Home Blog Page 630

5 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी खरेदीसाठी होणार्‍या गर्दीमुळे चारचाकीसाठी शिवाजी रोड बंद


पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. खरेदीकरीता येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यातच पार्क करीत असल्याने मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चार चाकी वाहनांना शिवाजी रोडने जाण्यास मनाई केली आहे. हा बदल ५ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे, असा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (यांनी काढला आहे.

शिवाजीनगरवरुन शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स़ गो़ बर्वे चौकामधून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – जंगली महाराज रोडने, टिळक चौकातून इच्छितस्थळी जातील.

स्वारगेटवरुन बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौकमार्गे जाणारी चारचाकी वाहने पुरम चौकामधून डावीकडे वळून टिळक रोडने एस पी कॉलेज, अलका चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग – बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.

फुटका बरुज वरुन जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग – शिवाजी रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.

शनिपार चौकाकडून मंडईकडे जाणारी वाहतूक व कुमठेकर रोडवरुन मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.

पार्किंगबाबत

बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व मंडई या भागामध्ये खरेदीकरीता येणार्‍या नागरिकांनी त्यांची वाहने बाबु गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ या ठिकाणी पार्क करावीत.

दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुशासन सप्ताहाला सुरुवात

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले उद्घाटन

मुंबई दि. २२ ऑक्टोबर : सुशासन ही व्यापक संकल्पना असून अधिकारी- कर्मचारी यांनी प्रशासकीय दैंनदिन कामामध्ये परिणामकारकता, पारदर्शकता, सहभागीता, प्रतिसादकता, उत्तरदायित्य, कायद्याचे न्याय या सहा सूत्रांचा वापर केल्यास कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा होऊन अधिकाधिक प्रभावी पद्धतीने कामकाज होईल असा विश्वास महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी व्यक्त केला. मंगळवारी सुशासन सप्ताहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या की, कोणत्याही संस्थेचा कर्मचारी हा महत्वाचा घटक आणि त्या संस्थेचा कणा असतो. त्यामुळे अधिकारी- कर्मचारी यांनी बदलत्या काळाबरोबर आवश्यक सर्व प्रशासकीय घटक अंगभूत असणे गरजेचे आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी ही जगतिकदर्जाची चित्रनगरी असून चित्रनगरीमध्ये गेल्या 47 वर्षात देशो-विदेशातील चित्रीकरण झाले आहे. परंतू या महामंडळाचे केवळ चित्रीकरण करणे हे एकमेव ध्येय नसून “कॅमेरा टु क्लाउड” अशा स्वरूपाचे काम करणे अर्थात चित्रपट, नाटक, सांस्कृतिक क्षेत्र, अशा विविध क्षेत्रात भरीव काम महामंडळाच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करायचे आहे. यासाठी कौशल्याभिमुख आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा अधिकारी-कर्मचारीवर्ग येत्या काळात निर्माण करण्यासाठी विविध कर्मचाऱ्यांसाठी असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रस्तावना करतांना सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी उपक्रमाचा उद्देश विषद केला. पुढे ते म्हणाले की, टीमवर्क म्हणून काम केल्यास कामाची गती वाढते, त्याचा परिणाम लाभार्त्याना मिळणारे लाभ जलदगतीने मिळण्यास सहाय्यभूत ठरते. तसेच दैनंदिन काम करताना आपल्या सहकाऱ्यांमध्ये सुसंवाद असायला हवा, प्रत्येक कामाची एक कार्य पद्धती ठरलेली असायला हवी आणि ती त्या पद्धतीने पार पाडायला हवी. महामंडळामध्ये काम करत असताना शासनाच्या चांगल्या गोष्टी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी या दोन्हींचा संगम करता यायला हवा असे मत सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, उप अभियंता ( स्थापत्य ) विजय बापट, उप अभियंता ( अभियांत्रिकी ) अनंत पाटील, व्यवस्थापक कलागरे सचिन खामकर, व्यवस्थापक ( नियोजन ) मुकेश भारद्वाज, उप मुख्य लेखाधिकारी राजीव राठोड, सहायक कलागरे मोहन शर्मा, रुचिता पाटील, अनिता कांबळे, अक्षता शिगवण, मंगेश राऊल, प्रेरणा देवळेकर आदि कर्मचारी उपस्थित होते.

अनिरुद्ध देशपांडे यांनी प्रशासकीय कार्य पद्धतीबाबत केले मार्गदर्शन

सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांचे पहिले सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रशासकीय कामाची उत्तम जाण असणार्या श्री. देशपांडे यांनी प्रशासकीय कार्य पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी टिपणी लेखन, पत्र लेखन तसेच शासनाकडून आलेले पत्र व्यवहार कसे करावे याबाबत उदाहरणासह अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दरम्यान महामंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

रुग्णांनी इच्छाशक्ती आणि सकारात्मकता दाखविली तर कर्करोगाचा रुग्ण निश्चित बरा होतो.

महिला स्नेहमेळाव्यात डॉ. सुमित शहा यांचे प्रतिपादन
 – प्रोलाईफ कँसर सेंटर येथे महिलांचा स्नेहमेळावा

पुणे : प्रोलाईफ कँसर सेंटरमध्ये दहा ते बारा वर्षांपूर्वी उपचार घेतलेले काही रुग्ण असून ते ठणठणीत आहेत व इथे आले आहेत. कारण उपचारांबरोबरच रुग्णाची इच्छाशक्ती, कुटुंब आणि नातेवाईक हे यांचा सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा असतो. रुग्ण बरा झाला की त्याला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यायला हवे, त्यासाठी कर्करोग रुग्णाला सहानुभूती दाखवू नका. आज तुम्ही जे जमलेले आहात हे ‘गॅदरिंग ऑफ स्ट्रेंथ’ आहे. हीच सकारात्मक ताकत नवीन रुग्णाला ऊर्जा देते, असे मत गुलटेकडी येथील प्रोलाईफ कँसर सेंटरचे लॅप्रोस्कोपीक कॅन्सर सर्जन डॉ. सुमित शहा यांनी व्यक्त केले.

प्रोलाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिटय़ूट आयोजित स्तन कर्करोगाच्या प्रवासातील साहसी महिलांचा स्नेहमेळावा मंगळवारी दि. 22 रोजी गुलटेकडी प्रोलाईफ कॅन्सर सेंटर व रिसर्च इन्स्टिट्युट येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. स्तनांच्या कर्करोगाचा सामना करून उभ्या राहिलेल्या बहादुर महिलांच्या प्रवासाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास दृढ करण्यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्करोगामधून बरे झालेले रुग्ण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व कर्करोगतज्ज्ञ डॉ. शोना नाग म्हणाल्या की जीवनशैली पूर्वीप्रमाणे सुरू ठेवा प्रोटीन डायट घ्या. पालेभाज्या, जिरे, हळद महत्वाची. तसेच उसळ मटकी, डाळी, बाजरी नाचणी राजगिरा खा. जिम करा. उपचार झालेल्या हाताची काळजी घ्यावी. भारतीय महिला या परिवाराच्या काळजी बाबत जागरूक असतात तसेच त्यांनी स्वतः कडे लक्ष दिले पाहिजे.

यानंतर कर्करोग फिजिओथेरपिस्ट रेणुका देशपांडे, यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, कर्करोग झाल्यावर आराम करायला हवा असे सांगितले जाते. परंतु असे काही नाही. या रुग्णाला फिजिओथेरपी फार महत्वाची असते. व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात. स्टॅमिना वाढतो. व्यायाम करा, काही पाऊले चाला. कितीतरी बॉलिवूड ऍक्टर्स आहेत त्या बऱ्या झाल्या आहेत. किमोथेरपी सुरू झाल्यावर लगेच मेनोपॉज सुरू होतो. ज्या महिलांना वयाच्या 30 ते 35 मध्ये कर्करोग होतो त्यांना लवकर पाळी बंद होते. त्यामुळे हाडे ठिसूळ व्हायला लागतात. व्यायाम केला की थकाल आणि झोप चांगली लागते.

यावेळी कर्करोग रुग्ण रेखा शहा अनुभव सांगताना म्हणाल्या, “2020 मध्ये मणका आणि स्तनाला कर्करोगाचे निदान झाले. मणक्याला रेडिएशन झाले. मला डॉ सुमित यांचा खूप उपयोग झाला. मी दर तीन महिन्याला प्रोलाईफ कँसर सेंटरला येते. सकारात्मक राहते. मी आनंदी आहे. घरी सर्व काम करते. यावेळी इतर रुग्ण शमा घुगे, शहाजहान इनामदार यांनीही त्यांचे अनुभव व्यक्त केले.

रुग्णाचे नातेवाईक ममता कांबळे म्हणाल्या की, माझ्या आईला गेल्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले. आम्ही डॉ. सुमित शहा यांच्याकडे उपचार केले. पण आई खूप सकारात्मक होती. ती खूप कणखर आहे. उपचार इतके छान झाले की असे वाटले नाही की तिला कर्करोग आहे. हा शेवटचा टप्पा नाही त्यापुढेही जीवन जगू शकतो.

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर,निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगाबाहेर येणार

मुंबई- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल झालेले वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ते मागील 2 वर्षांपासून तुरुंगात होते. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सचिन वाझे यांना मनसूख हिरेन हत्याकांड व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महानगरातील रेस्टॉरंट व बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातही सचिन वाझे यांचे नाव आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात होते.

सचिन वाझे यांनी नियमित जामिनासाठी काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यात त्यांनी या प्रकरणातील अनिल देशमुखांसह इतर सर्वच आरोपींना जामीन मंजूर झाल्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली होती. कोर्टाने त्यांचा हा युक्तिवाद मान्य करत त्यांना जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गत 23 ऑगस्ट रोजी वाझे यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज जारी करण्यात आला. त्यानुसार सचिन वाझे यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सचिन वाझे यांनी या प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारीही दर्शवली होती, पण ईडीने त्याला कडाडून विरोध केला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचमधील पीएसआय आहेत. त्यांच्या नावावर तब्बल 63 एन्काउंटर आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसच्या मृत्युमुळे ते वादात सापडले होते. युनूसचा 2004 मध्ये कोठडीत मृत्यू झाला गहोता. त्यामुळे वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर वाझे यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला. पण सरकारने 2007 मध्ये तो फेटाळून लावला. त्यानंतर 2008 मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाझे जून 2020 मध्ये पुन्हा पोलिस सेवेत रुजु झाले.

निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. २२: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) गठित करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण या समितीकडून करुन घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमे (सोशल मीडिया) तसेच फिरत्या एलईडी व्हॅन, ऑटो रिक्षा आदी बाह्यमाध्यमांवरून देण्यात येणाऱ्या श्राव्य (ऑडिओ), दृकश्राव्य (ऑडिओ-व्हीज्युअल) जाहिरांतीचे पूर्व प्रमाणीकरण या समितीमार्फत केले जाते. तर मुद्रीत माध्यमात (प्रिंट मीडिया) मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाच्या जाहिराती समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयासमोर, पुणे- ४११००१ येथून चालणार असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२१३०७ असा आहे.

माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज:
टीव्ही चॅनेल, रेडिओ, एफएम, सिनेमागृह, सोशल मिडीया, एसएमएस, दूरध्वनीवरील रेकॉर्डेड व्हॉईस कॉलद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या जाहिराती (आऊटबाऊंड डायलिंग– ओबीडी), वृत्तपत्रांच्या इ-आवृत्तीतील जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्या दृक-श्राव्य जाहिरातींसाठी प्रसारणपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विहीत नमुन्यातील इंग्रजी किंवा मराठी भाषेतील अर्ज दोन प्रतींमध्ये आवश्यक माहिती भरुन सादर करण्यात यावा. अर्जासोबत दोन सीडी/पेनड्राईव्ह (सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्या टंकलिखीत मजकुराच्या दोन प्रती – ट्रान्सस्क्रीपट) सादर करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांच्या जाहिराती राज्यस्तरावरील समितीकडून प्रमाणित केल्या जातात.

प्रत्येक ऑडिओ जाहिरात किंवा ऑडिओ-व्हीज्युअल जाहिरात ही स्वतंत्र असावी. एकाच सीडी, पेनड्राईव्हमध्ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नयेत. अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता, जाहिरात कोणत्या उमेदवारासाठी आहे. त्याचे नाव, पक्षाचे नाव, जाहिरात कुठे दाखवणार, जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरातीतील भाषा याचा स्पष्ट उल्लेख असावा. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्य असावा. इतरांची बदनामी करणारा, जाती-जातींमध्ये, धार्मिक तेढ निर्माण करणारा नसावा. देशविघातक कृत्याला प्रोत्साहन देणारा नसावा. समितीमार्फत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष (मीडिया सेल) हा ए-विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२०- २९९७२८७२ असा आहे. या ठिकाणाहून माध्यमांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाज माध्यमांचे संनियंत्रण येथून होत आहे.

५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे नेत्याच्या घरापर्यंत पोहचवले गेले-निवडणूक आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केलीय

रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

पुणे / प्रतिनिधी
निवडणूक आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी रुपये सापडले. यातील ५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले गेले, अशी माहिती काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मंगळवारी दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. खेड शिवापुर टोल नाक्यावर खाजगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोखड जप्त केली. सुरुवातीला ही रक्कम १५ कोटी असे जाहीर केले गेले होते. नंतर ५ कोटी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उर्वरित १० कोटी आमदारांच्या घरापर्यंत पोचवण्यात आले, अशी धक्कादायक माहिती आमदार रविंद्र धंगेकर यांनी यावेळी दिली.

गाडी अडवल्यानंतर १५ कोटी सापडले होते. नंतर ५ कोटी सांगण्यात आले. या वेळी सर्व अधिकारी असताना कोणावरही कारवाई झाली नाही. उलट उर्वरित रक्कम शहाजी बापू च्या घरी पोचवण्यात आली. निवडणूक यंत्रणा कुठे आहे? पंचनामा का झाला नाही? दोषींवर कारवाई का झाली नाही? कारमध्ये असलेल्या लोकांवर गुन्हा का दाखल झाला नाही? म्हणून या सर्व प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

माझा मित्रपरिवार ‘आनंदाची दिवाळी’ नागरिकांना भेट म्हणून देतो. यंदाही ‘आनंदाची दिवाळी’ माझा मित्रपरिवार देत असावा. सर्वांच्या आनंदात सहभागी होणे, या भावनेने मित्रपरिवार दरवर्षी हा उपक्रम घेतो. या उपक्रमात मी स्वतः हजर नव्हतो, पैसे वाटत नव्हतो तरीसुद्धा माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुण्याचे पोलीस भाजपचा अजेंडा राबवत आहेत. त्यांना गाडीत कोट्यवधीची रक्कम सापडणे गुन्हा वाटत नाही, असेही आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले.

संबंधितांवर गुन्हा दाखल करा-महायुती सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर करून आचारसंहितेचा भंग होत आहे. रेशनिंग दुकानातून रेशन कार्डधारकांना देण्यात येणाऱ्या शिध्याच्या पिशवीवर पंतप्रधान, मावळते मुख्यमंत्री, मावळते दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा फोटो लावून त्यांची जाहिरात सुरू आहे. हा आचारसंहितेचा भंग असून याबाबत तातडीने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पुणे शहर व जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे, असेही ते म्हणाले.

खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकीसाठी नियुक्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. 22: खडकवासला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघात नियुक्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.

मनुष्यबळ प्रशिक्षण कक्षामार्फत सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्राच्या 200 मीटर भोवतालची तसेच परिसरातील सुरक्षा व्यवस्था, मतदान केंद्राजवळ उभारल्या जाणा-या विविध राजकीय पक्षांच्या बूथबद्दलची नियमावली, मतदानासाठी आलेल्या मतदारांची शिस्त याबद्दल डॉ. माने यांनी माहिती दिली. मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सूक्ष्म नियोजन आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. मतदान प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार अथवा नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील डॉ. माने यांनी यावेळी दिले.

निवडणुकीदरम्यान पोलीस यंत्रणेचे कर्तव्ये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रशिक्षण कक्ष प्रमुख माधुरी माने आणि तुषार राणे यांनी पोलीस पथकातील अधिकारी कर्मचा-यांना माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यात पोलीस यंत्रणेची भूमिका, जबाबदाऱ्या, आव्हाने आणि त्या संदर्भातले निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले नियम याबद्दल विस्तृत मार्गदर्शन या प्रशिक्षणामध्ये करण्यात आले.

वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर


पुणे : वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक यांचा एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला १८ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ९ दिवसांचा अभ्यास दौरा आयोजिला आहे. ही टीम नुकतीच थायलंडला पोहोचली.
वैश्विक समरसता कार्यक्रमात एआयटीमध्ये चार दिवसांचा दौरा असून, येथे एआयटीमधील तज्ज्ञ प्राध्यापकांची अभ्यागत व्याख्याने, कॅम्पस सहल, नेटवर्किंग, रॉबर्ट बॉश, सियाम सिमेंट ग्रुप अशा उद्योगांना भेटी असतील. दोन दिवस पटाया येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण होईल. त्यानंतर बुद्ध मंदिराचे दर्शन व फ्लोटिंग मार्केटला भेट होणार आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया दिली.

परस्पर शैक्षणिक सहकार्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने अलीकडेच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण, क्षमता संवर्धन आणि इतर परस्पर फायद्याच्या उपक्रमांना चालना देण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. त्याअंतर्गत हा अभ्यास दौरा होत आहे. या वैश्विक समरसता कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना बँकॉक या व्हायब्रँट शहरात शैक्षणिक समरसता, औद्योगिक अनुभव आणि सांस्कृतिक समृद्धी यांचे एक अद्वितीय मिश्रण अनुभवता येणार आहे. यातून त्यांना एक सर्वसमावेशक, समृद्ध आणि परिवर्तनशील शैक्षणिक अनुभव मिळणार असून, सांस्कृतिक समरसता आणि करिअर वाढीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात शाश्वत करिअर घडविण्याची संधी देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे. यातून विद्यार्थ्यांना जागतिक व्यवसायाच्या वेगाने बदलणाऱ्या क्षेत्रात प्रगतीसाठी आवश्यक कौशल्ये आणि अंतर्दृष्टी मिळेल, असा विश्वास असल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. आशियातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या ‘एआयटी’ची स्थापना वाढत्या अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, संशोधन आणि क्षमता निर्मितीच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने १९५९ मध्ये झाली होती. जागतिक अर्थव्यवस्था व शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतील, असे योग्य व समर्पित भावनेने काम करणारे व्यावसायिक घडविण्याचे ध्येय घेऊन एआयटी आजवर कार्यरत आहे. व्यवसायाभिमुख, संशोधनात्मक आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतीमुळे एआयटीमध्ये शिकणाऱ्या पदवीधरांना आशिया आणि त्यापलीकडे व्यावसायिक यश आणि नेतृत्व प्राप्त होते.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षण देणारी संस्था असून, शालेय शिक्षणापासून ते कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पर्यंतचे विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून दिले जातात. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने आणि नामवंत विद्यापीठांशी संलग्नित बिझनेस मॅनेजमेंट, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमर्स, ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कम्प्युटर ऍप्लिकेशन्स, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, एज्युकेशन, अनिमेशन, विधी व न्याय, सायबर सिक्युरिटी, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, फिल्म मेकिंग, ब्युटी अँड वेलनेस, हेल्थ अँड फिटनेस, परफॉर्मिंग आर्टस् आदी शाखांमध्ये अभ्यासक्रम शिकवले जातात.

ऑगस्ट २०२३ मध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी एआयटी कॅम्पसला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सूर्यदत्त आणि एआयटी यांच्यातील संभाव्य सहकार्य कराराबाबत तेथील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या संचालक डॉ. सुमना श्रेष्ठा आणि विशेष पदवी कार्यक्रम संचालक व भूगणितशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नितीन कुमार यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर या दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक आदानप्रदानाविषयी सामंजस्य करार झाला. ‘सूर्यदत्त’च्या प्रमुख टीमच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट

रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे

दिल्ली दि.२२: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रहाटकर यांच्या कामाचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली आहे. यामध्ये त्यांनी महिलांच्या लैगिक छळाबाबत आवाज उठवत मोलाचे कार्य केले. तसेच यादरम्यान त्यांनी महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. याखेरीज त्या प्रत्येक गोष्टींची माहिती ठेवत असतात. छत्रपती संभाजी नगर पासून ते राजस्थान भाजपच्या सहप्रभारी असलेल्या विजया रहाटकर यांच्यासोबत कायम संवाद होत असतो. त्या एक व्यक्ती म्हणून देखील चांगल्या असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना व ए. वेंकादेश बाबू यांची माध्यम कक्षाला भेट

पुणे, दि. २२: विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना (आयआरएस,) व ए. वेंकादेश बाबू (आयआरएस) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणूक खर्च निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.मीना आणि श्री.ए.वेंकादेश बाबू यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवडणूक खर्च समन्वय अधिकारी सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे यावेळी उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली.

माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. श्री. यमगर यांनी खर्च नियंत्रण कक्षातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

निवडणूकीसंबधीचे कामकाज जबाबदारीने पार पाडावे-निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले

पुणे,दि.२२:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज महत्त्वाचे व जबाबदारीचे आहे. सर्व संबंधित नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेले कामकाज अत्यंत जबाबदारीने आणि वेळेवर पार पाडावे असे आवाहन मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले.

निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयात सर्व नोडल अधिकारी याची बैठक आयोजित करण्यात आली होती. उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीत आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री.नवले यांनी यावेळी निवडणूक प्रक्रिया, विविध पथकांनी करावयाची कार्ये आणि पार पाडावयाच्या जबाबदारी, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक उपक्रम (स्वीप) यावर मार्गदर्शन केले.

बैठकीस मीडिया कक्ष नोडल अधिकारी श्रीमती रश्मी ओव्हाळ, सी-व्हिजील कक्षाचे अविनाश खैरे, एक खिडकी कक्षाचे विशाल कोतागडे, निवडणूक खर्च कक्षाच्या अर्चना शेवते, आचार संहिता कक्ष नोडल अधिकारी के.के.प्रधान उपस्थित होते.

अमोल बालवडकर यांचे मेहुणे डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी प्राप्तिकर खात्याची छापेमारी

छापेमारीने भाजपची प्रतिमा संशयाच्या भोवऱ्यात

पुणे-पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत देणाऱ्या भाजप नेते अमोल बालवडकर यांच्या सासुरवाडीत प्राप्तिकर खात्याने मंगळवारी सकाळी धाड टाकली. ही कारवाई डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी करण्यात आली. कटके हे बालवडकर यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आपल्या इच्छुक उमेदवारांची अशा प्रकारे गळचेपी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षांना इच्छुक उमेदवारांच्या बंडखोरीचेही ग्रहण लागले आहे. भाजपने पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पण तिथे भाजप नेते अमोल बालवडकर यांनी त्यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत दिलेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन बालवडकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या अनेक नेत्यांनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतरही बालवडकर यांनी माघार घेण्याचे संकेत दिले नव्हते.

या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर खात्याने मंगळवारी सकाळी बालवडकर यांच्या सासुरवाडीत म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी धाड टाकली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. या कारवाईमुळे अमोल बालवडकर यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

अभिजीत कटके हे भाजपचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे आहेत. त्यांनी एकवेळा महाराष्ट्र केसरी, तर दोनवेळा उपमहाराआष्ट्र केसरी किताब जिंकला आहे. त्यांनी 2015 मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. त्यानंतर 2016 मध्ये ज्यूनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते.अभिजीत कटके यांनी 2023 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत हरियाणाचा कुस्तीपटू सोमवीर यांचा पराभव करत हिंदकेसरी किताब जिंकला होता.

पुण्यातील गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीचा पैलवान म्हणून कटके यांची ओळख असून सदर ठिकाणी ते कुस्तीचा सराव करतात. राज्यातील नामांकित पैलवान अशी कटके यांची ओळख आहे. बालवडकर यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच कोथरुड मतदारसंघात आव्हान देण्याची भाषा केल्यामुळे राजकीय हेतूने ही छापेमारी केल्याचा संशय आहे. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने या कारवाईविषयी अद्याप अधिकृत भाष्य केले नाही.

पुण्यातील वाघोली इथले अभिजित कटके यांच्या वाघोली आणि परिसरातील 15 जमीन विकासकांच्या कार्यालयात आणि घरी आयकर विभागानं पहाटे पाच वाजता छापेमारी केली. या ठिकाणी अजूनही तपासणी सुरू आहे.

भाजपाचे अमोल बालवडकर संतापले : आयकर विभागानं छापेमारी केल्यामुळे भाजपाचे नेते अमोल बालवडकर म्हणाले की, “आज सकाळी माझे मेहुणे हिंद केसरी अभिजीत कटके यांच्या घरावर इन्कम टॅक्सची छापेमारी झाली आहे. देशाचं नाव ज्यानं उंचावलं त्यांच्या घरी छापा पडणं ही आमच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. त्यांचे अवैध व्यवसाय नसताना देखील त्यांच्या घरावर छापेमारी झाली आहे. तो माझा मेव्हणा आहे म्हणून त्याच्या घरावर धाड पडली का असा मला प्रश्न पडतोय,” असं यावेळी बालवडकर म्हणाले.

भाजपामध्ये चंद्रकांत पाटील आणि बालवडकर वाद : विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदार संघाचे आमदार आहेत. मात्र अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदार संघातून आमदारकीसाठी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून बालवडकर आणि पाटील यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. अमोल बालवडकर हे आक्रमक भूमिका घेत कोथरूडमध्ये निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाकडून पहिल्या यादीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आल्यानं बालवडकर हे नाराज झाले. ते बंड करणार असल्याची चर्चा सुरू असून आता पैलवान अभिजित कटके यांच्यावर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीमुळे कोथरूड मतदार संघातील राजकारण तापलं आहे.

कारमध्ये सापडलेली 5 कोटींची रोकड कुणाची?:मालक म्हणतो -मी कार जून महिन्यातच विकली, त्या पैशांशी माझा कोणताही संबंध नाही


पुणे -ज्या गाडीतून पैसे जप्त करण्यात आले ती गाडी मी अकोला येथील बाळासाहेब आजबे यांना विकली आहे. त्यांचे पैसे देखील माझ्या बँक खात्यात आले आहेत. केवळ गाडीचे कागदपत्रे त्यांच्या नावावर केली नव्हती, असे अमोल नलावडे यांनी म्हटले आहे.दरम्यान अमोल नलावडे म्हणाले की, त्या गाडीशी किंवा त्यात सापडलेल्या पैशाशी माझा कसलाही संबंध नाही. त्या गाडीत कोण-कोण होतं, हेदेखील मला माहीत नाही. कोल्हापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या सांगोला येथील एका गाडीतून पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर सुमारे 5 कोटी रुपयांची रोख रक्कम असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रावरुन दिसून आले. पण आपण ही गाडी जून महिन्यातच विकल्याचा दावा त्यांनी केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदीदरम्यान ही रक्कम ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात आटपाटी तालुक्यात एका ओढ्यात सुमारे 80 लाख रुपयांची रक्कम पोलिसांना सापडली होती.

संबंधित गाडी ही सांगोला येथील एका नलावडे नावाच्या व्यक्तीवर असल्याची माहिती मिळाली आहे. सांगोला या ठिकाणी एका नेत्याची ही रक्कम असल्याचे पोलिसांना समजले असून त्या दृष्टीने खातरजमा करण्यात येत आहे. ही रक्कम नेमकी किती आहे हे समजण्यासाठी याबाबत पोलिसांनी नोटा मोजण्यास सुरुवात केली आहे.

संजय राऊतांचे ट्विट काय?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15कोटी सापडले!हे आमदार कोण?,काय झाडी…काय डोंगर….मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75कोटी पाठवले15कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू..किती हे खोके? असा सवाल उपस्थित करत अप्रत्यक्ष शहाजी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

शहाजी पाटील म्हणाले की, संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही, याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. तर अमोल नलावडे हे शेकापचा कार्यकर्ते आहेत. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात काय हे मला माहिती नाही.

चंद्रकांतदादा पाटील पाषाण, बाणेर बालेवाडीतील ग्रामदैवतांच्या दर्शनाला

ग्रामस्थांकडून नामदार पाटील यांचे जोरदार स्वागत

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती

पुणे:

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी बाणेर बालेवाडी मधील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करुन, विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस सचिन दळवी,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अस्मिता करंदीकर,राहुल कोकाटे,मोरेश्वर बालवडकर,अनिकेत मुरकुटे, शिवम सुतार, राजेंद्र पाषाणकर,प्रवीण शिंदे, उत्तम जाधव, विवेक मेथा,रोहन कोकाटे, सचिन सुतार, सुभाष भोळ, सचिन सुतार,सुशील सरकते,कल्याणी टोकेकर, निकीता माथाडे, वैशाली कमासदार, पुनम विधाते, भगवानतात्या निम्हण,ज्ञानेश्वर पारखे,पोपटराव जाधव, तानाजी काकडे, , काशिनाथ दळवी,यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रविवारी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. आज सोमवारी पाषाण मधील मारुती भैरवनाथ, बाणेर मधील भैरवनाथ मंदिर आणि सोमेश्वर वाडीतील सोमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी नागरिकांकडूनही नामदार पाटील यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्व पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख मताधिक्याने विजयी करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

यावेळी नामदार पाटील कृतज्ञता व्यक्त करत, गेल्या पाच वर्षांत कोथरुडकरांची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे पक्षाने पुन्हा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देऊन कोथरुड करांच्या सेवेची संधी दिली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बाणेर बालेवाडीकरांनी मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही चंद्रकांत पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असा भैरवनाथाच्या साक्षीने शब्द देतो, अशी भावना व्यक्त केली.

संजय राऊत-अमित शहा भेट/ बागवे -फडणवीस भेट अफवांचे षडयंत्र

पुणे- मुंबई पुण्यात भाजपाविरोधी शिवसेना आणि कॉंग्रेस च्या एकनिष्ठ नेत्यांच्याबद्दल अफवा उठविणारे बातम्यांचे षड यंत्र पसरविले गेल्याचे समोर आले आहे. पुण्यातून तर भाजपच्या नेत्यांची सुपारी घेऊन काही नेते कॉंग्रेसची हानी करत असल्याचा आरोप आता होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर मुंबईतील संजय राऊत आणि अमित शहा भेटीच्या अफवा आणि बातम्यांच्या विषयी मोठा संशय व्यक्त केला जातोय .खासदार संजय राऊत व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याची अफवा राजकीय वर्तुळात पसरली होती. तसेच, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे वृत्त पसरले होते. यामुळे काहीवेळ राज्यातील राजकारण तापले होते. परंतु हे पेल्यातील वादळ ठरले. ‘अशी कोणतीही भेट झालेली नसल्याचा’ खुलासा करून खासदार संजय राऊत यांनी दुपारी या बातमीतील हवा काढून टाकली. तसेच, नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनीही या बातम्या भाजपने पेरल्याचा आरोप केला.तसेच पुण्यात देखील कॉंग्रेसचे निवडून येण्याची सर्वाधिक शक्यता असलेले आणि जुने ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे बहुचर्चित आक्रमक माजी नगरसेवक पुत्र अविनाश बागवे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचे वृत्त पसरविण्यात आले होते . मात्र तत्काळ या वृत्ताचे खंडन करत बागवे यांनी या अफवेचा आपल्या खास भाषेत समाचार घेतल्याने या अफवेला देखील पायबंद बसला .