कलांमधून उलगडणार ‘ती’आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शनिवार, रविवारी आयोजन
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऋत्विक सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या कलेतील ‘ती’ या अनोख्या संकल्पनेवर परिसंवाद, कविता रसग्रहण, तबला वादन, नाट्य आणि चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऋत्विक सेंटर आयोजित दोन दिवसीय विशेष कार्यक्रम शनिवार, दि. 8 आणि रविवार, दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळात ऋत्विक सेंटर, वेद भवनजवळ, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. चित्रकाराला दिसलेली ‘ती’ या संकल्पनेवर आधारित प्रख्यात चित्रकार प्रसाद भारद्वाज यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन दोनही दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळात खुले असणार आहे.
शनिवार, दि. 8 मार्च रोजी ‘कविला उमगलेली ती’ या संकल्पनेवर आधारित वैभव जोशी यांचे ‘ती’च्या वरील कवितांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्री समिरा गुजर-जोशी करणार आहेत.
दिग्गज कलाकारांनी विविध कलाप्रकारातून केलेला स्त्रीचा गौरव या अंतर्गत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्दर्शक सुनील सुकथनकर, चित्रकार राजू सुतार आणि नर्तक डॉ. परिमल फडके यांना पॉडकास्टर सौमित्र पोटे ‘विविध कला प्रकारातून ती’ या विषयी बोलते करणार आहेत.
रविवार, दि. 9 मार्च रोजी ‘चित्रकथीमधील ती’ या अंतर्गत कोंकणी लोककलेवरून प्रेरित ‘मिथ ऑफ मँडिगोज’ हे नाट्य सादर होणार आहे. याचे लेखन, दिग्दर्शन शंतनु सायली यांचे आहे. सुप्रसिद्ध तबला वादक सावनी तळवलकर यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना स्वानंद राजोपाध्ये संवादिनी साथ करणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध चित्रकार प्रसाद भारद्वाज यांची असून दोन दिवसीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक सेंटरच्या समन्वयक श्रुती पोरवाल यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा
पाशवी बहुमताच्या आधारे सरकार सभागृह चालू देत नाही
मुंबई, दि. ४ मार्च २०२५
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली. सरपंच हत्येमध्ये वाल्मिक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सरआरोपी केले पाहिजे, अशी मागणी उद्या सभागृहात करु असे नाना पटोले म्हणाले.
औरंगजेबाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे पण तेच बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून सभागृह बंद पाडत आहेत, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रशांत कोरटकरने अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केला त्याच्यावर सरकार कडून काहीच बोलले जात नाही. महाराजांचा अपमान करणारे काही जण मंत्रिम़ंडळातही आहेत. जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल तर त्याचे समर्थन कसे करता, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.
मी कोणत्याही महापुरुषाबाबत अपशब्द बोललो नाही:कोणी दुखावले असेल तर माझे विधान मागे घेतो, औरंगजेबाच्या विधानावरून अबू आझमींचा यू-टर्न
मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दले केलेले विधान मागे घेतले आहे. माझ्या शब्दांचा विपर्यास केल्याचे ते म्हणाले. मी बोलताना कोणत्याही महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केले नसल्याचेही आझमी यांनी स्पष्ट केले. या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात असल्याचा आरोपी अबू आझमी यांनी यावेळी केला. अबू आझमी यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर हा वाद संपणार का? हे पाहावे लागणार आहे.अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एकनाथ शिंदे यांनी तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आज विधानसभेतही अबू आझमींच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. या सर्व घटनांनंतर अबू आझमी यांनी आपल्या औरंगजेब बद्दलच्या विधानावर स्पष्टीकरण दिले.
आझमी म्हणाले की, जेव्हा मी विधानसभेतून बाहेर आलो आणि पत्रकारांशी बोललो, तेव्हा पत्रकारांनी मला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची औरंगजेबाशी केलेली तुलना यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले, ज्यावर त्यांनी इतिहासकारांनी जे म्हटले आहे तेच पुन्हा सांगितले. जेव्हा इतिहासकारांवर बंदी नाही, तर त्यांच्या विधानावर इतका गोंधळ का होत आहे? असा प्रश्नही अबू आझमी यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की ते कधीही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा डॉ. आंबेडकर यांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाहीत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली, परंतु त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह बद्दल, जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले, तेच मी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतेही अपमानजनक भाष्य केलेले नाही. परंतु तरीही माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो, असे अबू आझमी म्हणाले.या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात आहे आणि यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे नुकसान करणे आहे, असे मला वाटते, असेही अबू आझमी म्हणाले.
औरंगजेबाबत बोलताना काय म्हणाले होते आझमी?
मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह देशात मुस्लिमांवर अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.
अबू आझमी या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही-एकनाथ शिंदेंची विधानसभेत मागणी
मुंबई-अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात देशाचा जीडीपी 24 टक्के होता. भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती, असे म्हणत औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची नाही, तर सत्तेसाठी होती, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. औरंगजेबाचे गोडवे गायल्याबद्दल सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असेही शिंदे म्हणाले.
अबू आझमी यांच्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आली होती. या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आजचे दिवसभराचे कामकाम स्थगित केले.काल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंग्याचे गोडवे, याठिकाणी अबू आझमीने गायले. खरे म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला हवा. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीचा धक्कार करत असताना, अबू आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते. अबू आझमी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमान करतो, असा आरोपी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना केला.छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले, आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणे, म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आपण ‘छावा’ बघा, रईस… छावा सिनेमा बघा, असे आवाहनही त्यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंगावरची कातडी सोलून त्यावर मीठ टाकले, एवढा अपमान केला, चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा अपमान आहे. आपल्या देशभक्तीचा अपमान आहे, असा घणाघात करत एकनाथ शिंदे यांनी
देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंबू राजा था।।
हा शेर सभागृहात म्हटला.
शंभू राजाने 9 वर्षांत 69 लढाया जिंकल्या. अरे लाज वाटायला हवी. या औरंगजेबाने आपली मंदिरे तोडून टाकली. आया-बहिणींवर अत्याचार केला. आया-बहिणींवर बलात्कार झाले. या औरंग्याने बापाला कैद केले, मुलांना मारून टाकले. 27 लोकांना मारले. असे सांगत, अबू आझमी निलंबित झाला पाहीजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.
सरकारकडे देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ-फोटो असताना मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला:फडणवीस, अजित पवारांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही- हर्षवर्धन सपकाळ
मुंबई दि. ४ फेब्रुवारी २०२५
स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनाम द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, फक्त धनंजय मुंडेच्या राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केले नाही हा खरा प्रश्न आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडीओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते म्हणजेच गृहमंत्री व सरकारकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे या टोळीला सरकारचा पाठिंबा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबायचे होते हे स्पष्ट होते.
देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते. आता आपली कातडी वाचविण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती अशा बातम्या पसरवून अंग झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. हा त्यांचा कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही, त्यांचे सत्य जनतेसमोर आले आहे, त्यामुळे त्यांनी पायऊतार व्हावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरुन उचलून फेका,त्याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करा,टोळी राज्यातून संपवावी लागेल- जरांगे – मनोज जरांगे
मुंबई-संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो सोमवारी समोर आले. यानंतर आज मनोज जरागे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्यासमोर ढसाढसा रडले.धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील. मला आता वेदना सहत नाहीत, मला आई समोर बसल्याने, मुलं सोबत असल्याने मला रडताही येत नाही. मला भावाला वाचवता आले नाही, अशी खंत त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे व्यक्त केली.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरुन उचलून फेका असे जरांगे यांनी म्हटले आहे. ही टोळी राज्यातून संपवावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा. तसेच, हत्या प्रकरणाचा बदला घेतला जाणार, अशा शब्दांत जरांगेंकडून धनंजय देशमुखांचे सांत्वन करण्यात आले.
मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे की, येऊ द्या त्यांना सुटून जसे यायचे तसे येऊद्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेणंच आपल्या हातात आहे. हे खूप भयंकर कृत्य आहे. इतका राग का? चूक काही मोठी नव्हती. देशात कुठेच अशी हत्या झाली नाही. इतका रोष व्यक्त करण्याइतकं काहीच झाले नव्हते.
मनोज जरांगे म्हणाले की, या सर्व गोष्टीला धनंजय मुंडे जबाबदार आहे. त्याला यांचा पैसा गोड लागला. मग या लोकांनी जमीनी बळकावल्या लोकांना मारहाण केली. त्यांने मंत्रिपदाचा वापर यांच्यासाठी केले आहे. इतके तिरस्कारने भरलेले सरकार मी बघीतले नाही. पुरावे नाही म्हणता तुम्हाला लाज वाटेल. धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी झाला पाहिजे. तरच हे सरकार खानदानी सरकार आहे. यांना पैसा, पदे मिळवण्यासाठी हे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ही विकृती पहिल्यापासून अशीच आहे. मी खूप कठोर काळजाचा आहे, पण कालचे फोटो पाहिल्यानंतर कुणीही खचून जाईल. धनंजय देशमुख यांना घरात जावे लागेल, बाहेर यावे लागेल. याचा बिमोड आपल्याला करायचा आहे, तुम्हाला लढावे लागेल. हे आपल्या लेकरांवर हसले आता त्यांना बाहेर सुटून येऊ द्या मग जनतेला न्याय करावा लागेल.
मनोज जरांगे म्हणाले की, काल फोटो पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. मी तफफड करत होता. माझा संतोष देशमुख हसला पाहिजे, की माझ्या माघारी माझ्या मराठा पोरांनी बदला घेतला. आता बदला होणार.सर्व टोळीचा बिमोड करत बदला घेणार आहोत.
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा: मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला राजीनामा
मुंबई-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ओएसडीसह पीएच्या हाती मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याचे समजत आहे.
राजीनामा सोडा, धनंजय मुंडेंना बडतर्फ न केल्यास अधिवेशन बंद पाडणार
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नका:त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानियांची मागणी; बडतर्फ न केल्यास अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा
मुंबई–काल ते धनंजय मुंडे म्हणत आहेत माझ्याविरुद्ध जे जे बोलले त्यांना मी धडा शिकवीन, मी त्यांना ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा आहे तो शिकवा तुम्हाला जे करायचे आहे ते करा असेल हिम्मत तर बघू आपण. मी लढाईची ताकद ठेवते असे आव्हान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या. धनंजय मुंडेंना बडतर्फ केले नाही तर आम्ही अधिवेशन बंद पाडू असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. सुरुवातीपासून त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे हृदयद्रावक फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाले होते. धनंजय मुंडेंना बडतर्फ केले पाहिजे, असे लोक सत्तेत कशासाठी हवेत, असा जाबही त्यांनी सरकारला विचारला.अंजली दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामाच घेऊ नये, तर त्यांना बडतर्फही केले पाहिजे. मुंडेंच्या माणसाने 10 वर्षं संघटित गुन्हेगारी केली, तरीही सरकार असे असंवेदनशील का वागत आहे? असा सवालही दमानिया यांनी केला. वाल्मीक कराडला का अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे. त्या थर्डक्लास कराडला कोठडीतही व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते? असाही सवाल त्यांनी केला. मी धनंजय मुंडेंविरोधात आतापर्यंत कितीतरी पुरावे दिले आहेत. परंतु, पुरावे दिले की, आरोप सिद्ध होऊ देत असे बोलतात. हे नेमके काय चालले आहे?
अजित पवारांनी लोकप्रतिनिधी म्हणून वागावे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना या फोटोबाबत, व्हिडिओबाबत माहिती नव्हते का? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. जर आज यांचा आता राजीनामा नाही आला, बडतर्फ केले गेले नाही.. तर संपूर्ण महाराष्ट्रात जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले त्या सगळ्यांना मी हात जोडून निवेदन करते की उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोहोचायचे आणि यांचा अधिवेशन बंद पाडायचा, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडा भरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावर खलबंत सुरू होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा क्लीनचीट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश
मुंबई-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे.दरम्यान काल माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले दोन दिवसांनंतर आम्ही ठरवू. धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातून दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचे आणि स्वतःच्या पक्षातील आमदार, खासदारांचे किती प्रेशर येते? ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? ते पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
पुढे करुणा शर्मा म्हणाल्या, मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे. माझे काही लोक आहेत, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे. सर्वांना माहिती आहे, धनंजय मुंडे छोटा मोठा आमदार किंवा मंत्री नाहीत. जो अजितदादा गट आहे, तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. त्यामुळे स्वतःच्या पक्षात स्वतःची चालणार. पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे, मला सर्व काही माहिती आहे. म्हणूनच मी हे सांगत आहे, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
स्वारगेट बलात्कार: प्रकरणाचे राजकारण ही तेवढेच गढूळ
पुणे- बलात्कार झाला कि नाही? नेमके काय घडले ? सारे काही कोर्टात स्पष्ट होईल,पोलीस तपास योग्य आहे कि अयोग्य हे देखील निष्पन्न होईल.पण एखाद्या बलात्कारा सारख्या गंभीर गुन्ह्याबाबत विरोधकांनी न्यायासाठी आवाज उठविणे गैर नाहीच पण सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर देताना बलात्कारीत पिडीतेची बदनामी होईल अशी विधाने करणे अत्यंत चिंताजनक असल्याचे अजूनही कोणाच्या लक्षात येत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही.
अगदी गृहराज्य मंत्र्यांच्या विधानापासून ते आरोपींच्या वकिलांच्या मुलाखती प्रसारित करण्यापर्यंतच्या माध्यम प्रतिनिधींनी याची जान ठेऊ नये या बाबी इथे महत्वाच्या ठरतात. आपली संविधान महिला सुरक्षेला अधिक महत्व देते. हे माहिती असूनही काहीही सिद्ध होण्याच्या पूर्वी कोर्टाच्या बाहेर सामाजिक स्तरावर फिर्यादी आणि पिडीत महिलेलाच घेरण्याचा प्रकार हा अत्यंत घातकी प्रकार मानला गेला पाहिजे.अशा बाबी झाल्या तर तक्रारी द्यायला देखील कोणी पुढे येणार नाही हे लक्षात का येऊ नये.
स्वारगेट ची घटना दुर्दैवी नाही तर घृणास्पद च होती आंनी आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या अवस्थेने तेच स्पष्ट करून दिले आहे. हे कोणी वेगळे सांगायची गरज नाही . वर्षानुवर्षे हा भाग कशा पद्धतीने दुर्लक्षित आणि कुजका ,अंधाऱ्या गुन्हेगारीत राहिला हे पोलिसच नव्हे तर स्वारगेटचे इथले कर्मचारी छोटे दुकानदार सांगतातच . रात्रीच्या वेळेत छोट्या मोठ्या लुटमाऱ्या आणि नशाधीन व्यक्तींचा वावर असलेल्या या भागाकडे गेली १५ते २० वर्षे किंवा त्याहून अधिक काल कोणत्याही महिला आमदार वा महिला मंत्र्याचे कधीही लक्ष गेले नाही हे जास्त महत्वाचे. पण या घटनेने या भागाचे वास्तव चव्हाट्यावर मांडले. आता यानंतर देखील या भागाचा कायमस्वरूपी कायापालट झाला नाही तर …. या संदर्भात नेहमीप्रमाणे सर्वांना रान खुलेच राहील .
पण स्वारगेट च्या बलात्काराच्या घटनेत पिडा सोसून घरी निघालेल्या एका तरुणीला जर अन्यायाविरुद्ध दाद मागायची असेल तर तिला पोलीस आणि कोर्टाच्या माध्यमातून ती मागू दिली पाहिजे. या घटनेचे राजकारण कुठपर्यंत करायचे याला काही मर्यादा पाहिजेत . एखाद्या महिलेच्यावर अशा पद्धतीने अशा ठिकाणी होणारा अत्याचार जर उघड झाला तर विरोधकांनी आंदोलने केलीच पाहिजेत . पण गृहराज्यमंत्री आणि नंतर अन्य कोणी नेत्यांनी सार्वजनिकरीत्या पिडीताच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहील अशा पद्धतीची विधाने केली तर तिच्यावरचा अत्याचार अजूनही थांबलेला नाही असाही दावा कोणी केला तर नवल का वाटावे . पिडीत किंवा फिर्यादी जर खोटी फिर्यादी बनली असेल तर हि गोष्ट कोर्टाच्या चार भिंतीआड जोवर सिद्ध होत नाही तोवर जर चिखलफेक होत राहिली तर अशाने खऱ्याखुऱ्या पीडिता देखील न्याय मागायला पुढे येण्यास कचरतील .यामुळे न्यायासाठी आंदोलने करणे विरोधकांना हक्क आहे तो त्यांना राबवू दिलाच पाहिजे आणि न्यायालयीन व्याव्स्थेद्वारेच न्याय मिळवून देणे एवढेच काम सत्ताधारी राजकारण्यांनी केले पाहिजे. हि चालत आलेली परंपरा आता कोणी मोडीत काढू नये इतकंच.
देवेंद्र जोगांच्या प्रतिज्ञापत्राने पोलीस तोंडघशी अन दबाव स्पष्ट ?
गजाने चिथावणी दिल्याचा आरोप ,गजाच्या २ दोन फॉर्च्युनर कारही केल्या जप्त,गाजला आता संपविणार या मार्गावर पोलीस जात असतानाच ..झाली माघार अन देवेंद्र जोगांच्या प्रतिज्ञापत्राने पोलीस पडले तोंडघशी.. दडलेले सत्य काय ?
पुणे- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना कोथरूड भागात झालेल्या मारहाणीप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. जोग यांनीच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मारहाण क्षणिक रागातून झाली असून कोणाच्या चिथावणीमुळे झाली नसल्याचे न्यायालयाला सांगितले.यामुळे गजा मारणे याच्या विरुध्द पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची होती हे स्पष्ट झाले आहे , हि चूक नजरचूक तर होऊ शकणार नाही पण या कडे राजकीय दबावाला बळी पडलेले किंवा तोंडघशी पडलेले पुणे पोलीस असे कोणी म्हटले तर नवल वाटणार नाही
कोथरुड भागात १९ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी संताप व्यक्त करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे, साथीदार रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मारणे सोमवारी सायंकाळी कोथरुड पोलीस ठाण्यात हजर झाला. देवेंद्र जोग यांना मारहाण करताना गुंड गजा मारणे, रुपेश मारणे यांनी साथीदारांना चिथावणी दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते . त्यानंतर न्यायालयाने मारणेला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.गुन्हे शाखेने आरोपी मारणे याला सोमवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले. त्यासोबतच, न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींना मोक्का न्यायालयाच्या ‘प्रोडक्शन वॉरंट’ने ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांकडून चारही आरोपींच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मारणे आणि इतर तीन आरोपींना समोरासमोर बसवून गुन्ह्याचा तपास मोक्का कायद्यान्वये करायचा आहे. अन्य वाहने जप्त करायची आहेत. आरोपींच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा तपास करायचा आहे.
आरोपींची एक संघटित टोळी असून त्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी यांसारखे गुन्हे करून बेकायदेशीरपणे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळविली आहे, त्याबद्दल तपास करायचा आहे. चारही आरोपी सराईत असून जनमानसात त्यांची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे साक्षीदार व फिर्यादी हे प्रचंड दबावाखाली असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयाला दिली. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण सायबर तज्ञांच्या मदतीने जप्त करण्यात आले. न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. दोन दुचाकी आणि दोन फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करण्यात आला, असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, फिर्यादी देवेंद्र जोग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. यामध्ये त्यांना झालेली मारहाण ही क्षणिक रागातून झाल्याचे नमूद केले. जोग यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले की, “या प्रकरणात मारहाण करणाऱ्यांना चिथावणी दिल्याचे मला वृत्तपत्रांतील बातम्यांतून समजले. मात्र घटना घडताना कोणीही चिथावणी दिली नाही. मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त घटनास्थळावर कोणी नव्हते. माझ्या समक्ष कोणाच्या सांगण्यावरून मला मारहाण झाली नव्हती. मी केवळ तीन ते चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.” दरम्यान, जोग यांनी दिलेल्या या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांनी मारणेवर दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि मोक्का अंतर्गत कारवाईचे पुढे काय होणार हे स्पष्ट झाले आहे. .
प्रथमपासूनच हा खोटा गुन्हा आहे. गुन्हेगारी कमी करण्याच्या प्रयत्नात गजानन मारणेवर पूर्वीचे गुन्हे आहेत. म्हणून त्याला गुंतवण्यात आले. घटनास्थळावर गजानन मारणे हजर नव्हता. मारणेपासून पाचशे मीटरवर घटना घडली. त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच येत नाही. फिर्यादीने स्वतः वकिलांमार्फत हजर होऊन या युक्तिवादाला पुष्टी दिली आहे. खोट्या केसमुळे लवकरच जामीनासाठी मागणी करणार आहोत.–अॅड. विजयसिंह ठोंबरे, आरोपींचे वकील
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपा युती सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.
मंगळवारी ४ मार्च रोजी महापालिका क्षेत्रात काँग्रेसचा युती सरकार विरोधात एल्गार.
मुंबई, दि. ३ मार्च २०२५
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज आंदोलन करण्यात आले. भाजपा युती सरकार हे शेतकरीविरोधी असून निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांकडे भाजपा युती दुर्लक्ष करत आहे. झोपी गेलेल्या भाजपा युती सरकारविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, रास्त वीज पुरवठा द्यावा, पिक विमा व कृषी अवजारांवरील जीएसटी रद्द करावी, शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान तात्काळ मिळावे, सोयाबीन हमीभावातील फरक, सोलार पंप तात्काळ देण्यात यावे, शेतमाला हमीभाव द्यावा, दूध दरवाढ द्यावी यासारख्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भाजपा युती सरकारच्या विरुद्ध हे आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. नापिकी आणि शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी आणि महिलांना सुरक्षिततेची हमी द्या नाहीतर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, प्रकाश मुगदिया, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बुलढाणा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चात हजारो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपने निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे या अधिवेशनात शेतक-यांची कर्ज माफ करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, माजी आमदार राजेश एकडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व नांदेड महानगरपालिकेतील बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मा. आ हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम,शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, महिला कॉंग्रेस अध्यक्षा रेखाताई चव्हाण, मा.महापौर जयश्रीताई निलेश पावडे, करुणाताई जमदाडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी विरोधी भाजपा यती सरकारविरोधात धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी आपापले ट्रॅक्टर घेऊन सामील झाले होते. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
राज्यातील इतर जिल्ह्यातही आंदोलन करून शेतकरी विरोधी भाजपा युती सरकारचा निषेध करण्यात आला. उद्या ४ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांच्या प्रश्नी आंदोलन केले जाणार आहे.
अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानित पै. सुजित मान यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
पुणे, दि. ३ मार्च: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १८ व्या राष्ट्रीय पातळीवरील एमआयटी डब्ल्यूपीयू आंतर-विद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट-२०२५’ क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेला ८९ पदक मिळाले. तर उपविजेतेपद एमआयटी एडीटी पुणे ला ४६ पदक मिळाले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या संघाला करंडक व रोख पारितोषक देण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. पुणे तर्फे, २५फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राष्ट्रीय पातळीवरील एमआयटी डब्ल्यूपीयू आंतर-विद्यापीठ व महाविद्यालय ‘समिट-२०२५’ चा पारितोषिक वितरण समारंभ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला..
स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण प्रसंगी अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानीत पै.सुजित मान हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डाॅ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाने हा समारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव प्रा.गणेश पोकळे, प्रा.पद्माकर फड, डब्ल्यूपीयच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक प्रा. विलास कथुरे व प्रा.अभय कचरे, प्रा.रोहित बागवडे हे उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
समिट २०२५ मध्ये देशभरातील १५० पेक्षा अधिक संघाच्या माध्यमातून २२०० विद्यार्थ्यांनी एकूण ९ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. विजेत्यांना करंडक, पदके, प्रशस्तीपत्र व रोख रूपये रकमेची पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कबड्डी व ई स्पोर्टस अशा एकूण ९ क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक क्रीडा प्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रोख पारितोषिक. या खेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य, पदक व रोख पारितोषिक देण्यात आले.
पै. सुजित मान म्हणाले, कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रयत्न हे तीन गुण खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच जोरावर ते यशस्वीतेचे शिखर गाठू शकतात. कोणताही क्रीडा प्रकार हा केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. यामध्ये सहभागी खेळाडू हे देशातील सर्व भागातून आल्यामुळे ते एकतेचे ही प्रतिक आहे.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिक दृष्टया सतर्क, बौद्धिकदृष्ट्या चाणाक्ष, आध्यात्मिकदृष्ट्या सजग असावे. शिस्त आणि चरित्र्य या दोन गोष्टींना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव याची जाणीव ठेवावी. देशासाठी हे अत्यंत महत्वाचे असून यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते.
या प्रसंगी क्रीडा विभागाचे निखील वणवे, राहुल बिराजदार व सहकारी हे उपस्थित होते.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
विद्यार्थी आदित्य गलगली व स्निग्धा खुशवाह यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.
