Home Blog Page 637

पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे चौथे पर्व ४ मार्चपासून !

पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या २४ संघांचा समावेश !

पुणे, 3 मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथे पर्व ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ४ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होणार असून स्पर्धेत विविध मंडळांचे २४ संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, सार्वजनिक गणपती, नवरात्र मंडळे तसेच ढोल-ताशा पथकांचा समावेश असलेली ही नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेचे हे सलग चौथे पर्व आहे. गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांचे २४ निमंत्रित संघ एकत्रितपणे या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतात आणि हेच या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या वर्षी स्पर्धेमध्ये आठ नवीन संघांना खेळण्याची संधी देण्यात आली असून स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी अधिक चुरस दिसणार आहे.

पुण्यातील गणपती मंडळातील कसबा गणपती मडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरूजी तालिम मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, गरूड गणपती मंडळ या मानाच्या गणपती मंडळांसह श्री साई मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदिर, युवा वाद्य पथक, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक या नवरात्री आणि वादक पथकांच्या क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे.

या स्पर्धेचे सामने सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर होणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या स्पर्धेत २४ संघांपैकी अव्वल ८ संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत.

रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, मंडई मास्टर्स, साई पॉवर हिटर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, कसबा सुपरकिंग्ज्, गरूड स्ट्रायकर्स, तुळशीबाग टस्कर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, शिवमुद्रा ब्लास्टर्स, नादब्रम्ह ड्रमर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, युवा योद्धाज्, सुर्योदय राईझर्स, जनादर्न जायंट्स, नुमवी स्टॅलियन्स्, भगतसिंग लिजंड्स, विश्रामबाग नाईट्स, समर्थ चॅलेंजर्स, एच.टी.एम. टायगर्स, गजर सुपरनोव्हाज्, रमणबाग फायटर्स असे २४ निमंत्रित संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

विजेत्या संघाला २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला ५१ हजार रूपये आणि इलेक्ट्रिक बाईक देण्यात येणार आहे. ‘फेअर प्ले’ पुरस्कार जिंकणार्‍या संघाला २५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार्‍या खेळाडूला रोख पाच हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

गतवर्षी (२०२४) साई पॉवर हिटर्स संघाने विजेतेपद तर, शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाने उपविजेतेपद पटकावले होते.

लोहगाव टँकरमुक्त करण्याच्या वचनपूर्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; आमदार पठारे यांचे मोठे योगदान

लोहगाव, पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या वचनाला अनुसरून, लोहगावमधील पाणीपुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वचनपूर्ती बैठक रविवारी (ता. ३) प्राईड एशियाना सोसायटी येथे पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरिक, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते

गेली अनेक वर्षे लोहगाव भागात पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न नागरिकांची डोकेदुखी ठरला आहे. महानगरपालिकेत समावेश होऊनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यावर आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सातत्याने या भागाची पाहणी व पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

या वचनपूर्ती बैठकीत नागरिकांनी रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, कर संकलन, पोलीस सुरक्षा, अवैध व्यवसाय आदी समस्याही पठारे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर तात्काळ कार्यवाही करत आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच, लोहगावमध्ये सहा ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राजेंद्र खांदवे म्हणाले, “लोहगावचा सात वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश झाला, मात्र अजूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. नागरिकांना पाण्यासाठी व इतर मूलभूत सुविधांसाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आजपर्यंत नागरिकांनी पाण्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत हे मोठे दुर्दैव आहे. परंतु बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्यामुळे एक एक करून विविध समस्या मार्गी लागत आहेत.”

लोहगावातील पाणीपुरवठा समस्येवर बोलताना कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी “न्याती, उत्तरेश्वर-निंबाळकर रस्ता, बी यु भंडारी टाकी ते प्राईड एशियाना आणि प्राईड एशियाना ते स्पार्क स्प्रिंग या चार झोनमध्ये रोज पाणीपुरवठा करू”, असे सांगितले. यावर पठारे यांनी ज्या सोसायटींना पाण्यासाठी महापालिकडे अर्ज करा, जेणेकरून लवकरात लवकर पाण्याच्या लाईन जोडून देता येतील, असे सुचवले.

तसेच, खराडी बायपास श्री पार्क पासून ते महालक्ष्मी लॉन्स दरम्यान २५० व्यासाची व ११०० मीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच, ५००० लीटर प्राथमिक पाण्याच्या टाकीचे उद्घाटन व लोहगाव-संतनगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारील रस्ता तसेच प्राईड एशियाना सोसायटी जवळील रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी प्राईड एशियाना सोसायटीचे चेअरमन गिरीश जयवाल यांच्या हस्ते आमदार पठारे यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी आमदारांच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करत लोहगावच्या विकासासाठी अशाच सातत्यपूर्ण कार्याची अपेक्षा व्यक्त केली.

वचनपूर्ती बैठक व इतर प्रसंगी कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, शाखा अभियंता सुधीर आलोरकर, राजेंद्र खांदवे, सुनील खांदवे, प्रीतम खांदवे, अन्वर मुल्ला, नितीन जाधव, शिंदे, तसेच सोसायटी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
प्रचारादरम्यान लोहगावकरांना दिलेल्या प्रत्येक वचनांची पूर्ती करण्यासाठी मी विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे, यात नागरिकांसोबत अधिकारी वर्गाचेही चांगले सहकार्य लाभत आहे. लोहगाव भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्नाला प्राधान्य देऊन टॅंकमुक्त लोहगाव हे उदिष्ट साध्य होताना दिसेलच सोबत इतरही प्रश्न मार्गी लावून लोहगावचा सर्वांगीण विकास साकार करण्याचा संकल्प पूर्ण करणार आहे.

  • बापूसाहेब पठारे (विद्यमान आमदार, वडगावशेरी मतदारसंघ)

बहुजनांवरील अन्यायाविरोधात सर्वसामान्यांना जागरूक करा- मायावती

बसपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न
दिनांक २ मार्च २०२५, पुणे:-उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, शोषित, वंचित, उपेक्षितांचा बुलंद आवाज, मायावती जी यांच्या अध्यक्षतेखाली बहूजन समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक २ मार्च २०२५ रोजी लखनऊ येथे संपन्न झाली. देशभरातील प्रमुख राष्ट्रीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य बैठकीला हजर होते. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव मुकुंददादा सोनवने, प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी, प्रदेश कार्यकारणी सदस्य रामचंद्र जाधव बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीतून मायावती यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करत सर्व प्रदेश कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा घेतला. बैठकीत पक्ष नेते आकाश आनंद यांना पक्षाच्या सर्व पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय मायावती यांनी जाहिर केले.कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय समन्वयक म्हणून आनंद कुमार साहेब आणि माजी खासदार इंजिनियर रामजी गौतम यांची निवड करण्यात आल्याची माहिती डॉ.चलवादी यांनी रविवारी (ता.२) दिली.

उपस्थितांना संबोधित करताना मायावती जी म्हणाल्या की, “अन्नदात्यांच्या शेतमालाला हमीभाव  मिळत नाही, शिक्षण-आरोग्य सेवा, अन्नधान्यावर सरकारने वस्तू आणि सेवा कर लादून सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जनसामान्यांमध्ये जावून प्रस्थापिक सत्ताधारी पक्ष बहुजनांवर अन्याय करतोय, कशाप्रकारे त्यांचे शोषण केले जात आहे, यासंबंधी जागरूक करा’. केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेले दावे फोल ठरत आहेत. कोट्यवधी गरीब, दलित, बेरोजगार, आदिवासी, मागासवर्गीय वर्ग तसेच मजूरांच्या स्थितीत कुठलीही सुधारणा झाली नसल्याची खंत बहजनींनी व्यक्त केली.विकासापासून वंचित असलेल्यांसाठी कार्य करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी पक्षनिष्ठेने काम करीत बहूजन आंदोलन आणखी बळकट करण्याचे आवाहन यानिमित्ताने मायावतींनी केले, असे डॉ.चलवादी म्हणाले. सुश्री बहनजी जिवंत असेपर्यंत पक्षाचा कुणीही उत्तराधिकारी राहणार नाही, यासंदर्भातही बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मान्यवर कांशीराम साहेबांना अपेक्षित चळवळ उभारण्याच्या दिशेने झोकून देत कार्य करण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आल्याचे डॉ.चलवादी यांनी सांगितले. महाराष्ट्र बहुजन समाज पार्टीच्या वतीने नवनियुक्त राष्ट्रीय समन्वयक आनंद कुमार साहेब आणि माजी खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेबांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– आर्थिक शिस्त पाळतानाच कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही

– छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांवर कारवाई होणारच

– राज्यात यंदा सर्वाधिक सोयाबीन खरेदी

– १०० दिवस उपक्रमाचे त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन करणार

– अधिवेशनात संविधान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यावर विशेष चर्चा होणार

मुंबई, दि. २ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगले व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नव्या सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असून हे अधिवेशन चार आठवड्याचे असणार आहे. या अधिवेशनात दोन विषयांवर महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत. 8 मार्चला महिला दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्ताने विशेष चर्चा होणार आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन दिवस संविधानावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात पाच विधेयकांवर चर्चा होईल. विधिमंडळात सर्व विषयांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या नवीन सदस्यांना चर्चेत सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आरोग्य विभागाच्या एका फाईलवर स्थिगिती दिल्याच्या बातमीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारची कोणतीही फाईल माझ्याकडे आली नाही व मी स्थगिती दिलेली नाही. आरोग्य विभागाच्या संबंधित विषयात केंद्र शासनाला सुचविलेल्या कामातील 9 टक्के निधी हा भांडवली खर्चावर खर्च करणार होते. मात्र, केंद्र शासनाने भांडवली खर्चावर 5 टक्के निधी खर्च करण्याची सूचना केली. त्यानुसार, प्राधान्यक्रम ठरवून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, सचिवांनी प्राधान्य ठरविण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे ही फाईल माझ्याकडे आली नाही. तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भातही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर कमी आहेत. इतर राज्यात या नंबर प्लेटची किंमत ही जीएसटी व ती प्लेट बसविण्याचा खर्च वगळून आहे तर महाराष्ट्रातील दर हे जीएसटी व प्लेट बसविण्याच्या खर्चासह आहे. गेल्या पंधरा वर्षातील सोयाबीनच्या सर्वाधिक खरेदीपेक्षा दहापट खरेदी यंदाच्या वर्षी सोयाबीनची झाली आहे. खरेदी केलेले सोयाबीन ठेवण्यास गोदामातही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे माध्यमांनी एखादी बातमी प्रसिद्ध करताना शासनाचीही बाजू मांडल्यास त्यातून होणारे गैरसमज पसरणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचे बोलले तर खपवून घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणारच असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असून त्यांच्याबद्दल आम्हाला पुरेपूर माहिती आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आम्ही काम करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने राबविलेल्या 100 दिवसांच्या कामास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात मी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून आढावा घेतला. अनेक विभागांनी चांगली कामे केली आहेत. अनेक कार्यालये स्वच्छ झाली असून रेकॉर्ड रुम तयार झाले आहेत.  दूरदृश्य प्रणालीद्वारे नुकत्याच घेतलेल्या बैठकीस राज्यातील सुमारे ७ हजार अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमाचे केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यातून उत्तम काम करणाऱ्यांना निवडण्यात येणार आहे. तसेच नेमून दिलेल्या कामांसाठी बेंचमार्क ठरविण्यात येणार असून त्या खाली कामगिरी असणाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सर्वसामान्यांसाठी व राज्य पुढे नेण्यासाठी काम करत आहोत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासन हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. विकास कामांबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी व राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. राज्याच्या विकासाची वाटचाल दुप्पट तर वेग चौपट होईल. याचे प्रतिबिंब येणाऱ्या अर्थसंकल्पात दिसेल. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहभाग घेऊन नागरिकांची, मतदारसंघाची प्रश्ने मांडावीत. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, या दृष्टीने कामकाज करण्यात येणार आहे. या अधिवेशनात राज्यपाल महोदयांचे अभिभाषण तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. तसेच दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी राज्य शासनाची आहे.

चहापान कार्यक्रम संपन्न

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्री, राज्यमंत्री तसेच आमदार उपस्थित होते.

मोदी,संघ राजवटीत देशाचे भवितव्य धोक्यात :डॉ.बाबा आढाव 

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित आगामी गांधी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाने तयार केलेल्या  विशेषांकाचे प्रकाशन रविवार,दि.२ मार्च २०२५ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव,राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर यांच्याहस्ते झाले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि 

‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.हा कार्यक्रम गांधी भवन,कोथरुड येथे दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.गांधी विचार साहित्य संमेलन विशेषांकाचे गांधी भवन येथे दि.७ ते ९ मार्च २०२५ रोजी होणार असून त्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या या  विशेषांकात गांधीजींच्या जीवन आणि संदेशाविषयी लेखन समाविष्ट करण्यात आले आहे.यावेळी लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, राजा कांदळकर आणि एड.राजेश तोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी आभार मानले. 

डॉ.बाबा आढाव म्हणाले,’सध्या लोकशाही प्रचंड प्रमाणात धोक्यात आली असून आता जर सामान्य जनता जागी होऊन संविधान रक्षण केले नाही ,तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.आजच्या मोदी आणि आर एस एस च्या विचाराने चाललेल्या देशात भारताची लोकशाहीच नव्हे तर देशाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी संविधान रक्षण करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा एवढेच कळकळीने सांगण्यासाठी मी या वयातही आवर्जून आलो. लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणली आहे आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत, त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत’, असेही बाबा आढाव म्हणाले.

‘महात्मा गांधी यांचे विचारच आजच्या देशातील परिस्थितीवर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतील,याचसाठी गांधी विचारांचा यज्ञ म्हणून हे तीन दिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे’,अशी माहिती कुमार सप्तर्षी यांनी यावेळी दिली.तरुणांनी या तीन दिवसीय साहित्य संमेलनाकडे खुल्या मनाने यावे,यासाठीची पूर्वतयारी म्हणून हा गांधी विचारांचा मागोवा घेणारा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. 

‘डॉ.कुमार सप्तर्षी यांचे विचार आणि कार्य पथदर्शक असून डॉ.सप्तर्षींमुळेच मी सामाजिक,राजकीय चळवळीत आलो,असे राजा कांदळकर यांनी सांगितले.आजच्या देशातील परिस्थितीवर मात करायची असेल तर साने गुरूजींचे विचार आठवावे लागतील .’देशातील जाती धर्मातील बंधुभाव जोवर जिवंत राहील तोवरच लोकशाही टिकेल’,असे साने गुरुजी म्हणाले होते. म्हणूनच देशातील बंधुभाव पूर्णतः नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. ते हाणून पाडण्यासाठी आपल्याला बंधुभाव एकात्मता आणि समता कायम ठेवावी लागेल’, असे मत कांदळकर यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्राची लावणी अभिजात, आता मात्र चिंता वाटते.

मिरजच्या “लावणी महोत्सवात” मान्यवरांचे मत..!

महाराष्ट्राची लावणी अभिजात असून तिला उत्तर पेशवाई काळापासून थोर वारसा लाभलेला आहे. मात्र अलीकडच्या काळात लावणी जिथे वाढली, मोठी झाली, शाता समुद्रा पलीकडे गेली, त्या लावणीला संगीतबारी कला केंद्रावर डीजेच्या धिंगाण्याचा सामना करावा लागत असून ही दुर्दैवी गोष्ट आहे. अशी चिंता मिरज (सांगली ) येथे तीन दिवस सुरू झालेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केली.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित केला जातो आणि त्यात पारंपरिक लावणीचे दर्शन घडविणाऱ्या किमान नऊ कला पथकांना कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाते यावर्षी चौफुला,मोडनिंब, वेळे कला केंद्रातील कला पथकांनी आपली कला सादर केली. या लावणी महोत्सवाचे उद्घाटन सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.

. त्यापूर्वी “पारंपरिक लावणीचे बदलते स्वरूप” या विषयावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या परिसंवादाचे अध्यक्ष पद लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ.प्रकाश खांडगे यांनी भूषविले, तर लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. गणेश चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड, प्रख्यात लावणी नर्तिका हेम सुवर्णा मिरजकर, लावणी सम्राज्ञायी प्रमिला लोदगेकर आणि किनवटचे लोकसाहित्याचे अभ्यासाक प्राध्यापक डॉ. रामप्रसाद तौर या मान्यवरांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. आज लावणी डीजेच्या विळख्यात सापडली आहे असे स्पष्ट मत खंडूराज गायकवाड आणि प्रमिला लोदगेकर यांनी व्यक्त केले. शासनाने संगीतबारी कला केंद्रासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणे गरजेचे आहे आणि केवळ गृह खात्यावर अवलंबून न राहता, सांस्कृतिक कार्य विभागाचा शिफारस असेल तरच त्या कला केंद्राना प्रयोग सादरी करण्याचा परवाना दिला जावा. असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.आज अभिजन वर्गातील चित्रपटाचे ग्लॅमर लाभलेल्या मुली लावणी सादर करू लागले आहेत. लावणीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर अभिजन वर्गाची नजर या कलेकडे गेली.
मात्र सत्यभामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर,विठाबाई नारायणगावकर, रोशन सातारकर यांची लावणी अभिजात होती आणि अभिजातच राहणार असे प्राध्यापक डॉ. खांडगे यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले. लावणी बदलली आहे हे सांगताना प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी बाजीराव मस्तानी मधील ‘नभातून आली अप्सरा’ हा कटाव सादर केला. हेमसुवर्णा मिरजकर यांनी यावेळी प्रत्यक्ष पारंपरिक लावणीचे दर्शन घडविले. प्रमिला लोदगेकर यांनी संगीतबारी कला केंद्रावर डीजे चा धुडगूस चालू असल्याने संगीतबारीतील पारंपारिक वाद्य मोडीत निघतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. डीजेमुळे कला केंद्रातील पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ येईल. अशी चिंता खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केली. या परिसंवादामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी संदीप बलखंडे यांनी सध्या कलावंतांकरिता शासन राबवित असलेल्या योजनाची सविस्तर माहिती दिली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय यशस्वीरित्या तीन दिवस राज्य लावणी महोत्सवाला सुरुवात झाली असून ही परंपरा टिकविण्यासाठी तमाशा आणि लावणी महोत्सवाचे आयोजन केले जाते. असे त्यांचे मत आहे. या महोत्सवाची संपूर्ण नियोजन स्थानिक नेते सुरेश आवटी यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनातून होत आहे.

मंगळवारी रंगणार ‘ नामदेव तुझा बाप … सेन्सॉर बोर्डाच्या  निषेधार्थ आंदोलन

  • नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ कार्यक्रम

पुणे : भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ. कवी, लेखक, कलाकार व आंबेडकरी चळवळीतील  कार्यकर्त्यांच्या वतिने अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ‘नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती सम्यक साहित्य संमेलन, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली. 

 ‘नामदेव तुझा बाप – नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन’  या अभिनव आंदोलनाबद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले,  मंगळवार दि . ४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात  दंगलकार नितीन चंदनशिवे,  सुमित गुणवंत, सागर काकडे, हृद‌मानव अशोक,  रमणी सोनवणे, अशोक घोडके, स्वप्नील चोधरी, हर्षनंद सोनवणे, रवी कांबळे,  जित्या जाली, देवा झिंजाड, विठ्ठल गायकवाड,  म.भा. चव्हाण, विजय बडेवार, अंजली कुलकर्णी,  सुरेश वैराळकर आकाश सोनवणे यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कवी, पत्रकार सहभागी होऊन नामदेव ढसाळ यांच्या कविता आणि लेखनांचे वाचन करणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.  

डॉ. बासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव  दिपक म्हस्के, डॉ. राजाभाऊ भैलुमे, प्रा. किरण सुरवसे, डॉ. निशा भंडारे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, डॉ. स्वप्निल गायकवाड, प्रा. रमा करोते-सुर्यवंशी आदि यं अभिनव आंदोलनाचे निमंत्रक आहेत.

परिवहन विभागाच्या 45 सेवा लवकरच व्हॉट्सअपवर मिळणार – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई – गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता यामध्ये परिवहन विभागाच्या 45 सेवांचादेखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. 

मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे आज परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पणही  फडणवीस यांच्या  हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगल प्रभात लोढा , आमदार मनिषा कायंदे, परिवहन विभागाचे संजय सेठी, विवेक भीमनवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, परिवहन विभाग सर्वात जास्त महसूल देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिवहन विभाग थेट नागरिकांशी आणि अन्य विभागांशी समन्वय करावा लागतो यामुळे या विभागाचे काम कौतुकास्पद आहे. आपघातचे प्रमाण कमी करण्यासाठी खासगी वाहन चालकांशी आणि संस्थाशी समन्वय साधणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘फ्लूट अँड फिडेल’ मधून बासरी आणि व्हायोलिन वादनाने पुणेकर मंत्रमुग्ध 

मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ :  अमर ओक आणि श्रुती भावे यांचा ‘फ्लूट अँड फिडेल’ सांगीतिक कार्यक्रम
पुणे : युही चला चल राही… जीव दंगला…याड लागलं...या गाण्याचे बोल नसतानाही केवळ वाद्यांच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांवर मोहिनी घातली. बासरी वादक अमर ओक आणि व्हायोलिन वादक श्रुती भावे यांनी त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दोघांनीही आपल्या वादन कौशल्यांनी रसिकांना संगीतमय सफर घडवली.

निमित्त होते, मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन च्या वतीने कर्वेनगर मधील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित फ्लूट अँड फिडेल या कार्यक्रमाचे. व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, या उद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणेकरांसाठी करण्यात आले होते.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुराडे, दीपक मानकर, दयानंद गावडे, गोपीचंद कदम, अमरसिंह पाटील या मान्यवरांसह कमिटीचे महेश भागवत, आश्रम काळे, सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव, सागर तुपे, तेजस चरवड, किशोर जगताप, भारती मुरकुटे, सई बहीरट, राजेश कुराडे, सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात देखा एक ख्वाब… जाने जा ढूंढता फिर रहा… चप्पा चप्पा यांसह डेस्पासितो.. पसूरी या गाण्यांच्या चालीवरील व्हायोलिन वादनाला रसिकांनी विशेष दाद दिली. बासरीवर सादर झालेल्या मोह मोह के धागे… या गीताच्या वादनात रसिक तल्लीन झाले. अमर ओक यांचे बासरीचे तर श्रुती भावे यांचे व्हायोलिनचे सूर आणि त्यांना रसिकांनी दिलेली दाद यामुळे कार्यक्रम रंगत गेला. त्यांच्या सुरेल जुगलबंदीने वातावरण भारावून गेले.

टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईतील BKC मध्ये:एप्रिलपासून ईव्ही विक्री

आयात धोरणानुसार, २१ लाख रुपयांची कार भारतीय बाजारात ३६ लाख रुपयांपर्यंत

३५ लाख रुपये दरमहा भाड्याने शोरूम साठी घेतली जागा

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी टेस्ला मुंबईत आपले पहिले भारतातील शोरूम उघडणार आहे. हे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे होईल. कंपनीने यासाठीचा करार अलीकडेच अंतिम केला आहे.प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांनुसार, टेस्ला बीकेसीमधील एका कमर्शियल टॉवरच्या तळमजल्यावर ४,००० चौरस फूट जागा घेत आहे. येथे ते त्यांच्या कार मॉडेल्सचे प्रदर्शन आणि विक्री करेल. कंपनी या जागेसाठी मासिक भाडेपट्टा सुमारे ९०० रुपये प्रति चौरस फूट किंवा सुमारे ३५ लाख रुपये देईल. भाडेपट्टा करार पाच वर्षांसाठी आहे.

कंपनी दिल्ली आणि मुंबईत आपले स्टोअर्स उघडणार असल्याची बातमी होती. टेस्ला दिल्लीतील एरोसिटी कॉम्प्लेक्समध्ये दुसरे शोरूम उघडण्याची अपेक्षा आहे. सीईओ एलन मस्क यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींना त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भेट दिली. यानंतर, कंपनीने भारतातील १३ नोकऱ्यांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या.

मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम उघडल्यानंतर आणि भारतात नोकऱ्यांची संधी दिल्यानंतर, टेस्ला एप्रिलपर्यंत भारतात प्रवेश करेल आणि भारतात कार विकण्यास सुरुवात करेल अशी आशा वाढली आहे. टेस्ला सध्या भारतात उत्पादन युनिट उभारणार नाही. हे जर्मनीतील बर्लिन-ब्रँडनबर्ग येथील गिगाफॅक्टरीमध्ये उत्पादित कार भारतात आणेल. कंपनी येथे सर्वात किफायतशीर ईव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. त्याची किंमत २५ हजार डॉलर्स (२१.७१ लाख रुपये) असू शकते. हे कोणते मॉडेल असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, भारताच्या सध्याच्या ईव्ही कार आयात धोरणानुसार, २१ लाख रुपयांची कार भारतीय बाजारात ३६ लाख रुपयांपर्यंत महागू शकते.

सध्या, परदेशातून येणाऱ्या इलेक्ट्रिक कारवर ७५% बेसिक कस्टम ड्युटी आकारली जाते. तथापि, जर कंपन्यांनी सरकारसोबत सामंजस्य करार केला तर $३५,००० पेक्षा जास्त किमतीच्या कारवर १५% कस्टम ड्युटी आकारली जाईल. ही ड्युटी सूट वर्षातून फक्त ८ हजार कारांवर उपलब्ध असेल.

मॉडेल ३ आणि वाय लाँच करण्याबाबतही चर्चा-टेस्ला सुरुवातीला येथे मॉडेल ३ आणि मॉडेल वाय कार लाँच करू शकते. पण, जागतिक बाजारात दोन्ही मॉडेल्सची किंमत ४४ हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कंपनी ते कमी किमतीत लाँच करेल अशी अपेक्षा आहे.

मंत्रालयावर धडकणार हजारोंच्या संख्येने भीमसैनिक आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिक

आझाद मैदान मुंबई येथे आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन

परभणी – शहीद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी ३ मार्च सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर हजारोंच्या संख्येने राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी नागरिक धडकणार असून सर्व आंबेडकरी संघटना सर्व पक्ष संविधान प्रेमी नागरिकाचा सहभाग राहणार आहे.
परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान निवृत्ती पवार यांनी तोडफोड विटंबना केल्याप्रकरणी ठीकठिकाणी आंबेडकरी व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी प्रचंड मारहाण केली शेकडो निरपराध महिला, अल्पवयीन तरुण वयोवृध्द अटक करून त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी शांततेत निषेध आंदोलन करणारे आंबेडकरी लोकनेते विजय वाकोडे यांचा सुद्धा या आंदोलन दडपशाहीमुळे मानसिक धक्याने हृदय विकाराने मृत्यू झाला. या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी व विविध मागण्याच्या अंमलबजावणीसाठी शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे.
या राज्यव्यापी आंदोलनास संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे समस्त आंबेडकरी संघटना संविधान प्रेमी नागरिकाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रमुख मागण्या

१)परभणीतील संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.

२)सोमनाथ सुर्यवंर्शीच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून न्यायालयीन चौकशी करा.

३)सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा ३०२ कलमान्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे

४)सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये द्या. व कुटूंबातील १ व्यक्तीला शासकाच नाकरी द्यावी.

५)पोलीसांनी केलेल्या कोंबींग ऑपरेशन दरम्यान निरपराध भिमसैनिकांवरील दाखल केलेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

६)पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या भीमसैनिकांना आर्थिक मदत द्यावी तसेच वत्सलाबाई मानवते या भगिनीला पोलसांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना आर्थिक मदत द्यावी

७)सोमनाथच्या हत्येस कारणीभुत असलेल्या संबंधीत पोलीसांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा.

८)अन्यायग्रस्त नागरीकांनी दोषी पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक लय येथे कलेल्या फिर्यादी दाखल करून घ्याव्यात..!

९)राज्य शासनाने फास्टट्रॅक कोर्ट मध्ये हा खटला चालवावा.

कालप्रहराच्या सीमा ओलांडून दिग्गज कलाकारांचे भावपूर्ण सादरीकरण:डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित रागप्रभा संगीतोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : राग यमन, हंसध्वनी, पूरिया, दरबारी, अभोगी, हेमंत, चंद्रकंस, नंद असे सायंकाळ ते उत्तररात्र या कालाधवीत गायले जाणारे राग आज सकाळच्या तीन प्रहरात ऐकायला मिळाले. कालप्रहराच्या सीमा ओलांडून दिग्गज कलाकारांनी भावपूर्णतेने केलेल्या सादरीकरणास रसिकांनी तन्मयतेने दिलेली साथ हे रागप्रभा संगीतोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 2) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रात पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित उदय भवाळकर, विदुषी पद्मा तळवलकर, पंडित राजा काळे, पंडित राम देशपांडे यांचे सादरीकरण झाले. संगीतोत्सवाचे उद्घाटन पंडित हरिप्रसाद चौरसिया. पंडित उदय भवाळकर, पंडित राजा काळे, पंडित योगेश समसी, पंडित विनायक तोरवी, पंडित राम देशपांडे, रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांच्या उपस्थितीत झाले.
ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी मैफलीची सुरुवात राग यमनने केली. त्यानंतर हंसध्वनी राग सादर केला. पंडित चौरसिया यांच्या सुमधूर वादनाने रसिकांना मोहित केले. पंडित योगेश समसी (तबला), मृणाल उपाध्याय (पखावज) यांनी साथसंगत केली तर अमर ओक, वैष्णवी जोशी, किरण बिश्त यांनी बासरी सहवादन केले.
त्यानंतर सुप्रसिद्ध ध्रुपद गायक पंडित उदय भवाळकर यांनी आपल्या धीरगंभीर आवाजात राग पूरिया ऐकविला. ‌‘शिव पार्वतीनाथ महाराज‌’ या पारंपरिक बंदिशीत आलाप, चौताल सादर केला. नंतर ‌‘भवानी माता काली‌’ ही रचना अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित भवाळकर यांना प्रताप आव्हाड (पखावज), मेघना सरदार, किरत सिंग यांनी सहगायन व तानपुरा साथ केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांनी आपल्या मैफलीची सुरुवात उत्तर रात्री गायला जाणाऱ्या राग दरबारीने केली. ‌‘मुबारक बात‌’ ही बंदिश विलंबित तालात सादर करून त्याला जोडून ‌‘अनोखा लाडला‌’ ही द्रुत बंदिश ऐकविली. राग अभोगीमधील ‌‘सपनेमे आए श्याम‌’, ‌‘लाज रखो मोरी‌’ या पारंपरिक बंदिशींना रसिकांनी भरभरून दाद दिली. सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋषिकेश जगपात (तबला), अंकिता दामले, निर्मला थोरात, रसिका गरूड (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या पुढील भागात सुप्रसिद्ध गायक पंडित राजा काळे यांनी राग हेमंत व चंद्रकंस सादर केला. ‌‘कहा मन लागों तेरो बालमवा‌’, ‌‘तोरे बिना बरन भयो‌’ या पारंपरिक बंदिशी प्रभावीपणे सादर केल्या. राग चंद्रकंसमधील कृष्णाला उद्देशून रचलेली ‌‘याहु जानी तम की करा‌’ ही रचना ऐकविली. अरविंदकुमार आझाद (तबला), चैतन्य कुंटे (संवादिनी), श्याम जोशी, अमृता काळे (सहगायन, तानपुरा) यांनी समर्पक साथ केली.
पहिल्या सत्राची सांगता ग्वाल्हेर-जयपूर घराण्याची तालीम मिळालेल्या पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या गायनाने झाली. पंडित देशपांडे यांनी मैफलीची सुरुवात राग नंदने केली. या रागातील ‌‘सैंया तोसे सकल बन ढुंढू‌’ ही पारंपरिक बंदिश ऐकवून नंतर आग्रा घराण्यातील ‌‘रहे रैन पिया सौतन‌’ ही रचना रसिकांची दाद मिळवून गेली. नागपूर येथील तबला वादक सचिन बक्षी यांची रचलेला ‌‘तान ते रे दानी‌’ तराणा ऐकवून रसिकांना आनंदीत केले. प्रशांत पांडव (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), गंधार देशपांडे, सिद्धार्थ गोडांबे, मयूर कोळेकर यांनी गायन साथ केली.
रागप्रहरांच्या कालबाह्य संकल्पनातून मुक्त संगीताविषयी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केलेल्या भावना दृकश्राव्य माध्यमातून पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आल्या.
कलाकारांचा सत्कार रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, विश्वस्त भारत वेदपाठक, संवाद पुणेचे सुनील महाजन, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन आनंद देशमुख यांनी केले.

डॉ. प्रभा अत्रे यांचे विचार काळाशी सुसंगत : पंडित हरिप्रसाद चौरसिया

राग-रागिणी सादरीकरणावर काळाचे बंधन नको, या प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेविषयी मी सहमत आहे, असे सांगून पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे यांची संगीत क्षेत्रातील साधना मोठी असून त्यांनी याविषयीचा सखोल अभ्यास केला आहे. राग सादरीकरण आणि समय यांचा एकमेकांशी संबंध नको, आजच्या काळात या संकल्पनेला महत्त्व नाही हा त्यांचा विचार सुसंगत आहे.
पंडित योगेश समसी म्हणाले, कालबाह्य रागसंगीत या विषयी विचारमंथन होणे आवश्यक आहे. जोड रागाचे सादरीकरण, कर्नाटकी संगीत पाहता प्रभा अत्रे यांचे विचार सुसंगत वाटतात. संगीताची गुरुमुखी परंपरा जपण्यासाठी ही संकल्पना योग्य आहे.

पंडित राजा काळे म्हणाले, कालबाह्य राग सादरीकरणाची संकल्पना सादर करताना कलाकाराची मानसिकता महत्त्वाची असते. कलाकाराने रागामागील शास्त्र सादर न करता तो सिद्ध करून रसिकांसमोर आणणे आवश्यक आहे. रागाचे शास्त्र नव्हे तर धून प्रकट करणे हे कलाकाराचे मोठेपण आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. 2 मार्च 2025 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महावितरणला शुक्रवारी गव्हर्नन्स नाऊ या प्रकाशनातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित अकराव्या सार्वजनिक उद्योग पुरस्कार सोहळ्यात दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणला ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’ आणि ‘बेस्ट यूज ऑफ ऑटोमेशन अँड डिजिटल टेक्नॉलॉजीज’ या दोन गटात सर्वोत्कृष्ट कामगिरीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. महावितरणचे अधीक्षक अभियंता (नवीकरणीय ऊर्जा) निखिल मेश्राम यांनी कंपनीच्या वतीने हे पुरस्कार स्वीकारले.

अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणची प्रमुख भूमिका आहे. विकेंद्रित स्वरुपात ठिकठिकाणी सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारून त्याद्वारे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याची ही योजना आहे. 

सौर ऊर्जानिर्मिती पार्क उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता असते. महावितरणच्या वीजनिर्मिती केंद्रांपासून पाच व दहा किलोमीटर अंतरावरील जमिनी निश्चित करणे, सौर ऊर्जानिर्मीतीसाठी त्या भाड्याने मिळविणे, सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी माहितीसाठा तयार करणे, प्रकल्पांची मंजुरी, योजनेची अंमलबजावणी करणे अशा सर्व कामांसाठी महावितरणने एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी गतीने आणि पारदर्शक पद्धतीने करता आली. या कामगिरीमुळे महावितरणला ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’, या गटात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला.

महावितरणने वीज उपकेंद्रांची देखभाल करण्यासाठी आणि अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणीमध्ये माहिती तंज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल कंपनीला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राज्यातील ३,५६३ वीज उपकेंद्रांच्या देखरेखीसाठी ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ बसविण्यात येत आहे. यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठीच्या सौर ऊर्जीकरण होणाऱ्या २,७७३ उपकेंद्रांचा समावेश आहे. ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’मुळे प्रत्येक वीज केंद्रातील विविध उपकरणांची स्थिती, बिघाड, विजेची मागणी व पुरवठा इत्यादींची माहिती तातडीने उपलब्ध होऊन निर्णय प्रक्रिया गतीमान होत आहे. महावितरणने मुख्यालयात विकसित केलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमुळे राज्यभरातील वीज पुरवठ्यावर देखरेख ठेवणे आणि महत्त्वाच्या बाबीत तातडीने निर्णय करणे शक्य झाले आहे. या उपक्रमात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज व मशिन लर्निंग या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मानसिक सुदृढतेसाठी खेळांची आवड जोपासावी – हर्षवर्धन पाटील

‘युवोत्सव २०२५’ मध्ये पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालयांचा विजय

पिंपरी, पुणे (दि. ०२ मार्च २०२५) – जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण होईल. पालकांनीही याकडे जागरूकपणे पाहण्याची आवश्यकता आहे. सर्वांगीण विकास साधत देशाची भावी पिढी सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांची जबाबदारी आहे, असे मत पीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव २०२५’ या तीन दिवसांच्या क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. १ मार्च) पारितोषिक वितरण समारंभाने झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर उपस्थित होत्या.
दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, आरजे अक्षय यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण १४५ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे –
फुटबॉल – प्रथम क्रमांक – गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, उपविजेते – श्री बालाजी विद्यापीठ, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आकुर्डी;
बॉक्स क्रिकेट (पुरुष) – प्रथम – डी. वाय. पाटील आयएमएस, आकुर्डी, उपविजेते – पीसीसीओई, निगडी, डी. वाय. पाटील कॉलेज, तळेगाव;
बॉक्स क्रिकेट (महिला) – प्रथम – पीसीसीओईआर, रावेत, उपविजेते – झील कॉलेज, इंदिरा कॉलेज;
बॅडमिंटन (पुरुष) – प्रथम – आनंद बोरा (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन), उपविजेते – रितेश निम्हाळ (पीसीसीओई, निगडी);
बॅडमिंटन (महिला) – प्रथम परिनीत मगदूम (बाबुरावजी घोलप कॉलेज, सांगवी), उपविजेते – अमृता गाडेकर (एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय);
व्हॉलीबॉल – प्रथम मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर; उपविजेते – पीसीसीओई निगडी, के. बी. पी. सातारा
वैयक्तिक विजेते – बॅडमिंटन (पुरुष) – सर्वोत्तम स्मॅशर – आनंद बोरा (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन),; बॅडमिंटन (महिला) – सर्वोत्तम स्मॅशर मिहिका ठाकूर (एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन);
बॉक्स क्रिकेट (पुरुष) – सर्वोत्तम फलंदाज – आदर्श पवार (डीवायपी आयएमएस); सर्वोत्तम गोलंदाज – प्रथमेश नाथे (पीसीसीओई), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – अभिषेक कोठावदे (डीवायपी आयएमएस);
बॉक्स क्रिकेट (महिला) – सर्वोत्तम फलंदाज – श्रेया टाकळकर (पीसीसीओईआर); सर्वोतम गोलंदाज – आदिती बिरादर (इंदिरा कॉलेज);
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – कल्याणी कोळपे (पीसीसीओईआर); व्हॉलीबॉल – सर्वोत्तम सेंटरर – विकास भामरे,
सर्वोत्तम ब्लॉकर – संस्कार पावरे, सर्वोत्तम स्मॅशर – विनीत शिंदे;
फुटबॉल – सर्वोत्तम गोलकीपर – ललित डोगरा (श्री बालाजी), टॉप गोल स्कोरर – यश गटकळ (डीवायपी सीओई), सर्वोत्तम खेळाडू – प्रेम भयार (गरवारे).

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या युवोत्सवात समन्वयक म्हणून प्रा. डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. अमरीश प‌द्मा यांनी काम केले. माजी वि‌द्यार्थी समन्वयक नंदलाल पारीक, विशाल निकम आणि अभिजीत नायडू यांचे सहाय्य लाभले. तसेच, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी परिषद सदस्य, विद्यार्थी स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

पुण्याच्या रस्त्यावर चार हजार बेवारस वाहने, वाहतूक शाखा आणि महापालिकेची संयुक्त कारवाई सुरू

  • कसबा मतदारसंघातून धुळखात पडलेली वाहने उचलण्याच्या मोहिमेला सुरुवात

पुणे (दि २ मार्च): शहरातील रस्त्यांवर धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा, अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. अशा काही वाहनांची चोरी झालेली असते, तर काहींना मालकच नसतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून याची सुरुवात कसबा मतदारसंघातून करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये येथील सर्व बेवारस वाहने हटवली जाणार आल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.

आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानाच्या माध्यमातून गणेश पेठतील दूधभट्टी चौकामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, झोन १ पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, “पुणे शहरात जवळपास चार हजारांच्यावर धुळखात पडलेली बेवारस वाहने आहेत. यामुळे पार्किंगची समस्या वाढत असून आरोग्यावरही परिणाम होतो. यातील काही वाहने चोरीची असतात तर काहींचे मालक सापडत नाहीत. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अशा वाहनांच्या मालकांना प्रथम नोटीस दिली जाईल, मात्र कोणी मालक नसल्यास वाहतूक पोलीस गाड्या जप्त करतील आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया करून लिलाव केला जाईल. कसबा मतदारसंघात पहिल्या दिवशी १३९ वाहने उचलण्यात आली असून येत्या १५ दिवसांमध्ये सर्व बेवारस वाहने हटवण्यात येतील. यासाठी आमदार हेमंत रासने यांची घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे”.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी म्हणाले, “महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर धुळखात पडलेली 45 वाहने गेल्या महिन्यात उचलण्यात आली आहेत. महापालिका आणि पुणे पोलिस यांच्यामध्ये समन्वय साधून ही कारवाई केली जात आहे. दोन्ही विभागांकडून रस्त्यावर अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहने जप्त केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी काही महिने लागत असल्याने ती ठेवण्यासाठी बाणेर येथे महापालिकेची जागा असून कोंढव्यात नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येईल. खराब झालेल्या महापालिकेच्या वाहनांचा देखील लवकरच लिलाव केला जाणार आहे.

आमदार हेमंत रासने म्हणाले, “बेवारस वाहनांमुळे अस्वच्छता, आरोग्यविषयक समस्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर कचरा तसेच बेवारस साहित्य असू नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशी वाहने उचलण्यासाठी पुणे पोलीस, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या संयुक्तिक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वाहने जप्त केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधी लागत असल्याने तो कमी करण्यासाठी तसेच संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. कसबा अनधिकृत फ्लेक्समुक्त करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.