Home Blog Page 622

महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती असलेल्या ‘एलईडी व्हॅन’ला अजितदादांनी दाखवला राष्ट्रवादीचा झेंडा

राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ;प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची माहिती…

मुंबई दि. २६ ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एलईडी व्हॅनला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.

ज्या – ज्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत त्या प्रचाराच्या मोहिमेची सुरुवात आज प्रदेश कार्यालयातून करण्यात आली.

या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून महायुती सरकारने केलेल्या लोककल्याणकारी योजना… लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना दिलेला लाभ… शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलेली वीज माफी… मोफत तीन गॅस सिलेंडरची योजना… मुलींच्या शिक्षणाचा शंभर टक्के खर्च उचलण्याचा क्रांतीकारी निर्णय… अशा अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत… मतदारापर्यंत पोचवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून जबाबदारीने आपले कर्तव्य चोख बजवावे-गोविंद शिंदे

पुणे, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्याचे कामकाज काटेकोरपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून जबाबदारीने आपले कर्तव्य चोख बजवावे, असे निर्देश आंबेगाव विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण अवसरी येथील शांता शेळके सभागृहात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे बोलत होते. या प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमिला वाळुंज , निवडणूक नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून संपूर्ण मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे समजावून घेवून त्याप्रमाणे समन्वयाने प्रत्यक्ष कामकाज पार पाडावे, असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आंबेगाव विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 475 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या पैकी 1235 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. मतदानाच्या आदल्या दिवशी नियमानुसार मतदान केंद्र तयार करून घेणे, उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मॉक पोल घेणे, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया विहित वेळेत सूरू करणे यासाठी आवश्यक प्रशिक्षण या सत्रात देण्यात आले.

मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी यांचे कामकाज आणि जबाबदाऱ्या यावेळी सांगण्यात आल्या. मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास परवानगी बाबतचे नियम, निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदीसाठी महत्वाचे अधिनियम, विधानसभा निवडणूक 2024 मधील महत्वाचे बदल, मतदाना दरम्यान भरावयाचे विविध नमुने यांचे विवरण भरणे आदी विविध मुद्यांवर प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली.

यानंतर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. मतदान अधिकारी व् कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण 9 व 10 नोव्हेंबर 2024 रोजी होईल, असे श्री गोविंद शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शहरात काँग्रेसला एक तरी जागा द्या, अन्यथा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही – मनोज कांबळे

पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

पिंपरी, पुणे (दि. २६ ऑक्टोंबर २०२४) या विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी यापैकी किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे माजी अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मनोज विष्णू कांबळे यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
शनिवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे, पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सचिव संदीप शिंदे, स्वाती शिंदे, हरीश डोळस, संदेश नवले, सुरेश गायकवाड, युनूस बांगर, सुधाकर कुंभार, निखिल भोईर आदी उपस्थित होते.
यावेळी मनोज कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु आज सकाळी माध्यमांमधून पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या एकाही इच्छुक उमेदवाराला संधी मिळाली नाही असे निदर्शनास येत आहे. यापूर्वी २००९ मध्ये चिंचवड विधानसभेतून भाऊसाहेब भोईर यांनी काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये भोसरी विधानसभेतून हनुमंत भोसले, चिंचवड विधानसभेतून कैलास कदम तर पिंपरी राखीव विधानसभेतून मनोज कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मागील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला देखील उमेदवार मिळाला नाही, त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाची हानी झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांचा या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. हे पाहता पिंपरी चिंचवड शहरामध्ये या विधानसभा निवडणुकीत किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळावी. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली अन्यथा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असा इशारा मनोज कांबळे यांनी दिला.
महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शहरातून एकही नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला नाही, त्यामुळे महानगरपालिका सभागृहात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. या परिस्थितीत बदल करायचा असेल तर या निवडणुकीत आणि पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवणे आवश्यक आहे यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. याचा काँग्रेसच्या वरिष्ठांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही सायली नढे यांनी सांगितले.

शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होऊन ही त्यांनी मराठा आरक्षण देता आले नाही – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ


पुणे-मराठा आरक्षणसाठी अनेकवेळा आंदोलन झाली पण कोणी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आज आरक्षणाचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. जेष्ठ नेते शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री असून ही त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही. सन २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये आल्यावर त्यांनी आरक्षण प्रथम दिले आणि ते न्यायालयात टिकेल. ओबीसी हक्क अबाधित ठेवून महायुती सरकारच मराठा आरक्षण दीर्घकालीन देऊ शकेल.मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या बाबत सरकार गांभीर्याने सूक्ष्म विचार करत आहे. सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. राज्य सरकारच्या अनेक योजना लोकउपयोगी असून कोणी किती जात, धर्म अजेंडा चालवला तरी जनता प्रगतीला मत देईल असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते माधव भंडारी, राष्ट्रीय प्रवक्ते के. के. उपाध्याय, मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, अध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, संजय मयेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची प्रमुख उपस्थित होती.
मोहोळ यांनी सांगितले की, भाजपच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात मीडिया सेंटर निर्मिती करण्यात येत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रसाठी मीडिया सेंटर पुण्यात सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून तयारी करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये ५८ पैकी ४२ जागा आमच्या असून त्या जागा पेक्षा अधिक जागा आम्ही पुन्हा जिंकू असा विश्वास आहे. राज्यासाठी केंद्र सरकारने दहा लाख कोटी रुपये विकास कामासाठी दिले असून राज्यासाठी एक लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. आमच्या काळात लोकउपयोगी योजना आघाडी सरकारने बंद केल्या त्यामुळे लोकांना त्याबाबत समजून चुकले ते योजना बंद करणारे सरकार होतें . युती सरकार काळात पुन्हा विकास होऊ लागला आहे. साखर कारखानाना सात हजार कोटी रुपये मदत केली गेली आणि दहा हजार कोटी आयकर विभागाचे माफ करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्ये प्रवास करताना सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. पुन्हा एकदा नागरिक आमच्यावर विश्वास ठेवतील.परदेशी गुंतवणूक सर्वाधिक देशात महाराष्ट्र मध्ये आलेली आहे. राज्याचे सहकार वाढले पाहिजे त्यानुसार पक्ष न पाहता कोणाचे त्यांना केंद्र सरकार मदत करते. सहकार मोठा झाला पाहिजे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कारखान्यास ३०० कोटी रुपये दिले गेले त्यांनी त्याच कामाला पैसे वापरले पाहिजे. महायुती म्हणून आम्ही राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

माधवी लता यांनी बेताल वक्तव्य करू नये – भाऊसाहेब भोईर

भाऊसाहेब भोईर यांनी दिले पोलीस आयुक्तांना पत्र

पिंपरी, पुणे (दि. २६ ऑक्टोबर २०२४) महासाधू मोरया गोसावी, संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा आदर्श पिंपरी चिंचवड शहराला आहे. हे सुसंकृत व कायदा आणि सुव्यवस्था पाळणाऱ्या सुजाण नागरिकांचे शहर आहे. या शहरामध्ये देशभरातून येऊन सर्व जाती, धर्माचे लोक कष्ट करून देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात हातभार लावत आहेत. ज्येष्ठ नेत्या माधवी लता यांनी निवडणुकीच्या तोंडावर चिंचवड विधानसभा क्षेत्रात येऊन प्रक्षोभक वक्तव्य करू नये व सामाजिक वातावरण बिघडवू नये अशा आशयाचे पत्र ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी पोलीस आयुक्त यांना दिले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यभर वाहत आहेत. या काळात जाती धर्मावर आधारित प्रचार करून शहरातील सुसंस्कृत वातावरणास गालबोट लावण्याचा प्रकार काही व्यक्ती व पक्षांकडून होण्याची दाट शक्यता आहे. एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शनिवारी (दि.२६) माधवी लता या चिंचवड विधानसभा क्षेत्रात येणार आहेत. सध्या निवडणूकीच्या तोंडावर अशा व्यक्तींनी बेजबाबदारपणे स्फोटक व गैर वक्तव्य केल्यास समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक प्रश्न उद्भवू शकतात, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यास प्रतिबंध घालणे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. या करिता माधवी लता यांना चिंचवड विधानसभा क्षेत्रात येऊन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत अशी समज द्यावी अशी विनंती जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.

समस्यांवर मात करत महिलांनी सक्षम व्हावे: चाफळकर

वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शन; रविवारी शेवटचा दिवस
पुणे : वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे भरलेले आहे. शुक्रवारी (दि. २५) या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका अनघा चाफळकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, ‘निर्मळ रानवारा’च्या संपादक ज्योती जोशी, सल्लागार व पत्रकार श्रीराम ओक आदी उपस्थित होते. ‘निर्मळ रानवारा’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन यावेळी झाले.

गेल्या चाळीस वर्षांपासून वंचित विकास स्त्रिया आणि मुलांसाठी काम करत आहे. छोट्या व्यावसायिकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यंदा प्रदर्शनात खास महिलांसाठी होम मिनिस्टर, मुलांसाठी गंमत जत्रा भरवण्यात आली. दिवाळीच्या वस्तू, फराळ, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थ, गिफ्ट आर्टिकल्स, कपडे, मुलांसाठी विज्ञान खेळणी, तसेच उत्तम प्रतीचा सुकामेवा निम्म्या किमतीत उपलब्ध असेल. उद्या रविवारी (दि. २७) सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

अनघा चाफळकर म्हणाल्या, “प्रदर्शनात सहभागी महिलांनी स्वतःमधील क्षमता ओळखून एक पाऊल पुढे टाकले आहे. आपला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे. जगताना, व्यवसाय वाढवताना येणाऱ्या समस्यांवर मात करत मागे न हटता सक्षम व्हावे. त्यातून तुम्हाला आत्मविश्वास मिळत जातो, जो भविष्यातील वाटचालीत उपयोगी पडतो.”
येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी जागृती अभियान करणारा स्टॉल प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचबरोबर एकल महिलांच्या सन्मानासाठी अभया संबोधावे, असा शासन आदेश येण्यासाठी सही अभियानही यावेळी राबवण्यात आले. जुने कपडे, वस्तू, ई-कचरा या प्रदर्शनात संकलित करण्यात येत आहे.

भाजपनेते वसंत देशमुखांचे स्त्री विरोधी विधान भाजप ची संघीय ‘मनुवृत्ती’ स्पष्ट करणारे..

 ‘राज्यातील कायदा सुव्यवस्था’ अराजकतेच्या गर्तेत..  – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदा तिवारी यांची संतप्त टिका

पुणे दि २६ आक्टों – देशात शिव छत्रपतींचा महाराष्ट्र ‘पुरोगामी विचारांचे प्रगतीशील राज्य’ म्हणून ओळखले जात होते. समतेचे प्रणेते राजर्षी शाहू, महीला शिक्षणाचे प्रणेते सावित्री-ज्योती फुले दांम्पत्यांच्या महाराष्ट्रात आता राजकीय द्वेष व असुयेने पछाडलेले ‘सत्तांध भाजपनेते नाती समान मुलीस’ घराबाहेर पडू न देण्याच्या जाहीर धमक्या देत असतील व विकृतीने पछाडलेले टोळ – भैरव टाळ्या वाजवत असतील तर राज्यातील कायदा सुव्यवस्था ही ‘त्रिकुट सरकारने’ मोदी शहां’कडे गहाण टाकल्याची पावती असल्याची संतप्त टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात केली. ते पुढे म्हणाले की, संगमनेर येथील विखेंच्या प्रचार सभेत डॅा जयश्री बाळासाहेब थोरांताचे प्रती भाजप नेते वसंत देशमुखांनी घरा बाहेर पडू देणार नाही हे वक्तव्य दमनशाहीचे प्रतीक असून, महायुतीच्या राज्यकर्त्यांची महीला – स्त्री विरोधी मानसिकता स्पष्ट करणारे, स्त्रीयांना शिक्षण हक्कांपासून प्रतिरोध करणाऱ्या प्रतीगामी विचारांचे द्योतक आहे. राज्यातील जनतेने आपल्या मुलीबाळींना निर्भय वातावरणात ‘सबला’ बनवायचे आहे की ‘भिती – धाक दपटशहाच्या वातावरणात ‘अबला’ बनवायचे आहे हे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले आहे.  

पश्चिम महाराष्ट्रासाठी भाजपचे पुण्यात मध्यवर्ती मिडिया सेंटरचे उदघाटन

पुणे, –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली असून विविध गाेष्टींचे सूक्ष्म नियाेजन करण्यात येत आहे. राज्यातील विविध विभागात भाजपकडून मध्यवर्ती मिडिया सेंटरची उभारणी करण्यात येत असून पश्चिम महाराष्ट्रासाठी पुण्यातील बाजीराव रस्ता येथील भारत भवन याठिकाणी विस्तारित अशा मध्यवर्ती मिडिया सेंटरचे उदघाटन परराष्ट्रमंत्री जय शंकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या उपस्थिीतीत शनिवारी करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, राष्ट्रीय माध्यम प्रमुख के.के.उपाध्याय, शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, अमाेल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित हाेते.
यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, संबंधित मिडिया सेंटर हे पत्रकारांसाठी पत्रकारांनी निर्माण केलेले केंद्र आहे. पत्रकारांची निवडणुक काळात खूप धावपळ हाेत असते. वेगवेगळे काेट घेणे, मुलाखती घेणे, प्रेसनाेट करणे , विविध कार्यक्रम उपस्थित राहणे यामुळे पत्रकारांना एकाच ठिकाणी नेत्यांच्या प्रतीक्रिया घेणे, पत्रकार परिषदा, मुलाखत, स्टुडिओ उपलब्धता, वन टु वन, अनाैपचारिक गप्पा या सर्व गाेष्ट एकाच ठिकाणी ही यामागील कल्पना आहे. निवडणुक हाेईपर्यंत सर्व पत्रकार परिषद व मुलाखती मिडिया सेंटर मध्ये हाेईल. माध्यम केंद्रात पत्रकारांचे साेईसाठी वायफाय, लाईव्ह फुटेज, संगणक उपलब्धता याठिकाणी करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी हे मिडिया सेंटर असून त्याचा वापर त्यांनी करावा. राज्यातील प्रत्येक विभागात अशाप्रकारे मिडिया सेंटर निर्माण करण्यात येत आहे. पत्रकारांचे अनाैपचारिक गप्पांचे ठिकाण येथे आगामी काळात सुरु राहील.

नवनिर्मिती व्दारे सामाजिक समस्यांचे निराकरण व्हावे – डॉ मणीमाला पुरी

पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘आयडियाथॉन’ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. २६ ऑक्टोबर २०२४) – विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग वास्तविक जगातील समस्यांचा विचार करून नवनिर्मिती केली तर सामाजिक समस्यांचे निराकरण करणे शक्य होईल.
‘समाज विकासासाठी समाज’ या मूलमंत्रावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने (पीसीयु) विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, विचारांना चालना देण्यासाठी ‘आयडियाथॉन – २४’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीसीईटी शैक्षणिक समूहातील शाळांमधील दीडशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. पीसीयुच्या ‘नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास’ विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, डॉ. सागर पांडे, डॉ. नीरू मलिक, अंकुश दहत, तुषार महोरे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमा बरोबरच विचारांना, कल्पना, कौशल्यांना, संशोधनाला चालना मिळाली पाहिजे; या उद्देशाने पीसीयुने विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामाध्यमातून देशाला सुजाण नागरिक, उत्तम संशोधक मिळतील असा विश्वास डॉ. सुदीप थेपडे यांनी व्यक्त केला.
डॉ. अपर्णा पांडे, प्रा. डॉ. रचना पाटील हे स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेत ३१ सहभागी संघांमधून तीन संघ विजयी झाले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध प्रकारची मतदान केंद्रे निश्चित

पुणे, दि. २६: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २११ खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये महिला मतदान केंद्र, युथ मतदान केंद्र, अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र अशी विविध मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध घटकांवर आधारीत मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार या मतदारसंघातील विविध ठिकाणची मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये वडगाव बुद्रुक येथील मतदान केंद्र क्रमांक ३११ शिवसागर सोसायटी क्लब हाऊस येथे महिला मतदान केंद्र, नांदेड सीटी येथील नांदेड सीटी पब्लिक स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ४०७ येथे अपंग मतदान केंद्र तर बहुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे युथ मतदान केंद्र उभारण्यात येईल.

डोणजे गाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३८४ येथे युनिक मतदान केंद्र, कोंढवे धावडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ८ येथे परदानशीन मतदान केंद्र तर वडगाव बुद्रुक येथील मतदान केंद्र क्रमांक ३१३ सनसिटी कम्युनिटी हॉल येथे मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात संवेदनशील किंवा दुर्गम ठिकाणी मतदान केंद्रे नसून ४८३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. माने यांनी दिली.

भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे यांना पुन्हा भाजपची उमेदवारी

भारतीय जनता पार्टीने २२ उमेदवारांची नावे असलेली दुसरी यादी आताच जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजप पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 22 उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काही विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. खाद्क्वस्ल्यात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर , पुणे कॅन्टोन्मेंट चे विद्यमान आमदार सुनील कांबळे आणि कसब्यात गेल्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे 1. पुणे छावणी – सुनील कांबळे 2. कसबा – हेमंत रासने 3. लातूर ग्रामीण – रमेश कराड ‘ 4. उल्हासनगर – कुमार आयलानी 5. शिराळा – सत्यजित देशमुख 6. धुळे ग्रामीण – राम भदाणे 7. मलकापूर – चैनसुख संचेती 8. अकोला पश्चिम – विजय अग्रवाल 9. ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे 10. वाशिम – श्याम खोडे 11. खडकवासला – भीमराव तापकीर 12. जत – गोपीचंद पडळकर 13. अकोट – प्रकाश भारसाखले 14. मेलघाट – केवलराम काळे 15. नाशिक मध्य – देवयानी फरांदे 16. पंढरपूर – समाधान आवताडे 17. वरोरा – करण देवतळे 18. विक्रमगड – हरिश्चंद्र भोये 19. सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे 20. राजुरा – देवराव भोंगळे 21. गडचिरोली – मिलिंद नरोटे 22. पेन – रवींद्र पाटील


काँग्रेसची जागा बदलाबाबत ठाकरेंशी चर्चा:मल्लिकार्जुन खरगेंचा निरोप घेऊन थोरात उद्धव ठाकरेंना भेटले

मुंबई- महाविकास आघाडीचे जागावाटप निकाली निघाल्याच्या दावा करणाऱ्या काँग्रेसने आज पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जागा बदलावर चर्चा केली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर जाऊन जागावाटपाविषयी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा निरोप त्यांना कळवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी याची पुष्टी केली. यावेळी त्यांनी आपल्या मुलीविषयी भाजप नेत्याने केलेल्या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला.

बाळासाहेब थोरात शनिवारी दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी माझ्यावर उद्धव ठाकरे व शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली होती. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो का? हा विचार या चर्चेत होता. त्या दृष्टिकोनातून आमच्यात चर्चा झाली.

विशेषतः काही विषय असे असतात, जे प्रत्यक्ष भेटून बोलणे गरजेचे असते. आजच्या बैठकीत काय झाले ते मी खरगे व चेन्नीथला यांना सांगणार आहे.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्हाला काही कार्यक्रम घ्यायचे आहेत. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन काही कार्यक्रम करायचे आहेत. या मुद्यावरही माझी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. पत्रकारांनी यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ 2 दिवस शिल्लक असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी अशा गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत चालत असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, जागावाटपाच्या चर्चेसारख्या काही गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत चालत असतात. आम्ही मैत्रीपूर्ण लढती कोणत्याही स्थितीत करणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आमचा अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल. आम्ही 180 हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. महाष्ट्रात आमचे सरकार स्थापन करण्याचा आमचा निर्धार आहे.

डॉ. जयश्री थोरातांबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा हिच भाजपाची ‘लाडकी बहीण’बद्दलची विकृत मानसिकता: नाना पटोले

महिलांचा अपमान करणाऱ्या अवलादींना माताभगिनीच व्याजासह त्यांची जागा दाखवतील.

विकृत वसंत देशमुखासह सुजय विखेंवर कडक कारवाई करा, निवडणूक आयोगानेही दखल घ्यावी.

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर २०२४
लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपाचा माजी खासदार सुजय विखेच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल अत्यंत हिन, निर्लज्ज व पातळी सोडून भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा हिच भाजपाची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते, अशा विकृत मानसिकतेला माता भगिनीच त्यांची जागा दाखवतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यासंदर्भात भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संगमनेरच्या सभेत विखेच्या कार्यकर्त्याने, “निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही”, अशी थेट धमकी देत तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुजय विखे व्यासपीठावरच होते. अशी वक्तव्य करणारा व्यक्ती वयाने ज्येष्ठ दिसतो. महिलांबद्दल अशी भाषा भाजपावालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रिजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. राज्यातील माता भगिनी या अपमानाचा व्याजासह निवडणुकीत बदला घेतील असेही नाना पटोले म्हणाले.

संगमनेर प्रकरणी भाजपाकडून आता सारवासारव केली जात आहे पण यामुळे त्यांची मानसिकता बदलणार नाही. पोलीस महासंचालकांनीही पक्षपाती न करता कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे. वसंत देशमुख या विकृत व्यक्तीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. निवडणूक आयागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वसंत देशमुख व सुजय विखेवर कारवाई करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

पर्वतीतून अश्विनी कदम तर खडकवासल्यातून सचिन दोडके – NCP शरद पवार गटाची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपली 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात पक्षाने पर्वतीतून अश्विनी नितीन कदम ,खडकवासला सचिन दोडके , एरंडोल विधानसभा मतदारसंघातून सतीश अण्णा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून आलेल्या सतीश चव्हाण यांना गंगापूर येथून विधानसभेच्या मैदानातून उतरवले आहे. याशिवाय पक्षाने माळशिरस येथून उत्तम जानकर यांना तिकीट दिले आहे.

शरद पवार गटाची दुसरी यादी

  1. सतीश अण्णा पाटील – एरंडोल
  2. सतीश चव्हाण – गंगापूर
  3. पांडूरंग वरोरा – शहापूर
  4. राहुल मोटे – परांडा
  5. संदीप क्षीरसागर – बीड
  6. मयुरा काळे – आर्वी
  7. दीपिका चव्हाण – बागलाण
  8. माणिकराव शिंदे – येवला
  9. उदय सांगळे – सिन्नर
  10. सुनीत चारोसकर – दिंडोरी
  11. सचिन दोडके – खडकवासला
  12. गणेश गीते – नाशिक पूर्व
  13. ओमी कलाणी – उल्हासनगर
  14. सत्यशिल शेलकर – जुन्नर
  15. सुलक्षणा शिलवंत – पिंपरी
  16. अश्विनी नितीन कदम – पर्वती
  17. अमित भांगरे – अकोले
  18. अभिषेक कळमकर – अहिल्यानगर शहर
  19. उत्तम जानकर – माळशिरस
  20. दीपक चव्हाण – फलटण
  21. नंदिनी बाभूळकर – चंदगड
  22. मदन कारंडे – इचलकरंजी

अनाथ मुलींनी लुटला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत दिवाळी खरेदीचा मनमुराद आनंद

पुणे दि.२६: दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने, फराळ, मिठाई असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सामन्यता मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात पण ज्या अभागी मुलांच्या नशिबात हे भाग्य नाही अशा अनाथ मुलींनी दिवाळीच्या सणानिमित्ताने तुळशीबागेत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत मनसोक्त खरेदी करत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी सर्व मुलींना चॉकलेट्स, बिस्कीट आणि मिठाई भेट म्हणून दिली.

तुळशीबाग गणपती मंडळ यांच्यातर्फे दिवाळी निमित्त मुळशी येथील सूर्योदय फाउंडेशन मधील अनाथ मुलींसाठी तुळशीबाग येथे दिवाळी खरेदी च्या उपक्रमाचे आयोजन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. याप्रसंगी श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, किरण चव्हाण, जितेंद्र आंबासनकर, प्रदीप इंगळे, श्रीमती अभिनेत्री वाळके, सुनंदा इपते, लक्ष्मी भावसार, सोनी पवार, सूर्योदय फाउंडेशन च्या रोहिणी दीक्षित उपस्थित होते.

हा स्तुत्य उपक्रम या दीपोत्सवाचा निरामय आनंदापासून वंचित असलेल्या या मुलानं मायेची उब देणारा ठरेल असा विश्वास डॉ नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की या मुलींनी शिकून मोठं व्हावं, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं करियर घडवावं. तसेच तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि मंडळाचे अभिनंदन करुन अत्यंत प्रामाणिकपणे या सर्व मुलींचे आदरातिथ्य केल्याबद्दल हार्दिक आभार मानले.

दिवाळीनिमित्त या मुलींच्या चेहऱ्यावर खुललेला आनंद मलाही आनंदित करतो. आपण सर्व या मुलींच्या घरातील सदस्य असल्यासारखे कायम त्यांच्या सोबत राहुया अशा हृद्य भावना डॉ गोऱ्हे यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या. तसेच, मंडळाचे कार्य ही नेहमीच देदीप्यमान असे राहिले आहे. विविध सामाजिक व आगळेवेगळे उपक्रम राबविण्यात मंडळ कायम पुढाकार घेत असते. भविष्यातही असेच कार्य मंडळाकडून सदैव घडत राहो अशा शुभेच्छा डॉ. गोऱ्हे यांनी तुळशीबाग गणपती मंडळाला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्या. मंडळाच्या पहिल्या महिला ट्रस्टी म्हणून अभिनेत्री वाळके यांची नियुक्ती केली त्याबद्दल त्यांनी मंडळाचे अभिनंदन केले.