Home Blog Page 619

टाटा नमकच्या नावाने बनावट मीठ विकणाऱ्या हडपसरच्या चौधरीला पकडले

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात कॉपीराईट कायद्याचा भंग करुन मीठाची विक्री करणार्‍या एका दुकानदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई हडपसर येथील विठ्ठल मंदिराशेजारील बालाजी ट्रेडर्स या दुकानात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत साजीद असगरअली अन्सारी (वय ३४, रा. स्पाईन रोड, भोसरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिराराम गंगाराम चौधरी (वय २६, रा. सोलापूर रोड, हडपसर) आणि नरेंद्रसिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साजीद अन्सारी यांना हडपसरमध्ये टाटा नमकच्या नावाने दुसरे मीठ विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार फिर्यादींनी पाहणी केली असता बालाजी ट्रेडर्स या दुकानातून भेसळयुक्त टाटा मिठाची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी बालाजी ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना २० पोत्यांमध्ये टाटा नमक (मीठ) चे ६०० एक किलोच्या पुड्या आढळून आल्या. पोत्यामधील मिठाचे पाकिटावरील कव्हर व त्याचे अक्षराचे फॉन्ट पूर्णपणे वेगळे दिसून आले. तसेच त्याच्यावर बॅच नंबर देखील नव्हते.

ही सर्व पाकिटे पूर्णपणे कॉपीराईटचा भंग करुन बनविल्याचे आढळून आले. त्याची विक्री करुन कॉपीराईटचे हक्काचे उल्लंघन करीत असताना दुकानदार मिळून आला. याबाबत हिरामराम चौधरीकडे चौकशी केल्यावर त्याने नरेंद्रसिंग याच्याकडून ही पाकिटे घेतल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशिल लोणकर करत आहेत.

राज्यातील भगिनींनी दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे: नाना पटोले.

नाना पटोलेंच्या उपस्थितीत भंडाऱ्यातून पुजा ठवकर व अर्जूनी मोरगावमधून दिलीप बनसोड यांचा अर्ज दाखल.

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर २०२४
महागाईने गृहिणींचे प्रचंड हाल होत असताना केवळ १५०० रुपये देऊन भाजपा सरकार मदत केल्याचे सोपस्कार पार पाडत आहे. केवळ पैसे देऊन महिलांचा सन्मान होत नाही. काँग्रेस सरकारने वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हिस्सा देण्याचा कायदा करुन महिलांचा सन्मान केला. राज्यातील ६७ हजार महिला बेपत्ता आहेत, त्यावर सरकारला प्रश्न विचारला तर सरकार उत्तर देऊ शकले नाही, महिलांवर अन्याय, अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. आता राज्यातील भगिनींनीच दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भंडारा विधानसभेच्या काँग्रेस मविआच्या उमेदवार पुजा गणेश ठवकर तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेस मविआचे उमेदवार दिलीप वामन बनसोड यांचा उमेदवारी अर्ज नाना पटोले यांच्या उपस्थितीत दाखल करण्यासाठी सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोले, माजी पालकमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आमदार अभिजित वंजारी, मा. आ. वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमितीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापुरात भाजपाच्या शाळेत ३-४ वर्षांच्या लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले, लोकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला तरिही शाळेच्या संचालकांवर कारवाई केली नाही, कोर्टाने झापल्यानंतर शाळेच्या संचालकांना अटक केली. भाजपा युतीचे सरकार महिलांना न्याय देऊ शकले नाही. मविआचे सरकार आल्यावर महिला सक्षमिकरणावरही भर देऊ, असे नाना पटोले म्हणाले.

यंदाही कसबा आम्हीच जिंकणार – रवींद्र धंगेकर

पुणे-कसबा हा कुणाचाच गड नाही तर कसबा हा केवळ जनतेचा गड आहे. यंदाही कसबा आम्हीच जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. माझ्या विरोधात भाजप संपूर्ण ताकद वापरत आहेत पण जनता माझ्या बाजूने असल्याने विजय माझा निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले. विरोधक अपप्रचाराची खेळी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जनता त्यांचा डाव हाणून पाडणार असेही यावेळी त्यांनी नमूद केले. श्री कसबा गणपतीचे  आशीर्वाद घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्नीसह मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून गणरायाचा आशीर्वाद घेत आपल्या उमेदवारीचा अर्ज सोमवारी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दाखल केला.

श्री कसबा गणपतीची आरती करून व आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आली. लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. यावेळी काढलेल्या रॅलीत नागरिक, कार्यकर्ते व महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुणाई बरोबरच महिला व ज्येष्ठांनी रॅलीत सहभाग घेतला. रवींद्र धंगेकर यांचा विजय असो, असा जयघोष करण्यात आला.  

काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आदि प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बरोबरच कसबा ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने, नेहरू स्टेडियम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, भाग 16चे अध्यक्ष मयूर भोकरे, भाग 15चे अध्यक्ष महेश हराळे, शिवराज भोकरे, गणेश शेडगे, कसबा महिला ब्लॉक अध्यक्ष गीता तारू, सोना ओव्हाळ, युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, संदीप अतपालकर, साहिल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कसबा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश नलावडे, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, भाई कात्रे, संजय गायकवाड, बाळासाहेब ढमाले, सारिका पारेख, निलेश मोरे, दीपक पोकळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कसबा विभाग प्रमुख चंदन साळुंखे, जावेद खान, राजेंद्र शिंदे, रुपेश पवार, संदीप गायकवाड, उमेश गालींदे, हनुमंत दगडे, बाळासाहेब गरूड, अरविंद दाभोळकर, गौरव सिन्नरकर, निलेश पवार, पारेख खांडके, निकिता मारडकर, स्वाती कथलकर आदि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, रवींद्र धंगेकर यांचे  महिलांकडून होणारे औक्षण व रवींद्र धंगेकर यांचा विजय असो अशा घोषणा देत नागरिकांनी मोठा प्रतिसाद धंगेकर यांना दिला.

कसब्याच्या नागरिकांच्या मनातला आमदार, सर्वसामान्यांचा चेहरा, 24 तास जनसेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.

श्रीमंत  दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत गणरायाची आरती करून धंगेकर यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.

छत्रपती शिवाजी मार्गाने पुढे जात असताना चौकात चौकातील गणेश मंडळांकडून धंगेकर यांचे स्वागत करण्यात येत होते. कार्यकर्त्यांना पाणी शरबत नागरिक देत होते. तिन्ही पक्षाचे झेंडे कार्यकर्ते हाती घेऊन धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. रवींद्र धंगेकर विक्रमी मताधिक्याने निवडून येतील हे आजच्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सिद्ध झाले आहे, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

भिगवण व उरुळी कांचन येथे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक जनजागृती मेळावा संपन्न

पुणे, दि. २८ : लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्यावतीने इंदापूर तालुक्यातील भिगवण व हवेली तालुक्यातील उरूळी कांचन येथे लाचलुचपत प्रतिबंधक जनजागृती मेळावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. भिगवण व उरुळी कांचन येथील आयोजित मेळाव्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. निंबाळकर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची रचना व कार्यपद्धती विषयी माहिती देऊन म्हणाले, अशा प्रकारच्या मेळाव्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नागरिकांमधील दरी कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात लाच-लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करता येते. याशिवाय लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांविरुद्धही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच त्या प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल. लोकसेवकाने कामे करण्याकरिता नागरिकांकडे लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पुणे कार्यालयाच्या ०२०-२६१३२८०२, २६१२२१३४, तसेच ७८७५३३३३३३ या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही श्री. निबांळकर यांनी यावेळी केले.

यावेळी नागरिकांमध्ये विभागाविषयी असलेले गैरसमज, शंकाचे निराकरण करण्यात आले. मेळाव्यात उरुळी कांचन परिसरातील सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, उरुळी कांचन पोलीस ठाणे तसेच भिगवण येथील ग्रामीण शासकीय रुग्णालय, भिगवण बस स्थानक, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय, भिगवण पोलीस ठाणे आदी शासकीय ठिकाणी तसेच बाजारपेठामध्ये जनजागृतीच्या अनुषंगाने हस्तपत्रिका, भिंतीपत्रके व व्हिजिटिंग कार्ड्स वितरीत करण्यात आले.

पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी मिसाळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पुणे-पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी मिसाळ यांनी शक्तिप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला.सारसबाग येथील गणपती आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मिसाळ यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्केट यार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पद्मावती, अण्णा भाऊ साठे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक या महापुरुषांना अभिवादन केले.

केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, निवडणूक प्रमुख दीपक मिसाळ, गणेश बिडकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, करण मिसाळ, संतोष नांगरे, प्रशांत दिवेकर, सुधीर कुरुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

मोहोळ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. माधुरी ताईंनी या मतदारसंघातील विकास कामांना गती दिली, लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचवल्या, त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे. त्यामुळे त्या मोठ्या बहुमताने विजयी होतील.”

माधुरी मिसाळ म्हणाल्या, सलग चौथ्यांदा भाजपच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. गेली पंधरा वर्षे केलेली विकासकामे आणि सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने विजयी होऊ असा विश्वास वाटतो.

आजच्या परिस्थितीत हिंदू समाजाला एकत्र आणणे महत्वाचे-स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

   विश्व हिंदू परिषद पुणे महानगराच्या वतीने  आयोजित ‘संत संगम ‘ कार्यक्रम
पुणे : हिंदू धर्म हा सर्व समभाव मानणारा आहे, कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही, मात्र आपणच किती वेळा दगा सहन करायचा? आजच्या परिस्थितीत हिंदू समाजाला एकत्र आणणे महत्वाचे आहे, आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे हे मान्य आहे, मात्र त्यासाठी आपण शिल्लक राहिजे पाहिजे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणूकीत मतदान करा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी  केले. 

विश्व हिंदू परिषद पुणे महानगराच्या वतीने स. प . महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल मध्ये आयोजित ‘संत संगम ‘ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज बोलत होते. यावेळी भंते हर्षवर्धन शाक्य, ज्ञानी अमरजीत सिंह, ह.भ.प.चिदंबरेश्वर साखरे महाराज, १००८ किन्नर आखाडा महामंडलेश्वर दीपाजी नंदगिरी जगावली माताजी, श्री महानुभव पंथाचे रविराज दादा पंजाबी, सिंधी संप्रदायाचे संत अनंत प्रकाशजी, वाल्मिकी संप्रदायाचे कैलासनाथ व भगवान महाराज,ह.भ.प फुरसुंगीकर व ह.भ.प पळसे महाराज या धर्मगुरूंसह विहिंप महाराष्ट्र व गोवा धार्मिक विभाग संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत धर्माचार्य सह प्रमुख नागनाथ  बोंगरगे, धर्माचार्य संपर्क प.म.प्रांत सदस्य समीर पायगुडे, पूर्व पुणे विभाग मंत्री धनंजय गायकवाड, पश्चिम पुणे विभाग मंत्री केतन घोडके आदी उपस्थित होते. 
पुढे बोलताना स्वामी  गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, आपला समाज, आपला देश टिकला पाहिजे, आपण देश प्रथम या भावनेने राष्ट्र वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या हिंदुस्थानाचा विस्तार प्रचंड मोठा होता, आपला देश अनेकदा संकुचित झाल्याचे दिसते भविष्यात संकुचित व्हायला जागा नाही, यामुळे आपण जगाला प्रेम देण्यासाठी आधी आपल्या सुरक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे. समाजवाद, सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या गोष्टी एका बाजूने होणार नाहीत, देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच हिंदुत्वाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना किशोर चव्हाण म्हणाले, आपण हिंदुत्वासाठी मतदान कसे होईल यांची जागृती करण्यासाठी इथे जमलो आहोत. देशाला , समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी संविधान जीवंत असणे आवश्यक आहे. हिंदू बहुसंख्यक आहे तोपर्यंतच  देश आणि संविधान सुरक्षित असणार आहे यांची जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी आपला हा उपक्रम आहे. 

संजय मुद्राळे म्हणाले, आपण आज संत संगम कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माचार्यांचे विचार ऐकत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद असे अनेक संतांचे अनमोल योगदान आहे. सातव्या शतकापासून आपल्यावर असंख्य परकीय आक्रमणे झाली मात्र आपण आपला धर्म फक्त संताच्या धैर्यामुळे, मार्गदर्शनामुळे टिकवू शकलो आहोत, आजही त्यांच्या विचारांची आपल्या देशाला गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभम मुळूक यांनी केले. 

पीसीसीओई मध्ये रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २८ ऑक्टोबर २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या नुकताच माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. यात एक हजार पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद रजत गुप्ता, वसुंधरा सिंह, संपदा कुलकर्णी, सौरभ बेदमुथा, संतोष पुजारी महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख प्रा. अजित पाटील आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी मागील २५ वर्षांचा आढावा घेत महाविद्यालयाने केलेली उत्तुंग कामगिरी सर्वांसमोर मांडली. तसेच महाविद्यालयाचे धोरण मिशन, विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम व सर्वांगीण विकासासाठी केलेले काम याची माहिती दिली.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रास्ताविक करताना महाविद्यालयाने आतापर्यंत प्लेसमेंट मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल माहिती दिली. आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आयटी, कला, मनोरंजन स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, परदेशांमध्ये उच्च शिक्षण, नोकरी यामध्ये स्वतंत्र ठसा उमटवून देशाचे नाव उज्वल केले आहे, याचा पीसीईटीच्या विश्वस्तांसह आम्हा सर्व प्राध्यापकांना सार्थ अभिमान आहे. महाविद्यालयाचे नाव उंचावण्यात विद्यार्थ्यांचे देखील मोठे योगदान आहे.
या माजी विद्यार्थ्यांनी आता इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. काही माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. ते शिकलेल्या विभागामध्ये मध्ये जाऊन आपल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटून विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याची सांगता झाली.
सूत्र संचालन प्रा. राजकमल सांगोले आणि प्रा. सोनल शिर्के व आभार माजी विद्यार्थी वसुंधरा सिंह यांनी मानले.

कॉंग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रचंड गर्दी: पर्वतीतून अश्विनी कदम यांनी भरला उमेदवारी अर्ज

पुणे- पर्वती विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी,आणि महिलांच्या तोबा गर्दीच्या मिरवणुकीने जाऊन महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .

माजी खासदार वंदना चव्हाण काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश काकडे ,माजी उपमहापौर निलेश निकम शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे ,बंडू नलावडे , शिवसेनेचे माजी गटनेते अशोक हरनावळ, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे संजय मोरे माजी आमदार जयदेव गायकवाड रवींद्र माळवदकरपर्वती अध्यक्ष शशिकांत तापकीर सौ. मृणालिनी वाणी, बाळासाहेब अटल, सचिन पासलकर, राहुल तुपेरे,अभिजीत बारवकर, तुषार नांदे, निलेश पवार, अमोल ननावरे, अभिजीत उंदरे, लखन वाघमारे, सुमित पवार, मंगेश जाधव, श्रीकांत मेमाणे, प्राजक्ता जाधव अमोल रासकर निलेश खंडाळे अमोल परदेशी संतोष पाटोळे रमेश सोनकांबळे इत्यादी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्केट यार्ड या ठिकाणच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आदी महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहर अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना अश्विनी नितीन कदम म्हणाल्या की, ” मागील पंधरा वर्षे आपली पर्वती सर्वांगीण विकासापासून वंचित आहे. नागरिकांना स्मरणात राहण्यासारखे एकही काम मागील पंधरा वर्षात निष्क्रिय आमदारांना उभा करता आले नाही. पंधरा वर्षातील निष्क्रियता संपवण्याची संधी यावेळी पर्वतीकर नागरिक सोडणार नाहीत. नगरसेवक या नात्याने माझ्या परिसरात नागरीकाना सुख – सुविधा आरोग्यसेवा, विविध योजना, घरोघरी देण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. मला पर्वतीकरांनी आमदार म्हणून सेवा करण्याचे संधी दिल्यास वैद्यकीय, शैक्षणिक, महिला सुरक्षितता, कोयता गॅंग, वाहतूक कोंडी, वाहतूक समस्या आदी प्रमुख विषयावर कायमस्वरूपी उपयोजना करून परिसराचा कायापालट करणार. संपूर्ण पुणे शहराला हेवा वाटेल असा पर्वती मतदारसंघ निर्माण करणार.

शिवरायांचे गड-कोटांचे प्रशासन उल्लेखनीय

पुणे : भारतीय लोक शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर जर गेले तर त्यापासून प्रेरणा घेऊन पुन्हा आपल्याशी लढतील आणि ती प्रेरणा त्यांना मिळू नये या उद्देशाने ब्रिटिशांनी भारतीयांना तिथे जाऊ दिले नाही. यामुळेच शिवाजी महाराजांच्या गड कोटांची दुरवस्था झाली असे मत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी आज ( २८.१०.२०२४ ) व्यक्त केले. दिवाळीनिमित्त माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात गड-किल्ले बांधणी स्पर्धेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ” छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटांचे प्रशासन ” या विषयावर ते बोलत होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सागरी आरमाराची निर्मिती आजच्या वसुबारसदिवशी केली असल्याच्या अनुषंगाने प्रशालेत गाय आणि वासरू यांची पूजा करण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी विविध प्रकारच्या गायी आणि त्यांचे होणारे उपयोग याबद्दल माहिती दिली.
एकावेळेला 300 लोक जाऊ शकतील आणि 300 टन साहित्य वाहून नेता येईल अशी जहाजे मराठ्यांनी निर्माण केली होती. यामुळेच सागरी मार्गाने व्यापार सुरू झाला आणि स्वराज्याची भरभराट होऊ शकली असल्याचं थोरात यावेळी म्हणाले. महाराजांनी गड किल्ल्यांचे प्रशासन उत्तम राखल्यानेच महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे लढू शकले अशीही माहिती थोरात यांनी यावेळी दिली.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या सागरी आरमाराची निर्मिती वसुबारसदिवशी केली असल्याची माहितीदेखील थोरात यांनी यावेळी दिली. या अनुषंगाने प्रशालेतील सर्व शिक्षिका , शिक्षकेतर महिला कर्मचारी यांच्या हस्ते गाय आणि वासरू यांची पूजा करण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी विविध प्रकारच्या गायी आणि त्यांचे होणारे उपयोग याबद्दल माहिती दिली.

तत्पूर्वी दीप्रज्वलननाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याचवेळी डॉ सुशीलकुमार धनमने आणि अनंतप्रसाद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचे परीक्षण केले. राजगड , प्रतापगड आणि तोरणा या प्रतिकृतींना अनुक्रमे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंतीताई यांनी परिक्षकांचा परिचय करून दिला. विकास दिग्रसकर यांनी सुत्रसंचलन केलं.

बारामतीत काका-पुतणे आमनेसामने-दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल

बारामतीत लोकसभेनंतर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार

पुणे- बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका-पुतण्या आमने-सामने आहेत. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत.या दोहोंनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत महाविकास आघाडीच्या वतीने युगेंद्र यांचा अर्ज दाखल करताना खुद्द शरद पवार स्वतः उपस्थित होते तर अजित पवारांचा अर्ज भरताना जय पवार उपस्थित होते घरून विजया पाटील , सुनेत्रा पवार यांनी औक्षण केल्यावर अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करायला मिरवणुकीने निघाले.

युगेंद्र यांचे कन्हेरी येथील निवासस्थानी मातोश्री शर्मिला यांच्याकडून औक्षण करण्यात आले. ग्रामदैवत कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत त्यांनी शहरातील कसबा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.तद्नंतर इंदापूर रस्त्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते प्रशासकीय भवनात दाखल झाले. तेथे शरद पवार यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. जगताप, सदाशिव सातव, सतीश खोमणे यांच्या उपस्थितीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज दाखल केला.

मी जी चूक केली तीच चूक आता पवारसाहेबांनी केली -अजितदादा

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याकडून जी चूक झाली तीच चूक या निवडणुकीत शरद पवार करत असल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत कुटुंबातील उमेदवाराविरोधात उमेदवार देण्याची मोठी चूक माझ्याकडून झाली. ती चूक आता त्यांच्याकडून होत आहे, असे ते म्हणालेत.अजित पवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पक्ष लोकसभेला आपल्याकडून जी चूक झाली तीच करत असल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिले होते. त्यात सुनेत्रा यांचा पराभव झाला होता.

अजित पवार यासंबंधी म्हणाले, लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्याविरोधात उभे करून तीच चूक ते करत आहेत. त्यांनी (शरद पवार) असे करायला नको होते. लोकशाही शासन पद्धतीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.

निवडणुकीत माझ्या विरोधात उभा राहणारा प्रत्येक उमदेवार स्ट्राँगच असल्याचे माणून आम्ही आतापर्यंत प्रचार केला. यंदाच्या निवडणुकीतही तीच परिस्थिती असेल. यंदा विरोधात कोणताही उमेदवार असला तरी बारामतीकर मला चांगल्या मतांनी निवडून देतील असा मला विश्वास आहे. दरम्यान, युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. ते अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत.

पास होण्यासाठीच परीक्षेला बसलोय :
खा. सुप्रिया सुळे

बारामतीमध्ये एक समांतर यंत्रणा, अदृश्य शक्ती बारामती चालवत आहे. हे अजिबात चालणार नाही. आगामी काळात ही समांतर यंत्रणा मोडून टाकण्यात येईल. सर्वसामान्य बारामतीकर बारामती चालवतील. केवळ बिल्डिंग्ज उभ्या करून प्रश्न सुटत नाहीत तर त्याचा सोशल इम्पॅक्टमध्ये बदल झाला पाहिजे. आम्ही परीक्षेला पास होण्यासाठीच बसलोय, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. युगेंद्र यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हेरी येथे मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. गेली सहा दशके शरद पवार यांना बारामतीकरांनी प्रेम दिले आहे. या निवडणुकीतही ते दिसून येईल असे त्या म्हणाल्या.

मी असेन नवखा पण आजोबा आहेत पाठीशी- युगेंद्र
मी गेली काही वर्षे समाजकारणात सक्रिय होतो. पक्षाने उमेदवार देत मोठी जबाबदारी दिली, त्याचा आनंद आहे. मी राजकारणात नवखा असलो तरी ५० वर्षांहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे आजोबा शरद पवार माझ्यासोबत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. बारामतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भ्रष्टाचार बोकाळला आहे, गुन्हेगारी वाढली आहे. अशा अनेक प्रश्नांसाठी आपला लढा असेल. तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल असे युगेंद्र पवार म्हणाले.

स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रगती करण्यासाठी जस्टडायलतर्फे पुण्यातील लहान व्यवसायांना मदत

पुणे-मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर पुणे हे शिक्षण, संस्कृती आणि उद्योगाचे माहेरघर आहे. येथील नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात  अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. पुणे शहराला मोठा आणि समृद्ध सांस्कृतिक इतिहास आहे. शास्त्रीय संगीत, नाटक, क्रीडा आणि साहित्य यांचे महोत्सव पुण्यात होत असतात.

पुण्याच्या अर्थव्यवस्थेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ अनुभवली असून माहिती तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास आले आहे. नवीन स्टार्टअप हब म्हणून पुण्याचा नावलौकिक होत असताना विविध उद्योगक्षेत्रात या शहराचा जलद गतीने विस्तार होत आहे. यामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी पुणे हे एक आहे. पुणे शहराला एक मजबूत औद्योगिक पाया आहे आणि प्रभावी व्यवसाय वातावरणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुमारे 7.5 लाख उद्यम-नोंदणीकृत MSMEs (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) येथे आहेत.

पुण्याच्या विकासाला हातभार लावताना जस्टडायलने MSMEs ना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांना पाठबळ आणि सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे MSMEs ना त्यांची दृश्यमानता वाढवायला आणि व्यवसायांना सोप्या पद्धतीने संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. वाढीव लीड्स, ब्रँड जागरूकता आणि ग्राहक सहभागाच्या माध्यमातून शहराच्या विशाल बाजारपेठेचा लाभ घेण्यास सक्षम करत जस्टडायल पुण्यातील अनेक उद्योजकांचा विश्वासू सहकारी बनला आहे.

पुण्यातील अनेक MSME मालकांनी जस्टडायलने त्यांच्या व्यवसायात कसे बदल घडवून आणले याबद्दल आपले अनुभव सांगितले आहेत. उदाहरणार्थ, मॉडर्न वॉटर प्युरिफायरचे मालक प्रशांत पवार यांनी जस्टडायलसोबतच्या त्यांच्या दीर्घकालीन सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “मी गेली 10 वर्षे वॉटर प्युरिफायर व्यवसायात आहे आणि माझी जस्टडायलची नोंदणी 8 ते 10 वर्षांपासून सक्रिय आहे. जस्टडायलने माझ्या व्यवसायाला महत्त्वपूर्ण चालना दिली असून त्यांच्यामुळे मला खात्रीशीर लीड्स आणि ग्राहक मिळाले आहेत. माझ्या दीर्घकालीन भागीदारीमुळे, मला दररोज 8 ते 10 दर्जेदार लीड्स मिळतात आणि माझ्या व्यवसायाचा मोठा हिस्सा जस्टडायलमधून येतो. हा खूप फायदेशीर प्रवास राहिला आहे आणि माझ्या व्यवसायाच्या सातत्यपूर्ण वाढीसाठी मी जस्टडायलवर अवलंबून आहे.”

जस्टडायलच्या सेवा व्यवसायांना स्पर्धात्मक बाजारपेठेत वाढीसाठी आवश्यक डिजिटल एक्सपोजर पुरवितात. एव्हरग्रीन एंटरप्रायझेसचे मालक स्वप्नील कुडाळे यांनी जस्टडायल पॅकेज अपग्रेड केल्याचे फायदे सांगितले. “मी 2009 पासून जस्टडायलसोबत आहे. आम्ही सुरुवातीला 12,000 रु. च्या मूलभूत पॅकेजसह सुरुवात केली, पण आमचा व्यवसाय वाढल्यामुळे, आम्ही 3 लाख रु.चे पॅकेज अपग्रेड केले. जस्टडायलने डिजिटल मार्केटिंगसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असल्याचे सिद्ध केले असून त्यामुळे व्यवसाय आणि ग्राहक संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांच्या टीमने आम्हाला खूप मार्गदर्शन केले आहे आणि आमच्या वाढीचे श्रेय बऱ्याच अंशी जस्टडायलला जाते. आम्हाला नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी जस्टडायलचे आम्ही आभार मानतो.”

दृश्यमानता आणि लीड्स मिळवून देणे यापलीकडे जात जस्टडायल त्यांच्या ग्राहकांना मोठ्या ग्राहक आधार मिळवून देत आहे. त्यामुळे व्यवसायाची पायभरणी आणि महसुलात वाढ होत आहे. हॉटेल रेस्ट इनचे मालक समाधान पिंजारी यांनी जस्टडायलमुळे योग्य प्रकारचे ग्राहक कसे आकर्षित झाले याबद्दल सांगितले. “जस्टडायलमध्ये नोंदणी केल्यानंतर आम्हाला अपेक्षित प्रकारचे ग्राहक आमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे ग्राहकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तेव्हापासून आम्हाला चांगला नफा मिळतो आहे आणि अनेक दर्जेदार लीड्स मिळाल्या आहेत. जस्टडायल माझ्या व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे.”

अशा असंख्य MSMEs ने त्यांच्या व्यवसायाच्या यशोगाथा अनुभवल्या असून, जस्टडायल त्यांना वाढ, दृश्यमानता आणि ग्राहक सहभागासाठी व्यापक प्लॅटफॉर्म पुरवत पुणे आणि त्यापलीकडे व्यवसायांना सक्षम करण्याचे कार्य करत आहे.

काकडा आत्मभान देतो; आत्मज्योत जागवितो : ह.भ.प. अद्वैता उमराणीकर

कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे ‌‘कार्तिक महात्म्य‌’ विषयावर प्रवचन
पुणे : मोहमायेतील गुरफटलेपण सोडून जागृत व्हा, नामस्मरणाचे महत्त्व जाणा, गुरुंची महती समजून घ्या, श्रद्धा जोपासून चैतन्याचा शोध घ्या, असे सांगणाऱ्या कार्तिक महिन्यातील काकडा या विषयी ह.भ.प. अद्वैता उमराणीकर यांनी ‌‘कार्तिक महात्म्य‌’ कार्यक्रमातून उपस्थितांचे प्रबोधन केले.
कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त ‌‘कार्तिक महात्म्य‌’ या विषयावर ह. भ. प. अद्वैता उमराणीकर यांचे पुण्याई सभागृह, पौड रस्ता येथे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
हरिपाठाचे जगणे आपल्या आचरणात यावे, असे सांगून उमराणीकर यांनी अक्कलकोट, शेगांव, गोंदवले, सज्जनगड, नृसिंहवाडी, शिर्डी, अमृतसर आदी भक्तिसंस्थानांमध्ये काकड्याची परंपरा कशी आहे, याविषयी माहिती विशद केली. काकड्यात सादर होणारी पंचपदी, भजन, आरती, गवळण, भारुड, जागल्या या भक्तिसंप्रदायातील वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणांची त्यांनी थोडक्यात ओळख करून दिली. सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्य या मुक्तीप्रकारांविषयी उद्बोधक माहिती सांगितली.
आपल्या नित्यनेमात फक्त पोथीवाचन, आध्यात्मिक-धार्मिक वाचन न करता संतांनी सांगितलेल्या मार्गानुसार कर्म होणे आवश्यक आहे, असे सांगून उमराणीकर म्हणाल्या, कार्तिक महिन्यातील काकडा हा आत्मभान देतो, आपल्यातील आत्मज्योत जागवितो. नामस्मरणाचे भक्तिमार्गात असणारे अनन्यसाधारण स्थान तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, रामदास स्वामी, गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आदी संत-महात्म्यांनी सांगितलेला सुख आणि आनंद यातील फरक या विषयही उमराणीकर यांनी विवेचन केले.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरी मुणगेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर, अद्वैता उमराणीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात मुक्ता चांदोकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजश्री महाजनी यांनी केले. या प्रसंगी कऱ्हाडे ब्राह्मण संघातील सदस्यांची स्नेहभेट आयोजित करण्यात आली होती.

कोथरूड: अर्ज भरण्यापूर्वीच अमाेल बालवडकरांची माघार, आता दिला चंद्रकांतदादांना जाहीर पाठींबा

पुणे-काल रात्री जनतेच्या प्रेमाखातर आपण मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढणारच असा ठाम व्हिडीओ द्वारे दावा करणाऱ्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज सकाळी ते अपक्ष लढणार म्हणून बातम्या प्रसिद्ध होताच दुपारी माघार घेत असल्याचे जाहीर केले

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः-या तत्त्वावर भारतीय जनता पक्ष निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे. मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे.परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते, मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा देत आहे.आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील.
-अमोल रतन बालवडकर

पुण्यातील काेथरुड मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली हाेती. त्यानंतर निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक अमाेल बालवडकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत दिल्याने चंद्रकांत पाटील यांच्या समाेरील आव्हानात वाढ झाली हाेती. मात्र, भाजपच्या वतीने करण्यात आलेली शिष्टाई साेमवारी फळास येऊन चंद्रकांत पाटील व अमाेल बालवडकर यांच्यात दिलजमाई झाली आहे. बालवडकर यांच्या घरी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेत माघार घेत असल्याचे सांगत त्यांचा शाल देऊन सन्मान केला.

दरम्यान, अमाेल बालवडकर यांचे मेहुणे महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी असलेले अभिजीत कटके यांच्या वाघोली येथील निवासस्थानी नुकतीच आयकर विभागाची छापेमारी झाली होती. त्यानंतर बालवडकर हे आघाडीकडून निवडणूक लढणार असल्याची राजकीय चर्चा देखील रंगली हाेती. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सदर मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत माेकाटे यांना तिकिट जाहीर केले. त्यानंतर अमाेल बालवडकर यांनी देखील निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने नेमका काेणता दबाव बालवडकर यांच्यावर आला? याबाबत राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अमाेल बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्यपध्दती बाबत जाहीर नाराजी व्यक्त केली हाेती. पक्षात लाेकशाही मार्गाने उमेदवारी मागितली तर आपल्यावर बहिष्कार टाकण्यात आला, काेणते नेते, लाेकप्रतिनीधी आपल्या कार्यक्रमास येऊ दिले जात नाही असा आराेप केला हाेता. तसेच पक्षासाठी रात्रंदिवस काम करुन देखील पक्ष नेतृत्व जर आपल्या कामाची दखल घेत नसेल तर वेगळा निर्णय घेणे आगामी काळात भाग पडेल, असा इशारा देखील दिला हाेता. मात्र, आता बालवडकर यांच्या माघारीमुळे चंद्रकांत पाटील यांना दिलासा मिळणार असून त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे पाहवयास मिळत आहे.

खडकवासल्यातील परिस्थिती बदलली ..

पुणे : खडकवासला विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे. तर याआधी मनसेने दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे . गेल्या अनेक दिवसांपासून खडकवासला मतदारसंघामध्ये मोठा सस्पेन्स पाहायला मिळत होता. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांची उमेदवारी गॅसवर असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण खडकवासला आणि वडगाव शेरी हे मतदासंघ भाजप आणि अजित पवार गट अदलाबदल करून घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र दादांनी पुन्हा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देत या चर्चांणा पूर्णविराम दिला.आता खडकवासला मतदासंघाध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहेय. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भीमराव तापकीर आणि सचिन दोडके हे उमेदवार रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात एकदम काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादीकडून उभे असलेल्या सचिन दोडके यांचा या निवडणुकीमध्ये अवघ्या २५९५ मतांनी पराभव झाला होता. आता शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली आहे. त्यासोबतच मनसेकडून मुयुरेश वांजळे यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कांटे कि टक्कर आता सॉफ्ट दिसली तर नवल वाटणार नाही . खडकवासल्यातील परिस्थिती आता बदललीय. शरद पवारांची पुण्यातील उमेदवारी देतानाची गणिते कुठे कुठे बरोबर तर कुठे चुकलीत असे अनेकांना वाटते आहे . अजितदादा गट बरोबर नसताना येथे पवार गटाचे अनेक नाराज आहेत . आणि बिल्डर लॉबी लोकांना राजकारणात नकोशी झाली आहे .या पाश्वभूमीवर येथील उमेदवारीत सस्पेन्स पाहायला मिळाला तसा मतदानात हि पाहायला मिळेल असे दिसते आहे.

अखेर अमोल बालवडकर उतरणार रणांगणात …म्हणाले,नेत्यांपेक्षा जनतेचे प्रेम महत्वाचे..

पुणे-कोथरूड मध्ये भाजपच्या मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांच्या सहज सोप्या विजयाच्या वाटेवर आता त्यांच्याच पक्षातील अमोल बालवडकर उभे ठाकल्याने हि वाट खडतर होऊ शकणार आहे. मनसेचे किशोर शिंदे , शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा या पूर्वीच्या निवडणुकीत चंद्रकांतदादा यांनी पराभव केला . तेव्हा संपूर्ण भाजपा दादांच्या समवेत एकदिलाने उभी होती .आता परिस्थिती बदलली आहे किमान बालवडकर यांनी जाहीरपणे विरोध करत मैदानात उतरवायचे ठरविलेले आहे. पुण्यातले झालेले दादा अजूनही स्थानिक सोडून बाहेरच्या शक्तींवर अवलंबून राहिले तर हि निवडणूक त्यांना गेल्या निवडणुकीप्रमाणे सहज सोपी असणार काय? हा प्रश्न उपस्थित झाल्यास नवल वाटणार नाही .किशोर शिंदे , मोकाटे आणि बालवडकर यांचा गेल्या ५/७ वर्षातील जनसंपर्क सर्वांना ठाऊक आहेच आणि चंद्रकांत दादांनी देखील पुण्यात आणि राज्यातच चांगला संपर्क ठेवला आहे. त्यामुळे आता हि लढत दुरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुरंगी म्हणजे थेट बालवडकर यांच्याशी चंद्रकांतदादा यांचा सामना होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही .