आडकर फौंडेशनतर्फे आरती देवगावकर यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार प्रदान
पुणे : सुशिक्षित व्यक्तींमध्ये अजूनही आरोग्य साक्षरता नाही तसेच दुसरीकडे अवयव दानाविषयी पुरेशी जागृतीही नाही. अवयव दानाचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच कमी असल्याने योग्य वेळी अवयवदान न झाल्याने रुग्णांचे मृत्यू ओढवतात. अवयव दानासंदर्भातील नागरिकांच्या मनातील भीती, शंका दूर करण्याचे वारंवार प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रचाराचे गेली 24 वर्षे काम करणाऱ्या आरती देवगावकर यांचा आडकर फौंडेशनतर्फे बुधवारी (दि. 6) डॉ.भोंडवे यांच्या हस्ते कोमल पवार स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे स्तुत्य काम आडकर फौंडेशनतर्फे केले जात आहे, असे नमूद करून डॉ. भोंडवे यांनी अवयवदान कोण करू शकतो याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. आरोग्य शास्त्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृत्रिम रक्तपेशी तयार करण्याविषयी संशोधन सुरू आहे. यात जर यश आले तर भविष्यात रक्तदानाची गरज कमी होऊ शकते असे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना आरती देवगावकर म्हणाल्या, आयुष्यातील छोट्या-छोट्या समस्यांचा आपण बाऊ करतो. पण समाजात गेल्यानंतर आरोग्यविषयक समस्या काय आहेत हे समजे आणि आपले दु:ख त्यांच्या दु:खापेक्षा किती छोटे आहे याची जाणिव होते. अवयवदानाविषयी जागृती करतानाच अवयवदानाचे प्रमाण कसे वाढेल याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मानपत्र वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पुनर्जन्म’ या विषयावर आयोजित कविसंमेलनात जयंत भिडे, मीरा शिंदे, विजय सातपुते, स्वप्नील पोरे, राजश्री सोले, साधना शेळके, विद्या सराफ, कांचन पडळकर, ऋचा कर्वे, प्रतिभा पवार, मिनाक्षी नवले, स्वाती सामक, प्रभा सोनवणे यांनी आपल्या रचना सादर केल्या.
पुणे-महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय, कमला नेहरु रुग्णालय व राज्य शासनाचे ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यावरील ताण कमी करण्याच्या हेतूने शहराच्या मध्य पुण्यातील महापालिकेच्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला.
रासने यांच्या प्रचारार्थ आज दत्तवाडी परिसरात मांगीरबाबा मंदिर, म्हसोबा चौक, शामसुंदर सोसायटी, राजेंद्र नगर, पीएमसी कॉलनी, गांजवे चौक या भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, धनंजय जाधव, किरण साळी, बाळासाहेब किरवे, गौरव साईनकर, रमेश काळे, स्वाती मोरे, अनिता बोडके, तानाजी ताकपेरे, विजय गायकवाड यांचा प्रमुख सहभाग होता.
रासने म्हणाले, महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पहिले वैद्यकीय महाविद्यालय, कमला नेहरू रुग्णालयात महापालिकेची पहिली रक्तपेढी, पहिला अतिदक्षता विभाग, नवजात अर्भक व 12 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी ह्दयरोग तपासणी केंद्र, चंदुमामा सोनावणे रुग्णालयात नवजात बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक प्रसूतिगृह, डायलेसिस केंद्र या आरोग्य सुविधा सुरू केल्या.
रासने पुढे म्हणाले, कोरोनामुळे अत्याधुनिक आणि बळकट आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. विस्तारणाऱ्या शहरात आपल्यानजीक उत्तम आरोग्य सुविधा देणारी केंद्रे विकसित करणे, हा आमच्या आरोग्यविषयक धोरणाचा भाग आहे. त्यानुसार मध्य वस्तीमध्ये असलेली रुग्णालये विकसित करणे आणि आरोग्य सुविधांच्या क्षमतावर्धनावर भर देत आहोत.
पुणे – लाडकी बहिण योजना अमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र ,अडीच कोटी महिलांच्या खात्यात आम्ही आतापर्यंत पैसे भरले आहेत. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशाचा चुरडा असल्याचे सांगितले. परंतु आम्ही ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील योजना बंद करणार नाही. सरकार जनतेचे असून हक्काच्या आमदार माधुरी मिसाळ पुन्हा विधानसभेत पाहिजे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण शाळेसमाेरील रस्त्यावर आयाेजन बुधवारी करण्यात आले हाेते त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे,शहराध्यक्ष धीरज घाटे,आमदार माधुरी मिसाळ,माजी मंत्री विजय शिवतारे,अमित गोरखे, दीपक मानकर, नाना भानगिरे, संजय सोनवणे, जगदीश मुळीक, विष्णू कसबे, सरस्वती शेंडगे ,संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे,प्रवीण चोरबोले , आबा शिळीमकर, संतोष नागरे , हर्षदा फरांदे, सुनील कुरूमकर, श्रीकांत पुजारी, महेश वाबळे, बाबा मिसाळ ,डॉ. सुनिता मोरे ,प्रशांत दिवेकर ,अनिरुद्ध भोसले उपस्थित हाेते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्य अहवाल प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीस म्हणाले, पुण्यात प्रचाराची सुरवात करावी असा प्रस्ताव माझ्या समोर आला त्यावेळी पर्वती मतदारसंघात प्रचार नारळ फोडण्याचे ठरवले. माधुरी मिसाळ यांचा चौथा विजय रेकॉर्ड ब्रेक असेल. एसआरए बाबत जी नियमावली तयार झाली त्याचे श्रेय मिसाळ यांना आहे. एफएसआय वाढवून देण्यासाठी त्यांनी काम केले. त्यातून २० हजार घराची निर्मिती याभागात होत असून गरिबांना ३५० स्क्वेअर फूट ऐवजी ४७० स्क्वेअर फूट मोठे घर उपलब्ध होत आहे. मिसाळ यांना विविध गोष्टीची जाण असून दूरदृष्टी आहे. पुणे बदलत असून मेट्रो आधीच सुरू झाली पाहिजे होती. आघाडी सरकार हे केवळ घोषणा सरकार होते पण आमचे सरकार गतिमान आहे. देशात सर्वात वेगाने तयार झालेली पुणे मेट्रो आहे. स्वारगेट येथे मल्टी मॉडेल हब तयार करण्याची कल्पना देखील त्यांची आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोडणारा देशातील सर्वाधिक अत्याधुनिक हब हा असणार आहे. स्वारगेट ते कात्रज आणि खडकवासला ते खराडी मेट्रो प्रकल्पास तातडीने मंजुरी देण्यात आली. पुण्यातील सांडपाणीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प राबवण्याचे ठरवले त्यातून नदी प्रदूषण रोखले जाणार आहे. मुळा मुठा नदीचे जुने स्वरूप पुन्हा लोकांना पाहवयास मिळेल. पुण्यात सर्वाधिक समस्या वाहतूक कोंडी आहे. त्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड तयार करण्यात येत आहे. एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते पण येथील वाहतूक कोंडी पाहून त्या घाबरतात. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री यांचे पुढाकारातून ५४ हजार कोटींचे रस्ते निर्माण केले जाणार आहे. बदलत्या पुण्यात पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी वेगवेगळी विकासकामे केली आहे. त्यामुळे एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांच्याकडे पाहून समजते. महिलांना समाजात केंद्र स्थानी आणले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले. त्यासाठी सक्षमता करण्यासाठी विविध योजना आणल्या गेल्या आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मोठ्या संख्येने लोक सभेला आले असून हा प्रतिसाद पाहून ज्याच्या सभेला तुम्ही आले आहे त्यांना निवडून देण्याची जनतेची इच्छा दिसून येत आहे. ही प्रचार सभा नसून विजयी सभा आहे. सन २००९ मध्ये माधुरी मिसाळ यांचे तिकीट जाहीर होईपर्यंत स्व.गोपीनाथ मुंडे आनंदी झाले नव्हते कारण सतीश मिसाळ हे त्यांचे देखील कुटुंब होते. मतदारसंघातील सरकारच्या योजना मी सांगणार नाही पण मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी माधुरी मिसाळ यांनी प्रयत्न केले आहे. त्यांचे कोणते काम कधीच अडवले जात नाही. केवळ आमदार होऊन विकास होऊ शकत नाही त्यासाठी राज्यात सत्ता येणे आवश्यक असते. २०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप निवडून आला पण थोडक्यात सत्ता गेली आहे.
मोहोळ म्हणाले, पुन्हा एकदा पार्वती करानी ठरवले हट्रिक झाली असुन आता चौकार मारण्याची वेळ आली आहे. शहरात अनेक विकास कामे आलेली आहे. देशात प्रगतीच्या दृष्टीने महाराष्ट्र वेगाने विकसित होत आहे. विकास कामे होताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांची कामे राज्य सरकारकडून होत आहे. पर्वती मतदारसंघात विकासाचे प्रचंड काम माधुरी मिसाळ यांनी केले आहे .त्यांना मागील वेळी ३० हजारांचे मताधिक्य होते, आता एक लाख मताधिक्याने मिसाळ यांना निवडून आणण्याचा संकल्प करा. पुण्यातील सर्व जागा महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, आज आपल्या पुणे शहरात पहिली सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. १५ वर्षं पक्षाने मला संधी दिली असून पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिली. पक्षाचा विश्वास मी सार्थ ठरवला आणि राज्यात पुन्हा युती सरकार येण्यासाठी पर्वती मधील मतदारसंघ एक असेल याची ग्वाही देते. लोकांच्या दैंनदिन गरजा समस्या सोडवण्यासोबत सत्ता नसतानाही दुप्पट कामे केली. मतदारसंघ संमिश्र असून वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात त्यांच्यासाठी ४०० प्रकारची कामे सध्या सुरू आहे.राज्यात प्रथमच मल्टी मॉडेल हब स्वारगेट येथे उभारण्यासाठी कल्पना मांडली आणि त्याला निधी कोणती कमतरता सरकारने पडू दिली नाही. कला संस्कृती जपण्यासाठी कलाग्राम प्रथम मला सुरू करता आले. एसआरएचा पहिला ४७० स्क्वेअर फूट घरांचा प्रकल्प मला मतदारसंघात सुरू करता आला आहे. मतदार यांना माझ्या कामाची कल्पना असून ते पुन्हा एकदा गतिमान, कार्यक्षम महायुतीला साथ देतील.सर्वांना सांभाळून घेणारे नेते कसे असावे हे भाजप मध्ये पाहवयास मिळते. लाडकी बहिण योजना बद्दल अभिमानाने महिला माझ्याशी बोलत आहे.
पुणे- चंद्रकांतदादांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढणारे-विजय तुकाराम डाकले यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
.विजय तुकाराम डाकले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी दिले आहे. पत्रामध्ये तुम्ही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी सदस्य पदावर कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीवर अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक विभाग अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व मित्र पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील आहेत. या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे राहू नये असे वारंवार सांगुनही महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवित आहात.सदरील कृत्य पक्षशिस्त भंग करणारे आहे म्हणून तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं ५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेतून पंचसुत्रीची घोषणा करण्यात आलेली आहे. महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेला उत्तर देण्यात आलं आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील २ कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला महायुती सरकार महिलांना बस प्रवासात ५० टक्क्यांची सवलत देत आहे. त्यामुळे महिलांना एसटी प्रवास करताना अर्धे तिकीट लागतं. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना, मुलींना मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे.शेतकऱ्यांना महाविकास आघाडीनं महत्त्वाची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर
1. जातीनिहाय जनगणना – 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार.
2. कुटुंब रक्षण – 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा देणार.
3. महालक्ष्मी योजना – महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार
4. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांना महिन्याला 4 हजार रुपये देणार.
राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. आज प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावला जात आहे. भाजपच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली. भारतात गरिबांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. अदानी आणि अंबानी रोजगार देणार नाहीत, तसेच महाराष्ट्रातील युवकांचे रोजगार हिसकावले जात आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी महायुती तसेच केंद्र सरकारवर केला आहे.
हे विचारधाराची लढाई आहे एका बाजूला बीजेपी आरएसएस आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी. एका बाजूला आंबेडकरांचे संविधान एकता समानता मोहब्बत रिस्पेक्ट आणि दुसऱ्या बाजूला समोरून नव्हे तर लपून बीजेपी आणि आरएसएसचे लोक या संविधानाला संपवणार. हे समोरून बोलणार नाहीत कारण संपूर्ण देश यांना संपवून टाकू शकतो म्हणून हे लपून या संविधानाला संपवण्याचा घाट घालत आहेत.
देशाच्या व्हाईस चान्सलर यांची लिस्ट काढून बघा त्यात तुम्हाला मेरिट कुठेच दिसणार नाही केवळ त्यांच्या क्वालिफिकेशन हे आरएसएस मेंबरशिप चा आहे. बनायचा असेल तर आरएसएस ची मेंबरशिप घ्या यांना कुठल्याच विषयाबद्दल काहीच माहित नसतं.
महाराष्ट्रात पूर्वीचे सरकार हे इंडिया आघाडीचे सरकार होते आणि त्या सरकारला चोरी करत पैसे देत हटवण्यात आले. का, कारण त्यांना दोन-तीन अरबपतींची मदत करायची आहे. मुंबईला माहिती आहे महाराष्ट्राला माहित आहे की धारावीची जमीन एक लाख कोटींची जमीन तुमच्या हक्काची जमीन गरिबांची जमीन तुमच्या डोळ्यासमोर हिसकावली जात आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्या चे प्रोजेक्ट होते एप्पल ची कंपनी असो बोईंग विमानाची कंपनी, तुमच्या पासून हिसकावून दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवली जात आहे. पाच लाख युवकांना रोजगार मिळाला असता. हे सगळे प्रोजेक्ट गुजरात मध्ये पाठवण्यात आले. सेमी कण्डक्टर प्लांट, आयफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, पेट्रोल केमिकल प्रोजेक्ट हे सगळे हे महाराष्ट्राचे होते त्यातून युवकांना रोजगार मिळणार होता हे सगळे तुमच्या पासून हिसकावण्यात आले.
राहुल गांधी म्हणाले, या संविधानामुळे अंबानी यांच्यावर मर्यादा आणता आल्या आहेत. या संविधानामध्ये महापुरुषांचे विचार आहेत, यात आंबेडकरांचा आवाज आहे, फुलेंचा आवाज आहे, गांधीजींचा आवाज आहे. हिंदुस्थानाचा आवाज गरिबांचा आवाज दलितांचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज या संविधानात आहे. संविधान हे केवळ पुस्तक नाही. इंडिया आघाडी तुम्हाला आश्वस्त करते की काहीही झाले तरी संविधानाला कोणी हात लावू शकत नाही याला कोणीच संपवू शकणार नाही इंडिया आघाडी एक साथ आहे आणि हिंदुस्थानाची जनता एकत्र आहे.
मविआ सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेडीसाठी ५०,००० रुपयांचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. राज्यात सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवणार अशी घोषणा राहुल गांधींनी केली. कुटुंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत विमा देण्याची घोषणादेखील महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.महालक्ष्मी योजनेची घोषणा करताना राहुल गांधींनी महायुती सरकारवर तोफ डागली. राज्य सरकार अदानींसाठी काम करत आहे. महागाई, कराच्या स्वरुपात लोकांची अक्षरश: लूट सुरु आहे. त्या लुटीचा मोठा फटका सामान्यांना बसला आहे. त्यामुळेच त्यांना प्रवासात पूर्ण सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. सामान्य कुटुंबाच्या खिशावर ९० हजारांचा डल्ला मारला जात आहे. त्या बदल्यात महिलांना केवळ दीड हजार रुपये दिले जात आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बंधुंनो भगिनींनो आणि मातांनो, या वाक्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले, नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता निवडणुकांचे फटाके फुटायला लागले आहेत. आपल्याकडे चांगले आयटम बॉम्ब आहेत आणि पलीकडे फुसके फटाके आहेत. 23 तारखेला आपल्याला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. त्याचा निश्चय करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत.कालपासून माझ्या जाहीर सभा सुरू झाल्या. सभा सुरू होण्याआधी दोन-तीन दिवस मी काही जणांशी बोलत होतो सगळे म्हणत होते अजून काही उत्साह दिसत नाही हो, त्यांना म्हटलं थांबा जरा फराळ तर होऊ द्या. फराळ कसा करायचा महागाई एवढी वाढली आहे. अनेक घरांमधून फराळातले पदार्थ गायब झाले आहेत. म्हंणलं हेच तर फटाके उद्याच्या निवडणुकीत फुटणार आहेत. योजनांचा पाऊस पडतो आणि आणि अंमलबजावण्याचा दुष्काळ हे नेहमीचे वाक्य आहे.जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. कारण महागाई वाढते. बाकीचे आनंदाचा शिधा वगैरे ठीक आहे पण त्या आनंदाचा शिधामध्ये सुद्धा अळ्या आणि लेंड्या सापडत आहेत. कसला आनंद आहे यांचा? गरिबांना लेंड्या देतायेत हा तुमचा आनंद? आणि असे बकवास लोक आपल्यावर राज्य करत आहेत? म्हणून मी सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर परत एकदा या ज्या पाच जीवनावश्यक वस्तू आहे त्यामध्ये तेल आलं साखर, तांदूळ, गहू, जे काही आहेत त्यांचे भाव आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता हे स्थिर ठेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही.आपल्याला कळतच नाही की आपला खिसा कापला जात आहे. प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावला जात आहे. उद्या श्वास घ्यायला सुद्धा टॅक्स लावतील. आणि इकडे योजनांचा पाऊस पाडत आहेत. आपण जे करतो ते खुलेआम करतो, आपला जाहीरनामा सुद्धा जाहीर आहे लोकांसाठी आहे. महिलांसाठी जी योजना आहे ती नुसतीच चालू ठेवणार नाही तर त्यामध्ये भर टाकणार आहोत. शरद पवार साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज हे तीन लाखांपर्यंत माफ करणार आहोत. त्यापूर्वी दोन लाखांचे आपण करून दाखवले आहे.महाराष्ट्रातील युवकांना जसे मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहे तसेच मुलांना देखील मोफत शिक्षण आपण देणार आहोत. त्यानंतर नोकरी मिळेपर्यंत काय करायचं तर ते या पंचसूत्री मध्ये आहे की प्रत्येक बेरोजगार तरुणाला दर महिन्याला आपण चार हजार रुपये देणार आहोत. जर तरुण आपला भविष्य असेल आणि या कपाळ करंट्या सरकारमुळे नासला जात असेल तर तरुणाने करायचं काय.लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण जी घोषणा केली होती संविधान बचावाची याला विरोधकांनी फेकनरेटीव्ह. संविधान वाचवायचाच आहे अजून ते पूर्ण झालेला नाही. संविधान बचाव हे भाजपला फेकनरेटीव्ह वाटत असेल तर धारावीचा जो मुद्दा जो काढतोय ते केवळ धारावीच नव्हे तर अख्खे मुंबई हे अडाणीच्या घशामध्ये घालणारे जीआर निघाले आहेत. हे निघालेले जीआर फेकनरेटीव्ह होऊ शकतात. यांना संपूर्ण मुंबई अदानीमय करायची आहे. आमच्या सरकार आल्यानंतर हे सगळे जीआर रद्द करू असा आश्वासन मी तुम्हाला देतो.
पुणे :स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात यश मिळविले असून, सातत्यपूर्ण पाठपुराव्याने खडकवासला-स्वारगेट-खराडी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोला राज्य शासनाची मान्यता मिळविली आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मेट्रोची सुविधा मिळणार असल्याचा दावा आमदार माधुरी मिसाळ यांनी केला.
मिसाळ यांनी वाळवेकर गार्डन परिसरात आज नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. माजी नगरसेवक महेश वाबळे, आनंद रिठे, प्रशांत जगताप, कैलास मोरे, प्रशांत थोपटे, रवींद्र चव्हाण, औदुंबर कांबळे, शीतल मोरे, संध्या नांदे, शिवाजी भागवत, रामदास शिंदे, रमेश कुदळे, बिपीन पोतनीस, मनोज कुदळे, विकास कांबळे, विकास पुलावळे, अनिल जाधव, गणेश सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, “स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी हा पुणे मेट्रोचा सुमारे 33 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनला प्रवाशांची पहिली पसंती मिळत आहे. मेट्रोमुळे सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर व जलद प्रवासाची सुविधा पुणेकरांना मिळत आहे.”
मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘मेट्रोमुळे उद्योग, व्यवसाय, रोजगारांच्या संधींमध्ये वाढ होणार आहे. शहराच्या विविध भागांतील उपनगरे मेट्रो मार्गांमुळे जोडली जात आहेत. या प्रकल्पामुळे वेळेची मोठी बचत होत आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड प्रवास अवघ्या 27 मिनिटे 20 सेकंदामध्ये होत असून, स्वारगेट ते शिवाजीनगर आणि मंडईपर्यंतच्या प्रवासाला अनुक्रमे अवघी 5 मिनिटे 27 सेकंद व 3 मिनिटे इतका कमी वेळ लागत आहे. त्यामुळे ती प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे.”
पुणे- भाजपा-महायुतीचे खडकवासला मतदारसंघाचे उमेदवारआमदार भिमराव तापकीरांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ शिवगंगा खोऱ्यातून केला.आज शिवगंगा खोऱ्यातील श्री तुकाई देवी मंदिर, कोंढणपूर येथे श्रीफळ वाढवून भिमराव अण्णा तापकीर यांच्या प्रचार व पदयात्रेची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा यावेळी मोठा सहभाग दिसला ज्यामुळे या कार्यक्रमाचा उत्साह वाढलेला दिसत होता. महायुतीतील माजी नगरसेवक दिलीप बराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला शिवसेना अध्यक्ष सतीश घाटे, भाजपा खडकवासला ग्रामीण अध्यक्ष नवनाथ तागुंदे,माजी नगरसेवक प्रदीप (बाबा) धुमाळ, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, बाळासाहेब नवले, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरूण राजवाडे, खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, राजश्री नवले, राणी भोसले, अश्विनी भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री भुमकर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव यांसह महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ग्रामीण भागातून प्रचाराचा शुभारंभ – चौथ्यांदा विजयी होण्याचे आवाहन
आमदार भिमराव अण्णा तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करून ग्रामीण मतदारांचा चौथ्यांदा विश्वास संपादन करण्याचे उद्दिष्ट ठेऊन नागरिकांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकीत ग्रामीण भागातून मिळालेल्या लीडमुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला असून, गेल्या १३ वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांनी यावेळीही महायुतीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.
विकासाच्या वचनाचा पुनरुच्चार
आमदार तापकीर यांनी सांगितले की, “भाजपा-शिवसेना आणि महायुतीच्या सरकारने राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत.” कोंढणपूर, कल्याण, सिंहगड, रहाटवडे, आर्वी, शिवापुर, खेड शिवापुर, श्रीराम नगर, गाउडदरा, गोगलवाडी यांसारख्या गावांना भेट देऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि आगामी निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले.
‘वंदे मातरम् 150’ अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाने पुण्यात शुक्रवारी शुभारंभ
पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150वे वर्ष दि. 7 नोव्हेंबर पासून सुरू होत असल्याने भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम् सार्ध शती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांचा शुभारंभ शुक्रवारी पुण्यात ‘वंदे मातरम् 150’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे होणार आहे, अशी माहिती कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, अरुणचंद्र पाठक, कार्यवाह संजय भंडारे, कार्याध्यक्ष शिरीष पटवर्धन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जन्मदा प्रतिष्ठान निर्मित, मल्हार प्रॉडक्शन प्रकाशित ‘वंदे मातरम् 150’ हा अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन वंदे मातरम्चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांचे असून कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीचा इतिहास आणि 150 वर्षातील ‘वंदे मातरम्’ संदर्भातील ठळक नोंदी दृकश्राव्य माध्यमातून पाहता येणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या सहकार्याने दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता एक पाऊल देशासाठी-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथून वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. शुभारंभ लॉन्स ते राजाराम पूल असा वॉकेथॉनचा मार्ग आहे. यात सर्व गटातील स्त्री-पुरुषांना सहभागी होता येणार आहे. दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारी (दि. 11) शाळा सुरू होत आहेत. या दिवशी अनेक शाळांमध्ये सुरू होते वेळीस सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन होणार आहे. ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचे 150वे वर्ष सुरू होत असल्याचे निमित्त साधून भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदेमातरम् सार्ध शती समारोह समितीतर्फे प्रत्येक राज्यात विविध कार्यक्रमांची आखणी केली जात आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, समूहगान स्पर्धांचे आयोजन, अनुबोधपटाची निर्मिती, आनंदमठ संगीत नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. वंदे मातरम्वर आधारित विषयांवर वक्तृत्व, कथाकथन, निबंध, काव्य, चित्रकला, प्रश्नमंजुषा, रिल्स मेकिंग, पथनाट्य अशा विविध प्रकारच्या स्पर्धा व कार्यक्रमांच्या माध्यमातून वंदे मातरम् घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न समिती करणार आहे. संपूर्ण देशभरात असे कार्यक्रम व्हावेत यासाठी देशभरातील विविध संस्था, संघटनांची मदत घेतली जाणार आहे. ‘वंदे मातरम्’विषयी ठळक नोंदी असलेली विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेली मराठी भाषेतील चित्रपुस्तिका नॅशलन बुक ट्रस्टतर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून भविष्यात विविध भाषांमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. समग्र वंदे मातरम्चे दोन खंड या पूर्वी प्रकाशित करण्यात आले होते. त्यात माहितीची भर घालून 850 पानांचा एक ग्रंथ नव्या स्वरूपात स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासनातर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम्’ची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्याचा वंदे मातरम् सार्ध शती समारोह समितीचा प्रयत्न आहे. याच उपक्रमातील एक पाऊल म्हणजे सोसायटी ऑफ इंडियन ॲकॅडमिक्स इन अमेरिका या संस्थेने ह्यूस्टन (अमेरिका) येथे दि. 16 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या इंडियन ॲकॅडमिक्स इश्यूज अँड इंडियन नॉलेज सिस्टिम या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत वंदेमातरम्चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले असून त्यांचे वंदे मातरम् : हिस्ट्री अँड इन्स्पिरेशन या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.
संविधानाच्या पुस्तकाचा रंग कोणता असावा हे ठरवण्याचा अधिकार संविधानविरोधी लोकांना नाही.
राहुल गांधींच्या पहिल्याच सभेने भाजपा घाबरली, भाजपाच्या शक्ती स्थळाजवळच कार्यक्रम घेतल्याने जळफळाट.
मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२४ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू लागला आहे. संविधानाच्या पुस्तकाचा रंग लाल, पिवळा का काळा असावा हे ठरविण्याचा अधिकार संविधान विरोधी लोकांना नाही. संविधान वाचवणे भाजपा व फडणविसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालणारी मराठी माणसे शहरी नक्षलवादी आहेत का असा सवाल विचारून देवेंद्र फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची माफी मागावी असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी संविधान ‘बचाओ’ची भूमिका हाती घेत संविधानाचे पुस्तक दाखवत असतात. ज्या लोकांनी आरक्षण व संविधानाला विरोध केला, संविधान जाळले त्या व्यवस्थेच्या बाजूला भाजपाच्या शक्तीस्थळाजवळच सुरेश भट्ट सभागृहात राहुल गांधींचा संविधान संमेलन कार्यक्रम झाला, त्यामुळे भाजपाचा जळफळाट झाला आहे. भाजपाला डाव्या विचारसरणीचे लोक देशाचे विरोधक वाटत असतील तर केरळमध्ये डाव्या पक्षाचे सरकार आहे, पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्या पक्षांचे सरकार होते, देशात आजही डाव्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत, त्यांना मतदान करणारे देशविरोधी आहेत का? आणि भाजपाला तसे वाटत असेल तर केंद्रात त्यांची सत्ता आहे फडणविसांनी कारवाई करावी. कोणालाही देशभक्तीचे किंवा देश विरोधाचे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला. भाजपाची सर्वात मोठी अडचण राहुल गांधी हे आहेत, भाजपा राहुल गांधी यांना घाबरतात म्हणून मनुवादी विचारसरणीचे हे लोक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण राज्यातील जनता सुज्ञ आहे भाजपाला ते त्यांची जागा दाखवतील, असेही नाना पटोले म्हणाले.
प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत गुरुवारी टिळक भवन येथे प्रचार समितीची पहिली बैठक
मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२४ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीपदी ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीच सदस्य, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती केली आहे. ४५ सदस्यांच्या या समितीच्या समन्वयकपदी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचार समितीच्या सदस्यांमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, खा. डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री सुनिल केदार, सतिश चतुर्वेदी, सुरेश शेट्टी, माजी खासदार हुसेन दलवाई, कुमार केतकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, एससी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, आ. भाई जगताप, आ. अभिजीत वंजारी, आ. प्रज्ञा सातव, चारुलता टोकस, उल्हास पवार, मोहन जोशी, अनिस अहमद, अशोक पाटील, चरणसिंह सप्रा, राजाराम पानगव्हाणे, रामहरी रुपनवर, मुनाफ हकीम, एम. एम. शेख, राजेश शर्मा, सचिन सावंत, शरद अहेर, महेंद्र घरत, किशोर बोरकर, जेनेट डिसुझा, इब्राहिम भाईजान, कमल फारुकी, अनिषा बागुल, सुर्यकांत पाटील, डॉ. हेमलता पाटील, मोहन देशमुख, प्रविण देशमुख, सुनिल अहिरे, अनिस कुरेशी, अशोक धवड या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचार समितीची पहिली बैठक महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरूवार दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता टिळक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२४ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. २४ तासाच्या आत संजय वर्मा यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, रश्मी शुक्ला यांना मिळालेली मुदतवाढ ही फक्त पोलीस महासंचालक पदासाठीच होती, दुसऱ्या कोणत्याही पदासाठी नाही, त्यांनी वयाची ६० वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ज्याक्षणी निवडणूक आयोगाने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवले त्याक्षणी त्या कायद्यानुसार निवृत्त झालेल्या आहेत, असे असताना त्यांना रजेवर कसे पाठवले जाते. महाराष्ट्रात एकच अधिकारी सरकारच्या सर्वात लाडक्या आहेत का, रश्मी शुक्लाच का, दुसरे अधिकारी नाहीत का, सदानंद दाते, रितेशकुमार, संजय वर्मा, फणसाळकर हे सक्षम अधिकारी नाहीत का? ६० वर्ष झाल्यांनतरही एकाच व्यक्तीसाठी आग्रह का, याचे उत्तर आशिष शेलार यांनी द्यावे. रश्मी शुक्ला निवृत्त झाल्या तरी त्यांच्यासाठी वेगळा कायदा लावला जातो, कायद्याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना नियुक्ती दिली जाते. रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यासाठी सर्व कायदे, नियम, संविधान, सुप्रिम कोर्टाचा निकाल बाजूला ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकार करत आहे. रश्मी शुक्ला यांच्या मदतीने निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा भाजपा युती सरकारचा हा प्रयत्न आहे. पोलीस वाहनातून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवले जाते अशी माहिती मिळाल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार सांगत आहेत यातच रश्मी शुक्लाच का, याचे उत्तर दडले आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.
सोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आज लिहिलेल्या पत्राची प्रत जोडली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा निर्धार; मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन.
पुणे: “हडपसर विधानसभा मतदारसंघाला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीमुक्त बनवायचे आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यात विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरले आहेत. हा बॅकलॉग भरून काढत महाविकास आघाडी हडपसरला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे,” असा निर्धार हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला. बुधवारी सकाळी ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रशांत जगताप यांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातील भोसले गार्डन येथे जगताप यांच्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन झाले.
प्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक विजय देशमुख, माजी नगरसेवक योगेश ससाणे, काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, शमशुद्दिन इनामदार, सचिन ननावरे, पूजाताई कोद्रे, हेमलताताई मगर, रत्नप्रभाताई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रशांत जगताप म्हणाले, “ग्रामदैवत भैरवनाथाला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ करत आशीर्वाद घेतला. कुटुंबातील सदस्य, तसेच महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळी सोबत होते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी हडपसरच्या विकासासाठी निवडणूक लढविण्याची संधी दिली. आपल्या सर्वांच्या साथीने या संधीचे सोने करायचे आहे. या मतदारसंघातील प्रश्न विधिमंडळात मांडून न्याय द्यायचा आहे. येथे पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी आदी समस्या आहेत. निष्क्रिय विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात काहीही काम केले नाही. त्यामुळे मला जनाधार मिळत असून, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विधिमंडळात हडपसरचे नेतृत्व करेल, असा विश्वास आहे.”
पवार साहेबांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. प्रशांत जगताप त्यापैकीच एक आहेत. महापौर, शहराचा अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. जनसामान्यांमध्ये मोठा संपर्क, येथील समस्यांची त्यांना जाण आहे. हडपसरच्या प्रगतीसाठी असा सुसंस्कृत व विकासाचा चेहरा जगताप यांच्या रूपाने मिळाला असल्याचे अंकुश काकडे यांनी नमूद केले.
बाळासाहेब शिवरकर यांनी जगताप यांच्या कार्याचे कौतुक करीत हडपसरच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. यापूर्वी, मीही या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या पाच वर्षात येथे काहीही काम झाले नसून, विद्यमान आमदारांना घरी पाठवण्याची वेळ आल्याचे शिवरकर म्हणाले.
पुणे – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधानसभा निवडणूक प्रचार समितीमध्ये माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नियुक्तीची घोषणा केली. खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समिती नेमण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश संघटनेत मोहन जोशी यांनी विविध पदांवर काम केले असून, त्यांनी कर्नाटक, तेलंगण आदी १२ राज्यांमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाचेही ते सदस्य आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही आघाडीचेच सरकार येईल, प्रचारही एकजुटीने चालू आहे. त्या दृष्टीने पक्ष आणि आघाडीचा प्रचार हिरीरीने करेन, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.
जातनिहाय जनगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली, काहीही झाले तरी जातनिहाय जनगणना होणार व आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच.
विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या उपस्थितीत नागपुरात संविधान सन्मान संमेलन संपन्न.
नागपूर/मुंबई, दि. ६ नोव्हेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रिबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा व आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, ते लपून हल्ला करतात, आरएसएसमध्ये हिंमत असती तर त्यांनी समोरुन हल्ला केला असता, असा घणाघाती हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे स्वतःबद्दल बोलत नसत, ते जेव्हा बोलायचे तेंव्हा तो कोट्यवधी लोकांचा आवाज असायचा. संविधानात सर्वांच्या विकासाबद्दल लिहिले आहे. संविधानामुळे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, आयआयटी, आयआयएम, सार्वजनिक रुग्णालये आहेत. निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा आहेत. संविधानात एक व्यक्ती एक मतदान, प्रत्येक जात, धर्म, प्रदेशाचा आदर केला आहे. पण देशात ९० टक्के लोकांवर दररोज अन्याय होत आहे, त्याविरोध आपली लढाई आहे. हे ९० टक्के लोक जेल, मनरेगा या ठिकाणी दिसतात. हा अन्याय दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. जातनिहाय जनगणनेवर मी बोलतो तेव्हा नरेंद्र मोदी माझ्यावर देश तोडण्याची भाषा करतो असा आरोप करतात. जातनिहाय जनगणनेवर काय भूमिका घ्यायची यावर आरएसएसमध्येही मंथन सुरु आहे, त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी जातनिहाय जनगणना करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादासुद्धा हटवली जाईल असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्याने कर्ज परतफेड केली नाही तर त्याला जेलमध्ये टाकले जातो आणि करोडो रुपये कर्ज घेऊन जो परदेशात पळून जातो त्याला उद्योगपती म्हणतात असा टोला राहुल गांधी लगावला, आपल्या भाषणात त्यांनी शिशुमंदिरासाठी एवढा पैसा कुठून येतो असा सवाल उपस्थित करत हा पैसा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नॅशनल हायवे, अदानी व अंबानीचा पैसा आहे असे म्हटले जाते. पाच टक्के लोक देश चालवत आहेत.
नागपूरात आगमन झाल्याबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नागपुरात दिक्षाभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि पारदर्शकतेसह पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयातील निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग पूर्ण सज्ज झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे, आणि सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी रोहिदास जाधव,दिपक चव्हाण सहाय्यक अधिकारी पल्लवी जोशी, शशिकांत कांबळे, शदरक करसुलकर, रवींद्र शिंदे, सागर शेवाळे आणि इतर अधिकारी व कर्मचारी या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभागाचे मुख्य काम म्हणजे निवडणुकीसाठी आवश्यक सर्व साहित्याचे योग्य नियोजन, वितरण आणि नियंत्रण राखणे. मतदान केंद्रांवर पाठवण्यात येणाऱ्या मतदान यंत्रे, मतपत्रिका, मतदार याद्या, शिक्के, शाई, सील, लेखन सामग्री यांसारख्या आवश्यक वस्तूंची सूची तयार करणे आणि त्याचे वितरण सुनिश्चित करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान या साहित्याची कमतरता भासू नये यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांच्या देखरेखीखाली साहित्य विभागाने कोणत्याही तांत्रिक अडचणी न येता मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व साहित्य वेळेत उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली आहे. यासह, निवडणूक संपल्यानंतर साहित्य परत एकत्र करून सुरक्षित ठिकाणी संग्रहित करणे, तसेच त्याची नोंद ठेवणे हे देखील त्यांचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.