा द्वितीय तर, चंद्रकांत दरोडे विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला. स्मृतीचिन्ह, अनुक्रमे ७ हजार व ५ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी पहिल्या तिन्ही क्रमांकाच्या विजेत्यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली. रुपाली चाकणकर म्हणाल्या, समाजाची बांधिलकी जोपासत दातृत्वाची भावना प्रत्येकाने जोपासायला हवी. असुरांचा वावर वाढतो तेव्हा आदिमाया, आदिशक्ती महिषासुरमर्दिनीचे रूप घेते. हे रूप प्रत्येक महिलेमध्ये असते, ते महिलांनी आपल्यामध्ये जागृत ठेवायला हवे. पुणे विद्येचे माहेरघर आहे. मात्र, येथे मुलींचे प्रमाण कमी आहे. वारसदार म्हणून मुलगा लागतो. त्यामुळे समाजात सर्वांपर्यंत नवदुर्गेच्या रूपाचे महत्व पोहोचायला हवे. विश्वस्त डॉ. तृप्ती अगरवाल म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये भोंडला हा एक प्रकार अनेक वर्षांपासून नवरात्रीमध्ये केला जातो. मात्र, आज भोंडल्याविषयी माहिती लहान मुली व तरुणांनी फारशी नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी भोंडल्याविषयी अधिकाधिक माहिती गोळा करावी आणि विद्यार्थ्यांनाही याची माहिती सांगावी, याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.
बोपदेव घाटतील आरोपी न सापडणे हा शासनाचा नाकर्तेपणा
पुणे —गेल्या काही दिवसापासून राज्यभरात महिला ,अल्पवयीन मुले दलित अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत .त्याच्या निषेधार्थ पुण्यात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्त्वात आज भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला . राज्यात महिलावरील अत्याचार राजरोसपणे चालू आहेत ,दलित समाजावर गावगावात आत्याचार होत आहेत.राज्यात कायदाचा धाक अजिबात राहीला नाही .या आत्याचाराचा निषेध करण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला .
मोर्चाची सुरुवात क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या भवानी पेठेतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली .यावेळी जेष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रधांजली अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली .या मोर्चात सर्वात पुढे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे ,महात्मा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महापुरुषांच्या वेषात तर लोकशाहिचे चार स्तंभाची हतबलता दाखवणारी प्रतिकृती तयार करण्यात आली होती .हा मोर्चा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे ,अरुणकुमार वैद्य स्टेडियम भवानी पेठ पासून सुरुवात झाली पुढे नाना पेठ ,रास्ता पेठ ,सोमवार पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला .या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे , सौ.झैनाब रमेश बागवे ,महिला अध्यक्षा ॲड. राजश्री अडसूळ, विठ्ठल थोरात , बापू दाखले, सुरेखा खंडागळे, संजय अल्हट, यादवराव सोनावणे, अनिल हतागळे यासह हजारोंच्या संख्येने महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते .
मुंबई, दि. १० ऑक्टोबर: भारताला उद्योग क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणा-या रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. टाटा या नावाने भारतीयांच्या मनामनात घर केले आहे. स्वत:च्या जगण्याने आणि अलौकिक कर्तृत्वाने मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणारे उद्योगपती व टाटा उद्योग समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योग विश्वातील दीपस्तंभ हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोकसंदेशात नाना पटोले पुढे म्हणाले की, रतन टाटा भारतातील सर्वोत्तम उद्योगपतींपैकी एक होते. अतिशय नम्र स्वभाव, सभ्यता, साधेपणा, प्रेम आणि करुणेने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. रतन टाटा यांनी 1961 मध्ये टाटा ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी अडचणीत असलेल्या ‘नेल्को’चे प्रभारी संचालक म्हणून काम पहात ही कंपनी नावारुपाला आणली. 1991 मध्ये रतन रतन टाटा यांनी टाटा समूहाची जबाबदारी स्वीकारली व 28 डिसेंबर 2012 रोजी ते स्वतः या पदावरून निवृत्त झाले. रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचे मूल्य 50 पटीने वाढले.
भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात रतन टाटा यांचे मालाचे योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक स्तरावर ब्रँड इंडियाचे नेतृत्व केले. पोलाद उद्योग, ऑटोमोटिव्ह, माहिती तंत्रज्ञानासह बहुतांश क्षेत्रात टाटाने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. रतन टाटा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने टाटा समूहाला केवळ नवीन उंचीवर नेले नाही तर लाखो रोजगार निर्माण करून भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात हातभार लावला आहे. उद्योगाशिवाय राष्ट्र उभारणीच्या सामाजिक कार्यातही टाटा यांचे योगदान अतुलनीय आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या परोपकारी प्रयत्नांमुळे देशभरातील लाखो लोकांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांचे नेतृत्व आणि योगदान भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रवासाला पुढील अनेक वर्षे मार्गदर्शन करत राहील.
रतन टाटा यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांनी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पुणे दि. 10 ऑक्टोबर: जिल्हा परिषद, मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडुंनी चमकदार कामगिरी केली. क्युरोगी या प्रकारात खेळाडूंनी प्रतिभेचे दर्शन घडवत २ सुवर्णपदक व ३ रौप्य पदकांची कमाई केली. . तायक्वांदो स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी केवळ तांत्रिक क्षमताच नाही, तर खेळाप्रती त्यांची अतूट बांधिलकीही दाखवली. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून प्रेक्षकांनी हजेरी लावी. 35 किलो वजनाखालील मुलींमध्ये सानवी गिरी(सुवर्णपदक), 38 किलो वजनाखालील मुलींमध्ये आरना यादव (सुवर्णपदक) आणि 38 किलो वजनावरील मुलींमध्ये निधी कुटे (रौप्य पदक) मिळाले आहे. तसेच 41 किलो वजनाखालील मुलांमध्ये आरव कुमार आणि 32 किलो वजनाखालील मुलांमध्ये वीर शर्मा (रौप्य पदक) मिळाले. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंच्या यशाबद्दल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रशिक्षक कोमल पाठारे घारे (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त) यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले असून, या कामगिरीतून त्यांचे कठोर परिश्रम आणि चिकाटी दिसून येते.
७४ वीजजोडण्यांसाठी दरमहा ११७०० युनिट ‘सौर’ वीजनिर्मिती होणार
पुणे, दि. १० ऑक्टोबर २०२४: राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून खेड तालुक्यातील टेकवडी (जि. पुणे) गावाने मान पटकावला आहे. १२३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीजजोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यामध्ये मान्याची वाडी (ता. पाटण जि. सातारा) नंतर राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून टेकवडी गावाने एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सौरग्राम टेकवडीमधील १०० टक्के सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे ‘ऑनलाइन’द्वारे लोकार्पण करण्यात आले. नागपूर येथे बुधवारी (दि. ९) आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांनी टेकवडीचे सरपंच विठ्ठल शिंदे यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमाला ‘ऑनलाइन’द्वारे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि टेकवडीचे ग्रामस्थ उपस्थित होते तर व्यासपीठावर आमदार अॅड. आशिष जयस्वाल, डॉ. परिणय फुके, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक (संचालन) अरविंद भादिकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते ‘सौरग्राम’चे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सरपंच विठ्ठल शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता युवराज जरग यांनी स्वीकारले. यावेळी फोरविया फाऊंडेशनचे ओंकार साळवी, सौर प्रकल्पाचे कंत्राटदार मुकेश माळी यांचाही गौरव करण्यात आला.
पुणे परिमंडल अंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमा नदीच्या तिरावर डोंगराच्या कुशीत असलेल्या दुर्गम टेकवडी गावामध्ये घरगुतीच्या ७०, ग्रामपंचायतीच्या २ तसेच मंदिर व प्राथमिक शाळेसाठी प्रत्येकी एक अशा एकूण ७४ वीजजोडण्या आहेत. या सर्वच वीजजोडण्या सौर ऊर्जेवर नेण्यासाठी महावितरणकडून टेकवडीची निवड करण्यात आली. सरपंच विठ्ठल शिंदे यांच्या विशेष पुढाकारातून राजगुरुनगरचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे, कनिष्ठ अभियंता अजय पोफळे, जनमित्र मनोज गाढवे, गणेश कोकरे, चिंतामण हांडे, संजय मेतल यांनी बैठकी घेऊन ग्रामस्थांना सौर ऊर्जेची योजना व फायदे समजून सांगितले. सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने होकार देत सौरग्रामसाठी तयारी सुरु केली. टेकवडीतील सर्वच ७० घरांचा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत समावेश करण्यात आला तर उर्वरित ग्रामपंचायत, मंदिर व प्राथमिक शाळेच्या ४ वीजजोडण्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली.
यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून ७० घरांसाठी प्रत्येकी एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प तसेच उर्वरित चार वीजजोडण्यांसाठी प्रत्येकी ७ किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे करण्यात आले. त्यासाठी फोरविया फाऊंडेशनकडून ‘सीएसआर’द्वारे आर्थिक सहाय्य मिळाले. सप्टेंबरअखेरीस सर्व वीजजोडण्यांसाठी छतावर सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. तर गावात सौर पथदिवे यापूर्वीच बसविण्यात आले आहेत.
टेकवडी गावाला आता छतावरील सौर प्रकल्पांमुळे तब्बल ९८ किलोवॅट वीजनिर्मितीची क्षमता प्राप्त झाली आहे. त्यामुळे गावात प्रत्येक महिन्यात तब्बल ११ हजार ७६० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे सर्वच, ७० घरांचा दरमहा सरासरी वीजवापर ७० ते ८० युनिट आहे. आता सर्वच घरांवर प्रत्येकी एक किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने प्रत्येक घरासाठी दरमहा १२० युनिट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्व घरांसह इतर वीजजोडण्यांचे वीजबिल देखील यापुढे शून्य होणार आहे. तर शिल्लक वीज महावितरणकडून विकत घेण्यात येणार आहे.लोकार्पणच्या कार्यक्रमाला ‘ऑनलाइन’द्वारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य अरूण चांभारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.