Home Blog Page 620

 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईन गोळ्यांचा मोठा साठा पकडला

इंफाळ आणि गुवाहाटी प्रदेशामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीतील चार जणांना अटक

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची दया केली जाणार नाही, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईनच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या चार जणांना अटक केल्याबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण विभाग -एनसीबीचे गृहमंत्री शाह यांनी अभिनंदन केले. हस्तगत केलेला अंमली पदार्थांचा साठा सखोल आणि चौफेर तपासाचा उत्कृष्ट नमुना ठरतो आहे, असे शाह यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या एका पोस्ट मध्ये म्हटले आहे. 

अंमली पदार्थ मुक्त भारत निर्मितीच्या मोदी सरकारच्या मोहिमेला गती मिळत असून, त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इंफाळ आणि गुवाहाटी या भागातील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे, असे देखील शाह यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अशी सविस्तर कारवाई….

13 मार्च 2025 रोजी केलेल्या पहिल्या कारवाईमध्ये इंफाळ विभागातल्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिलॉंग परिसरात एका ट्रकला थांबवून त्याची चौकशी केली असता, ट्रकच्या मागील भागातल्या एका कोपऱ्यामध्ये लपवून ठेवलेल्या 102.39 किलो मेथमॅफेटाईनच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या  तसेच ट्रक मधल्या दोन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी लगेच पुढच्या कारवाईकडे आपला मोर्चा वळवला आणि लीलोंग परिसरात असलेल्या संशयित अमली पदार्थ तस्करांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्याकडूनही ड्रग्स तस्करीसाठी वापरले जाणारे चार चाकी वाहन जप्त केले. या प्रकरणातल्या आणखी काहींचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईनंतर त्याच दिवशी एका माहितीच्या आधारे गुवाहटी विभागातील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिलचर जवळच्या आसाम- मिझोराम सीमेवर संशयित करीमगंज या ठिकाणी एका चार चाकी गाडीला अडवले व त्याची देखील सखोल तपासणी करण्यात आली, आणि या तपासात गाडीच्या स्टेफनी टायर मध्ये 7. 48 किलो मेथमॅफेटाईन पदार्थाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गाडीतून एकाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणामध्येही संशयित असणाऱ्या इतरांचा देखील शोध आता घेतला जातो आहे.

यानंतरच्या दुसऱ्या घटनेमध्ये मिझोराम राज्य उत्पादन शुल्क विभागाने 6 मार्च रोजी ब्रिगेड बावंगकॉन एझोल येथून 46 किलो क्रिस्टल मेथ जप्त केले. या प्रकरणाचा तपास आता अंमली पदार्थ नियंत्रण विभाग करतो आहे. या प्रकरणामध्ये आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे शोधण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग या प्रकरणाचा तपास करतो आहे.

ईशान्य प्रदेशातील भौगोलिक स्थानामुळे या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. म्हणूनच हा प्रदेश देशातील सर्वात असुरक्षित म्हणून ओळखला जातो आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने 2023 मध्ये या प्रदेशातील अंमली पदार्थाच्या विरोधातील लढाईला बळकटी देण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला सशक्त केले आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पाच शाखांच्या माध्यमातून तसेच ईशान्येकडील प्रादेशिक मुख्यालयाकडून या प्रदेशात होणाऱ्या अमली पदार्थाच्या तस्करीच्या विरोधात विशेषता (YABA)  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेथमॅफेटाईनच्या गोळ्यांसारख्या कृत्रिम औषधांच्या तस्करीत सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आणि सतत कारवाई केली जात आहे. अमली पदार्थ तस्करीमुळे केवळ या भागातील तरुण लोकसंख्येलाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे,असे याबाबतच्या वृतात म्हंटले आहे.

***

नवीन कायदेविषयक माहिती जाणून घ्या : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांचे आवाहन

नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्याय संहिता 2023 मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर, 16 मार्च 2025

नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आज येथे केले.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,  नागपूर व श्री सती अनुसया माता देवस्थान, पारडसिंगा यांच्या सहकार्याने श्री सती अनुसया माता देवस्थान पारडसिंगा देवस्थान परिसर, ता. काटोल जि. नागपूर येथे आयोजित केलेल्या नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्यायसंहिता 2023 या विषयावरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश अभय मंत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी विपिन ईटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन पाटील, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे उपस्थित होते.

यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांचा तसेच उपस्थित इतर मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उमेश महतो यांनी केले. 

ब्रिटिशकालीन कालबाह्य कायद्यांमध्ये सुधारणा करून भारत सरकारने १ जुलै २०२४ पासून नवीन कायदे अमलात आणले आहेत. या नवीन कायद्यांमध्ये नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विषयक नवीन कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती नागरिकांना करून देण्याकरिता माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तर्फे काटोल तालुक्यातील पारडसिंगा देवस्थान येथे दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात नवीन कायदे तसेच बदलण्यात आलेल्या जुन्या कायद्यातील सुधारित नवीन कायदे याबाबत सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या कायदेविषयक सल्ला तसेच सुविधांविषयी माहिती देण्यात आली आहे. हे प्रदर्शन १७ मार्च २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत नागरिकांसाठी निःशुल्क खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन कायदेविषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर तर्फे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे तांत्रिक सहाय्यक संजय तिवारी, सहाय्यक मंगेश टिककस, एम.टी.एस. नरेश गच्छकायला परिश्रम घेत आहेत.

विद्यार्थ्यांनी उलगडले उपनगरांमधील शहरीकरण

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने

‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन’
पुणे : पुण्याबाहेरील शहरीकरण, शहरीकरण होताना निर्माण होणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणीय समतोल अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी ‘अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या प्रदर्शनात पुण्याच्या उपनगरांमधील शहरीकरण सखोल अभ्यासातून उलगडले.

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण कलादालन येथे करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्टचे चेअरमन ॲड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया आणि संचालक प्रसन्न देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ॲड. अभय छाजेड म्हणाले, “विकास आराखडे तयार करताना अर्बन प्लॅनिंगकडे खूप कमी लक्ष दिले जाते. महाराष्ट्र आज जवळजवळ ५०% शहरीकरणाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबईपेक्षाही पुणे शहराची वाढ वेगाने होत आहे. अशी वाढ होत असताना पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा यांची योग्य आखणी आवश्यक आहे. यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केली पाहिजे.”

पुण्याच्या परिघीय शहरीकरणाचा सखोल अभ्यास विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘अर्बन डिझाईन’ अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यास प्रकल्प सादर केले आहेत.

प्रा. हृषीकेश अष्टेकर, देवेंद्र देशपांडे, गरिमा बुरागोहैन, गुंजन महेश्वरी, व मीनाक्षी सरावगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, महाविद्यालयाचे संचालक आर्किटेक्ट प्रसन्न देसाई व समन्वयक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हे प्रदर्शन दिनांक १९ मार्च पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत विनामूल्य खुले असेल.

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याची गरज : सुप्रिया बडवे 

पुणे : अथक परिश्रम, चिकाटी आणि वेगवेगळ्या आघाडय़ांवर एकाच वेळी काम करण्याचे कसब … असे उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे गुण महिलांमध्ये उपजतच असतात. परंतु महिलांना योग्य वेळी संधी न मिळाल्यामुळे अनेक महिला उद्योग क्षेत्रामध्ये मागे राहतात. महिलांचे उद्योग क्षेत्रातील प्रमाण वाढण्यासाठी महिलांना योग्य वेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,असे मत उद्योजिका सुप्रिया बडवे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे उद्योग क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष-विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, हर्षल लेले, युवा महिला आघाडी सदस्या प्रतिभा संगमनेरकर, स्वाती कुलकर्णी, कार्तिकी जोशी, मंजुषा वैद्य,अंजली दारव्हेकर, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, सचिन पंडित, प्रशांत देशपांडे, अजय कुलकर्णी मंदार महाजन उपस्थित होते.  
स्वयंसिद्धा पुरस्कार पुण्यातील गजानन एंटरप्राईजेसच्या संचालिका वैशाली धर्माधिकारी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार आर्टिसन प्रिंट अ‍ँड पॅकच्या संचालिका सानिया वाळिंबे यांना प्रदान करण्यात आला. तसेच यंदा युवा गौरव पुरस्कार पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांना प्रदान करण्यात आला.युवा उपक्रमांतर्गत कै.सौ. सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै.मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. तर, युवा गौरव पुरस्कार हा युवा कार्यकारिणी पुरस्कृत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सुप्रिया बडवे म्हणाल्या, घर आणि उद्योग सांभाळताना महिलांची कायम कसरत होत असते. घर सांभाळताना येणाऱ्या अडचणी आणि उद्योग सांभाळताना येणाऱ्या अडचणी या वेगवेगळ्या असतात. या दोन्ही सोडवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. काही कौशल्ये आत्मसात करता येतात तर काही कौशल्ये उद्योग करताना शिकता येतात. त्यातूनच खचून न जाता महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांसाठी पुढे आले पाहिजे.

सानिया वाळिंबे म्हणाल्या, उद्योग क्षेत्रामध्ये भरभराट होण्यासाठी महिलांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातून तसेच ज्या क्षेत्रामध्ये त्या उद्योग करत आहेत, त्या क्षेत्रातील कुटुंबाचे प्रोत्साहन असणे गरजेचे असते. दोन्हीचा ताळमेळ योग्य साधला तर निश्चितच महिला उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर जाऊ शकतात.

प्रतिभा जोगळेकर म्हणाल्या, स्वतःच्या परिवाराकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामगिरीवर मला मिळालेली कौतुकाची थाप आहे. मला सासर आणि माहेर दोन्हीकडून चांगला पाठिंबा मिळाल्यामुळे मी पोलीस क्षेत्रामध्ये एक महिला असूनही चांगली कामगिरी करू शकले.

वैशाली धर्माधिकारी म्हणाल्या, युवा परिवाराने दिलेला पुरस्कार हा केवळ माझा एक महिला म्हणून सत्कार नव्हे तर एक उद्योजिका म्हणून सत्कार आहे. हा पुरस्कार केवळ माझ्यासाठीच नव्हे तर सर्व महिलांसाठी प्रेरणादायी पुरस्कार आहे. एक महिला उद्योजिका झाली तर ती केवळ आपल्या कुटुंबासाठी हातभार लावत नाही तर समाजाचा विकास करण्यासाठी हातभार लावत असते, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आयुषी भावे यांनी केले व हर्षल लेले यांनी आभार मानले. 

पतित पावन संघटनेतर्फे औरंगजेब याचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे विरोधात आंदोलन

पुणे : परकीय आक्रमक क्रूरशासक औरंगजेब याचे आपल्या देशात व आपल्या मातृभूमीवर उदात्तीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे, प्रतापगड च्या पायथ्याशी जशी अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला अतिक्रमण झाली तसेच संभाजीनगर मध्ये अतिक्रमण झाली आहेत तीच नष्ट व्हावी, अशा मागण्या करीत पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे आंदोलन करण्यात आले.

लाल महाल चौक येथे  संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, गुरु कोळी, रवींद्र भांडवलकर, मिलिंद तिकोणे, यादव पुजारी, योगेश वाडेकर, स्वप्निल आंग्रे, राजाभाऊ रजपूत, योगेश पाटील, चेतन कांबळे, राजाभाऊ कारकुड, विराज सांगळे, गणेश बोडके, अक्षय भालेराव, ध्रुव जगताप, आकाश लोढा, अक्षय जम्बुरे, सचिन मोहिते, सुनील येनगुल, तेजस नाईक यांच्यासह  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वप्नील नाईक म्हणाले, परकीय आक्रमक, क्रूर शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे विरोधात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी व थोर पुरुष यांची अवेहलना करणाऱ्यांच्या विरोधात कठोर व सक्षम कायदा निर्माण व्हावा. प्रसारमाध्यमांवर ( इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर व्हाट्सअप)  औरंगजेबाचा उदत्तीकरण करणारे व छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विरोधात पोस्ट करणारे किंवा चुकीचा इतिहास पसरवणारे यांच्यावर त्वरित कारवाई होण्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र समिती गठीत करावी व या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त यासारख्या उच्चस्तरीय अधिकारी नेमण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

औरंगजेबाचे उद्दतीकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मवीर संभाजीराजांनी केलेल्या बलिदानाचा अवमान आहे. औरंगजेबाचे उद्दातीकरण करणे म्हणजे आपल्या भारतीय कायदा सुव्यवस्था व संविधानाचा अपमान व आव्हान करणे आहे. औरंगजेबाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले असून दि. २२ मार्च पर्यंत जर औरंगजेबाची कबर या भारत भूमीतून निघाली नाही, तर २३ मार्चला तर त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन याच पुण्याच्या कसब्यात केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पाक सैन्यावर बलुच आर्मीचा हल्ला: 90 सैनिक मारल्याचा दावा

इस्लामाबाद-बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने रविवारी दावा केला की त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर आत्मघातकी हल्ला केला होता, ज्यामध्ये ९० पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. बीएलएच्या मते, त्यांच्या माजीद ब्रिगेड आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला.

बीएलएने म्हटले आहे की क्वेट्टाहून कफ्तानला जाणाऱ्या ८ लष्करी वाहनांवर हल्ला करण्यात आला. नोश्की येथील महामार्गाजवळ आत्मघातकी दहशतवाद्यांनी वाहनांना लक्ष्य केले. एका आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने लष्कराच्या ताफ्याला धडक दिली.

यानंतर, बीएलएच्या फतेह पथकाच्या सैनिकांनी सैन्याच्या ताफ्यात घुसून सैनिकांना ठार मारले. ज्या वाहनावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. जखमींना नोश्की येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

फक्त ५ दिवसांपूर्वी बीएलएने एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. बीएलएने सर्व २१४ ओलिसांना मारल्याचा दावा केला. पाकिस्तानी सैन्याने म्हटले की त्यांचे फक्त २८ सैनिक मारले गेले, तर सर्व ३३ बलुच सैनिक मारले गेले.

उत्तर मॅसाडोनियाच्या नाईटक्लबला आग; 50 ठार:क्लबमधील संगीत मैफिलीत अपघात, 1500 लोक उपस्थित होते

स्कोप्जे-युरोपीय देश उत्तर मॅसेडोनियामधील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या आगीत किमान ५० जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोकानी शहरात आयोजित एका हिप हॉप संगीत मैफिल दरम्यान हा अपघात झाला.सुमारे ३०,००० लोकसंख्या असलेल्या या शहरातील एका नाईट क्लबमध्ये प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनचा संगीत कार्यक्रम सुरू असताना आग लागली. या हिप-हॉप कॉन्सर्टसाठी क्लबमध्ये १५०० लोक जमले होते.कार्यक्रमादरम्यान कोणीतरी क्लबमध्ये फटाके फोडले, ज्यामुळे आग लागली, असा अंदाज आहे. आग लागल्यानंतर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत काही लोक चिरडले गेले.संगीत मैफिलीत फटाके फोडण्यात आले होते, जे आगीचे कारण असल्याचे मानले जात आहे.

अपघाताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला…

पंतप्रधान ह्रिस्टिजान मिकोस्की यांनी X वर लिहिले: उत्तर मॅसेडोनियासाठी हा एक कठीण आणि खूप दुःखद दिवस आहे. इतक्या तरुणांचे दुःखद नुकसान कधीही भरून निघू शकत नाही. या कठीण काळात पीडितांचे दुःख कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना राजधानी स्कोप्जेसह देशभरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जात आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे, परंतु अद्याप त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

पश्चिम अमेरिकेत 26 वादळे, 34 जणांचा मृत्यू:130 Kmph वेगाने धुळीचे वादळ

10 कोटी लोकसंख्या प्रभावित, 2 लाख घरे वीजेशिवाय
वॉशिंग्टन-अमेरिकेत, अर्कांसस, कॅन्सस, मिसूरी, इलिनॉयसह सुमारे 6 पश्चिमेकडील राज्ये चक्रीवादळाच्या विळख्यात आहेत. एबीसीच्या अहवालानुसार, या राज्यांमध्ये आतापर्यंत २६ वादळे आली आहेत.शनिवार आणि रविवारी आतापर्यंत ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिसूरीमध्ये सर्वाधिक १२ मृत्यू झाले आहेत. १० कोटी अमेरिकन लोकसंख्येवर याचा परिणाम झाला आहे. २ लाख घरांमध्ये वीज गेली आहे.

कॅन्ससमध्ये धुळीच्या वादळामुळे महामार्गावर सुमारे ५० वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण बेपत्ता झाले.१०० किमी/तास वेगाने धुळीचे वादळ वाहत आहे. इमारती आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. कॅनडाच्या सीमेवर हिमवादळे आणि उष्ण भागात जंगलातील आगी लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील वादळ अंदाज केंद्राने असा दावा केला आहे की, हे वेगाने वाहणारे वादळ गंभीर धोका निर्माण करू शकतात. आज अनेक राज्यांमध्ये बेसबॉलच्या आकाराचे गारा आणि वादळ देखील शक्य आहे.
पूर्व लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, पश्चिम जॉर्जिया आणि फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. टेक्सास, कॅन्सस, मिसूरी आणि न्यू मेक्सिको हे जंगलातील आगींचा धोका आहे.
टेक्सास, ओक्लाहोमा, मिसूरी, इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगनमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे २,००,००० हून अधिक घरांची वीज गेली आहे.
राष्ट्रीय हवामान सेवेने दक्षिण डकोटा आणि पश्चिम मिनेसोटाच्या काही भागांसाठी हिमवादळाचा इशारा जारी केला आहे. या भागात ६ इंचांपर्यंत बर्फवृष्टीची शक्यता आहे.

राज्यात ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार: हर्षवर्धन सपकाळ

औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव.

रत्नागिरी, दि. १६ मार्च २५
राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर सारखे हे टोळयांचे सरकार असून त्याची किंमत मात्र जनतेला चुकवावी लागत आहे, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा युती सरकारवर कडाडून हल्ला केला, ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यामागे कोण आका होता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खोक्या आला आहे. एक मंत्री खोटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे ते उद्योगपतींना द्यायचे आहे आणि याप्रकरणी कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जाती धर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी फक्त उद्योगपतींच्या हितासाठी कोकण उद्धवस्थ करू पहात आहे. शक्तीपीठ सुद्धा उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केला जात आहे. बहुजन समाजातीला लोकांना गोव्याला तीर्थ पिण्यास पाठवायचे आणि उद्योगपतींना आयात निर्यात मोठ्या प्रमाणात करता यावी यासाठी हा शक्तीपीठाचा घाट घातला जात आहे.

देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक..
औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकले, भावाचा खून केला, लहान भावाला वेडे ठरवले. या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका असे सांगत आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षडयंत्र आहे. औरंगजेबाचे उदात्तिकरण कोणीच करू नये पण भाजपा स्पॉन्सरच त्याचे उदातिकरण करत आहेत असेही सपकाळ म्हणाले.

शिवेंद्रराजे, छत्रपतींचा अपमान का सहन करता?
भाजपा ज्या कुशीत जन्मला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचारही तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने २०० वर्ष महाराजांची समाधी जनतेला कळू दिली नाही. महात्मा जोतीबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचा विचार व कार्य लोकांना कळू नये हा त्यामागचा डाव होता. भाजपा संविधान मानत नाही ते सरसंघचालक गोलवकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. भाजपाच्या पिल्लावळी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत. अपमान करा व संरक्षण मिळवा, अपमान करा व पुरस्कार मिळवा हे काम भाजपा करत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते त्या सरकारमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत, आपण हा अपमान का सहन करता? असा प्रश्न विचारून महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून राजीनामा द्या, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश कीर उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा.
तळकोकणात सामाजिक सौहार्द बिघडवून येथील शांतता नष्ट करण्याचा सत्ताधारी लोकांचा डाव आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात खनिजे सापडली आहेत, ती उद्योगपतींना द्यायची आहेत. कोकणातील माणूस स्वाभिमानी आहे त्याचा अडसर यात येऊ नये म्हणून जातीय व धार्मिक मुद्द्यांवरून वातावरण अशांत करून त्यांना त्यांचा कुटील हेतू साध्य करायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज आहे. महिनाभरात स्थानिक लोकांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करा, प्रदेश काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे असे प्रांताध्यक्ष सपकाळ म्हणाले.
यावेळी आमदार भाई जगताप, ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, रमेश कीर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तमाशा सम्राट काळू -बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देणारा “रंगबाजी” हा सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई १६ मार्च – ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदातून मनमुराद हसविले, असे तमाशा सम्राट काळू- बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सोमवारी (ता. १७ मार्च ) सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये “रंगबाजी”हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात काळू – बाळू यांच्या पाचव्या पिढीतील वंशज सूरजकुमार आणि निलेशकुमार सहभागी होणार आहेत.

काळू -बाळू म्हटलं तरी मराठी माणसांच्या चेहऱ्यावर सहज हसू उमटतयं, असे हे वाक्य केवळ काळू-बाळू कवलापूरकर यांच्या एका गाजलेल्या वगनाट्याच्या विनोदामुळे प्रचलित झाला आहे. ते वगनाट्य म्हणजे ‘जहरी पेला’, म्हणूनच या जोडगोळीच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने सोमवार दिनांक १७ मार्च रोजी “रंगबाजी”हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
कलिना येथील मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या सांस्कृतिक भवनामध्ये (उत्तर द्वार) सदर सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मा मंत्री सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री विकास खारगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे. प्रा. डॉ.गणेश चंदनशिवे, डॉ. शिवाजी वाघमारे, काळू बाळू यांच्या पाचव्या पिढीतील वंशज सूरजकुमार, निलेशकुमार आणि इतर कलाकार या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लोककला अकादमी आणि लोकजीवन फाउंडेशन, मुंबई हे सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

विशेष चर्चा सत्र….!
या दरम्यान तमाशा कला क्षेत्राच्या परंपरेवर विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, मराठी नाट्यक्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक संतोष पवार सहभागी होणार आहेत. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका ठक्कर हे करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना निशुल्क असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बिभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केली आहे

जिल्ह्यात १७ मार्च रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे दि. १६ : नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार १७ मार्च रोजी सकाळी ११ वा. तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात पुणे शहर- मुंढवा, शिरुर-तहसिल कार्यालय, हवेली-कोंढवे धावडे, लोणी काळभोर- अष्टापूर, पिंपरी चिंचवड-निरगुडी, मावळ-लोणावळा, मुळशी-माले, खेड-वाडा, दौंड-यवत, पुरंदर-जेजुरी, जुन्नर-निमगाव सावा, आंबेगाव-मंचर, भोर-निगुडघर, वेल्हा-कोंढावळे खुर्द, बारामती-लोणी भापकर आणि इंदापूर- बावडा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी
आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे

येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारतीचा कोनशीला समारंभ संपन्न

पुणे: पंचवीस ते तीस वर्षे प्रलंबित न्यायालयीन खटले येत्या दोन वर्षात निकाली काढण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने कृती आराखडा तयार केला असून या आराखड्याची अंमलबजावणी योग्यरीत्या करावी यासाठी वकील वर्गाने सहकार्य करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारतीचा कोनशीला समारंभ न्या. ओक यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, आरीफ सा. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा न्यायाधीश अरविंद वाघमारे, पुणे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य पक्षकारांना योग्य दर्जाचा न्याय मिळावा यासाठी न्यायाधीश आणि वकील वर्गाने तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगून न्या. ओक म्हणाले, पुणे जिल्हा हा संपूर्ण देशात सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा आहे. राज्यात ५५ लाख ७६ हजार खटले प्रलंबित असून त्यापैकी ३८ लाख ७१ हजार खटले फौजदारी खटले आहेत. ७ लाख ४३ हजार म्हणजेच १२ ते १३ टक्के खटले एकट्या पुणे जिल्ह्यातील प्रलंबित असून ३१ टक्के खटले हे ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित असलेल्या आहेत. त्यामुळे हे खटले प्रलंबित काढण्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रीकरण करण्यासह न्यायालयांना अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

न्या. वराळे म्हणाले, संविधानाकडे आता आपल्याला केवळ दस्ताऐवज म्हणून नव्हे तर जीवनप्रणालीचे सूत्र म्हणून पहावे लागेल. त्यासाठी आपण संविधानाची तत्त्वे अंगिकारली पाहिजेत तसेच आचरणात आणली पाहिजेत. महाराष्ट्राने आपला पुरोगामी, विकसनशील, प्रागतिक वारसा जपावा, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, पुणे जिल्ह्याची व महानगराची वाढलेली लोकसंख्या पाहता मोठ्या संख्येने खटले न्यायालयात आहेत. त्याचा ताण न्यायालयीन यंत्रणेवर येतो. तसेच शिवाजीनगर येथील न्यायालयामध्ये पक्षकारांची मोठी गर्दी दिसून येते. आज या इमारतीचे भूमिपूजन झाल्यामुळे भविष्यात शिवाजीनगर येथील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, लोकसंख्या वाढत असून खटलेही मोठ्या प्रमाणात वाढल्याने नवीन न्यायालये होणे ही काळाची गरज आहे. शिवाजीनगर न्यायालय आवारातच दोन नव्या इमारतींचे काम सुरू असून त्यात एका इमारतीत १४ न्यायालये तर दुसऱ्या इमारतीत फक्त पोक्सोसाठीचे ८ न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच येरवडा येथील आज कोनशीला समारंभ झालेल्या इमारतीत २८ न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. राज्य शासनाकडून न्यायालयीन पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी तत्परतेने मिळतो, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी न्यायाधीश श्री. महाजन यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास न्यायालयीन अधिकारी, वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देहू येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान

वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम -एकनाथ शिंदे

पुणे, दि. १६ : संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते. रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला. तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा सुरु असताना दर्शन बारी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. निसर्गाचे रक्षण करणेही आपले कर्तव्य आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस प्रयत्न शासन करत आहे. नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची चळवळ ही लोकचळवळ व्हावी, देशातील सर्वात आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत असा नावलौकिक करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ते म्हणाले, तरुण पिढीसाठी संत तुकाराम यांची गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करुन देण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच सर्व शाळांमध्ये हे ई-बुक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटलांकडून अपक्ष खासदाराला खुली ऑफर:म्हणाले – विशाल पाटील सोबत आल्यास सांगलीच्या विकासाला गती मिळेल, त्यांनी विचार करावा

पुणे-भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची जाहीर ऑफर दिली आहे. विशाल पाटील आमच्यासोबत आल्यास केंद्रातील आमची संख्या वाढेल आणि सांगलीच्या विकासालाही गती मिळेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मला भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगले काम करतोय असे मी समजतो, अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली. तसेच भाजप प्रवेशाबाबत माझा कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले.राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या पक्ष बदलण्याचा सिलसिला सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत शिवधनुष्य हाती घेतले. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करणारे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे.

राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावे लागते पुढे काय होईल माहित नाही, वर्तमान काळात त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत. या कालावधीचा आम्ही विचार करतो, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली संख्या देखील वाढते, सोबतच सांगली जिल्ह्यातील विकासाच्या कामाला त्यांना जे काय करायचे आहे. त्याला देखील सोपे जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

विशाल पाटलांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांनी भाजपसोबत येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय, ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल. मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असे मी समजतो, असे विशाल पाटील म्हणाले. पण भाजप प्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाही. मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही. सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष गट तट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय हे माझे धोरण आहे, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना आधीच उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे विशाल पाटील यांची या मतदारसंघात दोन वर्षांपासून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू होती. पण ठाकरे गटाच्या उमेदवाराला तिकीट जाहीर झाल्याने विशाल पाटील बंडखोरी करत लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा पराभव करत ठाकरे गटाला मोठा धक्का देत निवडणूक जिंकली. विशाल पाटील यांनी 5 लाख 71 हजार 666 मतांनी विजय मिळवला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संजय काका पाटील यांना 4 लाख 71 हजार 613 मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि त्यांना फक्त 60 हजार 860 मते मिळाली होती.

औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा:पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक एकबोटेंना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मृत्युपूर्व दृश्यांनी कबरीबाबतच्या भावना तीव्र

छत्रपती संभाजीनगर-मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्यातच पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक ,कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त पसरले. प्रशासनाने त्यांच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली असून मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा बंदी करण्यात आली आहे. 16 मार्च 2025 ते 5 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणतही प्रयोजन नाही, असे असतानाही मला जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस दिल्यामुळं माझी करमणूक झाली असल्याचे मिलिंद एकबोटे म्हणाले. माझं सर्व लक्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यततिथीच्या कार्यक्रमाच्या नियोजनावर आहे. हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे एकबोटे म्हणाले. मला दिलेली नोटीस संपूर्णपणे खोटी आहे. माझा उल्लेख माजी आमदार म्हणून करण्यात आला आहे. मी कोणताही माजी आमदार नाही. कदाचीत भावी आमदार असेन असे एकबोटे म्हणाले. काल्पनिक गोष्टी डोक्यात ठेऊन पोलिस अधिकाऱ्याने ही गोष्ट केलेली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत छावा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात मोगल बादशहा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे कशाप्रकारे हाल केले ते दाखवण्यात आले. या चित्रपटामुळे मराठा समाज व हिंदू धर्मातील लोकांच्या औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तीव्र झालेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करणाऱ्याची कबर कशाला पाहिजे? असा सवाल करत ही कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्याबाबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर आक्रोश पाहावयास मिळत आहे. मिलिंद एकबोटे यांनी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्याच्या माहिती नंतर त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हा बंदीचे आदेश काढले आहेत.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी अहवालात नमूद केले आहे की, मिलिंद एकबोटे हे अत्यंत कडवट हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून त्यांचेवर भिमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा व इतर धर्मीयांच्या, समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतापगडावरील अफजलखान कबर हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तसेच त्यांचे संघटनेचे अनेक सदस्य व सक्रीय कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात आहेत. गोपनिय माहितीनुसार जर सदर लोक तुळापूर वरून खुलताबाद येथे यायला निघाले तर हिंदूत्ववादी संघटनांचे अनेक सक्रीय सदस्य, कार्यकर्ते व कट्टर हिंदू लोक त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन देखील चालू असून सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे हिंसक पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटण्याची दाट शक्यता असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1) अन्वये मिलिंद रमाकांत एकबोटे, माजी नगरसेवक तथा अध्यक्ष “धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण”, “हिंदू एकता मोर्चा”, “समस्त हिंदू आघाडी”, “शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन” यांना व त्यांच्या समर्थकांना दिनांक १६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीमध्ये प्रवेश करण्याबाबत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती अहवालातून करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हा बंदी आदेश काढले आहेत.

मिलिंद एकबोटे यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्यानंतर औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. या बंदोबस्तात दोन पोलिस अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी आणि फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाची तपासणी करूनच सोडले जात आहे.

औरंगजेब 1707 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी मरण पावला. त्याला औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगरपासून 25 किलोमीटर अंतरावर खुलताबाद येथे दफन करण्यात आले. संभाजीनगरमध्ये त्यांच्या पत्नीची कबर ‘बीबी का मकबरा’ आहे. औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात खुलताबादमध्ये दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जिथे त्यांचे गुरु, सुफी संत सय्यद जैनुद्दीन यांना दफन करण्यात आले होते. ही कबर सय्यद जैनुद्दीन यांच्या कबरीच्या संकुलातच आहे. त्याने त्याला एका साध्या उघड्या कबरीत पुरण्याचा आदेशही दिला होता. नंतर हैदराबादच्या निजामाने तत्कालीन भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या विनंतीवरून थडग्याभोवती संगमरवरी ग्रील बसवली.