Home Blog Page 636

पश्चिम महाराष्ट्रात दरमहा ४२ लाखांवर वीजग्राहक

करतात वीजबिलांचा ‘ऑनलान’ सुरक्षित भरणा

 दर महिन्याला सरासरी १२०० कोटी रुपयांचा घरबसल्या भरणा

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२४: महावितरणच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वर्गवारीच्या वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या वर्गवारीतील तब्बल ४१ लाख १२ हजार घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वीजग्राहक दर महिन्याला सुमारे ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या वीजबिलांचा सुरक्षित व घरबसल्या ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.

महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत सर्व प्रकारची ग्राहकसेवा एका क्लिकवर डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहून, कार्यालयीन वेळेत वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे. तसेच एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.

गेल्या तीन महिन्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील १ कोटी २६ लाख ३८ हजार ६०६ लघुदाब वीजग्राहकांनी ३५८७ कोटी ३२ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. त्यानुसार दर महिन्याला ४२ लाख १२ हजार (७९ टक्के) वीजग्राहक सरासरी ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या (८० टक्के) वीजबिलांचा घरबसल्या भरणा करीत आहेत. यामध्ये दर महिन्याला पुणे जिल्ह्यात २५ लाख ८४ हजार ४३० वीजग्राहक ७९६ कोटी, सातारा जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार २२० वीजग्राहक ७५ कोटी ८१ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३ लाख २० हजार १४० वीजग्राहक ८३ कोटी २७ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख ४४ हजार ६५० वीजग्राहक १६९ कोटी २७ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ३ लाख ४३० वीजग्राहक ७१ कोटी ३३ लाख रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.

वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरणा करणे सोयीचे व सुरक्षित आहे. या पद्धतीला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. तसेच ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच दिली जाते. वीज बिल भरण्यासंदर्भात काही तक्रार किंवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ईमेलद्वारे महावितरणशी संपर्क साधू शकतात. तसेच वीजबिलांचा क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे ऑनलाईन भरणा केल्यास वीज बिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार करा – विवेक सावंत

शिक्षण संस्थांनी विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञान स्नेही व्हावे – डॉ. गिरीश देसाई

पीसीयू मध्ये आंतरराज्य मुख्याध्यापक संवाद, संमेलन संपन्न

पिंपरी, पुणे (दि. १९ ऑक्टोबर २०२४) अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनात आयसीटीचा वापर केला पाहिजे. आता शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय भूमिकेवर लक्ष केंद्रित करून २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार केला पाहिजे असे
आवाहन पीसीयू व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विवेक सावंत यांनी उपस्थित शिक्षकांना केले. यावेळी त्यांनी एआय आधारित लर्निंग सोल्यूशन्समध्ये शिक्षणाच्या आणि वैयक्तिक शिकण्याच्या संधींचे प्रात्यक्षिक सादर केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अंतर्गत साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) येथे ‘प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्ह २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीईटी चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू च्या कुलगुरू डॉ. मणिमला पुरी, प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, सीनियर जनरल मॅनेजर एमकेसीेएल अमित रानडे आदी उपस्थित होते. यामध्ये उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, चंदीगड, पश्चिम बंगाल, बिहार आणि गोवा राज्यातील मुख्याध्यापक आणि शाळा प्रमुख उपस्थित होते.
पारंपरिक शैक्षणिक पद्धतीचा अभिनव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अर्थपूर्ण वापर करून शिक्षण संस्थांनी विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञान स्नेही व्हावे त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या उद्देशाने प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.
डॉ. मणिमला पुरी यांनी पीसीयू आणि पीसीईटी समुहाची ओळख करून दिली आणि विद्यापीठाने दिलेले विविध कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाबाबतची बांधिलकी या विषयी माहिती दिली. शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्याच्या आणि सर्व विषयांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींना चालना देण्याच्या विद्यापीठाच्या दृष्टीकोन आहे असेही सांगितले.
डॉ. सुदीप थेपडे यांनी पीसीयू मध्ये अनुभवात्मक शिक्षण, आंतरविद्याशाखीय सहयोग आणि शैक्षणिक परिणाम वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या एकात्मतेवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे सांगितले.
पीसीटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आयोजन करण्यात मार्गदर्शन केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

५६१ कोटी रुपयांच्या GST च्या नकली पावत्यांचा खेळ -करोडोची फसवणूक, ८ जणांचा पुणे पोलीस घेताहेत शोध

पुणे-हजारो कोटीच्या मालाची सुमारे ५६१ कोटी ५८ लाखाची जीएसटी सरकारला न भरता त्या भरल्याच्या नकली पावत्या सापडल्याने काही बोगस कंपन्या आणि ८ जणांच्या टोळी विरोधात पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी कसे गलेलठ्ठ होतात हे GST कर्मचारी अधिकारी, आणि पोलिसांनाही समजेनासे झाले आहे. GST आल्यापासून घोटाळ्यांचा पूर शेकडो हजारो कोटीचे मोठे रूप धरण करू लागला आहे.

दि.०१/०१/२०२३ ते ०८/१०२०२४ रोजी डिजीजीआय ऑफिस, वाडिया कॉलेज समोर, पुणे यातील नमुद इसम यांनी संगणमताने बनावट कंपनीच्या नावे टॅक्स रिर्टन फाईल करुन बनावट जीएसटी ई बिल टॅक्स पावत्या इलेक्ट्रानिक दस्ताएवेज लॅपटॉपमध्ये बनवुन वेगवेगळ्या फर्मला पाठवून अंदाजे सन २०२१ पासुन सप्टेंबर २०२४ पर्यंत वितरीत करुन शासनाचा GST एकुण ५६१.५८ करोड रुपयांचा चुकवून फसवणुक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड मो. नं.९६८९२८६५६५ अधिक तपास करत आहेत.

कोथरूड प्रीमिअर लीग : क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेत ५६ क्रिकेट टीम व ४५ फुटबॉल टीमने नोंदविला सहभाग

पुणे-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने कोथरूड प्रीमिअर लीग : क्रिकेट व फुटबॉल चे आयोजन करण्यात आले होते. ५६ क्रिकेट टीम व ४५ फुटबॉल टीम ने सहभाग नोंदविला.

क्रिकेट मध्ये “स्पार्टन टीम” विजयी झाली तर “प्रदीप जोरी टीम ने उपविजेते होण्याचा मान मिळविला “विश्वेश ऊटांगडे” मॅन ऑफ टूर्नामेंट ठरले ”फुटबॉल मधे “पन्ना बॉईज” विजयी ठरले तर “इमोर्टल्स” टीम उपविजेता.“निखिल पडवळ” -मैन ऑफ द टूर्नामेंट ठरले

ह्या स्पर्धेचे संयोजक प्रतीक मंजुश्री संदीप खर्डेकर (अध्यक्ष,क्रीडा आघाडी यूवा मोर्चा,पुणे शहर) होते व
ह्या स्पर्धेचे आयोजक – भाजप क्रीडा आघाडी,पुणे युवा मोर्चा असून सरचिटणीस प्रणव वडणेरकर,अथर्व वेल्हणकर, अद्वैत इनामदार , योगेश कंठाळे, नयन शिंदे यांनी मेहनत घेतली.

“कोथरुड प्रीमियर लीग” चे उदघाटण नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले व या वेळी “युवा मोर्चा शहर अध्यक्ष : करण मिसाळ , मुख्य प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर , प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक , पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी , कोथरुड अध्यक्ष संदीप बुटला, कोथरुड सरचिटणीस गिरीश खत्री, माजी नगरसेवक दीपक पोटे, माजी नगरसेवक मंजुश्री खर्डेकर , महिला आघाडी उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर , हिंदू जिमखाना चे संस्थापक आशिष कांटे उपस्थित होते .

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंगचा थरार

कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटांवर हेलिकॉप्टर खाली आले होते. आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. पण त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला दिसत नव्हती…….

मुंबई– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना साताऱ्यातून समोर आली आहे. मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावातून हेलिकॉप्टरने पुण्याला जात होते. यावेळी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री रस्ते मार्गाने पुण्याला रवाना झाले.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळगावी दरे येथे आले होते. येथून ते शुक्रवारी दुपारी हेलिकॉप्टरमधून मुंबईला जाणार होते. ठरल्यानुसार हेलिकॉप्टरने इथून टेक ऑफ केले. मात्र थोड्याच वेळात हवामान बदलले आणि ढग दाटून येत पावसाला सुरूवात झाली. या परिस्थितीत संभाव्य धोका ओळखून पायलटने हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्याचा निर्णय घेतला. टेक ऑफच्या अवघ्या पाच मिनिटात हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आलं.

“पुणे आणि सातारा येथे हवामान स्वच्छ होतं, पण हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर अचानक काही ढग तयार झाले. पायलटनं कोणताही आपत्कालीन कॉल केला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पायलटनं हेलिकॉप्टर मूळ स्थानावर नेण्याचा निर्णय घेतला. टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात हे हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आलं. दुपारी चारच्या सुमारास हे हेलिकॉप्टर परत आलं. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाहनानं पुणे विमानतळाकडं रवाना झाले,” अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

“मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंग करण्यामागचा थरार सांगितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावातून हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे हे देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. यावेळी पुण्याच्या दिशेला जात असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले अन् मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे हेलिकॉप्टर हवेत भरकटायला लागलं. कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटांवर हेलिकॉप्टर खाली आले होते. आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. पण त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले”, असं मंगेश चिवटे यांनी सांगितलं.

शरद पवार गटात हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी

पुणे; विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरू झालं. हर्षवर्धन पाटील यांनीही काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना महायुतीत तिकीट मिळणार असल्यानं हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता पाटील यांची आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षच्या संसदीय मंडळावर नियुक्ती करण्यात आली.संसदीय मंडळाची बैठक शनिवार, 19/10/2024 रोजी संध्याकाळी 05:00 वाजता, राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीस उपस्थित राहावं, असं पत्र पाटील यांना दे ण्यात आलं आहे.

c c tv कॅमेरा द्वारे हेल्मेट सक्ती राबविली जाते ती रस्त्यावरच पोलीस उभे करून राबविण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू करणार

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न

अपघातातील मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी-न्यायमूर्ती अभय सप्रे

पुणे,दि.१८ : वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नयेत यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिले.

विधान भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण आदी उपस्थित होते.

बेदरकारपणे आणि बेजबाबदारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे ही गंभीर बाब आहे, असे सांगून न्यायमूर्ती श्री.सप्रे म्हणाले, रस्ता अपघात कमी व्हावे, अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे, बळींची संख्या कमी व्हावी याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी वेळोवेळी मार्गदशक तत्वे निश्चित केली केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली आहे. ही समिती कायमस्वरुपी कार्यरत असून रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना आणि त्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती थेट सर्वोच्च न्यायालयास सादर करते असे त्यांनी सांगितले.

निष्पाप नागरिकांच्या रस्ते अपघातात बळींची संख्या लक्षात घेता परिवहन विभाग, पोलीस विभाग तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक बजावण्याबरोबरच निस्वार्थ भावनेने काम करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्ता सुरक्षेसंबधी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी. अपघातातील बळींची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न करावे. या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे सर्व संबधित यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक पालन करावे.

वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने रस्ता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनीही वाहतूकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळणे आवश्यक आहे. रस्यावर चालविण्यात येणारे वाहन सुस्थितीत असावे, वाहनचालकांनी सीट बेल्ट लावावे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलू नये, अतिवेगाने वाहन चालवू नये, मद्यप्रशान करुन वाहन चालवू नये, वाहन परवाना तसेच वाहन व वाहनचालकांनी सुरक्षा विमा वेळोवेळी नुतनीकरण करावे, रस्ता सुरक्षा उपाययोजनांची माहिती करुन घ्यावी, त्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी केल्या.

रस्त अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत त्यामुळे वाहनचालकाने स्वत: आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करावा. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट सक्ती करावी. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करावे, अशा सूचना न्यायमूर्ती श्री. सप्रे यांनी केल्या.

परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहितीचे सादरीकरण केले. विशेषत मुंबई-पुणे महामार्गावर ३० टक्क्यांने व समृद्धी महामहार्गावर ३३ टक्क्यांने अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महामंडळ, शाळा, महाविद्यालयात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात येईल. हेल्मेट न वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबधित विभागप्रमुखांना जारी करण्यात येतील अशी सांगून ते पुढे म्हणाले, राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांवर करण्यात येणाऱ्या वाहनांच्या तपासणीप्रमाणे जिल्हा तसेच शहरांतर्गत तपासणी करण्याची सूचना डॉ.पुलकुंडवार यांनी केली.

निवृत्त न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ‘अपघातमुक्त वारी’ अभियानाचे आयोजन तसेच परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबत समाधान व्यकत केले.

बैठकीस नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, गोंदियाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
0000

पंडित श्री वसंतराव गाडगीळ – एक चालते बोलते ज्ञानपीठ

आज दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी पंडीतजींचे देहावसान झाल्याचे कळले आणि पंडितजींच्या संपूर्ण जीवनकार्य समोरून तरळून गेले. अशा या चालत्याबोलत्या संस्कृतच्या विद्यापीठाला आमच्या कराड कुटुंबियांच्या आणि एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली वाहतो !

लेखक : प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड
अध्यक्ष, विश्व शांती केंद्र, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत

दुर्लभं भारते जन्म । महाराष्ट्रे सुदुर्लभम् ॥
या उक्तीनुसार भारतात जन्म मिळणे कठीण आणि महाराष्ट्रात जन्म मिळणे अतिशय दुर्लभ आहे. आपल्या भारताला सत्यनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा अशा महापुरुषांची आणि द्रष्ट्या सत्पुरूषांची जणू परंपराच लाभली आहे. परंतु, दुर्दैवाने, हिमालयाच्या उंचीची आदर्श माणसे दुर्मिळ होत गेली आणि ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पहावे, ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, अशा वंदनीय व्यक्ती अलीकडे अभावानेच आढळतात.
या सर्व पार्श्वभूमीवर स्व. पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या जीवनातील सामाजिक,  शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य समाजाला निश्चितपणे मार्गदर्शक ठरत असल्याचे मान्य करावे लागेल.  
मला प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते की, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या खालील उक्तीनुसार आपण सदैव चांगल्या व्यक्तीं वा घटनां यांच्यापासून शोध व बोध घेण आपल कर्तव्य आहे.
मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण॥
पंडित वसंतराव गाडगीळ यांना आपण कितीही अडीअडचणीच्या, त्रासाच्या वेळी भेटलात तरी त्यांच्या चेहर्‍यावर एक प्रकारच स्मितहास्य व दृढ निश्चयाचा भाव स्पष्टपणे दिसायचा. त्यांच्या सुदृढ व संपन्न व्यक्तिमत्त्वाचे ते एक द्योतक होते.
मऊ मेणाहूणी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रासी भेदूं ऐसे ॥
पंडित वसंतराव गाडगीळ म्हणजे खर्‍या अर्थाने वैष्णव व शैव पंथाचे समन्वयक होते. हरी हरामध्ये किंवा इतर सर्व जातीधर्मांच्यामध्ये त्यांना कधीच भेद दिसला नाही. ते खर्‍या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त व हाडाचे वारकरी होते.
पंडित वसंतराव गाडगीळांची आणि माझी पहिली भेट टिळक स्मारक मंदिरामध्ये झाली. जगात देव आहे की नाही अशा आणि धर्म, श्रध्दा, अंधश्रद्धा अशा विविध स्वरूपाच्या विषयांवर वादविवाद व चर्चा आयोजित करण्यात आली होती.  अशा स्वरूपाच्या चर्चेमध्ये ईश्वराचे अस्तित्व मानणारे व ईश्वराचे अस्तित्व अजिबात न मानणारे लोक हजर होते. त्यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ यांनी अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने ईश्वराचे अस्तित्व सिध्द करण्याविषयी जे विचार व्यक्त केले, ते मला अंत:र्मुख करणारे वाटले.  त्यावेळेपासून माझ्या मनामध्ये पंडित गाडगीळांच्या ज्ञानसाधनेविषयी एक प्रकारचा आदरभाव निर्माण झाला आणि नकळत आमचे ऋणानुबंध घनिष्ठ होत गेले.
पुढे हळुहळु गाडगीळांच्या ठायीच्या नि:स्पृहतेची अधूनमधून प्रचिती येवू लागली आणि त्यांच्या अंतर्यामी वास करीत असलेल्या सात्विक भावाची व निर्मळ मनाची ओळखही पटली. अतिशय विद्वान अशा पंडित गाडगीळांच्या व्यक्तिमत्त्वात, भारतीय संस्कृतीचे व सद्गुणांचे यथार्थ असे मूर्तिमंत दर्शन घडायचे, अशी माझी भावना आहे.  
आपल्या भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व वैचारिक असे परिवर्तन घडत आहे. त्यातून नवनवीन पुरोगामी विचार समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न चालू आहे. समाज विघातक अशा बुरसटलेल्या अनेक रूढी परंपरा लोप पावत आहेत, हे एक शुभलक्षणच आहे. तथापि दुर्दैवाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली मूलभूत अशा श्रद्धेलाच तडा जातो की काय? अशी भीती निर्माण होते आहे. अशावेळी गीतेतील खालील सिध्दांताची समाजाला जाणिव करून देणे मला गरजेचे वाटते.
पंडित वसंत गाडगीळ हे  आपले विचार व्यक्त करताना आपल्या भूमिकेशी अगदी ठाम असत. तसेच, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये मेळ घालत असतानाच, त्यांच्या प्रत्येक कृतीतून, ते प्रभावीपणे समन्वय साधत असल्याची प्रचिती यायची. यातच पंडित गाडगीळांचे वैशिष्टय होते.
अगदी लहानपणीच १२ – १३ वर्षाच्या वयातच वसतरावांनी कोल्हापूरहून त्यांच्या चुलत भावाकडे, त्यावेळच्या अखंड भारतातील कराचीला प्रयाण केले. त्यानंतरचा त्यांचा जीवनाचा प्रवास खर्‍या अर्थाने उद्बोधक ठरत गेला असे दिसते.
सोरटी सोमनाथच्या सोमेश्वराची प्राणप्रतिष्ठा भारताचे पहिले राष्ट्रपती कै. बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या शुभहस्ते १९५२ साली झाली. त्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या पुढाकाराने तरूण वयातील वसंतराव गाडगीळ यांना स्वयंसेवकाची भूमिका देण्यात आली होती. दुर्दैवाने त्यावेळचे टोपलीचे संडास साफ करणारे मेहतर समाजातील सेवक अचानकपणे संपावर गेलेले, संडास साफ करण्यासाठी इतर कोणी हाताखाली माणसे नसल्यामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी स्वत:च हातात खराटा घेवून त्यावेळची टोपलीच्या संडासांची साफसफाई सुरू केली. हे वसंत गाडगीळांनी पाहिले आणि त्याच क्षणी त्यांनी तर्कतीर्थांचं हे काम नाही असे सांगून, त्यांच्या हातातला खराटा व बादली घेवून संडास साफ करण्याचे काम स्वत:कडे घेतले. तर्कतीर्थांना वसंत गाडगीळांचे हे कोणताही संकोच वा लाज न बाळगता अगदी तरूण वयात, उत्स्फूर्तपणे त्यांनी स्वत: होऊन स्वीकारलेले संडास साफकरण्याचे काम पाहून, खूप मोठा अचंबा वाटला व मनातून या पोराचे कौतुकही वाटले.
त्या दिवसापासून तर्कतीर्थांनी वसंत गाडगीळांना ब्रम्हवृंदाला पाणी पुरविण्याचे पाणक्याचे काम सोडून गाभार्‍यातील पुजाअर्चेच्या वेळी पुजेचे साहित्य पुरविण्याची जबाबदारी सोपवली. गाडगीळांना त्यावेळी आपल्याला फार मोठी बढती वा प्रमोशन मिळाल्याचा आनंद झाला.  
प्राणप्रतिष्ठेच्या समाप्ती नंतर पौराहित्य करणार्‍या अनेक विद्वान ब्रम्हवृदांच्या बरोबरीनेच महावस्त्र व दक्षिणा प्रदान करुन तर्कतीर्थांनी स्वत: गाडगीळांना सन्मानित केले. गाडगीळांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा प्रसंग वसंत गाडगीळांच्या जीवनाला विधायक स्वरूपाची कलाटणी देणारा ठरला, त्यावेळेपासून वेदविद्या, धर्मशास्त्र व संस्कृत भाषेचा अभ्यास करण्याचा गाडगीळांनी सकल्प सोडला.
पुढे गाडगीळांच्या जीवनामध्ये कालानुरुप, बदलत्या परिस्थितीनुसार त्यांनी अंगीकारलेल्या कार्याचे दुसरे एक उदाहरण म्हणजे गाडगीळांनी हिंदुधर्मातून धर्मांतर केलेल्या अनेक व्यक्तींना पुन्हा हिंदुधर्मात सामील करून घेण्याचे फार मोठे सामाजिक कार्य  केले.  
पंडित वसंतराव गाडगीळांच्या या समाजाभिमुख आणि सुधारणावादी जीवनाचा वेध घेतल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांचे जीवन खर्‍याअर्थाने समर्पित वृत्तीच्या ब्राम्हण्याला साजेसे होतेे.  दुर्दैवाने सध्या मात्र नकळत  भारतीय संस्कृती व परंपरेचा र्‍हास होत असताना दिसतो. यात दोष कोणी कोणाला द्यायचा हे समजत नाही.  अभक्ष भक्षण आणि अपेय पान ही सध्याची संस्कृती बनत चालली आहे. अशा स्थितीत पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या सात्विक व समर्पित जीवनाची वाटचाल अर्थपूर्ण आहे, असे वाटते.
सध्या मात्र सर्व जगातल्या अनेक देशांनी संस्कृत भाषेचा सखोल अभ्यास करण्याचे कार्य सुरू केल्यानंतर आपल्या भारतीयांना संस्कृत भाषेचे महत्व पुन्हा पटू लागले आहेे. संगणक तज्ञ महाराष्ट्रभूषण डॉ. विजय भटकर यांनी सर्व जगाला ओरडून, या पुढे संस्कृत भाषा ही संगणकाच्यासाठी सर्वात योग्य भाषा ठरेल असे ठामपणे सांगण्यास सुरूवात केली हे आपले भाग्य आहे.
पंडित गाडगीळांचे, एरवी अत्यंत क्लिष्ट वाटणार्‍या संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, चिंतन, मनन व व्यासंग हे एक त्यांच्या जीवन साधनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. खर्‍या अर्थाने या भाषेला सुबोधता आणि गेयता प्राप्त करून देण्याचा पंडित वसंतराव गाडगीळांनी कसोशीने प्रयत्न केला. सर्वसामान्य श्रोत्यांना त्यांचं संस्कृतमधील भाषण ऐकणं ही एक पर्वणीच असायची. संस्कृत भाषा एवढी सोपी, सुबोध व रसाळ आहे याची तेंव्हा जाणिव व्हायची.
‘ज्ञानसाधना’ हेच ध्येय व ‘सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा’ असे मानून पंडित वसंतराव गाडगीळांनी अनेक अडीअडचणीतून सुध्दा आपल्या जीवनातील साधना चालू ठेवली आहेे. पंडितजींच तीन खोल्याच घर पाहिलं तर जणु कांही अनेक ग्रंथांच्या व पुस्तकांच्या गुहेमध्येच वसंतराव गाडगीळ राहतात असे आपल्याला दिसेल. या व्यक्तीने आयुष्यभर ग्रंथ संपदा प्राप्त करून, आपले स्वत:चे व समाजाचेही जीवन समृध्द केले आहे.
खर्‍या अर्थाने पंडित वसंतराव गाडगीळ हे मला एकविसाव्या शतकातील एक ऋषितुल्य असेच व्यक्तिमत्त्व वाटते.
माऊलींच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये राजबाग, लोणी काळभोर येथे ‘विश्वशांती गुरुकुल’ प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्या शुभप्रसंगी भूमिपूजनाच्या निमित्ताने पंडित वसंतराव गाडगीळ, ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, शतंजिवी योगमहर्षि थोर स्वातंत्र्य सेनानी श्री शेलारमाला यांचे मिळालेले आशीर्वाद आणि सदिच्छा मला फार मोलाच्या वाटतात.  विश्वशांती गुरूकुल संकल्पना रूजूवात करण्याच्या भूमिकेतून या गुरूकुलाचा प्रमुख आचार्य वा गुरू कसा असावा, कोण असावा, याचा जेंव्हा मी विचार करू लागलो तेंव्हा मला पंडित वसंतराव  गाडगीळ हेच या गुरूकुलाचे आचार्य शोभतील अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली व त्यानुसार मी पंडितजींना ही जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली, व ती त्यांनी मनापासून स्वीकारली, हे आमचं भाग्य. आमच्या जीवनात गुरूवर्य पूज्य साखरे महाराज, पंडित वसंतराव गाडगीळ, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ.विजय भटकर यांच्या झालेल्या भेटी हा आम्ही आमच्या पूर्वजन्माचा ऋणानुबंध मानतो.
ज्ञानाचे खरे उपासक असणारे पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या जीवनाचा प्रवास व वाटचाल बारकाईने अभ्यासल्यानंतर, पंडित वसंतराव गाडगीळ हे माझ्यामते खर्‍याअर्थाने चालते-बोलते ज्ञानपीठच आहेत अशी माझी भावना आहे.
भारतीय धर्म, संस्कृती आणि परंपरा हाच ज्यांचा श्वास आहे आणि संस्कृत हेच ज्यांनी आपले जीवन मानले आहे, अशा पंडित वसंतराव गाडगीळ यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा अमृत महोत्सवी सोहळा आमच्या संस्थेच्या वतीने २००५ साली संपन्न झाली आणि त्यावर कळस म्हणजे २०१२ मध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे आत्ताचे पंतप्रधान मा. श्री. नरेद्र मोदीजी यांनी पंडीजींच्या कार्याचा गौरव केला.

२१ ऑक्टोबर: पोलीस स्मृतिदिन का देशभर पाळला जातो? समजून घ्या ….

दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन देशभर पाळला जातो. या दिवशी संपुर्ण वर्षात आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते. हा दिवस पोलीस दलाला अभिमानाचा, शौर्याला मानवंदना देण्याचा, त्याचबरोबर आपल्या जुन्या सहका-यांच्या स्मृतीने मन हेलावणाराही असतो. २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन पाळला जाण्यास १९५९ मध्ये लडाख भागातील सरहद्दीवर झालेली घटना कारणीभुत ठरली. भारत चीन सरहद्दीवर लडाख भागात १८ हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज नावाचे ठिकाण आहे. २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉट स्प्रिंग्ज येथे गस्त चालु होती. गस्ती तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी कुच करत हॉट स्प्रिंगच्या पुर्वेला ०६ मैल दुर ती आली असताना पर्वताच्या डाव्या बाजुला तुकडीच्या नेत्याला काही संशयास्पद खुणा दिसल्या. तुकडी त्या खुणांच्या अनुरोधाने पुढे चालु लागली आणि अचानक भयानक गोळीबार सुरू झाला. त्याठिकाणी पोलीस वीरांनी शौर्याने तोंड दिले. ही विशेष लढाई लढता लढता यापैकी १० गस्ती शिपायांना वीरमरण आले व ९ जण जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती सापडले. हे १० अमर शिपाई होते पुरणसिंग, धरमसिंग, इंगजित सुबा, नोरबु लामा, शिवनाथ प्रसाद, त्शेरिंग नोरबु, इमामसिंग, सवनरािग, बेगराज आणि माखनलाल असे होते. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही अचानक चिनी सैन्यांनी हल्ला केला होता. या लढाईत कामी आलेल्या या शुर पोलीस जवानांपैकी पश्चिम बंगालचे ३, हरियाणा-२, पंजाब २, उत्तर प्रदेश-२, हिमाचल प्रदेश-१ असे होते. ही बातमी वा-यासारखी सा-या देशभर पसरली. १३ नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. १४ नोव्हेंबरला सकाळी ०८/०० वा. हॉट स्प्रिंग्ज येथे त्यांच्या वर सन्मानपुर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर पाटणा येथे १९५९ साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धाच्या वेळी सर्वांनी अशी शपथ घेतली. ‘आमच्या हया वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी २१ ऑक्टोंबरला पोलीस हुतात्मा दिन पाळुन करू’ आणि तेव्हापासुन दरवर्षी हा दिन भारत वर्षांत मोठ्या सन्मानाने ‘पोलीस हुतात्मा दिन’ म्हणुन पाळण्यात येतो. राज्या-राज्यातुन पोलीस दले या हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजीत करून त्यांना मानवंदना देतात.

दि.१ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकुण २१४ जवान यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले. त्यामध्ये महाराष्ट्रातील १. पोलीस उप निरीक्षक प्रकाश नाना शिंदे २. पोलीस कॉन्सटेबल राहूल गोपिचंद पवार ३. पोलीस कॉन्सटेबल वैभव सुनिल वाघ अशा एकुण ०३ पोलीस जवानांचा समावेश आहे.

माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०८/०० वा. हुतात्म्यांना पोलीस संशोधन केंद्र, पाषाण रोड, पुणे येथे श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्त,अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी हे हजर राहणार आहेत.

रस्तोरस्तीच्या 21 मिसिंग लिंक व्यवस्थित करा, कोथरूड मधला मोठा प्रश्न मार्गी लागेल… केसकर

पुणे-रस्ते जोडणी तील रस्तोरस्तीच्या २१ मिसिंग लिंक साठी सत्वर कार्यवाही करा म्हणजे कोथरूड मधला वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल अशी मागणी करत महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना थेट चर्चेसाठी माजी विरोधीपक्ष नेते उज्वल केसकर यांनी आव्हान दिले आहे. ५. ५ किमी ची जागा ताब्यात घेऊन जलदगतीने कार्यवाही करण्याऐवजी याकडे सरार्स दुर्लक्ष करून खोळंबा करून ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे कि,’

खालील 21 मिसिंग लिंक ची यादी देतोय ती जर व्यवस्थित झाली तर कोथरूड मधला मोठा प्रश्न मार्गी लागेल.
१) महात्मा सोसायटी गल्ली नंबर आठ ते नाल्या वरचा छोटा पूल पंधरा मीटर रुंदीचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी दहा मीटर एवढा कमी अंतर जोडलं तर एक मोठा रस्ता व्यवस्थित वापरता येतो.
२) पौड रोडवरील कर्वे रस्त्याला मिळणाऱ्या चितळे बंधू दुकानापाशी 20 मीटर लांबीची पट्टी केली तर हा रस्ता नीट वापरता येतो.
आयडियल कॉलनी च्या रस्त्यावर एक टॉयलेट आहे त्यामुळे तो रस्ता नीट होतच नाहीत कर्वे पुतळा पेट्रोल पंप ते आयडियल कॉलनी 30 मीटर गुजरात कॉलनी गोल्डन बेकरी ते वनस फॅक्टरी 48 मीटर आंबेडकर चौक वाया तिरुपती नगर 200 मीटर किनारा हॉटेल ते पेटकर साम्राज्य रोड 54 मीटर आयडियल कॉलनी ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 54 मीटर वनाज मेट्रो यार्ड ते गुरुकृपा सोसायटी 68 मीटर कर्वे रोड कॅनॉल चा रस्ता कमिन्स फॅक्टरी पर्यंत 90 मीटर दुधाने लॉन्स ते राजाराम पुल 180 मीटर एकलव्य कॉलेज ते हायवे 70 मीटर आंबेडकर आंबेडकर चौक कमिन्स फॅक्टरी ते बॅरोमीटर 152 मीटर भुजबळ बाग ते गुलमोहर रोड १५० मीटर कोकण एक्सप्रेस ते पिना गार्डन 180 मीटर नवीन शिवणे गोसावी वस्ती रोड तीनशे मीटर नऊशे मारुती ते कर्वेनगर 150 ठाकरे पद ते आंबेडकर चौक मिलेनियम हायस्कूल 1700 मीटर बालभारती पौड1800 मीटर .

या संदर्भामध्ये आपण चर्चेसाठी वेळ द्यावा ही विनंती.

राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयीन तत्परतेने १२० विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा!

पुणे – पुण्यातील विद्यार्थ्यांचा ग्रूप दिल्ली व जालंधरच्या सहलीसाठी आला होता. ते सर्वजण पुण्यात विमानाने येणार होते. जालंधर ते दिल्ली हा प्रवास ज्या बसने करत होते त्या बसेस दिल्लीच्या वाहतूक कोंडीत सापडल्याने विमान चुकणार होते. त्यामुळे त्यांनी तातडीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ य़ांच्या पुण्यातील कार्यालयाशी संपर्क साधून अडचण सांगितली. मोहोळ यांच्या कार्यालयाने तत्परतेने सूत्र फिरवून त्या मुलांना त्याच दिवशी रात्री विमानाने पुण्यात आणले

पुणेकर्स एज्युकेशन इनिशिएटिव्हच्यावतीने त्या पुण्यातील नामवंत शाळेतील १२० मुले आणि त्यांसोबत इतर २० जण असे १४० जण दिल्ली, जालंधरला शैक्षणिक सहलीसाठी गेले होते. त्यांची आमची परतीची तिकीटे बुधवार (दि १७) रात्री ८:२० च्या विमानाची होती. विमानतळावर दोन तास अगोदर पोचण्यासाठी त्यांनी दिल्लीला येण्यासाठी बसने सकाळी साडेसातवाजता जालंधर सोडले. वाटेत अर्ध्यातासाचा लंचब्रेकही सर्वांनी घेतला. त्यांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास निर्विघ्न झाला. खरी परिक्षा तिथूनच सुरू झाली.
दिल्लीच्या विमानतळापासून साधारणत २५ किमीवर त्यांच्या बसेस वाहतूक कोंडीत सापडल्या. आमच्या बसेसना उशिर होत होता. मुलांना रात्री विमानात फूड पॅकेटसची व्यवस्था विमानतळावर केली होती. ते सर्वजण संपर्क करत होते अन ट्रॅफिक जॅमची अपडेट देत होते. विमानतळापर्यंत अशीच परिस्थिती असेल तर आम्हाला आमचे विमान गाठता येणे अशक्य वाटत होते.

पुण्याचे खासदर मुरलीधर मोहोळ, नागरी उड्डाण राज्यमंत्री असल्याचे पुणेकर्स एज्युकेशन इनिशिएटिव्हच्या लीना म्हसवडे यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता मोहोळ यांच्या पुण्याच्या कार्यालयात फोन करून त्यांच्या पीएना आमची अडचण सांगितली. त्यांनी दिल्लीच्या कार्यालयातील एकाचा नंबर दिला. त्यांना मी फोन लावला. त्यांनी आणखी एक नंबर दिला. त्यांनाही फोन लावून आमची अडचण सांगितली.
त्यानतर चक्र फिरली अन अवघ्या दहाच मिनिटात त्यांना इंडिगो एअरलाइन्समधून फोन आला. एअरलाइन्सने आमची महिती घेतली आणि बसेसचे नेमके लोकेशनही घेतले. त्या वाहतूक कोंडीतून पुढे सरकत अखेर आम्ही विमानतळावर पोचलो. कंपनीने काही जणांची सोय सव्वानऊच्या विमानात आणि इतरांची साडेअकराच्या विमानात व्यवस्था केली होती. इंडिगोच्या कर्मचार-यांनी मुलांची सुरक्षा तपासणीसाठी मदत केली. त्यांचे फूड पॅकेटस आत नेऊ मुलांना देण्याचीही परवानगी दिली. राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयाने दाखवलेल्या तत्परतेने ही सहल नियोजनानुसार उशिरा का होईना पण बुधवारी रात्रीच पुण्यात पोचली.
“आपण मंत्री आणि राजकारण्यांना नेहमी नावे ठेवतो, पण या प्रसंगाने माझा मोहोळसाहेब आणि एकंदर सिस्टीम वरचा विश्वास कितीतरी पटीने वाढला. आपण मतदार म्हणून योग्य कार्यक्षम खासदार निवडून दिल्याबद्दल खूप समाधान वाटले”, असे लीना म्हसवडे यांनी सांगितले.

ढोल-लेझीम वादनातून युवकांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचे काम : भारत सासणे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे समर्थ प्रतिष्ठानचे संजय सातपुते यांचा जिद्द पुरस्काराने गौरव

पुणे : समाजातील आजची विदारक, उन्मादक परिस्थिती बघता युवा वर्गातील ऊर्जेचा उपयोग समर्थ प्रतिष्ठान संचलित ढोल लेझीम पथकाच्या माध्यमातून युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण आणि समाजासाठी उपयुक्त काम केले जात आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध कथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी काढले.

रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे दरवर्षी कर्तृत्ववान व्यक्तीस दिल्या जाणाऱ्या जिद्द पुरस्काराने आज (दि. 18) संजय सातपुते यांचा सासणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी सासणे बोलत होते. सातपुते यांनी समर्थ प्रतिष्ठान संचलित ढोल लेझिम पथकाच्या माध्यमातून एक कोटी 25 लाख रुपये समाजऋण फेडण्यासाठी विविध घटकांना प्रदान केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सातपुते यांना सन्मानित करण्यात आले. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होत्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सातपुते यांच्या कार्याची माहिती घेतल्यानंतर जिद्द पुरस्कार योग्य व्यक्तीला प्रदान करण्यात आला आहे, असे नमूद करून सासणे पुढे म्हणाले, ढोल-ताशा वादनातून वीर रसाची अनुभूती प्राप्त होते. ज्या वयात युवकांमधील ऊर्जा बहरत असते त्या वेळी युवकांमधील ऊर्जेला योग्य मार्ग दाखविला जाणे किती आवश्यक आहे, हे समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून सिद्ध झाले आहे. आजच्या काळात प्रत्येकालाच अस्तित्वासाठी लढावे लागत आहे, समाजकार्यासाठीची लढाई अधिक तीव्रतेने लढावी लागणार आहे, असेही त्यांनी सूचित केले.

सत्काराला उत्तर देताना संजय सातपुते म्हणाले, पुरस्कार हे समाजकार्यासाठी बळ देणारे असतात. रंगत-संगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला पुरस्कार पुढील वाटचालीस नक्कीच बळ देणारा ठरेल. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून प्रतिष्ठानमधील प्रत्येकाचा आहे. ढोल-ताशा-लेझीम पथकाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. या पथकांच्या माध्यमातून जी कार्ये होत आहेत ते बघितल्यास समाजऋण फेडणारी पथके असा विधायक दृष्टीकोन असायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद करून मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, वैजयंती आपटे, केतकी देशपांडे, सुजित कदम, नचिकेत जोशी, समीर गायकवाड, योगेश काळे, भारती पांडे यांचा सहभाग होता.

नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या विरोधात तळोजा मध्यवर्ती कारागृहात ७ भीमा कोरेगाव बंद्यांचे उपोषण सुरू

मुंबई दिनांक : १८ ऑक्टोबर, २०२४
भीमा कोरेगाव बंद्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या विरोधात तळोजा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सात्यत्याने या सर्व न्यायाधीन बंद्यांना न्यायालयीन तारखांना न्यायालयात आणणे बंद केले आहे. प्रत्येक वेळी सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्याच्या उथळ सबबी दिल्या जात आहेत. दिनांक ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी भीमा कोरेगाव बंद्यांना अशाच पद्धतीने न्यायालयीन तारखेच्या दिवशी न्यायालयात हजर केले गेले नाही. त्यावेळी भीमा कोरेगाव बंद्यांपैकी ॲड. सुरेंद्र गडलिंग जे स्वतः प्रत्यक्ष स्वतःची केस लढत आहेत, त्यांनी जेलमधून व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले होते. त्यांच्या या म्हणण्याला सविस्तर ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन. आय. ए. कोर्ट no. 25 यांनी तळोजा मध्यवर्ती कारागृहाला स्पष्ट निर्देश दिले की सर्व बंद्यांना पुढच्या न्यायालयीन तारखेला म्हणजे १८ ऑक्टोबर २०२४ रोजी न चुकता न्यायालयात हजर केले जावे. परंतु न्यायालयाचे इतके स्पष्ट निर्देष असताना देखील नवी मुंबई पोलीस आयुक्त हे निर्देश सपशेल धुडकावत आहेत. याच संदर्भात ऍड. सुरेंद्र गडलिंग व सागर गोरखे ही बाब विशेष एन. आय. ए. न्यायालयासमोर मांडून संबंधित अर्ज दाखल करणार होते. तसेच मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन येणार होते. परंतु आजही न्यायालयाची नियमित तारीख असताना सात जणांपैकी एकालाही न्यायालयात आणले गेले नाही. विशेषतः कारागृहातील बंद्यांना न्यायालयात व हॉस्पिटलमध्ये ने आण करण्यासाठी पुरेसे पोलीस संख्याबळ उपलब्ध असताना व ते संख्याबळ केवळ याच कारणासाठी वापरण्याचे व इतर कोणत्याही कामासाठी न वापरण्याचे जी आर उपलब्ध असताना नवी मुंबई पोलीस आयुक्त हे संख्याबळ नेमके इतर कामांसाठी परस्पर वापरत आहेत. अशा पद्धतीने या बंद्यांना सात्यत्याने जाणीवपूर्वक न्यायालयीन तारखांना हजर न करणे हे या बंद्यांच्या संविधानिक अधिकारांचं हनन आहे. आणि म्हणून तळोजा मध्यवर्ती कारागृहात ऍड. सुरेंद्र गडलिंग, सागर गोरखे, सुधीर ढवळे, रमेश गायचोर, हॅनी बाबू, रोना विल्सन, महेश राऊत हे भीमा कोरेगाव खटल्यातील सात न्यायाधीन बंदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या असंविधानिक व मनमानी कारभाराविरोधात आज उपोषणाची सुरुवात केली आहे. यातील काही जण सहा वर्षांपासून तर काही जण चार वर्षांपासून कारागृहात बंदिस्त आहेत. अजूनही खटला सुरू झालेला नाहीये.

नमुना मतपत्रिका छपाई करण्याबाबत निर्बंधात्मक आदेश जारी

पुणे, दि. १८: राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकांनी तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापण्याबाबत निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे संबंधित हे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील.

शासकीय कार्यालये, विश्रामगृहांच्या परिसरात राजकीय सभा, मिरवणुकांना प्रतिबंध

विधानसभा निवडणूक प्रक्रिया कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये मिरवणूक, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध जारी केले आहेत.

विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका दंडाधिकारी कार्यालय, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने वरील कृत्य करण्यास बंदी घातली आहे.

हा आदेश दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदी व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ प्रमाणे संबधित दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपकाचा वापर नियंत्रित करण्याचे आदेश जारी

विधानसभा निवडणूक प्रक्रिया कालावधीत निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर नियंत्रित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच प्रचाराकरीता ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, वाहन फिरत असताना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध असेल.

सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पुणे जिल्ह्यासाठी अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांचा ताफा, दालनातील उपस्थितांची संख्या नियंत्रित; मिरवणूक, सभा, घोषणांना प्रतिबंध

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येताना आणावयाची वाहने, दालनात उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची संख्या नियं‍त्रित करण्याबरोबरच मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार उमेदवारांना जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात येताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील, या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

सदरचा आदेश दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यास निर्बंध

पुणे, दि. १८: जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतकांना निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही; तसेच तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील.

सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरत्या स्वरुपात पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरत्या स्वरुपात पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हे आदेश अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता-२०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील.