पुणे-गृहप्रकल्पातील भागीदाराने धमकावल्यामुळे एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्याच्या धायरी परिसरात घडला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर मनोहर बेटटीगिरी (52) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी सविता किशाेर बेटटीगिरी (वय-४८) यांच्या तक्रारीनुसार आराेपी सुरेंद्र बाबुराव लायगुडे, संग्राम सुरेंद्र लायगुडे व सागर सुरेंद्र लायगुडे (सर्व रा.धायरी,पुणे) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएल असाेसिएटस तर्फे किशाेर बेटटीगिरी व त्यांचे भागीदार सुरेंद्र लायगुडे यांनी बारंगणी मळा, धायरी, पुणे येथे संयुक्तरित्या भागीदारीत राजवीर अवेन्यू नावाने बांधकाम करार केला हाेता. सदरचे बांधकाम करताना मेसर्स स्वाती कन्सल्टन्सी, धायरी यांच्या तर्फे आराेपींनी मयतास 91 लाख रुपयांचे कर्ज स्वरुपात दिले हाेते. त्याबदल्यात व्यैक्तिकरित्या मयताने 80 लाख रुपयांची परतफेड केली हाेती. परंतु आराेपींनी सदरचे बांधकाम दाेन-तीन वेळा बंद पाडले. तसेच सदर साईटवरील किशाेर बेटटीगिरी यांना मिळणारे 2 व्यापारी गाळे परस्पर ताब्यात घेतले. किशाेर यांनी याबाबत सुरेद्र लायगुडे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माझी पाेरं तुला हिशाेब मागणार, ताे तुला द्यावाच लागेल असे बाेलून जमेत नसेल तर जा जीव दे जा असे बाेलले. तसेच सदर गाळे भाड्याने देऊन त्याबाबत नाेटीस पाठवून किशाेर यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांनी आत्महत्या केली. याबाबत पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत.