कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे ‘कार्तिक महात्म्य’ विषयावर प्रवचन
पुणे : मोहमायेतील गुरफटलेपण सोडून जागृत व्हा, नामस्मरणाचे महत्त्व जाणा, गुरुंची महती समजून घ्या, श्रद्धा जोपासून चैतन्याचा शोध घ्या, असे सांगणाऱ्या कार्तिक महिन्यातील काकडा या विषयी ह.भ.प. अद्वैता उमराणीकर यांनी ‘कार्तिक महात्म्य’ कार्यक्रमातून उपस्थितांचे प्रबोधन केले.
कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त ‘कार्तिक महात्म्य’ या विषयावर ह. भ. प. अद्वैता उमराणीकर यांचे पुण्याई सभागृह, पौड रस्ता येथे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
हरिपाठाचे जगणे आपल्या आचरणात यावे, असे सांगून उमराणीकर यांनी अक्कलकोट, शेगांव, गोंदवले, सज्जनगड, नृसिंहवाडी, शिर्डी, अमृतसर आदी भक्तिसंस्थानांमध्ये काकड्याची परंपरा कशी आहे, याविषयी माहिती विशद केली. काकड्यात सादर होणारी पंचपदी, भजन, आरती, गवळण, भारुड, जागल्या या भक्तिसंप्रदायातील वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणांची त्यांनी थोडक्यात ओळख करून दिली. सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्य या मुक्तीप्रकारांविषयी उद्बोधक माहिती सांगितली.
आपल्या नित्यनेमात फक्त पोथीवाचन, आध्यात्मिक-धार्मिक वाचन न करता संतांनी सांगितलेल्या मार्गानुसार कर्म होणे आवश्यक आहे, असे सांगून उमराणीकर म्हणाल्या, कार्तिक महिन्यातील काकडा हा आत्मभान देतो, आपल्यातील आत्मज्योत जागवितो. नामस्मरणाचे भक्तिमार्गात असणारे अनन्यसाधारण स्थान तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, रामदास स्वामी, गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आदी संत-महात्म्यांनी सांगितलेला सुख आणि आनंद यातील फरक या विषयही उमराणीकर यांनी विवेचन केले.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरी मुणगेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर, अद्वैता उमराणीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात मुक्ता चांदोकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजश्री महाजनी यांनी केले. या प्रसंगी कऱ्हाडे ब्राह्मण संघातील सदस्यांची स्नेहभेट आयोजित करण्यात आली होती.