Home Blog Page 634

पोलीस मुख्यालयातील १०३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची स्तन कर्करोग तपासणी संपन्न

अमनोरा येस फाउंडेशन आणि सहयोगी संस्थेच्या वतीने स्तन कर्करोग तपासणी शिबिर
पुणे :  कर्करोगाच्या प्रकारांमध्ये महिलांमधील  स्तनकर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. परंतु अनेक वेळा महिला त्याकडे दुर्लक्ष करतात त्यातही पोलीस महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे स्वतःकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अमनोरा येस फाउंडेशन आणि सहयोगी संस्था यांच्या वतीने पोलीस मुख्यालयात कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची स्तन कर्करोग तपासणी झाली.

बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, यु इ लाईफसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, ससूनचे अधिक्षक डाॅ. यल्लप्पा जाधव, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे, ससूनच्या शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. लता भोईर, सिटी ग्रुप चे उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

डॉ. एकनाथ पवार म्हणाले, पुण्यातील सर्व पोलीस महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांना कर्करोग तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे. महिलांचे देखील चांगले सहकार्य या शिबिराला मिळत आहे. पोलीस मुख्यालयात झालेल्या शिबिरात मॅमोग्राफीसाठी ३९ तर ३ महिला पोलिसांना पुढील तपासणीसाठी सांगण्यात आले आहे. कर्करोगाबद्दल लवकर माहिती मिळाल्यास त्यावर उपचार करता येतात. त्यामुळे महिला पोलिसांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे.

डॉ. राजकुमार शिंदे म्हणाले, महिला अजूनही त्यांना काही त्रास होत असेल तर सांगत नाहीत परंतु महिलांनी पुढे येऊन ते सांगणे गरजेचे आहे. स्तन कर्करोग पूर्वतपासणी सर्व महिलांनी करून घेणे आवश्यक आहे.

विवेक कुलकर्णी म्हणाले, महिला पोलिसांना विनामूल्य कर्करोग तपासणीसाठी हेल्थ कार्ड  देण्यात आले आहेत. यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या ५ शिबिरात २२५ महिला पोलिसांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ महिला पोलिसांना मॅमोग्राफी तर १० जणींना सोनोग्राफी तपासणी सांगण्यात आली होती. पोलीस समाजाची काळजी घेतात त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे.

विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

पराभव दिसू लागल्यानेच मविआचे आरोप!-चंद्रशेखर बावनकुळे यांचे आरोप

नागपूर-महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत होणारा पराभव स्पष्ट दिसू लागल्याने मतदार याद्यात घोळ केल्याचा आरोप पराभूत मानसिकतेमधून केला जात असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एरव्ही ईव्हीएमवर बोलणारे मविआचे नेते आता मतदार यादीवर बोलू लागले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते कोराडी (नागपूर)येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये वाद असून केवळ भाजपा आणि महायुतीचा विरोध करण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. मविआचे देशासाठी समर्पण नाही, अजेंडाही नाही. निव्वळ जाती-पातीचे राजकारण करून सामाजिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. दिवसभर राजकारण आणि फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक दिवस असा येईल, की ज्या दिवशी मविआमधील सर्व उमेदवारीसाठी मारपीट करतील. दुसरीकडे भाजपा-महायुती विचारधारेतून आणि महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करीत आहे.

  • मतदार यांद्यांमध्ये सुधारणा
    2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नावे मोठया संख्येत गहाळ झाल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती. ही नावे का गायब झाली? कशी गायब झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली? या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने माझ्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. तेव्हा मविआचे नेते का चुप्प होते? तेव्हा हा प्रश्न का उपस्थित केला नाही?, असाही प्रश्न त्यांनी विचारला. आता कॉंग्रेस घाबरली आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही अधिकाधिक मतदान करा,असे जनतेला आवाहन करणार असल्याचे ते म्हणाले.
  • नितीन गडकरींचे मार्गदर्शन
    देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी काही जागांवरती आम्हाला मार्गदर्शन केले असून , गडकरी महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी पूर्णवेळ प्रचार करणार आहेत.
    …………………..

मंगलप्रभात लोढा,आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील १४ उमेदवार जाहीर,३ विद्यमान आमदारांना प्रतिक्षेत…

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर सर्वांचं लक्ष उमेदवारांच्या यादीकडे लागले होते. त्यात महायुतीत भाजपाने बाजी मारत ९९ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक समितीने या ९९ जणांना निवडणुकीची संधी दिली आहे.

या यादीत मुंबईतल्या १४ जागांवरही भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केलेत. त्यात ३ विद्यमान आमदारांना अद्याप प्रतिक्षेत ठेवण्यात आलं आहे.

मुंबईतल्या या १४ जागांवरील उमेदवार कोण?

दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विलेपार्ले – पराग आळवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर

भाजपाच्या पहिल्या यादीत बोरिवली येथील आमदार सुनील राणे, वर्सोवा येथील भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्व येथील पराग शाह या ३ विद्यमान आमदारांना प्रतिक्षेत ठेवले आहे. बोरिवली येथे भाजपाने खासदारकीचं तिकिट कापलेले गोपाळ शेट्टी हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांचं तिकिट कापण्यात आलं होते. त्यामुळे बोरिवली विधानसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना भाजपा तिकीट देऊ शकते असं बोललं जाते.

घाटकोपर पूर्व येथे मागील निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले प्रकाश मेहता यांचं नाव आघाडीवर आहे. प्रकाश मेहता हे माजी मंत्री आहेत, परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली होती. आता घाटकोपर पूर्व येथील पराग शाह यांच्याऐवजी प्रकाश मेहतांच्या नावाची चर्चा आहे. तर वर्सोवा येथील भारती लव्हेकर यांचीही उमेदवारी धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील या जागांवर भाजपा कुणाला संधी देतं ते पाहणे गरजेचे आहे.

कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे पर्वतीतून माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी जाहीर:भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

दौण्ड : ॲड राहुल कुल,चिंचवड : शंकर जगताप,भोसरी : महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर

उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कामठी येथून निवडणूक लढवणार

पुणे-कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे पर्वतीतून माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे .

भाजपाच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार

  1. दौण्ड : ॲड राहुल कुल
  2. चिंचवड : शंकर जगताप
  3. भोसरी : महेश लांडगे
  4. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे
  5. कोथरुड : चंद्रकांतदादा पाटील
  6. पर्वती : माधुरी मिसाळ
  7. सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख
  8. अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी
  9. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख
  10. मान : जयकुमार गोरे
  11. कराड दक्षिण : डॉ. अतुल भोसले
  12. सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
  13. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक
  14. इचलकरंजी : राहुल आवाडे
  15. मीरज : सुरेश खाडे
  16. सांगली : सुधीर गाडगीळ
उमेदवारी जाहीर होताच चंद्रकांत दादांनी पेढे वाटप करत मोदी-शहांचे अन फडणवीसांचे आभार व्यक्त केले

रविवारी भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 99 नावे आहेत. 13 जागांवर महिलांना तिकीट देण्यात आले आहे. 6 जागा एसटीसाठी आणि 4 जागा एससीसाठी आहेत.

कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे पर्वतीतून माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे .तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी जाहीये झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातून तर नितीश राणे यांना कणकवलीतून तिकीट मिळाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द न केल्याने नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. नितेश राणे सध्या मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत.

गौरी लंकेश मर्डर केसमधील आरोपीच्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळेंची शिंदेंवर टीका:म्हणाल्या – राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजण्यामागे हे एक प्रमुख कारण

पुणे-पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोप श्रीकांत पांगारकर याने शनिवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे पक्षप्रवेशानंतर पांगारकर यांची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती देखील केली. श्रीकांत पांगारकरांच्या पक्षप्रवेशावरुन विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
हे अतिशय धक्कादायक आहे. गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण असल्याचे सुळे यांनी म्हटले. प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे. म्हणूनच महाराष्ट्राला खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.श्रीकांत पांगारकर हे पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याच्या संपर्कात असल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे एसआयटीने श्रीकांत पांगाकरला 2018 मध्ये अटक केली होती. 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरांचा जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता त्यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

हडपसर कोणाला ? महायुतीतही तिढा कायम

पुणे- महायुती मधील घटक पक्ष असलेल्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे हडपसर मतदार संघातून विद्यमान आमदार असून येथूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाना भानगिरे यांनी उमेदवारी मागितली आहे. यामुळे हडपसर मतदार संघातून एकीकडे महाविकास आघाडीतील खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार बांधणी केली असताना प्रशांत जगताप यांनी येथून लढण्याची तयारी केली असताना, ठाकरेंच्या शिवसेनेने देखील महादेव बाबर यांच्यासाठी कंबर कसलेली असताना महाविकास आघाडीत तिढा तसा महायुतीतला हा तिढा देखील अद्याप सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही स्तरावर येथून उमेदवारी साठी मोठी रस्सी खेच निर्माण झाली आहे. सत्तेत असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोहोंचे उमेदवार येथे हट्टाला पेटले आहेत तर विरोधी पक्षातील म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील दोहोंचे उमेदवार देखील हट्टाला पेटले आहेत. यामुळे हडपसर विधानसभा मतदार संघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून‘कोथरूड’ दिवाळी अंकाचं प्रकाशन…

पुणे-कोथरूड सारख्या उपनगरावर विशेष दिवाळी अंकाची निर्मिती होते, ही माझ्यासारख्या कोथरुडवासियासाठी आनंद देणारी बाब आहे. कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, समाजकारण आणि राजकारण… अशा सर्वांगाने कोथरुड परिपूर्ण असून या कोथरुडने या देशालाही बरेच काही दिले आहे. त्यामुळे कोथरुडवरील हा दिवाळी अंक निश्चितच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.असे उद्गार येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले .

ते म्हणाले,’ दिवाळी अंक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक माहेरघर पुण्याला मानलं जातं आणि पुण्याचं कोथरूडला ! आणि हाच धागा लक्षात घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून मेनका प्रकाशननं या वर्षी ‘कोथरुड दिवाळी अंका’ची निर्मिती केली याचे मला कौतुक आहे आणि माझ्या खूप शुभेच्छाही आहेत कोथरुडसारख्या उपनगरावर विशेष दिवाळी अंकाची निर्मिती होते, ही माझ्यासारख्या कोथरुडवासियासाठी आनंद देणारी बाब आहे. कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, समाजकारण आणि राजकारण… अशा सर्वांगाने कोथरुड परिपूर्ण असून या कोथरुडने या देशालाही बरेच काही दिले आहे. त्यामुळे कोथरुडवरील हा दिवाळी अंक निश्चितच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह रवींद्रजी वंजारवाडकर, उच्च-तंत्रशिक्षण मंत्री श्रीचंद्रकांतदादा पाटील, प्रा. मिलिंद जोशी, वैशाली करमरकर, डॉ. सलिल कुलकर्णी, मनेका प्रकाशनचे अभय कुलकर्णी , सुकृत करंदीकर यांच्यासह कोथरुडकर उपस्थित होते.

कोथरूड,शिवाजीनगर भाजपचे मोहरे तेच… बालवडकर करणार काय ? याबाबत उत्सुकता..

पुणे- भाजपची उमेदवार यादी अद्याप अधिकृत रित्या जाहीर झाली नसली तरी यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यादी दाखवून त्याबाबत त्यांचे मत घेतल्यावर काही अत्यल्प जागा वगळता अंतिम यादी तयार असल्याचे वृत्त आहे. आणि या यादीची माहिती बावनकुळे,फडणवीस,चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांना असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे. एकूणच सूत्रांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून चंद्रकांतदादा पाटील यांची कोथरूड मधून तर सिद्धार्थ शिरोळे यांची शिवाजीनगर मधून उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जाते आहे.

कोल्हापूर मधून पुण्यात आल्यावर चंद्रकांत पाटलांनी जरी कोथरूडला आपलेसे केले असले तरी येथील स्थानिक नेत्यांनी या वेळी त्यांच्या विरोधात मोहीम उघडल्याचे दिसले आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उघडपणे मैदानात उतरून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला आव्हान देत स्वतः लढण्याची तयारी सुरु केली आहे.चंद्रकांत पाटील,दिल्ली स्थित एक पत्रकार,आणि खुद्द भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी बालवडकर यांना समजविण्याचा प्रयत्न केलाय पण त्यात त्यांना यश आल्याचे वृत्त नाही.मात्र कोथरूडमधून महाविकास आघाडीकडे फार भक्कम उमेदवार नसल्याने बालवडकर यांनी जरी बंडखोरी केली तरी चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या मतदारांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. अलीकडेच मनसे च्या काही स्थानिक नेत्यांनी बालवडकर यांची भेटही घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता बालवडकर नेमकी कोणती भूमिका घेणार यावरही पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळे यांनी ५ वर्षे सातत्याने ठेवलेला जनसंपर्क आणि इथल्या समस्या विधीमंडळात विनम्रतेने मांडून सोडविण्याचा केलेला प्रयत्न हेच त्यांच्या यशाचे मूळ कारण असणार आहे. त्यांना पक्षातूनही फारसा विरोध नाही आणि कॉंग्रेस कडे त्यांच्या विरोधात इच्छुक असलेल्यामध्येच मोठी फाटाफूट दिसून आलेली आहे.

पर्वतीत तुतारी कि पंजा…? बागुल मुंबईत तळ ठोकून…

पुणे- मला आमदार व्हायचंय असे जवळपास कित्येक टर्म सांगत आणि आयत्यावेळी राष्ट्रवादीला मतदार संघ सुटल्याने माघार घेत गेली ४० वर्षे नगरसेवक पदावरच उत्कृष्ट काम करत राहिलेले कॉंग्रेसचे नेते आबा बागुल आता आपल्या राजकीय कारकिर्दीत टोकाच्या भूमिकेला पोहोचू शकतील असे चित्र आहे.बागुल यांनी गेली ३ दिवस मुंबईत तळ ठोकला आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या समवेत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आपण किती वर्षे नगरसेवक म्हणूनच काम करायचे ? आपल्याला आमदारकीची संधी देणार आहात कि नाही ? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. काल ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना भेटले तर आज सकाळी देखील त्यांनी भेटी गाठी सुरु केल्याचे वृत्त आहे.

पर्वती मतदार संघ नेहमी राष्ट्रवादीला कॉंग्रेसने आघाडी करताना सोडला आहे. येथून गेली ३ टर्म भाजप उमेदवार निवडून येत आहेत.आता सध्या भाजपा बद्दल नाराजी असल्याचे यावेळी निवडूनच येईल असे आबा बागुल असल्याचा दावा बागुल यांच्या समर्थकांच्या कडून केला जातोय.बागुल यांनी गेल्या लोकसभेला कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना उमेदवारी डावलून रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली तेव्हा बागुल यांना तुम्हाला आमदारकीची संधी देऊ असे आश्वासन पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिले होते.विधानपरिषद तर त्यांना दिली गेली नाहीच आता ते वारंवार प्रयत्न करत असलेल्या पर्वती मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गट आपल्या निष्ठावंत आणि जनसंपर्काने मतदार संघ भक्कम बांधलेल्या अश्विनी नितीन कदम यांना डावलून बागुलांच्या साठी पर्वती सोडणार कि नाही हे आता लवकरच समजणार आहे.राजकीय क्षेत्रात पर्वतीत कमळाच्या विरोधात तुतारी फुंकणार कि पंजा लढणार याबाबत आता उत्सुकता ताणली जाऊ लागली आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र निष्ठावंत आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली गेली पाहिजे असा आग्रह धरला आहे. वंदना चव्हाण आणि अन्य नेत्यांनी हा निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे घेतील असे म्हटल्याचे वृत्त आहे.

अनुच्छेद २१ अंतर्गत झोपेच्या अधिकाराचे उल्लंघन ED करते आहे: उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच फटकारले

मुंबई: नागरिक,आरोपी ,संशयित अगर गुन्हेगार प्रत्येक व्यक्तीला अनुच्छेद २१ अंतर्गत झोपेचा अधिकार आहे,या झोपेच्या अधिकाराचे उल्लंघन ED करते आहे असता ठपका ठेवत उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच फटकारले आहे.पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशीसाठी बोलविलेल्या व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्याऐवजी कार्यालयीन वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे परिपत्रक ईडीने जारी केले आहे.लोकांना रात्री उशिरापर्यंत चौकशीसाठी थांबवून ठेवण्यात येत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर ईडीने हे परिपत्रक जारी केले.

ज्यांची चौकशी करण्यात येत आहे, त्यांना ”झोपेचा अधिकार” आहे आणि त्यांच्या या अधिकाराचा आदर करा, असे न्यायालयाने म्हटले होते. ईडीने ११ ऑक्टोबरला जारी केलेले परिपत्रक केवळ विभागाअंतर्गतच जारी केले आहे. सार्वजनिक केलेले नाही, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने म्हटले.

ईडी त्यांचे परिपत्रक संकेतस्थळावर अपलोड करेल आणि ट्विटरवरही अपलोड करेल, हे सांगण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने केलेली अटक बेकायदा आहे, असे म्हणत व्यावसायिक राम इसरानी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यांना चौकशीसाठी पूर्ण दिवस वाट पाहायला लावत रात्रभर थांबविण्यात आले, याबद्दल न्यायालयाने ईडीला चांगलेच सुनावले.

अनुच्छेद २१ अंतर्गत झोपेचा अधिकार

  • राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकाला ”झोपेचा अधिकार” आहे आणि ईडीने त्याचे उल्लंघन केले आहे. झोप न मिळाल्यास व्यक्ती आजारी पडेल आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही मरीनं होईल. त्यामुळे चौकशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच करावी, असे न्यायालयाने एप्रिलमधील सुनावणीत म्हटले होते. त्यानुसार, ईडीने परिपत्रक काढले.
  • परिपत्रकानुसार, चौकशी अधिकाऱ्याने वेळेत चौकशी सुरू करावी आणि शक्य झाल्यास एक किंवा दोन दिवसांत पूर्ण करावी. चौकशीवेळी पूर्ण तयारीनिशी अधिकाऱ्याने उपस्थित राहावे. तसेच ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, अशा लोकांची चौकशी ठरावीक वेळेत करावी.
  • आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलवावे. केवळ अपवादात्मक प्रकरणातच उपसंचालक, सहसंचालक किंवा अतिरिक्त संचालकांच्या परवानगीने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतर चौकशी केली जाऊ शकते.

मविआ, महायुतीने किमान ३०/३० ब्राम्हण उमेदवार द्यावेत – ब्राह्मण महासंघाने दिला इशारा

राज्यातील विधानसभा निवडणुकांचीउमेदवार यादी घोषित करताना किमान ३०/ ३० उमेदवार ब्राम्हण असतील याची काळजी महायुती आणि मविआ या दोहोंनी घ्यावी अन्यथा ब्राम्हण समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा गर्भित इशारा ब्राम्हण आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात २८८ पैकी १० मतदारसंघ ब्राह्मणबहुल आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मिळून किमान ३० ब्राह्मण उमेदवार द्यावेत, अशी मागणी अ.भा. ब्राह्मण महासंघाने मविआ, महायुतीकडे केली आहे. राज्यात ब्राह्मण केवळ साडेतीन टक्के आहेत असे म्हणणे बंद करा आणि सत्तेतील वाटा द्या, असे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणालेे. महायुती आणि महाविकास आघाडीनेही याकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही न बोलताही बरेच काही करू शकतो असा इशाराही त्यांनी दिला.महाराष्ट्रात ब्राह्मणांची ८० हजार ते १ लाख २० हजार मतदार संख्या असलेले दहा मतदारसंघ आहेत. कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, चिंचवड, डोंबिवली, विलेपार्ले, दक्षिण पश्चिम, नाशिक आदींचा त्यात समावेश आहे. ३० ते ५० हजार मतदार असणारे ३७ मतदारसंघ आहेत. सर्व राजकीय पक्षांनी ठरवल्यास किमान २७ ते २८ मतदारसंघात ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळू शकते असे कुलकर्णी म्हणाले.

महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के ब्राह्मण आहेत. त्यांची संख्या सुमारे १ कोटी १० लाख आहे. यामध्ये जवळजवळ ६० टक्के देशस्थ आणि २० टक्के चित्पावन ब्राह्मण आहेत. २० टक्के इतर असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात १२% ब्राह्मण आहेत आणि ते प्रमुख मतदार गट आहेत. पण, महाराष्ट्रात ब्राह्मण एकजूट होत नाही अशी खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. आपण केवळ महाराष्ट्रीय ब्राह्मणांना एकत्र धरतो. पण, महाराष्ट्रात मोठ्या संख्येने पंजाबी, दाक्षिणात्य, उत्तर प्रदेेशी, राजस्थानी, गौड सारस्वत आणि इतर शाखीय ब्राह्मण राहातात. या सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवली तर राजकीय पक्षांना ब्राह्मणांचा विचार उमेदवारी देताना करावाच लागेल. पण दुर्दैवाने दिशा एक नसल्याने ब्राह्मण मागे फेकले जातात असे कुलकर्णी यांनी सांगितले. देशात १९३१ सालच्या जातनिहाय जनगणनेनंतर पुन्हा तशी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात नेमके कोणत्या जातीचे किती लोक राहतात याची ठोस आकडेवारी नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते ढोबळमानाने महाराष्ट्रातील ब्राह्मणांची लोकसंख्या ५.५ टक्के नाेंदवली होती. त्यालाही आता ९३ वर्षे होऊन गेली. बिहारने केलेल्या जात गणनेनुसार तिथे ब्राह्मण ३.६५ टक्के आहे असे कुलकर्णी म्हणाले.

पुण्यातील कसबा मतदारसंघातून ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी करणारे पत्र ब्राह्मण संघटनेने प्रसिद्ध केले आहे. भाजप आणि शिंदेसेना हिंदुत्ववादाचा प्रचार करीत असल्यामुळे त्यांनी राज्यभरात किमान ३० ब्राह्मण उमेदवार उभे करावेत, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच कसबा मतदारसंघ हा ब्राह्मणबहुल असल्याने या ठिकाणी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी भालचंद्र कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

एसआरएच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरुध्द ACB ची कारवाई

पुणे:बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) कार्यालयातील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरुध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
शिरीष रामचंद्र यादव आणि प्रतीक्षा शिरीष यादव अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध उत्पन्नापेक्षा अधिक एक कोटी ३८ लाख ७४ हजार रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. उत्पन्नात विसंगती आढळून आल्याने यादव यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. परंतु संधी देऊनही त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. चौकशीदरम्यान, यादव यांनी भ्रष्ट मार्गाने बेहिशोबी मालमत्ता धारण केली. त्यासाठी पत्नी प्रतीक्षा यांनी प्रेरणा दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबत ‘एसीबी’कडून बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
त्यावरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कटके करीत आहेत.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने पुण्यातील एका प्रख्यात बड्या सराफाकडे मागितली10 कोटीची खंडणी

पुणे:लॉरेन्स बिश्नोई टोळीने पुण्यातील एका प्रख्यात बड्या सराफाकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. खंडणी न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी ईमेलवरून देण्यात आली आहे. जर तुम्हाला बाबा सिद्दीकीप्रमाणे तुमचा जीव गमवायचा नसेल तर लॉरेन्स बिश्नोई टोळीला 10 कोटी रुपये द्या, असे धमकीच्या ईमेलमध्ये नमूद केले आहे.पैसे केव्हा आणि कसे द्यायचे याचा तपशील दुसऱ्या ईमेलवर पाठवला जाईल. याची माहिती पोलिसांना दिली गेली तर बरे होणार नाही, असे म्हटले आहे.

पोलीस सहआयुक्त रंजन कुमार म्हणाले, “आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीची मागणी करणारा ईमेल आला आहे,

निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांचा हेल्मेट आणि रस्ता सुरक्षेबाबत सिम्बायोसीसच्या विद्यार्थ्यांशी संवाद

पुणे, दि. १९: सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी विमाननगर येथील सिम्बायोसीस लॉ कॉलेज येथील विद्यार्थ्यांसोबत रस्ता सुरक्षेबाबत संवाद साधला.

यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, सिम्बायोसीस लॉ कॉलेजच्या संचालक डॉ. शशिकला गुरपुर, उप संचालक अपराजिता मोहंती आदी उपस्थित होते.

सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. सप्रे म्हणाले, रस्ते अपघातामध्ये दुचाकी अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या मोठी असून या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. याकरिता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करून, इतर सर्व महाविद्यालयांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन श्री. सप्रे यांनी केले.

राज्यामध्ये रस्ता सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे नमूद करुन ते म्हणाले पुण्यामध्ये दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे दिसून येते. ही परिस्थिती विद्यार्थ्यांनी बदलावी असे आवाहनही श्री. सप्रे यांनी केले. तसेच सिम्बायोसीस लॉ कॉलेज यांनी रस्ता सुरक्षेसंदर्भात महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा क्लब स्थापन करावा, अशी सूचना त्यांनी केली.

श्री. भिमनवार म्हणाले, रस्ता सुरक्षा हा महत्वाचा विषय असून याकरिता परिवहन विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याबद्दल नमुद केले. राज्यामध्ये मागील दोन वर्षात रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे नमूद केले. तसेच सिम्बायोसीस लॉ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हेल्मेटचा वापर करून रस्ता सुरक्षेसंदर्भात एक चांगले उदाहरण दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मोहंती यांनी केले.
0000

पुणे शहरात हेल्मेटसक्ती साठी बैठकावर बैठका…

न्यायमुर्ती श्री.अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली वाहन उत्पादक आणि वाहन वितरकांची बैठक संपन्न

वाहन वितरकांनी सीएसआर फंडामधून रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करावी-न्यायमूर्ती अभय सप्रे

पुणे,दि.१९:- वाहन उत्पादक कंपनी व वाहन वितरक यांनी केवळ व्यवसायीक दृष्टीकोन न ठेवता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सीएसआर फंडातून रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.अभय सप्रे यांनी केले.

विधान भवनातील झुंबर हॉल येथे मोटार वाहन उत्पादक कंपनी व वाहन वितरकांच्या बैठकीत ते बोलत होते. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यावेळी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री.सप्रे म्हणाले, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी याकरिता वाहन वितरकांनी ग्राहकांचे प्रबोधन करावे तसेच हेल्मेटचा वापर करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. कायद्यातील तरतूदीनुसार ग्राहकास दुचाकीसोबत मोफत हेल्मेट देणे बंधनकारक आहे. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. वाहन उत्पादक कंपन्या व वाहन वितरक यांनी परिवहन विभाग तसेच पोलीस विभागासोबत ताळमेळ ठेवून रस्ता सुरक्षा संदर्भात वाहनधारकांना मार्गदर्शन करावे. वाहनचालकांना विशेषकरुन तरुणवर्गाला वाहतूक नियमांची माहिती होण्यासाठी ‘ट्रॅफीक पार्क’ सारखे उपक्रम राबवून त्यांच्यामधे रस्ता सुरक्षेसंदर्भात जागृती होईल याकरिता प्रयत्न करण्याचे न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी आवाहन केले.

वाहनाचा वीमा न काढताच वाहनचालक रस्त्यावर वाहने चालवतात ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा वाहनचालकांवर कायद्याच्या चौकटीत तातडीने दंडनीय कारवाई करावी असे सांगून पाच वर्षासांठी त्रयस्थ पक्ष विमा वाहनचालकांनी काढावा यासाठी वाहन उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करावा, यामुळे अपघातग्रस्तांना आर्थिक मदत होईल असे न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी सांगितले केले.

परिवहन आयुक्त श्री.भिमनवार यांनी, मागील मागील दोन वर्षामध्ये वाहन उत्पादक कंपन्यांनी सीएसआर फंडातून रस्ता सुरक्षे संदर्भात उपाययोजना करण्यासंबंधी पुढाकार घेतला नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली.
वाहन उत्पादक कंपन्यांनी एखाद्या विशिष्ट भागावरती लक्ष केंद्रित करून रस्ते सुरक्षे संदर्भात कार्य करावे, रस्ता सुरक्षा संदर्भात परिवहन विभागाकडे वेगवेगळ्या संकल्पना असून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरिता सीएसआर फंडातून खर्च करण्याकरिता कंपन्यांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. वाहन धारककांनी हेल्मेट, सीटबेल्ट वापरणेबाबत तसेच रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत वाहन उत्पादक कंपन्यांनी जनजागृती करावी असे आवाहन केले. बैठकीकरिता उपस्थित वाहन उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व वाहन वितरक यांनी सीएसआर फंडातून रस्ता सुरक्षेसंदर्भात कामकाज करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस वाहन उत्पादक कंपनी व वाहन वितरक यांचे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड तसेच परिवहन विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
०००