७४ वीजजोडण्यांसाठी दरमहा ११७०० युनिट ‘सौर’ वीजनिर्मिती होणार
पुणे, दि. १० ऑक्टोबर २०२४: राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून खेड तालुक्यातील टेकवडी (जि. पुणे) गावाने मान पटकावला आहे. १२३९ लोकसंख्येच्या या गावातील सर्वच घरगुतीसह ७४ वीजजोडण्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांतून वीजपुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून राज्यातील १०० गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून त्यात टेकवडी गावाची निवड झाली होती. यामध्ये मान्याची वाडी (ता. पाटण जि. सातारा) नंतर राज्यातील दुसरे सौरग्राम म्हणून टेकवडी गावाने एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सौरग्राम टेकवडीमधील १०० टक्के सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे ‘ऑनलाइन’द्वारे लोकार्पण करण्यात आले. नागपूर येथे बुधवारी (दि. ९) आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांनी टेकवडीचे सरपंच विठ्ठल शिंदे यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमाला ‘ऑनलाइन’द्वारे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि टेकवडीचे ग्रामस्थ उपस्थित होते तर व्यासपीठावर आमदार अॅड. आशिष जयस्वाल, डॉ. परिणय फुके, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक (संचालन) अरविंद भादिकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते ‘सौरग्राम’चे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सरपंच विठ्ठल शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता युवराज जरग यांनी स्वीकारले. यावेळी फोरविया फाऊंडेशनचे ओंकार साळवी, सौर प्रकल्पाचे कंत्राटदार मुकेश माळी यांचाही गौरव करण्यात आला.
पुणे परिमंडल अंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमा नदीच्या तिरावर डोंगराच्या कुशीत असलेल्या दुर्गम टेकवडी गावामध्ये घरगुतीच्या ७०, ग्रामपंचायतीच्या २ तसेच मंदिर व प्राथमिक शाळेसाठी प्रत्येकी एक अशा एकूण ७४ वीजजोडण्या आहेत. या सर्वच वीजजोडण्या सौर ऊर्जेवर नेण्यासाठी महावितरणकडून टेकवडीची निवड करण्यात आली. सरपंच विठ्ठल शिंदे यांच्या विशेष पुढाकारातून राजगुरुनगरचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे, कनिष्ठ अभियंता अजय पोफळे, जनमित्र मनोज गाढवे, गणेश कोकरे, चिंतामण हांडे, संजय मेतल यांनी बैठकी घेऊन ग्रामस्थांना सौर ऊर्जेची योजना व फायदे समजून सांगितले. सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने होकार देत सौरग्रामसाठी तयारी सुरु केली. टेकवडीतील सर्वच ७० घरांचा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत समावेश करण्यात आला तर उर्वरित ग्रामपंचायत, मंदिर व प्राथमिक शाळेच्या ४ वीजजोडण्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली.
यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून ७० घरांसाठी प्रत्येकी एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प तसेच उर्वरित चार वीजजोडण्यांसाठी प्रत्येकी ७ किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे करण्यात आले. त्यासाठी फोरविया फाऊंडेशनकडून ‘सीएसआर’द्वारे आर्थिक सहाय्य मिळाले. सप्टेंबरअखेरीस सर्व वीजजोडण्यांसाठी छतावर सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. तर गावात सौर पथदिवे यापूर्वीच बसविण्यात आले आहेत.
टेकवडी गावाला आता छतावरील सौर प्रकल्पांमुळे तब्बल ९८ किलोवॅट वीजनिर्मितीची क्षमता प्राप्त झाली आहे. त्यामुळे गावात प्रत्येक महिन्यात तब्बल ११ हजार ७६० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे सर्वच, ७० घरांचा दरमहा सरासरी वीजवापर ७० ते ८० युनिट आहे. आता सर्वच घरांवर प्रत्येकी एक किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने प्रत्येक घरासाठी दरमहा १२० युनिट वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्व घरांसह इतर वीजजोडण्यांचे वीजबिल देखील यापुढे शून्य होणार आहे. तर शिल्लक वीज महावितरणकडून विकत घेण्यात येणार आहे.लोकार्पणच्या कार्यक्रमाला ‘ऑनलाइन’द्वारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य अरूण चांभारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.