Home Blog Page 650

११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे शहर पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या ७ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. काल दि. ११ रोजी रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियुक्ती आदेश काढले आहेत.

१. शरद आसाराम झिने – गुन्हे पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ ते वपोनि आंबेगाव पोलीस ठाणे

२. अतुल मुरलीधर भोस – गुन्हे पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड ते वपोनि नांदेडसिटी पोलीस ठाणे

३. महेश गुंडाप्पा बोळकोटगी – वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे ते वपोनि बाणेर पोलीस ठाणे

४. विजयानंद पद्माकर पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक चतुःशृंगी ते वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे

५. संजय गुंडाप्पा चव्हाण – वपोनि चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि खराडी पोलीस ठाणे
६. अनिल शिवाजी माने – गुन्हे पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि चंदननगर पोलीस ठाणे

७. पंडित हणमंतराव रेजितवाड – वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे ते वपोनि वाघोली पोलीस ठाणे

८. सर्जेराव शामराव कुंभार – गुन्हे पोलीस निरीक्षक विमानतळ ते वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे

९. श्रीमती मंगल शामराव मोंढवे – वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे ते वपोनि फुरसुंगी पोलीस ठाणे

१०. शंकर भिकू साळुंखे – गुन्हे पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते वपोनि बिबवेवाडी पोलीस ठाणे
११ मानसिंग संभाजी पाटील – गुन्हे पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे ते वपोनि काळेपडल पोलीस ठाणे

तसेच मुंबई येथून बदलीने आलेल्या पोलीस निरीक्षकांची बदली पुढील प्रमाणे

१. राहुल वीरसिंग गौड – गुन्हे पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे

२. अमर नामदेव काळंगे – गुन्हे पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे

३. राजेंद्र भाऊराव पन्हाळे – गुन्हे पोलीस निरीक्षक चतुःशृंगी पोलीस ठाणे

तणावमुक्त आनंदी कार्यसंस्कृती जपण्याची गरज!

अर्नेस्ट अँड यंग( ई वाय) कंपनीच्या पुणे कार्यालयातील एका 26 वर्षे वयाच्या ॲना नावाच्या चार्टर्ड अकाउंटंट मुलीने आत्महत्या केली. तिच्या आईने कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर तक्रार केली असून कामाच्या अतिताणामुळेच ही आत्महत्या झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत असलेल्या विविध समस्यांचा घेतलेला हा वेध.

भारतात सध्या चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रामध्ये “बिग फोर” म्हणजे डेलॉईट, प्राईस वॉटर हाऊस कूपर्स,लंडन स्थित अर्नेस्ट अँड यंग व नेदरलँड मधील केपीएमजी या चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय काही अन्य मोठ्या कंपन्या असून तेथे अक्षरशः लाखो चार्टर्ड अकाउंटंट, अन्य व्यावसायिक काम करीत आहेत. चार महिन्यापूर्वी अर्नेस्ट अँड यंग ( ई अँड वाय) या ख्यातनाम चार्टर्ड अकाउंटंट कंपनीमध्ये एका तरुण मुलीने कामाच्या अतिताणा पोटी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेबाबत त्या मुलीची आई अनिता अगस्ती यांनी कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गंभीर आरोप केलेले आहेत. किंबहुना याची दखल राज्य शासनाच्या कामगार विभागाने घेतली असून या कंपनीच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत थेट चौकशी सुरू केलेली आहे.

पुण्यासारख्या शहरात घडलेली ही घटना ही केवळ पहिलीच घटना नाही तर आज जगभरातील अनेक देशांमध्ये तरुण व्यावसायिकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. जपानमध्ये 2023 मध्ये 2900 तरुणांनी अती कामापोटी आत्महत्या केलेल्या होत्या. जपानी भाषेत त्याला ‘करोशी’ असे संबोधले गेले होते. भारतासह जगभरातील सर्व खाजगी किंवा अन्य व्यावसायिक कंपन्यांचे उद्दिष्ट केवळ प्रचंड नफा मिळवणे असल्यामुळे त्या सातत्याने कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करत राहतात. याचा परिणाम त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर आणि सुख स्वास्थ्यावर होतो हे यामागचे कारण आहे. दोन वर्षांपूर्वी भारतातील अशा आत्महत्यांचे प्रमाण 11 हजाराच्या घरात होते. आणि याला जबाबदार आहे ते कंपन्यांमध्ये असलेल्या नफेखोरी या हिंसक कार्य संस्कृतीचे धोरण. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक कंपनीला अस्तित्व टिकवण्यासाठी खर्चामध्ये कपात करणे, कार्यक्षमता वाढवणे व त्याचप्रमाणे उत्पादकतेत वाढ करणे हे अपरिहार्य आहे. याचा परिणाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत राहतो. प्रत्येक कंपनी अवास्तव कामाच्या अपेक्षांचे ओझे कर्मचाऱ्यांवर सातत्याने लादत असते. त्यामुळे दररोजच्या आठ तासाच्या ऐवजी 12 ते 16 तास काम करावे लागते. हे काम करत असताना कर्मचारी सातत्याने प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत राहतात. कदाचित या कर्मचाऱ्यांना उत्तम वेतनही मिळत असते परंतु केवळ पैसे मिळाल्याने समाधान लाभत नाही कारण त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे जवळजवळ बिघडलेले असते. एक प्रकारची ही गजबजलेल्या ‘कामाची’ संस्कृती तरुणाईवर मोठा आघात करत आहे. कामामध्ये असणारी व्यस्तता हानिकारक ठरते असेही लक्षात आलेले आहे. अनेक कंपन्या सातत्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून उत्पादकतेची जास्तीत जास्त अपेक्षा करत राहतात आणि हे करताना या कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार कुठेही केला जात नाही. अर्थात हा सर्व प्रकार काही नव्याने घडतोय असे नाही. जगभरात सर्वत्र नवनवीन तंत्रज्ञान, पैसा, कायदा यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत राहिल्याने केवळ सतत कार्यरत राहिल्याने या कंपन्यांचे प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांची काही कार्यक्षमता असते परंतु त्याला सातत्याने जादा पैशाचे आमिष दाखवले जाते आणि या साऱ्या प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा किंवा शारीरिक क्षमतेचा कोठेही विचार केला जात नाही आणि अखेर त्याची परिणीती असह्य ताणामध्ये होते. यातूनच कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होणारी सततची चिंता,सतत उदास असणे किंवा चिडचिड करणे आणि नैराश्याच्या गर्तेत जाण्यामध्ये होते. त्यातूनच हे आत्महत्यांचे प्रमाण मर्यादेबाहेर गेलेले दिसते.

या सर्व पार्श्वभूमीवर नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची भूमिका कंपन्या वरवर घेत असल्या तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे हे नाकारता येणार नाही. जो कर्मचारी कामावर सतत आनंदाने काम करत असतो त्याच्याकडून निश्चितच उत्पादकता जास्त चांगल्या प्रकारे मिळते हे प्रत्येक कंपनीला, त्यांच्या व्यवस्थापनाला माहित असते. मात्र जेथे कर्मचाऱ्यांना काम करताना सातत्याने दबाव किंवा ताणाखाली किंवा काही उद्दिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र दबाव राहतो तेथे उत्पादकता बाजूला राहून कार्यक्षमता कमी होते. याचाच विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व मानसिकतेवर होत राहतो. त्यामुळेच अनेक कंपन्यांमध्ये कामाचे तास सुद्धा अत्यंत लवचिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातो. काही नवीन उपक्रम हाती घेऊन कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि एकाच वेळेला कर्मचाऱ्यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि त्याचे काम यांचा समतोल साधण्याचा विचार अलीकडे केला जात आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्या किंवा विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या वित्तसेवा विषयक कंपन्यांमध्ये याबाबत सतत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात. परंतु प्रत्येक कंपनीनेच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कामाचे फेरमुल्यांकन करण्याची निश्चित वेळ आलेली आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये खेळाच्या सुविधा तसेच उपहारगृह किंवा मनोरंजनाच्या सुविधा दिल्या जातात. एक प्रकारे कर्मचाऱ्यांना मानसिक दृष्ट्या समाधान चांगल्या प्रकारे कसे लाभेल याचे प्रयत्न केले जातात परंतु दुसरीकडे त्यांच्याकडून व्यवस्थापनाने सातत्याने केलेल्या अपेक्षांमध्ये वाढ होत जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना हा समतोल साधणे जमत नाही. यासाठी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास हे अत्यंत प्रमाणित केले पाहिजेत. शारीरिक कष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आठ तासांची कामाची शिफ्ट किंवा पाळी असते. मात्र ज्यांना मानसिक किंवा बौद्धिक कष्ट होणार असतात त्यांना सहा तासापेक्षा जास्त काम करणे हे त्रासदायक ठरते. प्रसारमाध्यमा सारख्या क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची शिफ्ट ही आठ तासांच्या ऐवजी सहा तासांची त्यासाठीच केलेली आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रत्येक कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची सातत्याने काळजी घेऊन त्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्याची निश्चित गरज आहे. ज्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी शिकत असताना प्रत्येक विद्यार्थी व्यवस्थितपणे शिकेलच असे नसते. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अक्षमता असते. त्यांच्यासाठी समुपदेशनासारखे प्रयत्न करून शिक्षणाची गोडी लावता येते. त्याच धर्तीवर अनेक कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांच्या मानसिक समुपदेशनाचा उपक्रम हाती घेतला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून त्यातून त्याची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवली जाईल किंवा मनाचे स्वास्थ्य त्याला लाभून त्याच्या कामात कशी सुधारणा होईल यासाठी सर्व कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे. ताणतणावाचे व्यवस्थापन हा आज परवलीचा शब्द झाला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा किती उपयोग होतो आहे हे प्रत्येक कंपनीने पाहण्याची वेळ आली आहे. कंपनीची उत्पादकता आणि त्यांना मिळणारा नफा याची गणिते बदलण्याची आवश्यकता आहे. जर प्रत्येक कर्मचारी आनंदी आणि समाधानी असेल तरच त्याच्या हातून कार्यक्षमपणे काम केले जाऊ शकते हे निश्चित. समतोल आणि शाश्वत कार्य संस्कृती हा या सगळ्याचा गाभा आहे. त्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक कंपनीने यावर जाणीवपूर्वक काम केले तर नजीकच्या भविष्यकाळात हे आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल यात शंका नाही. यामुळेच कंपन्या व कर्मचारी या दोघांनी दोन्ही घटकांनी एकत्र येऊन काही ठोस पावले उचलून वाजवी कामाचा ताण व तास यातून परिपूर्ण आरोग्य व आयुष्य यांची सांगड घातली पाहिजे असे वाटते.

लेखक:प्रा नंदकुमार काकिर्डे
(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी सह तिघांना कात्रज घाटात सापळा रचून पकडले -रणदिवेच्या हत्येचा २४ तासात उलगडा

पुणे :पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांचा निर्घुण खून करणार्‍या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.
राहुल दत्तात्रय खुडे (वय ४०), सचिन दत्तात्रय खुडे (वय ३४) आणि सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी (वय २७, सर्व रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाळासाहेब रणदिवे व आरोपी यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर रणदिवे यांनी टाकलेल्या मेसेजवरुन वाद निर्माण झाला होता. रणदिवे हे मार्केटयार्डमधील सावित्री हॉटेलचे समोरील शेडमध्ये चहा पित बसले असताना आरोपी धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना दुसर्‍या दिवशी सकाळी यांचा मृत्यु झाला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना बातमी मिळाली की, आरोपी हे कात्रज घाटाचे दिशेने साताराकडे जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी कात्रज घाटात सापळा रचून तिघांना अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.

पुण्यातून अपहरण आणि ५ कोटीची खंडणी-कर्नाटकात गुन्हेगार पकडून अपहृतांची सुटका -पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : घराची पुजा करायची आहे, असे आमिष दाखवून पुजारी व त्यांचे शिष्य यांना विजापूरला घेऊन जाऊन डांबून ठेवून ५ कोटींची खंडणी मागणार्‍या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. रामु अप्पाराम बळुन (वय २९, रा. त्रिकुंडी, ता. जत, जि. सांगली), दत्ता शिवाजी करे (वय २०, रा. त्रिकुंडी ता. जत, जि. सांगली), हर्षद सुरेश पाटील (वय २२, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.आरोपी हे फिर्यादी यांचे घरी २९ सप्टेबर रोजी आले. फिर्यादीचा मुलाला भेटून विजापूर येथे घराची पुजा करायची आहे, असे आमिष दाखविले. कर्नाटक येथे पुजारी व त्यांचे सोबतचे शिष्य यांना घेऊन गेले. पिस्तुल व हत्यारांचा धाक दाखवून अपहरण करुन ५ कोटींच्या खंडणीसाठी त्यांना डांबुन ठेवले होते.या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाला आरोपींनी पुजारी व त्यांचे शिष्यांना कर्नाटकामधील सिंधनूर जवळ डांबून ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार सुमीत ताकपेरे, जोतीष काळे यांचे पथक रवाना झाले. सिंधनूर येथे पोहचल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी केले असता आरोपींनी पुजारी व त्यांचे शिष्यांना एका निर्जन ठिकाणी असलेल्या रुममध्ये डांबुन ठेवले होते. पोलिसांना पाहून आरोपी पळून जात होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिबवेवाडी पोलिसांनी हत्यारासह ताब्यात घेतले. पुजारी व त्यांच्या ३ शिष्यांची सुटका केली. तसेच आरोपींनी आणखी ४ शिष्याना दुसरीकडे डांबून ठेवले होते. त्यांचीही सुटका केली. अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे ताब्यात घेऊन आरोपींना अटक केली.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, शिवाजी येवले, विशाल जाधव, नितीन कातुर्डे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.

“दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी”; संजय राऊतांचा टोला

मुंबई-दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात चार दसरा विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि शिवसेना शिंदे गटाच्या दसऱ्या मेळावाच्या आयोजन करण्यात आलं आहे.

या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पॉडकॉस्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे, अशी टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केले. राज ठाकरेंच्या पॉडकास्टवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र साकारण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी बेसावध न होता मतदान करावं असं राज ठाकरे यांनी म्हटलं. माध्यमांनी यावेळी यावरुनच संजय राऊत यांना सवाल विचारला. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्र लुटीला समर्थन दिलं असल्याचे संजय राऊत म्हणाले.

“राज ठाकरे अगदी बरोबर बोलले आहेत. महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु आहे. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे दुर्दैवाने उभे राहिले होते. महाराष्ट्राची लूट दिल्लीते सत्ताधीश खास करुन मोदी आणि शाह करत आहेत. व्यापार मंडळाचे नेते. त्या व्यापाऱ्यांच्या मागे लोकसभेला जे उभे राहिले त्यांनी महाराष्ट्र लुटीला समर्थन दिलं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्राचे सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जातंय आणि आपण आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही. बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत. पण आम्ही स्वतःमध्ये मश्गूल तर कधी जातीपातीमध्ये मश्गूल. आमचं या लोकांकडे लक्ष कधी राहणार. आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. दरवेळी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपआपले राजकीय खेळ करत राहतात. याच्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते, पूल बांधणे ही प्रगती नसते. प्रगती समाजाची व्हावी लागते. परदेशातले देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात. आपण चाचपडत आहोत. एवढं सगळं होऊनही तुमच्यातला राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता आणि पश्चातापाचा हात डोक्यावर मारता,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

मानसिक आरोग्याच्या जागृतीसाठी ‘कनेक्टिंग ट्रस्ट’तर्फे ‘वॉकेथॉन’

  • जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त रविवारी (ता. १३) आयोजन; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

पुणे: कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. याची गंभीर दखल घेत कनेक्टिंग ट्रस्टने या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता. १३) दुपारी ४ ते ६ या वेळेत संभाजी पार्क, जंगली महाराज रोड, गुडलक चौक, फर्गसन महाविद्यालयमार्गे संभाजी पार्क अशी ही वॉकेथॉन होणार आहे. कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालक अर्णवाज दमानिया, सहसंस्थापक सँडी डायस, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात होईल. जागतिक मानसिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य’ अशी आहे. पुणेकरांनी या वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

याविषयी बोलताना प्रणिता मडकईकर म्हणाल्या, “मानसिक आरोग्याविषयी अलीकडे झालेल्या अभ्यासांत कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कामाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम होतो याकडे अभ्यासकांनी विशेष लक्ष वेधले आहे. ‘द सायलेंट स्ट्रगल – हाऊ मेंटल हेल्थ इम्पॅक्ट्स द इंडियन वर्कफोर्स २०२३’ यामध्ये १० विविध क्षेत्रे आणि आठ भारतीय शहरांमधील तीन हजार कर्मचाऱ्यांचा अभ्यास ‘आयपीएसओएस’ या संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासात प्रत्येक दोनपैकी एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका आढळतो. ९३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी मानसिक आरोग्य आणि कल्याण महत्त्वाचे वाटत असल्याचे मत नोंदवले. ३५-४५ वयोगटातील लोक, महिला आणि उच्च पदावरील कर्मचारी यांचा समावेश सर्वाधिक धोका असलेल्यांमध्ये होतो. आठवड्याला ४५ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही या गटात समावेश आहे. या अभ्यासात ९० टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी व व्यक्तिगत जीवन यांचे संतुलन हा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा सर्वोच्च घटक असल्याचे नमूद केले आहे. ४२ टक्के लोकांनी त्यांच्या नोकरीमुळे तणावग्रस्त असल्याचे मान्य केले. जवळजवळ ४५ टक्के लोकांनी कामाच्या ताणामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम झाला आहे, असे सांगितले. ८० टक्के लोकांनी गेल्या वर्षी तणाव, चिंता, बिघडलेले मानसिक आरोग्य यामुळे कामावरून दोन आठवड्यांची रजा घेतल्याचे कबुल केले. ९० टक्के लोकांच्या मते प्रत्येकवेळी रजेवर असताना त्यांच्याकडून कामाची अपेक्षा केली जात असून, हे चिंताजनक आहे.”

‘इनसाईट्स फ्रॉम इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस इन हेल्थ अँड वेलनेस २०२३’ या अभ्यासात २१० संस्थांमधील १८.५ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक अभ्यास करण्यात आला. यातील एक महत्त्वाचा निष्कर्ष असे दर्शवितो की, प्रत्येक चार भारतीय कर्मचाऱ्यांपैकी एकाला तणाव, चिंता किंवा नैराश्याबद्दल बोलण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या परिस्थितीचा परिणाम केवळ भारतीय कार्यस्थळावर होत नसून त्याची व्याप्ती जागतिक आहे, असे हे दोन्ही अहवाल सूचित करतात, असे मडकईकर यांनी नमूद केले.

आत्महत्या प्रतिबंध आणि आत्महत्येला कलंकमुक्त करण्यासाठी कनेक्टींग ट्रस्टच्या समर्पित, प्रशिक्षित स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांची टीम गेली १९ वर्षे कार्यरत आहे. विविध कार्यक्रमांद्वारे हजारो लोकांना ट्रस्ट मदत करत आहे. यात हायस्कूल-काॅलेजेसमध्ये पीअर सपोर्ट तयार करणे, मोफत हेल्पलाइन, ईमेल सपोर्ट, सुसाईड सर्व्हायव्हर सपोर्ट आणि कनेक्टिंग संस्थेमध्ये प्रत्यक्ष भेटूनही संवाद साधता येतो ह्या विनामूल्य सेवांचा समावेश आहे, असे मडकईकर यांनी सांगितले.

रावणाने बाप म्हणून सीतेचे अपहरण केले:NCP आमदाराचा वादग्रस्त दावा; रावण दहन बंद करण्याची मागणी; रावण मंदिराला निधीही दिला

अकोला-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी विजयादशमीच्या दिनी रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. एवढेच नाही तर त्यांनी रावणाच्या मंदिरासाठी तब्बल 20 लाख रुपयांचा निधी देऊन, रावणाने माता सीतेचे बाप म्हणून अपहरण केल्याचा वादग्रस्त दावाही केला आहे. त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

राज्यासह संपूर्ण देशात आज विजयादशमीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशात ठिकठिकाणी रावण दहन केले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा येथे रावणाची महाआरती केली. यावेळी गावकऱ्यांसह आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मिटकरी यांनी रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी केली.

रावण हा ज्ञानी व सत्पुरुष होता,रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का?

रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का? रावण हा ज्ञानी व सत्पुरुष होता. पण त्याच्यातील चांगुलपणाकडे समाजाने दुर्लक्ष केले. रावणाने माता सीतेचे एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या वर्षी रावण मंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर मला प्रचंड राजकीय अडचण झाली. त्यामुळे मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. पण आता मी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने जिर्णोद्धाराचा प्रयत्न करणार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे अमोल मिटकरी यांनी गतवर्षी रावण मंदिराच्या सभागृह व जिर्णोद्धारासाठी 20 लाख रुपयांचा निधीही जाहीर केला होता. पण त्यावरून प्रचंड आकांडतांडव झाले होते. त्यानंतर आज पुन्हा मिटकरी यांनी सांगोळ्यात रावणाची आरती केल्यानंतर रावण दहनाच्या प्रथेवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील काही आदिवासी संघटनांनी यापूर्वीच रावण दहनाला विरोध केला आहे.

सांगोळ्याच्या रावण मंदिराची काय आहे आख्यायिका?

अकोला शहरापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर सांगोळा हे गाव आहे. इथे रावणाच्या सद्गुणांमुळे त्याची पूजा केली जाते. मागील 300 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. वाईट ते सोडावे व चांगले ते घ्यावे, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते. पण त्याच्यात काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते.

सांगोळा येथे रावणाची दगडात कोरलेली मूर्ती आहे. दसऱ्याच्या दिवशी या मूर्तीची पूजा केली जाते. या गावातून मन नदी वाहते. या नदीच्या काठावर ऋषीमुनीचे आश्रम होते. गावकऱ्यांची ऋषीमुनीवर खूप श्रद्धा होती. काही कालावधीनंतर मुनी कालवश झाले. गावकऱ्यांनी महाराजांची आठवण मूर्तीच्या रुपेने संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता. महाराज ज्या वडाच्या झाडाखाली तपस्या करत होते. त्या वडाच्या झाडाखाली मुनी तपस्या करत असल्याची मूर्ती तयार करण्याची सूचना त्यांनी मूर्तीकाराला केली. पण मूर्तिकाराच्या हातून मुनीच्या ऐवजी रावणाची मूर्ती तयार झाली. तेव्हापासून सांगोळा येथील गावकरी 10 तोंडे, 20 डोळे, सर्व आयुधांनी सूसज्ज असणाऱ्या 20 हातांच्या रावणाची पूजा करत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मावळातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न -आमदार धंगेकर

पुणे- पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मावळातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, कासारसाई धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेली मावळ तालुक्यातील 200 कोटी रुपयांची 31 एकर जमीन वाटप आदेश होण्यापूर्वीच नोंदणीकृत साठेखत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित करण्यात आल्याचा आारोप त्यांनी केला आहे.

मावळ तालुक्यातील गट क्रमांक 154 सह पाच ते सहा गटांतील शासकीय जागा लाटण्याचा हा प्रकार आहे. या जागेवर कासारसाई प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे अपेक्षित आहे. या जागेचा सातबाराही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर आहे. मात्र, मंत्री विखे पाटील यांच्या जवळचे असलेले सचिन शिंदे, श्वेता आचार्य यांच्यासह काही लोकांनी जिल्हाधिकारी यांच्या नावावर आणि मालकी हक्क असलेली सरकारी जमीन नोंदणीकृत साठेखताद्वारे परस्पर हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. या जागेच्या सातबाऱ्यावर जिल्हाधिकारी यांचे नाव असल्याने ही जागा सरकारी आहे, हे माहिती असूनही राजकीय दबावातून उपनिबंधकांनी त्याचे साठेखत तयार केले. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जमीन हस्तांतर करणारे आणि घेणारे, तसेच त्यांना मदत करणाऱ्या उपनिबंधकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनेक अडचर्णीवर मात करीत आपण निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. निळवंडेसाठी आदर्श पुनर्वसन केले. त्यासाठी आपण स्वतःची जमीन दिली. शेजारच्यांनी गुंठाही जमीन दिली नाही. निळवंडेचे काम कुणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडेसाठी कवडीचेही योगदान नाही, असे टीकास्र काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता डागले आहे.

श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव ; विजयादशमीला मंदिरात देवीभक्तांची अलोट गर्दी

पुणे : दक्षिण भारतातील कारागिरांनी सुमारे २३ वर्षांपूर्वी साकारलेली सोन्याची साडी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला यावर्षी देखील परिधान करण्यात आली. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीच्या मूर्तीला ही तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, पुरातन काळापासून दस-याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, याकरिता दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते.

सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते.

३ वेळा आमदार राहिलेल्या तापकिरांच्या उमेदवारीला मंजुषा नागपुरेंचे आव्हान

पुणे- खडकवासला विधानसभा मतदार संघ तसा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मतदार संघ.बारामती लोकसभा मतदार संघात येणारा हा मतदार संघ गेली तेरा वर्षे भाजपने आपल्याकडे राखून ठेवण्यात यश मिळविले आहे.ते कोणत्या कर्तुत्वाच्या जोरावर हेच अनेकांना न उलगडणारे कोडे आहे. त्याचे उत्तर स्पष्ट आहे येथे भाजपला मानणारा आणि विस्थापित होऊन या मतदार संघातला रहिवासी झालेला मतदार संघ मोठा आहे. गावकी भावकीच्या लढाया पाहत अनधिकृत बांधकामाच्या जाळ्यात,वाहतुकीच्या कोंडीत आणि अस्वच्छतेच्या परिसरातच वावरलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीच्या काका पुतण्यांनी कॉंग्रेसला कधीच हद्दपार केले हा इतिहास मतदार देखील जाणून आहेच.पण बेकायदेशीर बांधकामे करत वर्चस्व प्रस्थापित केलेल्या किंवा खंडणीखोर आणि गुन्हेगारांच्या छायेत राहण्या ऐवजी येथील मतदार संघाला शांतता प्रिय आणि विकासाकडे नेणाऱ्या नेतृत्वाची कायमच गरज भासली.या पार्श्वभूमीवर सध्याचा काळ पहिला तर गुन्हेगारी,घात पात अपघात, अनधिकृत बांधकामांनी निर्माण झालेले प्रश्न आणि वर्चस्वाधीष्टीत गुन्हेगारी यामुळे येथील नागरिक चिंतातूर बनलेला आहे.चिखलांचे रस्ते,पाण्याची कमतरता, ड्रेनेजच्या समस्या,विजेचा अभाव,डुकरांचा सुळसुळाट या सर्व स्थानिक समस्यांना आता पत्रकारांनी,आणि महापालिकेत पोहोचलेल्या या मतदार संघातील सदस्यांनी जवळ जवळ पूर्णपणे तिलांजली दिली आहे. या मतदार संघात मग १३ वर्षे आमदार राहून काय करता आले असते ? आणि काय करायला हवे होते ?यावर मंथन करत आता विद्यमान आमदारांना मतदारच घेरणार आहेत अशी स्थिती आहे.गेल्या निवडणुकीत एका व्हिडीओ ने धमाल केली.आणि बिल्डरशाही जोपासणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे पारडे जड केले. पण विजय मात्र राष्ट्रवादीला मिळविता आला नाही.आणि भाजपाला हातातून निसटू पाहणारा हा मतदार संघ म्हणूनच याकडे पाहावे लागू लागले, पण तरीही गेल्या ५ वर्षात देखील महापालिकेच्या स्तरावरच येथे काम होत गेले. राज्यस्तरावरील कामासाठी देखील महापालिकेलाच वारंवार पाठपुरावा करण्याचे नशिबी आले.या पार्श्वभूमीवर भाजपने आता या विधानसभेला आपला उमेदवार येथून बदलला तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.खडकवासल्यातून राष्ट्रवादीची २ शकले झाल्या नंतर भाजपाला योग्य तळमळीचा,जनसंपर्क दांडगा ठेवलेला उमेदवार दिला तर विजय अवघड नाही असे मानले जाते. आणि म्हणूनच येथून कितीही उमेदवार इच्छुक असले तरी महिला उमेदवार म्हणून आणि काम करण्याची प्रबळ इछ्या शक्ती गेल्या ५ वर्षात दिसलेल्या मंजुषा नागपुरेंचे नाव सूत्रांनी आघाडीवर नोंदविले आहे. ज्या नावास हिंदुत्वाची किनार देखील लाभलेली असल्याने संघाकडून देखील या नावाची शिफारस होऊ शकते असाही दावा केला जातो आहे.

रस्त्याचे रुंदीकरण अगोदर आणि नंतर उड्डाण पुले,ड्रेनेजच्या समस्या सोडविणे अशा कामांना प्राधान्य देत बेरोजगारी,ज्येष्ठांची काळजी, महिलांचे संरक्षण अशा कामांची यादी नागपुरे यांचे नाव आघाडीवर ठेवण्यास कारणीभूत ठरते आहे. त्यांच्या शिवाय अन्य काही इच्छुक आहेत पण त्यांना महापालिकेच्या स्तरावरच आपले राजकारण सुरु ठेवावे लागेल असा सूत्रांचा दावा आहे त्यामुळे आता खडकवासल्याच्या उमेदवारीसाठी तब्बल १३ वर्षे आमदार राहिलेल्या तापकिरांना पक्षांतर्गत पातळीवरच संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते आहेत नेमके आता त्यात त्यांना यश मिळणार कि निवृत्तीच स्वीकारावी लागणार हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे हे निश्चित.

रामदास आठवलेंचा ‘कमळ’ हाती घेण्यास नकार:राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी स्वबळावर लढण्याचा इशारा

नागपूर-मोदी सरकारमध्ये सुमारे ११ वर्षांपासून सामाजिक न्याय मंत्री असणाऱ्या रामदास आठवले यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कमळ हाती घेण्यात नकार दिला आहे. यावेळी आम्ही विधानसभेची निवडणूक महायुतीत राहून, आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपने नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. मित्रपक्षांनी कमळाचे काम करावे असे आवाहन शहराध्यक्षांनी केले आहे. त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाची मागणी महायुतीकडे केली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रामदास आठवले यांनी आरपीआयला आठ ते दहा जागा द्याव्या अशी मागणी केली आहे. यात विदर्भातील उत्तर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीतील तीनही पक्षांनी आम्हाला त्यांच्या त्यांच्या कोट्यातून प्रत्येकी तीन जागा द्यावा अशी सूचना त्यांनी केली आहे.

नागालँड आणि मणिपूर राज्यात आरपीआयचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी निवडून आले आहेत. आणखी दोन राज्यांमध्ये आमचे उमेदवार निवडून आल्यास आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे आम्ही आमच्याच पक्षावर विधानसभेची निवडणूक लढण्याचे ठरवले आहे असे आठवले यांनी सांगितले. मागील विधानसभेच्या निवडणुकीत आरपीआयचे उमेदवार कमळावर लढले होते. पाचपैकी दोन आमदार आरपीआयचे निवडून आले आहेत. सध्या महायुतीचे नेते जागांसाठी आपसातच भांडत आहे. आम्हाला जागा सोडल्या नाही तर काय करायचे ते आम्ही ठरवू, असाही इशारा त्यांनी दिला.

रिपब्लिक नेत्यांच्या बेकीमुळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणार असल्याचा मुद्दा प्रभावी ठरला. मोठ्या प्रमाणात दलितांची मते महाविकास आघाडीला मिळाली. हे खरे असले तरी दलितांची सर्वच मते आघाडीला मिळाली नाहीत. काही मते महायुतीच्या उमेदवारांनाही मिळाली आहेत. ती आमच्यामुळे मिळाल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला. हरियाणाच्या विजयामुळे महायुतीचे मनोबल वाढले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती १७० ते १८० जागा जिंकेल असाही दावा रामदास आठवले यांनी केला.

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे:ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी अजित पवार म्हणाले. मी सयाजी शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो. मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल तसंच जनकल्याणाच्या कार्यात त्यांचं मोलाचं योगदान लाभेल, असा विश्वास मला आहे. पुढील राजकिय कारकिर्दीसाठी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन

सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक –उपमुख्यमंत्री

पुणे, दि. ११: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्यादृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पोलीस आयुक्तालय, पुणे शहर अंतर्गत शिवाजीनगर येथे पोलीस मुख्यालयात विविध प्रकल्पांचे भूमीपूजन व शुभारंभ तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संगणकीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व मीरा- भाईंदर पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस ठाण्याचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, न्यायिक व तांत्रिक पोलीस महासंचालक संजय वर्मा, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे शहर अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळखले जाते. पुणे शहर हे मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजी व स्टार्टअप कॅपिटल आहे. शहराच्या वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे पोलीस विभागाची आव्हाने बदलली आहेत. त्यामुळे आव्हानांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी राज्यातील पोलीस विभागाच्या आकृतीबंधामध्ये ६३ वर्षानंतर सर्व निकषांचा विचार करुन २०२३ मध्ये नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे.

जेथे जेथे आवश्यकता असेल त्या ठिकाणी पोलीस ठाणी निर्माण करण्याचे तसेच आधुनिकीकरणाचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत पुणे व मिरा- भाईंदर येथील सुमारे ७२० कोटी रुपयांच्या कामांचा आज शुभारंभ व भूमीपूजन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, देशामध्ये सर्वात अत्याधुनिक अशा प्रकारचं सायबर सुरक्षा केंद्र हे महाराष्ट्रामध्ये आहे. जवळपास साडेसातशे कोटी रुपये खर्च करून त्याठिकाणी जगातली आधुनिक मशीनरी घेतलेली आहे. गुन्हेगार तातडीने सापडू शकेल अशी क्षमता आता सायबर केंद्रामध्ये तयार केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या कॅमेऱ्यांचे एकीकरण पोलीस विभाग करत आहे. महिला व बालकांविरुद्धचे गुन्हे, आणि ड्रग्ज संदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे सक्त निर्देश त्यांनी दिले. ड्रग्ज प्रकरणात कुठलाही पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्याला थेट बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ते पुढे म्हणाले, अंधाऱ्या, निर्मनुष्य, दुर्गम भाग, घाट क्षेत्रात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वीज व्यवस्था, नाईट व्हिजन कॅमेरे आदी उपाययोजना करा, अशा सूचना देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग जोमाने काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेऊन गुन्हेगारांवर प्रतिबंध ठेवण्यासाठी पुणे शहर आयुक्तालयांतर्गत नवीन ७ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग जोमाने काम करत असून दुर्गम क्षेत्रात सुरक्षा परिक्षण करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गुन्हे व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलीस कटिबद्ध आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, शहराचे वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण लक्षात घेऊन प्रशासकीय सुलभतेसाठी नवीन परिमंडळास मान्यता मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथे नवीन जागा मिळाली असून चार नवीन पोलीस ठाण्याला शासनाने मान्यता दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय निश्चितच गुणात्मक बदल घडवून आणेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर येथील सात नवीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन, सीसीटीव्हीच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या व बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नवीन ४ पोलीस ठाण्यांचा शुभारंभ, सायबर पोलीस ठाणे, पीसीसीटी शिल्ड ॲप्लीकेशनचे उद्घाटन करण्यात आले. तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृहविभाग, मुंबई या संगणकीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व मीरा- भाईंदर पोलीस आयुक्तालयातील नवीन बोईज पोलीस ठाण्याचे व नवीन सहायक पोलीस आयुक्त, तुळींज कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांचा पोलीस विभागातर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
0000

राज्यकर्त्यांकडून शालेय विद्यार्थी  दुर्लक्षित – डॉ. श्रीपाल सबनीस 

शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान 

पुणे : शिक्षणातून विद्यार्थी घडतात, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत यामुळे राज्यकर्त्यांनी लाडका विद्यार्थी योजना  राबविण्याची गरज आहे, परंतु आज मतदानाच्या प्रक्रियेत प्राथमिक शाळेचे विद्यार्थी जे देशाचे भवितव्य आहेत, ते येत नसल्याने राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षित असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.  

शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे च्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त साने गुरुजी स्मारक येथे विविध शाळेतील गरजू  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून  डॉ. श्रीपाल सबनीस बोलत  होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संविधानांचे अभ्यासक प्रा. सुभाष वारे, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर, प्राचार्य वृंदा हजारे, मुख्याध्यापिका मीरा काटे, पर्यवेक्षक जीवन इंगळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आपला देश आज विविध पातळ्यांवर प्रगती करत आहे, मात्र सामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ज्या गरीबी मुळे अडचणी येतात ती गरीबी काही कमी होत असल्याचे दिसत नाही. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेला हा शिष्यवृत्ती उपक्रम अतिशय चांगला आहे, त्याला मिळणारी नागरिकांची साथ ही अत्यंत मोलाची आहे. आज राष्ट्रीय एकात्मतेचा एक चांगला अनुभ या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने आला. सर्व जाती – धर्मातील गरीब विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली गेली याचे समाधान वाटते. 

प्रा. सुभाष वारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जो वर्ग आर्थिक प्रगती करत आहे त्यांनी ‘ पे बॅक टू सोसायटी’ हे ध्यानात घेऊन नाही रे वर्गाला मदत केली पाहिजे तर महात्मा गांधी यांनी भांडवलदारांना तुम्ही मालक नाही तर विश्वस्त या नात्याने संपत्ती जमवली पाहिजे असे म्हटले होते. या महापुरुषांच्या, आपल्या संताच्या शिकवणीनुसार आजचा उपक्रम खांडेकर यांनी राबविला आहे, या कार्यक्रमातून सामाजिक कृतज्ञतेची भावना व्यक्त होते.   

शिवाजी खांडेकर म्हणाले,  प्रतिष्ठानच्या वतीने आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबता आहोत. आज २६ विद्यार्थी, विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देत आहोत पुढील वर्षी ही संख्या शंभरच्या पुढे नेण्याचा आमचा मानस आहे. 

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक जीवन इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन मीनाक्षी संगारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता उद्योगपति रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. 

चौकट 

शिष्यवृत्ती व शिष्यवृत्ती धारकांची नावे 

एस.एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय –  मीराताई काटवटे पुरस्कृत – हाफिजुल रेहमान रईन
राजा धनराज गिर ज्युनिअर कॉलेज –  राधाबाई इंगळे पुरस्कृत कै. लक्ष्मण इंगळे स्मरणार्थ समृध्द जीवन शिष्यवृत्ती – श्रेया रितेश भिसे
मोलेदिना माध्यमिक विद्यालय – अविनाश संगारे, भाई संगारे फाऊंडेशन, पुणे पुरस्कृत पँथर शहीद भाई सांगरे शिष्यवृत्ती – उमर गुलामअली खान, ९ वी
लक्ष्मणराव आपटे ज्युनिअर कॉलेज –  शिवाजी खांडेकर पुरस्कृत – स्मृती सुमित ओव्हाळ, ११ वी                                                                                   –  अधिनी कदम पुरस्कृत – सुहानी रुपेश चव्हाण, १२ वी                                                                                                                                  – ज्ञानेश्वरी रीटे, १२ वी
खंडोजी बंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय, धायरी –  वाळाराम धुलप पुरस्कृत – श्रध्दा सिध्देश्वर माळी, १० वी
नु.म.वि. मुर्तीची प्रशाला – श्रीमती संगीता गोवळकर पुरस्कृत – गायत्री संतोष बागवे, १० वी
आबासाहेब गरवारे कॉलेज – श्रीमती विद्या नांदुलकर पुरस्कृत – वैभव बाळू कांबळे
रावसाहेव पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज –  मंगलताई जाधव पुरस्कृत – अनन्या संदिप दामले, ९ वी                                                                                                                                – पौर्णिमा मनोज सर्वगोड, ८ वी
महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय-डॉ. प्रिया निघोजकर पुरस्कृत-नेहाल तसोवर हुसेन, ९वी                                                                                          –  कल्पना शेरे पुरस्कृत- ऋषिकेश राजेंद्र जगताप, ९वी
एम व्ही एम रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय – शोभा खांडेकर पुरस्कृत – अनुष्का वसंत डोंगरे १० वी                                                                                   –  शंतनू खांडेकर पुरस्कृत – सोनाक्षी किशोर देवकर ९ वी
सुंदरदेवी राठी हायस्कूल –   विनोद गोरे पुरस्कृत – राजवीर सतीश परदेशी, ९ वी
सेंट हिल्डाज हायस्कूल –  राकेश नेवासकर पुरस्कृत – समृध्दी दीपक क्षत्रीय, ९ वी
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वारजे –  देवेंद्र पारखे पुरस्कृत – मिताली दत्तात्रय निक्षे, १० वी
बनकर विद्यालय, सुखसागर नगर, कात्रज –   सुभाष तांबे पुरस्कृत – कोमल तानाजी होगडे, १२ वी
हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय -डॉ. गोवर्धन पांडुळे पुरस्कृत कै. गोविंद पांडुळे स्मरणार्थ- धनश्री हरिभाऊ कन्हाळे, ९वी
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळा – सुखदेव कंद पुरस्कृत – श्रेयस अजय कांबळे, ८ वी
अशोक विद्यालय – श्रीमती मेधा गोरे पुरस्कृत – कार्तिक राजेंद्र गायकवाड, ९ वी
समाज भूषण बाबुराव फुले माध्यमिक विद्यालय – प्रसन्न कोतुळकर पुरस्कृत – नेहा लक्ष्मीपुत्र गौर, १० वी
राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय – किशोर मुथा पुरस्कृत – निकिता गणेश वाघमोडे, ९ वी

भरत नाट्य संशोधन मंदिराचे कार्य देवघरातील नंदादीपासारखे : विजय कुवळेकर

भरत नाट्य मंदिराच्या 130व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्करांचे वितरण
विजय कुवळेकर यांचा कै. गो. रा. जोशी स्मृती नाट्यसमीक्षक/अभ्यासक पुरस्काराने गौरव

पुणे : आयुष्यात तपश्चर्या, साधना, तयारीला पर्याय नसतो. अखंड अभ्यास त्यातून शिकत जाणे भरत नाट्य संशोधन मंदिराच्या परंपरेतून कळते. संस्थेचे कार्य देवघरातील नंदादीपाप्रमाणे शांत तेवत आहे. संस्थेमध्ये स्वत:भोवती आरत्या ओवाळण्याची कुणाचीच मानसिकता नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले. या वेळी कुवळेकर यांचा कै. गो. रा. जोशी स्मृती नाट्यसमीक्षक/अभ्यासक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत नाट्य करंडक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण आणि विविध पुरस्कारांचे वितरण आज (दि. 11) कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या वेळी ते बोलत होते. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन भरत नाट्य मंदिरात करण्यात आले होते. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्यवाह संजय डोळे, विश्वस्त रवींद्र खरे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई मंचावर होते.
कुवळेकर म्हणाले, भरत नाट्य संशोधन ही संस्था नाट्य-कला क्षेत्रात कार्यरत असूनही सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून करत असलेल्या कार्यामागे मुलभूत विचार आहे. संस्था पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रस्थानी कायमच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरुबाबा महाराज औसेकर म्हणाले, आत्मचिंतनातून नवनवीन शोध लागतात. त्यासाठी तपस्या करावी लागते. ही प्रक्रिया भरत नाट्य संशोधन मंदिराने जपून ठेवावी. डिजिटल युगातही नाट्यक्षेत्र आणि कलेच्या क्षेत्रात संस्थेतर्फे संशोधन व्हावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय डोळे, अभय जबडे, रवींद्र खरे यांनी केले.

भरत नाट्य संशोधन मंदिराची स्थापना विजयादशमीच्या मुहुर्तावर झाली असून संस्थेने नृत्य-नाट्य-संगीत कलाप्रवासाची 130 वर्षे पूर्ण करून 131व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भरत नाट्य मंदिर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे मानकरी
कै. अप्पासाहेब ताम्हणकर स्मृती उत्कृष्ट नाट्य कलाकार – उदय थत्ते
कै. बबनराव गोखले स्मृती उत्कृष्ट संगीत वादक – मुकुंद कोंडे
कै. उदयसिंह पाटील स्मृती सर्वोकृष्ट बालकलाकार – सार्थक फडके
कै. गोपाळराव लिमये स्मृती संस्था कलाकार (नियोजन) – मुकुंद खामकर
गुणवंत संस्था कलाकार : भरत नाट्य मंदिर – अभिजित पोतनीस
कै. अवधूत घाटे स्मृती संस्था नाट्य कलाकार – डॉ. प्रचिती सुरू
कै. गो. रा. जोशी स्मृती तेजा काटदरे पुरस्कृत नाट्यसमीक्षक/अभ्यासक – विजय कुवळेकर
स्नेहवन आणि पालवी या संस्थांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भरत नाट्य मंदिरातर्फे आर्थिक मदत देण्यात आली तर पडद्यामागील कलाकारांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणेच्या ‌‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी‌’ला भरत करंडक
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे घेण्यात आलेल्या भरत करंडक स्पर्धेत कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली असून संस्थेने सादर केलेल्या ‌‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी‌’ या एकांकिकेने भरत करंडक पटकाविला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या (बारामती) ‌‘पाटी‌’ या एकांकिकेला द्वितीय तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 11,111 एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणेच्या ‌‘एक दिन बीत जाएगा माटी के मोल‌’ला आणि दृष्टी, पुणेने सादर केलेल्या ‌‘नदीकाठचा प्रकार‌’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
लेखन : प्रथम – विनोद रत्ना (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – सई काटकर, वेदिका कुलकर्णी (11,111), उत्तेजनार्थ – निरज खेडकर, सुजल धडोती (एक दिन बित जाएगा माटी के मोल).
दिग्दर्शन : प्रथम – आदेश यादव, सुबोधन जोशी (पाटी), द्वितीय – श्रेयस इंदापूरकर (नदीकाठचा प्रकार), उत्तेजनार्थ – निरज खेडकर, सुजल धडोती (एक दिन बित जाएगा माटी के मोल).
अभिनय : पुरुष : प्रथम – सुजल बर्गे (पाटी), द्वितीय – अमेय राजमाने (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी).
लक्षवेधी अभिनय : समृद्धी कुलकर्णी (बस नं. 1532)
अभिनय : स्त्री : प्रथम – ऋतुजा बोठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – श्रद्धा रंगारी (पाटी).
नेपथ्य : प्रथम – ऋतुजा बोठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – प्रद्युम्न उमरीकर (11,111), उत्तेजनार्थ – श्रावणी धुमाळ, गौरव माळी (कैवारी).
प्रकाश योजना : प्रथम – अभिप्राय कामठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय – आकांक्षा पन्हाळे (इंद्रायणी), उत्तेजनार्थ – वेदिका कुलकर्णी (11,111).
ध्वनीसंयोजन : प्रथम – मानस जोगळेकर (बस नं. 1532), द्वितीय – देवाशिष शिंदे (इंद्रायणी), उत्तेजनार्थ – श्रेयस शिराळकर, राजस शिंदे (एक दिन बित जाएगा माटी के मोल).
अभिनय उत्तेजनार्थ : विक्रांत बारगळे, प्रथमेश अंभोरे, गार्गी कथले, मिहिर माईणकर, निलय कात्रे, मयंक हिंगे, यश पत्की, इंद्रायणी दीक्षित, वृषाली घोडके, सोहम कुलकर्णी, क्षितिजा चिंदरकर, नयन अमराळे.
स्पर्धेचे संयोजन विश्वास पांगारकर आणि पुष्कर केळकर यांनी केले तर स्पर्धेचे परीक्षण चारुलता पाटणकर, अनुपमा कुलकर्णी, समीर हंपी यांनी केले. परीक्षकांच्या वतीने समिर हंपी यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल प्रा. राजेंद्र उत्तुरकर, अश्विनी थोरात यांनी जाहीर केला.