पुणे दि. २९: पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी नियुक्त २ हजार ८५० अधिकारी, कर्मचारी यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण ९ व १० नोव्हेंबर रोजी देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली आहे.
प्रथम प्रशिक्षण अबेदा इनामदार ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे दोन सत्रात आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात सादरीकरणाद्वारे तसेच इव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक ४० प्रशिक्षणार्थींच्या बॅचमध्ये स्वतंत्र खोलीमध्ये ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण क्षेत्रिय अधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, निवडणूक नायब तहसिलदार चित्रा ननावरे व निवडणूक प्रशिक्षण नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर यांनी मार्गदर्शन केले.
श्री. भंडारे यांनी प्रशिक्षणार्थींना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी व कर्तव्ये सांगून सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडावी, निवडणूक प्रक्रिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दक्ष राहून काम करावे,अशा सूचनाही श्री. भंडारे यांनी दिल्या.
मतदानाच्या आदल्या दिवशी नियमानुसार मतदान केंद्राची रचना करून घेणे, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी (जसे की मॉक पोल, सीआरसी इ.) मतदान यंत्रे हाताळणी बाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वीत आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे याबाबत तसेच निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदींसाठी महत्वाचे अधिनियम, विधानसभा निवडणूक २०२४ मधील झालेले महत्त्वाचे बदल, मतदाना दरम्यान भरावयाच्या विविध नमुन्याचे व प्रपत्राचे विवरण याबाबत निवडणूक प्रशिक्षण क्षेत्रिय अधिकारी यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली. प्रशिक्षणानंतर सर्व प्रशिक्षणार्थींची ऑनलाइन पदध्तीने परीक्षा घेण्यात आली.