नागपूर-मोदी सरकारमध्ये सुमारे ११ वर्षांपासून सामाजिक न्याय मंत्री असणाऱ्या रामदास आठवले यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कमळ हाती घेण्यात नकार दिला आहे. यावेळी आम्ही विधानसभेची निवडणूक महायुतीत राहून, आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपने नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. मित्रपक्षांनी कमळाचे काम करावे असे आवाहन शहराध्यक्षांनी केले आहे. त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाची मागणी महायुतीकडे केली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रामदास आठवले यांनी आरपीआयला आठ ते दहा जागा द्याव्या अशी मागणी केली आहे. यात विदर्भातील उत्तर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीतील तीनही पक्षांनी आम्हाला त्यांच्या त्यांच्या कोट्यातून प्रत्येकी तीन जागा द्यावा अशी सूचना त्यांनी केली आहे.
नागालँड आणि मणिपूर राज्यात आरपीआयचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी निवडून आले आहेत. आणखी दोन राज्यांमध्ये आमचे उमेदवार निवडून आल्यास आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे आम्ही आमच्याच पक्षावर विधानसभेची निवडणूक लढण्याचे ठरवले आहे असे आठवले यांनी सांगितले. मागील विधानसभेच्या निवडणुकीत आरपीआयचे उमेदवार कमळावर लढले होते. पाचपैकी दोन आमदार आरपीआयचे निवडून आले आहेत. सध्या महायुतीचे नेते जागांसाठी आपसातच भांडत आहे. आम्हाला जागा सोडल्या नाही तर काय करायचे ते आम्ही ठरवू, असाही इशारा त्यांनी दिला.
रिपब्लिक नेत्यांच्या बेकीमुळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणार असल्याचा मुद्दा प्रभावी ठरला. मोठ्या प्रमाणात दलितांची मते महाविकास आघाडीला मिळाली. हे खरे असले तरी दलितांची सर्वच मते आघाडीला मिळाली नाहीत. काही मते महायुतीच्या उमेदवारांनाही मिळाली आहेत. ती आमच्यामुळे मिळाल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला. हरियाणाच्या विजयामुळे महायुतीचे मनोबल वाढले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती १७० ते १८० जागा जिंकेल असाही दावा रामदास आठवले यांनी केला.