Home Blog Page 616

जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भोर – भोर राजगड वेल्हा विधानसभा मतदार संघामधून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.भोर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मांडेकरांच्या रॅलीला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, पीडिसीसी बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, मा उपसभापती सारीका मांडेकर, मा नगरसेवक सुषमा निम्हण, मा.युवक अध्यक्ष सागर साखरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ हगवणे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चंदाताई केदारी,केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, राजेंद्र सोनवणे,,पांडुरंग निगडे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे,मा नगरसेवक प्रमोद निम्हण, श्रीकांत कदम, नंदूशेठ भोईर, गणपत जगताप, हरिदास कोकाटे, शिवाजी ढेबे,विक्रम बोडके, संग्राम निगडे, मुळशी तालुका युवक अद्यक्ष सुशिल हगवणे,मुळशी तालुका अद्यक्ष अंकुश मोरे, माऊली साठे आदी उपस्थित होतें.यावेळी माध्यमांशी बोलताना मांडेकर म्हणाले की, मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. आज महायुतीची उमेदवारी जरी मला मिळालेली आहे. मी महायुतीच्या उमेदवारीसाठी जे जे इच्छुक पदाधिकारी होते त्या सर्वांची भेट घेणार आहे. आम्ही सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.त्याच विश्वासाने या निवडणुकीला मी सामोरा जाणार आहे. भोर राजगड मुळशीतील जनतेला परिवर्तन हवे आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या भागात परिवर्तन होणार आहे. त्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्याही मतभेदाचे संभ्रमाचे वातावरण नसल्याचे यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानंतर उज्वल केसकर यांची माघार,चंद्रकांतदादांना पाठींबा

पुणे- माजी नगरसेवक, तथा पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्षनेते श्री. उज्वल केसकर यांनी कोथरूड विधानसभा निवडणूकीत अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या श्री. केसकर यांनी आपल्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदेश शिरसावंद्य असून आपण नामनिर्देशनपत्र भरणार नाही अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आपल्या नगरसेवक तसेच विरोधीपक्षनेते पदाच्या कार्यकाळात उज्वल केसकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. गुंठेवारी सारखा प्रश्न सोडवला. मेजर प्रादीप ताथवडे उदयान साकारले, कोथरूड मध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांनी केलेल्या कार्यामुळे कोथरूडमध्ये त्यांना मोठा जनाधार मिळाला.
विकास कामांच्या जोरावर केसकर यांनी कोथरूड विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. आज ते नामनिर्देशनपत्र दाखल करणार होते. त्यापूर्वीच सुहास कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. स्वयंसेवक असल्याने संघाचा आदेश शिरसावंद्य मानून नामनिर्देशनपत्र भरणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच निवडणूकीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह चंद्रकांत दादा पाटील यांचे काम करणार असून त्यांना जाहीर पाठींबा आहे अशी माहिती देखील त्यांनी प्रसिद्धी पात्रकाद्वारे दिली आहे.

शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश भोकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने भोकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत कसबा विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा निर्धार केला. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विचार करणे गरजेचे असून, राज्यात विविध ठिकाणी मूलभूत सुविधा या योग्य प्रकारे दिल्या जात नाहीत आणि याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युवा नेतृत्वाला संधी दिलेली आहे. गणेश भोकरे हे तरुण आणि विकासाचा चेहरा असलेले उमेदवार आहेत. कसबा मतदारसंघांमध्ये जनता त्याच त्याच लोकांना कंटाळली असून नवीन आणि तरुण उमेदवार गणेश भोकरे यांना विजयी करेल असा विश्वास आहे त्याचबरोबर राज्यभरात मनसेचे अनेक उमेदवार विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. माहीममध्ये अमित ठाकरे यांचा विजय निश्चित असून, लढून जिंकण्यात जास्त मजा आहे, या विचाराने आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत.

स्वरसागर महोत्सवाचे ग. दि. माडगूळकर सभागृहात मंगळवारी भव्य उद्घाटन

‘मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्राचे आयोजन

पिंपरी, पुणे (दि. २९ ऑक्टोंबर २०२४) मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती व दिवाळीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन च्या वतीने २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन आकुर्डी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
तत्पूर्वी सोमवारी (दि.४ नोव्हेंबर) पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात सायंकाळी ५ वाजता, ‘मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वरसागर महोत्सवाच्या ग. दि. माडगूळकर येथील मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन, श्रद्धा शिंदे – हर्डीकर यांचा कथक नृत्याविष्कार होणार आहे. बुधवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजता स्नेहल सोमण यांचे सामूहिक नृत्यरंग, डॉ. शर्वरी डीग्रजकर – पोफळे यांचे शास्त्रीय गायन, स्वरस्वप्न – व्हायोलिन समूह वादन हे कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी (दि. ७) समारोपाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता, पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध नाटकाचे मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य सादर होईल. तसेच डॉ. सुमेधा गाडेकर यांची ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ ही नृत्यनाटिका, मिलिंद ओक व राहुल सोलापूरकर यांचा निशे प्रस्तुत ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाने स्वरसागर महोत्सवाची सांगता होणार आहे. .
तत्पूर्वी, सोमवारी सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात आयोजित केलेल्या ‘मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?’ या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जेष्ठभाषा तज्ञ व इतिहास संशोधक संजय सोनवनी आदी सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन राजन लाखे हे करणार आहेत.
हे सर्व कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहेत अशीही माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी प्रसिद्धीस दिली आहे

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची माध्यम कक्षाला भेट

पुणे, दि. २९: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असून निवडणूक प्रक्रिये दरम्यान माध्यम कक्ष समन्वय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निरपेक्षपणे व पारदर्शकपणे कामकाज करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला डॉ.पुलकुंडवार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वयक डॉ.रविंद्र ठाकूर, निवडणूक शाखेच्या तहसीलदार शितल मुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे,सहायक संचालक जयंत कर्पे यावेळी उपस्थित होते.

विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती डॉ.पुलकुंडवार यांनी घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली.

माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सी-व्हीजील आणि निवडणूक खर्च कक्षालाही विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी भेट दिली.

देवेंद्र फडणविसांनी पहा कसे जगदीश मुळीकांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून थांबवले

पुणे : महायुतीकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.असे असताना याच मतदारसंघातून जगदीश मुळीक यांनी भाजपचा एबी फॉर्म मिळवत उमेदवारी अर्ज भरण्यास गेले असता वरिष्ठांचा फोन आल्याने उमेदवारी अर्ज न भरताच ते माघारी फिरले आहेत.अर्थात ते माघारी कसे , कोणाच्या आणि काय बोलण्यावरून फिरले याबाबतचा व्हिडीओ त्यांनी स्वतः जाहीर केला आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतो सांगून उमेदवारी दाखल करण्यापासून परावृत्त केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.


याबाबत माध्यमांशी बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, ” या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा अशी सर्वांची इच्छा होती. आम्ही घेतलेल्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वडगाव शेरीतून मला अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला होता.अर्ज भरण्याचे आदेशही दिले होते. मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काही बिघाडी होऊ शकते या दृष्टीकोनातून अर्ज भरणे थांबवण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर लगेच आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली.”ते पुढे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी छोट्या – मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांचा विचार करते. त्यामुळे मी कोणतंही आश्वासन न घेता फक्त वरिष्ठांचं ऐकून फॉर्म भरणे थांबवले आहे. भविष्यात वरिष्ठ जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करणार आहोत. पक्ष जिथे आदेश देईल तिथे आम्ही महायुतीचा प्रचार करणार आहोत”, असे मुळीक यांनी म्हंटले आहे.

जादूची फिरली कांडी अन बंडाची उडली दांडी…

पुणे- निवडणुका म्हटल्या कि,विविध प्रकरच्या युक्त्या,प्रयुक्त्या डाव पेच आणि धुराळा पाहायला मिळतो,त्यात आता महापालिकेच्या निवडणुका गेल्या ३ वर्षापूर्वी व्हायला हव्या होत्या त्या अजून झाल्या नाहीत अन लोकसभा आणि आता त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा धुराळा उठला आहे. विविध पक्षांकडे विविध मतदार संघात अनेक कार्यकर्ते आणि विद्यमान लोकप्रतिनिधी देखील पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक असतात आणि ते आपापल्या पक्षाच्या प्रोसिजर नुसार रांगेत उभे असतात. पण उभे असताना त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून दबाव तंत्र शक्ती प्रदर्शन करत कधी मोठ्या तर कधी छोट्या नेत्यावर दबाव तंत्र सुरु असते तर कधी जनतेत आपल्या नावाचे अस्तित्व कायम राखणे गरजेचे असते म्हणूनही प्रयत्न सुरु असतात.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हडपसर मतदार संघात प्रशांत जगताप यांना उमेदवारी देताच शिवसेनेचे महादेव बाबर यांनी उमेदवारीला विरोध करत बंडाचा झेंडा उभारण्याचा प्रयत्न केला त्या नंतर प्रशांत जगताप यांच्याच पक्षातून त्यांचेच सहकारी नगरसेवक राहिलेले योगेश ससाणे यांनीही बंडाचा झेंडा फडफडवला.बाहेरचा उमेदवार नको म्हणून त्यांनी आरोळी माध्यमांच्या पुढे ठोकली आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ना आम्ही हडपसर मधील विविध स्तरावरील मंडळी भेटून त्यांना अन्य कोणीही उमेदवार द्या पण जगताप देऊ नका अशी मागणी केल्याचे सांगितले एवढेच नव्हे तर हा उमेदवार बदलला नाही तर…हडपसर विकास आघाडी स्थापन करून त्याद्वारे वेगळा झेंडा वेगळा उमेदवार देऊन लढा देऊ असाही इशारा दिला. अर्थात त्याचा हा ऑडीओ पुरावा पहा….

एवढी सारी उठाठेव आदल्या रात्री त्यांनी जाहीर केली आणि रात्रीतून जादूची कांडी फिरली … ससाणे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळ पासून प्रशांत जगताप यांच्या प्रचाराला प्रारंभ केला . एवढेच नव्हे तर त्यांनी यामध्ये ज्या ज्या प्रभूतींची नावे घेतली त्यातील बहुसंख्य मंडळी जगताप यांच्या समवेत दिसू लागली . त्यांचा अर्ज भरतानाही ससाणे उपस्थित होते . हि जादू नेमकी कशी झाली हे मात्र कोणी जाहीर केले नाही .मात्र अशा बंडाची रात्रीतून दांडी कशी उडते यावर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले.

प्रशांत जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित कोण कोण होते त्यांचे छायाचित्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा हजारोंच्या उपस्थितीत साकोलीतून अर्ज दाखल.

महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय: नाना पटोले

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले यांचे औक्षण केले यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य आणि सहकारी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, शेतकरी उद्ध्वस्थ झाला, महिला सुरक्षित नाहीत पण भाजपा युती सरकारला त्याची काळजी नाही. गरिबांना हक्काची जमीन मिळावी यासाठी लढा देऊन आपण वन हक्क कायदा आणला पण गरिबांना जमिनी देण्यापेक्षा भ्रष्ट भाजपा सरकारने अदानी, अंबानीला जमीन देण्यास प्राधान्य दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. युपीएससीच्या परीक्षा न घेता आरएसएसच्या विचार सरणीच्या मुलांची थेट संयुक्त सचिव पदावर भरती केली जात आहे. एमपीएससीच्या माध्यमातूनही रिक्त जागा वेळेवर भरल्या जात नाहीत. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्माचाऱ्यांची भरती आता ठेकेदारी पद्धतीने सुरु करून मागासवर्गीयांचे या नोकऱ्यातील आरक्षण संपवले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळाही बंद करण्याचा घाट घातला आहे. श्रीमंतापेक्षा गरिबांना जास्त कर द्यावा लागतो, हे सर्व पाप भाजपा सरकारचे आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एमपीएससी मार्फत सर्व जागा भरल्या जातील तसेच परिक्षेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. परिक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुटले जाणार नाही. महिलांना भाजपा सरकार जी मदत करत आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत देऊ, महागाई कमी करण्याचा प्रयत्न करु. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराला गाडणाऱ्या भाजपा युती सरकाला जमिनीत गाडणे हाच आमचा उद्देश असून या सरकारला खाली खेचून मविआचे सरकार आणण्यासाठी आज साकोलीतून रणशिंग फुंकले आहे, असे नाना पटोले म्हणाले.
यावेळी माजी मंत्री बंडू सावरबांधे, सतीश चतुर्वेदी, आमदार अभिजित वंजारी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायन्स पार्कमध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, पुणे -पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘इसरो – स्पेस ऑन व्हील्स’, पर्यावरण पूरक किल्ले बनवा स्पर्धा, शास्त्रीय गायन, वाचन स्पर्धा आणि सुर नभांगनाचे अशा विविध सांस्कृतिक व वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायन्स पार्कच्या प्रांगणामध्ये होणारे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षक रसिकांनी या सांस्कृतिक मेजवानीस उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी केले आहे.

यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ‘इसरो – स्पेस ऑन व्हील्स’ हे यापूर्वी आयोजित केलेले प्रदर्शन लोक आग्रहास्तव पुन्हा सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) पासून गुरुवार (दि. ३१ ऑक्टोबर) पर्यंत व रविवार (दि. ३ नोव्हेंबर) पासून मंगळवार (दि. ५ नोव्हेंबर) पर्यंत सज्ज राहणार आहे. गुरुवारी (दि. ३१ ऑक्टोबर) ते गुरुवार (दि. ७ नोव्हेंबर) पर्यंत ‘पर्यावरण पूरक किल्ले बनवा स्पर्धा’, गुरुवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी ५:३० वाजता, मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क तर्फे विज्ञान व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच प्राजक्ता ठकार यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ ‘अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत’ ही वाचन स्पर्धा शनिवारी (दि. २ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता आणि रविवारी (दि. ३ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता, हेमंत मोने लिखित, दिग्दर्शित सुर नभंगनाचे हा सुरेल मैफिली चा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवारी ( दि. १ नोव्हेंबर) लक्ष्मीपूजन निमित्त प्रदर्शन तसेच सायन्स पार्क व तारांगण बंद राहील. या व्यतिरिक्त दिवाळीच्या सुट्ट्यात नियमित सुरू राहील असे जाहीर करण्यात आले आहे.

मेट्रोने प्रवास करत हेमंत रासनेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कसब्यात दिसून आली महायुतीची एकजूट

पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपा-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामदेवता कसबा गणपतीचे दर्शन घेत महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. कसबा मतदारसंघासह शहराच्या वाहतुकीला गती देणाऱ्या पुणे मेट्रोतून मंडई स्टेशन ते स्वारगेट असा प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजीसभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे अजय भोसले, सचिव किरण साळी, लहुजी शक्तीसेनेचे विष्णूभाऊ कसबे, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सौ. स्वरदा बापट, कुणाल टिळक यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली दहा वर्षातील मोदी सरकारचे तसेच राज्यातील महायुती सरकारच्या कामावर नागरिकांचा विश्वास. स्वर्गीय गिरीश भाऊ बापट, स्वर्गीय मुक्ताताई टिळक या दोघांच्या कष्टातून कसब्यामध्ये अनेक विकास कामे झाली. आज महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेले हजारो नागरिक हे पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचा आमदार होणार हे दर्शवत आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “राज्यामध्ये महायुतीचे लोककल्याणकारी सरकार यावे, ही जनतेची इच्छा आहे. कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेली कसब्याती जनता हेमंत रासने यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे”.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमंत रासने म्हणाले, “गेली 18 महिन्यांमध्ये कसबा मतदारसंघात केलेल्या कामाची दखल घेऊन महायुतीने मला कसबा मतदारसंघातून लढण्याची पुन्हा एकदा संधी दिली असून वरिष्ठांनी दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे. कसबा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने आणि महायुतीच्या एकजुटीने निश्चितच उमेदवारीचे विजयात रूपांतर होईल. गेल्या 18 महिन्यांमध्ये रस्त्यावर टेबल मांडत ५० हजारांच्यावर नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. कोणतीही समस्या असो ती सोडवण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कायम पुढे राहिले आहेत. त्यामुळे कसब्यातील जनता निश्चितच मतदान रुपी आशीर्वाद देईल हा विश्वास आहे”.

पक्ष्याची करामत अन् तासभर अंधार

पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड परिसरात तासभर वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. २९ ऑक्टोबर २०२४: महापारेषणच्या रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीवर (टॉवर लाईनवर) मोठ्या पक्ष्याने इंटरनेट केबलचा तुकडा टाकल्याने शार्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी पर्यायी वीजपुरवठ्यामध्ये विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, रहाटणी, काळेवाडी या परिसरात बुधवारी (ता. २९) सकाळच्या सुमारास २० मिनिट ते दीड तासापर्यंत वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

याबाबत माहिती अशी की, रहाटणी येथील महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्राला अतिउच्चदाब १३२ केव्ही चिंचवड-रहाटणी वीजवाहिनीद्वारे वीज पुरवठा होतो. मात्र आज सकाळी ७.५६ वाजता रहाटणी उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. महापारेषणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजवाहिनीची पाहणी केली. यात वाकड येथील वूडस् सोसायटीजवळ या वीजवाहिनीच्या तीनपैकी दोन वीजवाहिन्या शॉर्टसर्किटने क्षतीग्रस्त झाल्याचे दिसून आले. त्याचखाली जमिनीवर इंटरनेटच्या केबलचे काही तुकडे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसून आले की, एखाद्या मोठ्या पक्ष्याने इंटरनेटच्या केबलचा तुकडा घेऊन या वीजवाहिनीवर बसण्याचा प्रयत्न केला. यात इंटरनेट केबलच्या तुकड्याचा एकाचवेळी दोन वीजवाहिन्यांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाले व वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता आहे. 

दरम्यान, रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला महापारेषणकडून गणेशखिंड २२० केव्ही उपकेंद्रातून चिंचवड-गणेशखिंड अतिउच्चदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र विजेची मागणी वाढली असल्याने या वीजवाहिनीवर भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. परिणामी महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या कल्पतरू, रहाटणी, मधुबन, आकाशगंगा व पार्कस्ट्रिट या पाच वीजवाहिन्यांवर नाईलाजाने भारनियमन करावे लागले. यामुळे सकाळच्या सुमारास पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, रहाटणी व काळेवाडी परिसरात २० मिनिट ते १.३० तासापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. त्यानंतर भारव्यवस्थापनासाठी तांत्रिक उपाययोजना करून रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्रातील वीजवाहिन्यांना महापारेषणच्या चिंचवड व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर सर्वच परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. महापारेषणकडून नादुरुस्त झालेल्या १३२ केव्ही चिंचवड-रहाटणी वीजवाहिनीचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली. 

दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. वेंकादेश बाबू यांच्याकडून कामकाजाचा आढावा

पुणे, दि. ३०: दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. वेंकादेश बाबू यांनी दौंड विधानसभा मतदारसंघ कार्यालयास मंगळवार (दि. २९) रोजी भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी खर्च निरीक्षकांनी निवडणूक खर्च विभाग, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, पेड न्यूज व माध्यम निरीक्षण आदी बाबत पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून निवडणूक विषयक कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

डॉ. ए. वेंकादेश बाबू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, ग्रीन बिल्डींग, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा असून भ्रमणध्वनी क्रमांक ९२२६१८४५५४ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी हरिश बोरावके हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८८१३६०३६६ आणि ९७०२४१३०१८ असा आहे. डॉ. ए. वेंकादेश बाबू हे सकाळी १० ते ११ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटीसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात २ हजार ८०० निवडणूक कर्मचा-यांना प्रशिक्षण

पुणे दि. २९: पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी नियुक्त २ हजार ८५० अधिकारी, कर्मचारी यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण ९ व १० नोव्हेंबर रोजी देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली आहे.

प्रथम प्रशिक्षण अबेदा इनामदार ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे दोन सत्रात आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात सादरीकरणाद्वारे तसेच इव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक ४० प्रशिक्षणार्थींच्या बॅचमध्ये स्वतंत्र खोलीमध्ये ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण क्षेत्रिय अधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, निवडणूक नायब तहसिलदार चित्रा ननावरे व निवडणूक प्रशिक्षण नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर यांनी मार्गदर्शन केले.

श्री. भंडारे यांनी प्रशिक्षणार्थींना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी व कर्तव्ये सांगून सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडावी, निवडणूक प्रक्रिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दक्ष राहून काम करावे,अशा सूचनाही श्री. भंडारे यांनी दिल्या.

मतदानाच्या आदल्या दिवशी नियमानुसार मतदान केंद्राची रचना करून घेणे, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी (जसे की मॉक पोल, सीआरसी इ.) मतदान यंत्रे हाताळणी बाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वीत आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे याबाबत तसेच निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदींसाठी महत्वाचे अधिनियम, विधानसभा निवडणूक २०२४ मधील झालेले महत्त्वाचे बदल, मतदाना दरम्यान भरावयाच्या विविध नमुन्याचे व प्रपत्राचे विवरण याबाबत निवडणूक प्रशिक्षण क्षेत्रिय अधिकारी यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली. प्रशिक्षणानंतर सर्व प्रशिक्षणार्थींची ऑनलाइन पदध्तीने परीक्षा घेण्यात आली.

शिवाजीनगर व कोथरूड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती

पुणे, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाकडून २०९ शिवाजीनगर व २१० कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून के. हिमावती यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

श्रीमती के. हिमावती यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-२०५ असा आहे. त्यांना दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत भेटता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक ९२२६९३८२६५ असा असून ई-मेल पत्ता genobsershivajinagar.kothrud@gmail.com असा आहे. श्रीमती के. हिमावती यांचे संपर्क अधिकारी श्री. दिगंबर होसारे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३७०९०८२६२ असा आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली

खडकवासला व पर्वती विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती

पुणे, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाकडून २११ खडकवासला व २१२ पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

श्री. संजीव कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०४ असा आहे. त्यांना सोमवार आणि बुधवारी सकाळी ११ ते १२ यावेळेत भेटता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक ९२२६८११९९६ असा असा आहे. श्री. संजीव कुमार यांचे संपर्क अधिकारी श्री. दिग्विजय आहेर हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९९२१२५२५९९ असा आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.