Home Blog Page 631

कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीरांना बीओआय रक्षक सॅलरी पॅकेज देण्यासाठी बँक ऑफ इंडियाने भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार केला

मुंबई, 6 मार्च 2025: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या लष्करी कर्मचारी, माजी सैनिक आणि अग्निवीरांना बीओआय रक्षक वेतन पॅकेज देण्यासाठी भारतीय सैन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याची घोषणा केली. या सामंजस्य करारात वाढीव मोफत व्यापक वैयक्तिक अपघात विमा कव्हर (पीएआय), डेबिट आणि क्रेडिट कार्डवर आकर्षक ऑफर आणि इतर अनेक ऑफर्ससह विशेष फायद्यांचा समावेश आहे.

4 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयात सामंजस्य करारांच्या देवाणघेवाणीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारतीय लष्कराचे महासंचालक (एमपी आणि पीएस) लेफ्टनंट जनरल राजीव पुरी हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला मेजर जनरल व्ही.के.  पुरोहित, एडीजी पीएस, बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री.सुब्रत कुमार आणि दोन्ही संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय सैन्याला सेवा दिल्याबद्दल लेफ्टनंट जनरल राजीव पुरी यांनी बँक ऑफ इंडियाचे आभार मानले. लष्कराचे प्राबल्य असलेल्या भागात बँकेच्या काही संरक्षण अनुकूल शाखा सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.

बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. सुब्रत कुमार म्हणाले, “भारतीय सैन्याशी जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या रक्षक वेतन योजनेचे फायदे वाढवताना आम्हाला आनंद होत आहे. अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे त्यांनी सर्वोत्तम बँकिंग उत्पादने आणि ग्राहक सेवा देण्याची खात्री देतो.” लष्कराच्या निवृत्तीवेतनधारकांनी बीओआय डोअर स्टेप बँकिंगचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. बँक ऑफ इंडियाच्या वतीने त्यांनी भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बीओआयची रक्षक वेतन योजना ही संरक्षण दल, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास तयार केलेली वेतन योजना आहे. ती 100 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैयक्तिक अपघाती विमा कव्हर, 200 लाख रुपयांचे मोफत हवाई अपघाती विमा कव्हर, तसेच लागू अटी आणि शर्तींसह इतर अनेक विशेषाधिकार आणि सवलती देते.

१० मार्च पासून ऊस तोडणी मशीन मालक करणार बेमुदत आंदोलनसाखर आयुक्तांना दिले निवेदन

 पुणे, ६ मार्च : ऊस तोडणी मशीनचा तोडणीदर ५० टक्यांनी वाढवून देणे, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत ३ वर्ष मुदत वाढ मिळावी आणि पाचट कपात १.५ टक्के असावी. या सारख्या अनेक महत्वपूर्ण मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे वसंतराव जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना दिले. या मागण्यांसाठी राज्यातील १३०० मशीन मालक १० मार्च पासून साखर संकुल समोर बेमुदत आंदोलनास बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सुद्धा देण्यात येणार आहे.
साखर आयुक्तांना निवेदन देतांना संघटनेचे अभय कोल्हे, राजाभाऊ लोमटे, धनंजय काळे, गणेश यादव, निलेश बागटे, कलीम शेख, शरद चव्हाण, राहुल इथापे आणि रजत नलावडे उपस्थित होते.
 महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटना, सातारा यांच्या वतीने ऊस मशीनचे तोडणीदार/वाहातूकदार वाढविणेबाबतची मागणी सुद्धा केली आहे. कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन पर योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास १३०० मशिन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळाले आहे. त्यातच २०१९ पासून जवळपास ९०० मशिनला अनुदान मिळालेले नाही. यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले पण त्यांना न्याय मिळाला नाही.
डिझेल वृद्धिमुळे एक टन ऊस तोडणीसाठी मशीनला जवळपास ३ लीटर डिझेल लागत असून २६० ते २८० रू. खर्च येतो. मशिन चालविण्यासाठी ऑपरेटर/इनफिल्डर ड्रायव्हर यांचे पगार, टनानूसार ऑपरेटिंग खर्च ८० रूपये येतो. दुरूस्ती, ग्रीस व स्पेअर पार्टससाठी प्रति टनानूसार १०० रूपये खर्च येतो. म्हणजेच एक टन ऊस तोडणीसाठी ४६० रूपये खर्च येतो. इकडे कारखाने आम्हाला ४५० ते ५०० रूपये देतात. आम्हाला आवक कमी असून बँकेचे हप्ते भरणे ही अवघड झाले आहे.
आयुक्तांच्या जी.आर नुसार ४.५ टक्के पाचट कपात ही शेतकर्‍यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एकूण १३.५ टक्के केली जात आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

एयर इंडियातर्फे इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी ‘झिपअहेड’ प्रायोरिटी चेक- इन आणि बॅगेज हँडलिंग सेवा

·         प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज हँडलिंगसाठी सशुल्क सेवा

·         सहा भारतीय विमानतळांवर डिर्पाचरसाठी नाममात्र शुल्कासह ही सेवा उपलब्ध

गुरुग्राम६ मार्च २०२५ – एयर इंडियाने आज ‘झिपअहेड’ ही सशुल्क सेवा लाँच केली असून त्याअंतर्गत भारतात प्रवास करणाऱ्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना प्रायोरिटी चेक- इन आणि प्रायोरिटी बॅगेज सेवेचा लाभ घेता येईल.

एरवी अशाप्रकारची सुविधा उपलब्ध नसलेल्या, परंतु घाई असलेल्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना प्रायोरिटी सेवेचा लाभ घेऊन आपला वेळ वाचवता येण्यासाठी ही सेवा लाँच करण्यात आली आहे. प्रवाशांना ऑन- ग्राउंड टचपॉइंट्सद्वारे ही सेवा घेऊन विमानतळावर चिंतामुक्त राहाता येईल.

‘झिपअहेड’ सेवेचा लाभ घेणाऱ्या एयर इंडियाच्या प्रवाशांना एयरलाइनच्या प्रीमियम इकॉनॉमी चेक- इन काउंटर्सवर चेक इन करता येईल तसेच बॅगेज हँडलिंग सेवेचा वापर करता येईल. सध्या ही सेवा सहा भारतीय विमानतळावर डिपार्चरसाठी उपलब्ध असून त्यात दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता यांचा समावेश आहे. नाममात्र शुल्क भरून ही सेवा घेता येणार आहे.

·         रुपये ४९९ : डिपार्चरआधी सहा तास खरेदी केल्यास

·         रूपये ६९९ : डिपार्चरपासून सहा तासांच्या आत खरेदी केल्यास

‘झिपअहेड’ सेवा खरेदीसाठी एयर इंडियाची वेबसाइट, मोबाइल अप, एयरपोर्ट टिकिटिंग ऑफिस (एटीओ) यावर डिपार्चरआधी ७५ मिनिटे उपलब्ध असेल.

एयर इंडियाच्या महाराजा क्लब लॉयल्टी प्रोग्रॅमचे प्लॅटिनम आणि गोल्ड सदस्य असलेल्यांना त्यांच्या भाडेशुल्काचा प्रकार किंवा प्रवासाचा क्लास कोणताही असला, तरी या प्रायोरिटी सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे.

‘झिपअहेड’ विषयी अधिक माहिती www.airindia.com वर देण्यात आली आहे.

मुंबईत तीन ठिकाणी ‘तेरे मेरे सपने ‘- ‘विवाह पूर्व संवाद’ केंद्र सुरु होणार

८ मार्च २०२५ – आंतरराष्ट्रीय महिला दिनी उद्घाटन

मुंबई, दि. 6 मार्च
राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्गदर्शनाखाली बृहनमुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने भारतीय स्त्री शक्ती तर्फे मुंबईमध्ये तीन ठिकाणी ‘विवाह पूर्व संवाद’ केंद्र सुरू होत आहेत.

विवाह हा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. विवाहानंतर दोघांचं नातं हे जर सशक्त असेल तरच ते यशस्वी होते. आज आपण फॅमिली कोर्टात तरुण मुलामुलींची कौटुंबिक वादाच्या व घटस्फोटाच्या खटल्यांची जी आकडेवारी बघतो आहोत ती चिंताजनक आहे. ह्याला आळा घालण्यासाठी ‘विवाहपूर्व कुटुंब संवाद केंद्रांची’ मोठ्या प्रमाणात गरज आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी अशी ‘विवाहपूर्व कुटुंब संवाद केंद्र’ देशभरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भारतीय स्त्री शक्ति तर्फे मुंबईमध्ये परेल, विले पार्ले आणि बोरीवली अश्या तीन ठिकाणी ‘विवाह पूर्व संवाद’ केंद्र सुरू केले जाणार आहेत.
भारतीय स्त्री शक्ति १९८८ पासून महिला आणि कुटुंबांच्या सशक्तीकरणाचे काम करीत आहे. या अंतर्गत भारतीय स्त्री शक्ति तर्फे ‘कुटुंब सल्ला केंद्र’ तसेच ‘विवाह पूर्व मार्गदर्शन कार्यशाळा’ असे अनेक उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकारी सीमा देशपांडे यांनी दिली.

संपर्क नंबर
+91 90829 65051

जागतिक महिला दिन आणि अहिल्याबाई होळकर तृतीय जन्मशताब्दी निमित्ताने ७ मार्च रोजी विधिमंडळात विशेष प्रस्ताव मांडला जाणार – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : ८ मार्च २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात जागतिक महिला दिन साजरा केला जाणार असून, त्यानिमित्ताने विधिमंडळात महिलांच्या सशक्तीकरणासाठी ७ मार्च रोजी विशेष प्रस्ताव मांडला जाणार आहे. तसेच, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माच्या तिसऱ्या शताब्दीच्या निमित्ताने ३१ मे पर्यंत राज्यभर महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे, विकास योजना, तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक पावले याबाबत व्यापक चर्चा होणार असल्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

या वर्षी १९७५ ते १०८५ या आंतरराष्ट्रीय महिला दशकाला ५० वर्षे होत आहेत. १९९५ च्या बिजींगच्यैमचौथ्या महिला विश्व संमेलनास ३० वर्षे होत आहेत .जागतिक महिला आयोगाच्या १० मार्चपासून सुरू होणाऱ्या ६९ व्या विशेष सत्रात महिलांच्या न्याय व सुरक्षेसाठी जागतिक स्तरावर शासनाने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
या पार्श्वभुमीवर राज्यातील महिलांना न्याय मिळण्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा, तसेच त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याबाबत या चर्चेत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, अजूनही काही ठिकाणी महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासन, समाज आणि सर्व घटकांनी एकत्र येऊन महिलांच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. विधिमंडळात मांडला जाणारा हा प्रस्ताव सर्वपक्षीय सहमतीने मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.”

या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती राहणार आहे. विधिमंडळ सचिवालयातील जितेंद्र भोळे आणि विलास आठवले यांच्या सहकार्यातून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

यावेळी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ७ मार्च रोजी विधिमंडळात विशेष सत्र आयोजित करण्यात आले असून, त्याचदिवशी संध्याकाळी शासनाचे उत्तर दिले जाणार आहे. “महिला आणि पुरुष दोघांनी मिळून हा दिवस साजरा करावा, कारण केवळ महिलांसाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या समृद्धीसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

लोकमान्यनगरच्या पाणीप्रश्नासाठी महाविकास आघाडी आक्रमक

पुणे – प्रभाग क्र २९ मधील लोकमान्य नगर हा भाग १९६२ च्या सुमारास म्हाडा ने विकसित केले आहे, सदर ठिकाणी तेव्हापासून आजपर्यंत लोकमान्य नगर वसाहतीचे स्वतःची पाणीपुरवठा व्यवस्था आहे, गेली अनेक वर्षांपासून ती जीर्ण झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, पाणी समस्या मुळे नागरिकांना मानसिक आणि सोबत आर्थिक त्रास ही सहन करावा लागतो, त्यामुळे शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांच्या माध्यमातून प्रभाग २९ महाविकास आघाडी च्या वतीने पुणे महापालिका मुख्य अभियंता पाणी पुरवठा श्री नंदकिशोर जगताप यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता जगताप यांनी प्रश्न समजून घेऊन तत्पर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले त्यानुसार लोकमान्य नगर मधील प्रतेक इमारतीने पुणे मनपा ला निवेदन द्यावे आम्ही तत्पर पाणी पुरवठा साठी नवीन लाईन टाकून देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपविभाग प्रमुख गणेश घोलप, कांग्रेस चे अनिल धीमधीमे, संदीप मळेकर, सागर धाडवे, शिवसेना प्रभाग प्रमुख संजय साळवी, युवासेनेचे विजय जोरी, उपस्थित होते.

अंगणवाडी मदतनिस संदर्भात उमेदवारांनी पुन:श्च नव्याने अर्ज सादर करावेत

 पुणे दि. 6: बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) पुणे शहर पूर्व या प्रकल्प कार्यालयाने सर्व अंगणवाडी मदतनिस यांची भरती संदर्भात यापूर्वी झालेली सर्व कार्यवाही रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात नवीन जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे असे मोनिक रंधवे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) पुणे शहर पूर्व यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
 तसेच उमेदवरांचे या पूर्वी आलेले भरती संदर्भातील कोणतेही अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी. नवीन जहिरात प्रसिध्द झाल्यानंतर उमेदवारांनी पुन:श्च नव्याने अर्ज सादर करावेत असेही पत्रकात नमुद केले आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.६: जिल्ह्यातील महाविद्यालयात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी व्यवसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरीता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १५ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

या नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ सन २०२४-२५ पासून शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता एकत्रित तयार केलेले आहे. शासकीय वसतिगृहात ऑनलाईन अर्ज केलेल्या, परंतु गुणवतेअभावी शासकीय वसतिगृहात निवड झालेली नाही अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज या नवीन प्रणालीव्दारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ग्राह्य धरले जाणार आहेत.

स्वाधार योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ऑनलाईनपद्धतीने अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या लॉगिनमधून बँकेचा तपशील भरावा. अशा विद्यार्थ्यांसाठी बँक तपशील भरण्याबाबत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती श्री. लोंढे यांनी दिली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना

पुणे, दि. 6: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून त्यासाठी २१ मार्च २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा लाभ मातंग समाज व त्यामध्ये अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या १२ पोट जातींना घेता येणार आहे. अर्जदार पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १८ वर्षे पूर्ण व ५० वर्षाच्या आत असावे. सीबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० असावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. वेळोवेळी महामंडळाने घातलेल्या अटी, शर्ती बंधनकारक राहतील.

योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचे बीजभांडवल ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून बीजभांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर असणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या (एनएसएफडीसी) महिला समृध्दी योजना रक्कम १ लाख ४० साठी एनएसएफडीसीचा सहभाग १ लाख २५ हजार रुपये, १० हजार रुपये अनुदान, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून या रक्कमेवर ४ टक्के व्याजदर असणार आहे.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, व्यवसायासाठी आवश्यक जागेचा पुरावा, तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याबाबतचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र, आधार क्र. जोडणी केलेल्या बँक खात्याचा तपशील, ग्रामसेवकाचे शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, दुकाने अनुज्ञप्ती/ उद्योग आधार जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०५७ येथे संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी कळवले आहे.

RSS च्या भैय्याजी जोशी यांचा यू-टर्न:चौफेर टीकेनंतर म्हणाले – माझ्या विधानामुळे गैरसमज झाला, मुंबईची भाषा मराठीच, ती सर्वांनी शिकावी

मुंबई
मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी, मुंबईही महाराष्ट्राचाच भाग आहे. मुंबईची भाषा मराठीच, याबद्दल दुमत नाही. मुंबईत बहूभाषिक लोक, सर्वांनी मराठी शिकले पाहिजे, असे म्हणत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. तसेच भाषेसाठी कधीही संघर्ष झालेला नाही, असेही भैय्याजी जोशी म्हणाले आहेत.

वादग्रस्त विधान केल्यानंतर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असे मला वाटत आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचे काहीही कारण नाही. भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचे जीवन चालत आहे. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असेच आम्हाला वाटते. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही.

मुंबई येथील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या समोरच केले होते.भैय्याजी जोशी यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सनेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठी भाषेवर बोलताना भैय्याजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचे मान सोडावे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जोशीबुवांनी अशा काड्या करू नये, अशा शब्दात त्यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. इतकेच नाही तर या वक्तव्याचा भाजप निषेध करणार आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपला देखील आव्हान दिले आहे. तर भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे किंवा भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महिला दिनी ‘या’ बसेस मधूनच महिलांना मोफत प्रवास

पुणे- महिला दिनी पुण्यात PMPML महिलांना मोफत प्रवास कुठूनही कुठेही करण्याची संधी देणार आहे मात्र महिला दिनी महिलांसाठी असलेल्या १३ बसेस मधूनच मोफत प्रवास सुविधा देण्यात येणार आहे आणि या १३ बसेस एकूण ४२ फेऱ्या करणार आहेत. पहा नेमक्या त्या बसेस कोणत्या आणि कुठून जाणार कुठेपर्यंत …

३०१ महिला स्वारगेट ते हडपसर गाडीतळ
११७ महिला स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर धायरी
९४ महिला कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
८२ महिला एनडीए गेट क्र. १० ते मनपा भवन
२४ महिला कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
१०३महिला कात्रज ते कोथरूड डेपो
६४महिला हडपसर गाडीतळ ते बारजे माळवाडी
१११महिला भेकराईनगर ते मनपा भवन
११महिला मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव
१७०महिला पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द
३७२महिला निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी
३६७महिला भोसरी ते निगडी
३५५महिला चिखली ते डांगे चौक

ससून रुग्णालयातअधिष्ठाता बदलत राहिल्याने व्यवस्थापनातच त्रुटी:प्रशासकीय स्थैर्य हवे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

मुंबई/पुणे- : गेल्या दीड वर्षात पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता (डीन) सातत्याने बदलत राहिल्याने स्थावर व्यवस्थेचे संचलन नीट होत नाही. व्यवस्थापनात त्रुटी राहिल्या आहेत, याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत बोलताना सभागृहाचे लक्ष वेधले.

ससून रुग्णालयात एमआरआय तपासणी मशीन बंद पडणे, तपासणी करण्यासाठी दोन -दोन दिवस ताटकळत थांबावे लागते, हे नित्याचे झाले आहे. खाजगी संस्थांमधून एमआरआय ची टेस्ट करून घेणे महागात पडते, याकरिता ससून रुग्णालयात एमआरआय मशीन सहजपणे उपलब्ध होणे गरजेचे असून त्यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी, अशीही मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ससून रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया मोफत होतात. पण, ससूनमध्ये हृदयरोगतज्ज्ञ कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत. ससूनमध्ये कायमस्वरूपी हृदयरोगतज्ज्ञ नियुक्त करणे आवश्यक आहे, याकडेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्ष वेधले.

रुग्णांच्या सोयीकरता रुग्णालयासाठी व्हीलचेअर आरोग्य खाते तातडीने खरेदी करणार आहे का, असाही प्रश्न आमदार शिरोळे यांनी विचारला. ससून रुग्णालयाच्या प्रशासनात स्थैर्याची आवश्यकता आहे. तरच तेथील संचालन व्यवस्थितपणे होईल याचाही पुनरुच्चार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. ६: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक ८ मार्च रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध

पुणे, दि. ६: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (५ वी)आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ ८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

अंतरिम उत्तरसूचीमध्ये आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरुपात ११ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येईल.ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. विहित मुदतीत प्राप्त व ऑनलाईन निवेदनांचाच विचार केला जाईल. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ११ मार्चपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे ८ मार्च रोजी आयोजन

पुणे, दि. ६ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे व यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स आणि यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता यशस्वी भवन, एल्प्रो चौक, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहापुढील चौक, चिंचवड गाव येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी रिक्तपदे कळविली असून किमान १० वी, १२ वी, पदवीधर अशा विविध पात्रताधारक महिला उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक महिला उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.