बारामतीत लोकसभेनंतर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार
पुणे- बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका-पुतण्या आमने-सामने आहेत. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत.या दोहोंनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत महाविकास आघाडीच्या वतीने युगेंद्र यांचा अर्ज दाखल करताना खुद्द शरद पवार स्वतः उपस्थित होते तर अजित पवारांचा अर्ज भरताना जय पवार उपस्थित होते घरून विजया पाटील , सुनेत्रा पवार यांनी औक्षण केल्यावर अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करायला मिरवणुकीने निघाले.
युगेंद्र यांचे कन्हेरी येथील निवासस्थानी मातोश्री शर्मिला यांच्याकडून औक्षण करण्यात आले. ग्रामदैवत कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत त्यांनी शहरातील कसबा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.तद्नंतर इंदापूर रस्त्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते प्रशासकीय भवनात दाखल झाले. तेथे शरद पवार यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, सदाशिव सातव, सतीश खोमणे यांच्या उपस्थितीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज दाखल केला.
मी जी चूक केली तीच चूक आता पवारसाहेबांनी केली -अजितदादा
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याकडून जी चूक झाली तीच चूक या निवडणुकीत शरद पवार करत असल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत कुटुंबातील उमेदवाराविरोधात उमेदवार देण्याची मोठी चूक माझ्याकडून झाली. ती चूक आता त्यांच्याकडून होत आहे, असे ते म्हणालेत.अजित पवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पक्ष लोकसभेला आपल्याकडून जी चूक झाली तीच करत असल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिले होते. त्यात सुनेत्रा यांचा पराभव झाला होता.
अजित पवार यासंबंधी म्हणाले, लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्याविरोधात उभे करून तीच चूक ते करत आहेत. त्यांनी (शरद पवार) असे करायला नको होते. लोकशाही शासन पद्धतीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.
निवडणुकीत माझ्या विरोधात उभा राहणारा प्रत्येक उमदेवार स्ट्राँगच असल्याचे माणून आम्ही आतापर्यंत प्रचार केला. यंदाच्या निवडणुकीतही तीच परिस्थिती असेल. यंदा विरोधात कोणताही उमेदवार असला तरी बारामतीकर मला चांगल्या मतांनी निवडून देतील असा मला विश्वास आहे. दरम्यान, युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. ते अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत.
पास होण्यासाठीच परीक्षेला बसलोय :
खा. सुप्रिया सुळे
बारामतीमध्ये एक समांतर यंत्रणा, अदृश्य शक्ती बारामती चालवत आहे. हे अजिबात चालणार नाही. आगामी काळात ही समांतर यंत्रणा मोडून टाकण्यात येईल. सर्वसामान्य बारामतीकर बारामती चालवतील. केवळ बिल्डिंग्ज उभ्या करून प्रश्न सुटत नाहीत तर त्याचा सोशल इम्पॅक्टमध्ये बदल झाला पाहिजे. आम्ही परीक्षेला पास होण्यासाठीच बसलोय, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. युगेंद्र यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हेरी येथे मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. गेली सहा दशके शरद पवार यांना बारामतीकरांनी प्रेम दिले आहे. या निवडणुकीतही ते दिसून येईल असे त्या म्हणाल्या.
मी असेन नवखा पण आजोबा आहेत पाठीशी- युगेंद्र
मी गेली काही वर्षे समाजकारणात सक्रिय होतो. पक्षाने उमेदवार देत मोठी जबाबदारी दिली, त्याचा आनंद आहे. मी राजकारणात नवखा असलो तरी ५० वर्षांहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे आजोबा शरद पवार माझ्यासोबत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. बारामतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भ्रष्टाचार बोकाळला आहे, गुन्हेगारी वाढली आहे. अशा अनेक प्रश्नांसाठी आपला लढा असेल. तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल असे युगेंद्र पवार म्हणाले.