रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे समर्थ प्रतिष्ठानचे संजय सातपुते यांचा जिद्द पुरस्काराने गौरव
पुणे : समाजातील आजची विदारक, उन्मादक परिस्थिती बघता युवा वर्गातील ऊर्जेचा उपयोग समर्थ प्रतिष्ठान संचलित ढोल लेझीम पथकाच्या माध्यमातून युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण आणि समाजासाठी उपयुक्त काम केले जात आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध कथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी काढले.
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे दरवर्षी कर्तृत्ववान व्यक्तीस दिल्या जाणाऱ्या जिद्द पुरस्काराने आज (दि. 18) संजय सातपुते यांचा सासणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी सासणे बोलत होते. सातपुते यांनी समर्थ प्रतिष्ठान संचलित ढोल लेझिम पथकाच्या माध्यमातून एक कोटी 25 लाख रुपये समाजऋण फेडण्यासाठी विविध घटकांना प्रदान केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सातपुते यांना सन्मानित करण्यात आले. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होत्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सातपुते यांच्या कार्याची माहिती घेतल्यानंतर जिद्द पुरस्कार योग्य व्यक्तीला प्रदान करण्यात आला आहे, असे नमूद करून सासणे पुढे म्हणाले, ढोल-ताशा वादनातून वीर रसाची अनुभूती प्राप्त होते. ज्या वयात युवकांमधील ऊर्जा बहरत असते त्या वेळी युवकांमधील ऊर्जेला योग्य मार्ग दाखविला जाणे किती आवश्यक आहे, हे समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून सिद्ध झाले आहे. आजच्या काळात प्रत्येकालाच अस्तित्वासाठी लढावे लागत आहे, समाजकार्यासाठीची लढाई अधिक तीव्रतेने लढावी लागणार आहे, असेही त्यांनी सूचित केले.
सत्काराला उत्तर देताना संजय सातपुते म्हणाले, पुरस्कार हे समाजकार्यासाठी बळ देणारे असतात. रंगत-संगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला पुरस्कार पुढील वाटचालीस नक्कीच बळ देणारा ठरेल. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून प्रतिष्ठानमधील प्रत्येकाचा आहे. ढोल-ताशा-लेझीम पथकाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. या पथकांच्या माध्यमातून जी कार्ये होत आहेत ते बघितल्यास समाजऋण फेडणारी पथके असा विधायक दृष्टीकोन असायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद करून मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, वैजयंती आपटे, केतकी देशपांडे, सुजित कदम, नचिकेत जोशी, समीर गायकवाड, योगेश काळे, भारती पांडे यांचा सहभाग होता.