पुणे : महायुतीकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.असे असताना याच मतदारसंघातून जगदीश मुळीक यांनी भाजपचा एबी फॉर्म मिळवत उमेदवारी अर्ज भरण्यास गेले असता वरिष्ठांचा फोन आल्याने उमेदवारी अर्ज न भरताच ते माघारी फिरले आहेत.अर्थात ते माघारी कसे , कोणाच्या आणि काय बोलण्यावरून फिरले याबाबतचा व्हिडीओ त्यांनी स्वतः जाहीर केला आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतो सांगून उमेदवारी दाखल करण्यापासून परावृत्त केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, ” या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा अशी सर्वांची इच्छा होती. आम्ही घेतलेल्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वडगाव शेरीतून मला अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला होता.अर्ज भरण्याचे आदेशही दिले होते. मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काही बिघाडी होऊ शकते या दृष्टीकोनातून अर्ज भरणे थांबवण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर लगेच आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली.”ते पुढे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी छोट्या – मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांचा विचार करते. त्यामुळे मी कोणतंही आश्वासन न घेता फक्त वरिष्ठांचं ऐकून फॉर्म भरणे थांबवले आहे. भविष्यात वरिष्ठ जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करणार आहोत. पक्ष जिथे आदेश देईल तिथे आम्ही महायुतीचा प्रचार करणार आहोत”, असे मुळीक यांनी म्हंटले आहे.