Home Blog Page 596

खडकवासला मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा भंग; विनापरवाना प्रचार फलक उभारला

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रचारासाठी लावण्यात येणाऱ्या फलकांसाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, धायरी येथील मधुमालती सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर परवानगीशिवाय प्रचार फलक लावल्याचे आढळले आहे.
दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 31 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत खडकवासला मतदारसंघातील भरारी पथक 6 ने आपल्या कर्तव्याच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या Cvigil Investigator अँपवरून तक्रार प्राप्त केली. या तक्रारीत धायरीगाव भागातील मधुमालती सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर मोठ्या फलकावर प्रचार सामग्री लावलेली असल्याचे नमूद करण्यात आले होते. फलकात पांढऱ्या रंगाच्या बॅनरवर मोठ्या अक्षरात संदेश लिहिलेला होता, ज्यामध्ये सोसायटीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची माहिती देण्यात आली होती.
भरारी पथकाने संबंधित ठिकाणी पोहोचून महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तत्काळ फलक काढून टाकला. फलक काढण्यापूर्वी त्याचे छायाचित्र घेण्यात आले असून, तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीतून संबंधित फलक कोणी लावला, हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशांनुसार परवानगीशिवाय प्रचार साहित्य लावणे आचारसंहितेचा भंग असून, प्रकरणावर पुढील तपास सुरू आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठीशी कोथरुडकरांनी खंबीरपणे रहावे!

माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन

पुणे- देशाला आणि राज्याला योग्य दिशा दाखवणं हे राज्यकर्त्यांचं प्रमुख काम असतं. आज देश आणि मोठ्या झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून देणं, ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

अर्थ संवादच्या वतीने भारताचे पाच ट्रिलियन डॉलर युग आणि त्यामध्ये सीए सीएसचे स्थान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात दृकश्राव्य माध्यमातून सहभागी होऊन त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील, सीए अशोक नवाले, हर्षद देशपांडे, राघवेंद्र जोशी, दिनेश गांधी  यांच्या सह पुणे शहरातील सीए सीएस उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, निवडणूक हा लोकशाहीचा यज्ञ आहे. देश आणि राज्याला योग्य दिशा दाखवणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. पुणे आणि कोथरुडने नेहमीच देशाला दिशा दिली आहे. आज देश झपाट्याने प्रगती करत आहे. महाराष्ट्र ही कुठे मागे राहिलेला नाही. चंद्रकांतदादा पाटील हे अतिशय सुसंस्कृत, संवेदनशील आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे अशा व्यक्तीमत्वाचे हात बळकट करणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सीए आणि सीएस हे समाजातील प्रभावशाली क्षेत्र आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशासाठी चांगलं जगलं पाहिजे, प्रत्येकाने आपले क्षेत्र आणि सामाजिक काम नीट केलं पाहिजे. मतदान ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून ती पूर्ण केली पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.

विश्वकल्याणासाठी पुणेकरांचे सामूहिक रामरक्षा पठण आणि ग्रंथ पारायण दिंडी

सहयोगी संस्थेच्या वतीने आयोजन
पुणे :  राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याणाचा हेतू अशा ५ संकल्पाद्वारे ५ वेळा रामरक्षा पठण मुलांनी केले. कुश लव रामायण गाती….स्वयंवर झाले सीतेचे…सेतू बांधा रे सागरी ही गीत रामायणातील गीते सादर करीत विश्वकल्याणासाठी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.

ग्रंथ पारायण दिंडी यांच्यासह भक्ती सुधा फाउंडेशन, चौफेर प्रतिष्ठान आणि समर्थ व्यासपीठ यांच्यावतीने लहान मुलांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठण आणि गीतरामायण पठणाचे आयोजन सारसबाग गणपती मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे, भक्ती सुधा फाउंडेशनचे आशिष केसकर,  गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे उपस्थित होते.  पांचजन्य शंख नाद पथकाने कार्यक्रमात शंख वादन केले.

कार्यक्रमात ८ ते १४ वयोगटातील बालकलाकारांकडून गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात हा गीतरामायणचा कार्यक्रम सादर झाला.  पुण्यात घरोघरी आणि तुळशीबाग मंदिरात वर्षभर सुरू असलेल्या १३ लक्ष रामरक्षा पठणाची  सांगता अयोध्येत २२ आणि २३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे, या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वीरेंद्र कुंटे म्हणाले, दिनांक २२  आणि २३  नोव्हेंबरला अयोध्येमध्ये प्रथमच सामूहिक रामरक्षाचा कार्यक्रम राम लल्लांच्या समोर होणार आहे. १३ लाख रामरक्षा आम्ही ग्रंथ पारायण दिंडीच्या माध्यमातून समर्पित करणार आहोत. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी श्री दत्तप्रसाद जोग आणि सहकलाकार गोवा  यांचे हिंदीतून व पुणे , बडोदा, चैन्नई येथील   बालकलाकारांकडून मराठी  असे प्रथमच हिंदी व मराठी दोन्ही भाषांमध्ये अयोध्येमध्ये गीत रामायण सादर होणार आहे. पाच संकल्प युक्त पाच वेळा राम रक्षा आणि पुन्हा भीमरूपी आणि नंतर  श्रीराम जय राम जय राम असा गजर करणार आहोत.

आशिष केसकर म्हणाले, आपल्या राष्ट्राबद्दल एक आत्मियता निर्माण व्हावी, या हेतूने संकल्प करीत रामरक्षेचे पठण करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांगितीक परंपरेमध्ये गीत रामायण हा एक अनमोल हिरा आहे. ही संपत्ती ही पुढच्या पुढीकडे द्यावी या दृष्टीने बालचमूंकडून ही गीत रामायण बसवून घेतले आणि त्यांनी गीत रामायण सादर केले. यानंतर अयोध्येत राम मंदिरात हा कार्यक्रम ते सादर करणार आहेत.

शिरोळे यांचा विविध मंडळातील कार्यकर्त्यांशी,  नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीचा धडाका

पुणे, दि. ९ नोव्हेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना मतदार संघातील सर्वच भागात मोठा पाठींबा मिळत असून पदयात्रा, महिला मेळावे, विविध मंडळांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यावर त्यांचा मोठा भर आहे.

नुकताच औंधरोड भागातील सर्व मंडळातील युवकांच्या सोबत शिरोळे यांची बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित युवकांनी या भागात शिरोळे यांनी केलेल्या विविध विकास कामांचे कौतुक केलेच शिवाय नजीकच्या भविष्यात करावयाची आवश्यक कामे यांची माहितीही त्यांना दिली. याशिवाय औंध भागातील कॉसमॉस बँक चौक, जयभवानी चौक, कोळी आळी, भैरवनाथ मंदिर, मंगेश सोसायटी या भागात देखील शिरोळे यांच्या पदयात्रेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.    

यावेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “औंध भाग हा माझ्या मतदार संघातील महत्त्वाचा भाग असून आजवर या भागातील विविध कामांवर तब्बल ७ कोटी रुपये खर्च केलेले आहेत. या अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था, रस्ता कॉंक्रीटीकरण, ओपन जीमची उभारणी, व्यायाम साहित्य, पेव्हिंग ब्लॉक्स टाकणे अशी महत्त्वाची कामे झाली आहेत. नजीकच्या भविष्यातही या भागातील उर्वरित कामे मार्गी लावू.”

यावेळी उपस्थित सर्व मंडळाच्या प्रतिनिधींनी औंधरोड भागातील युवकांच्या रोजगाराच्या समस्या मांडल्या तसेच सेवा वस्त्यांमधील वाढती गुन्हेगारी व व्यसनांचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात काम करण्याबाबद्दल शिरोळे यांसोबत युवकही कटिबद्ध असतील असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला सिद्धार्थ महासंघाचे अध्यक्ष सुभाष पाडळे, चंद्रमणी संघ अखिल औंधरोडचे अभिजित शेलार, तसेच राजू मोरे, साहिल डोळस, युवाशक्तीचे ॲड. रोहित आगळे, चिखलवाडी भागातून अमन भालेराव व औंधरोड परिसरातील राहुल खरात, हरिकृष्ण पटेल, इतर सर्व मंडळाचे व स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंधरा वर्षात खुंटलेला विकास पाच वर्षात भरून काढणार : आबा बागुल

पर्वती मतदारसंघात नव्याने तीन अत्याधुनिक
रुग्णालयांची निर्मिती करणार

पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघ हा सर्व वर्गातील नागरिकांचा विभाग आहे. मात्र येथे गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आवश्यक असलेली रुग्णालये नाहीत. गेली पंधरा वर्षे येथे विकास थांबला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात पर्वती विधानसभा मतदारसंघात तीन अत्याधुनिक सुविधा असलेले व गोरगरिबांना फ्री आणि इतरांना नाममात्र दरात परवडेल अशी रुग्णालये उभारण्यात येतील. असे आश्वासन शनिवारी अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी नागरिकांना दिले.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल हे गेली ३२ वर्षे महापालिकेत अपराजित नगरसेवक आहेत. त्यांचा जनसंपर्क हा दांडगा असून, याच प्रेमापोटी दररोज हजारो नागरिक त्यांची भेट घेऊन त्यांच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द देत आहेत. आज वाळवेकर लॉन्स येथे नागरिकांशी संवाद साधताना आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदार संघातील रुग्णालयांची कमतरता भरून काढण्यासाठी येत्या पाच वर्षात प्रयत्न करून, महापालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून तीन अत्याधुनिक रुग्णालये उभारण्याची ग्वाही दिली. तसेच येथे विनामूल्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना आपत्तीच्या काळात गणेश कला क्रीडा मंच येथील हॉल मध्ये कोरोनाने बाधित रुगांची दिवसरात्र सेवा करून त्यांना आजारमुक्त करणाऱ्या आबा बागुल यांच्या कार्याचा आम्हाला अनुभव आहे. व आबा येत्या काही वर्षात पर्वती मध्ये नक्की ३ रुग्णालये, तेही अत्याधुनिक सुविधांसह तयार करून देतील असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. स्व. राजीव गांधी ई- लर्निंग सारखी देशातील पहिली शाळा महापालिकेच्या माध्यमाद्वारे सुरू करणारे आबा बागुल आमच्या भागात नक्कीच अत्याधुनिक रुग्णालये सुरू करतील अशी खात्री ही यावेळी अनेकांनी बोलून दाखवली.
दरम्यान आज आबा बागुल यांनी पर्वती मतदार संघात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच मतदार संघातील महत्वाच्या व्यक्ती, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी या सर्वांचीच कंबर कसून आम्ही तुमच्या विजयासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

खडकवासला विधानसभा निवडणुकीत वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे अहोरात्र योगदान

पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अत्यंत तत्परतेने नियोजन आणि अंमलबजावणीचे काम सुरू आहे. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. यशवंत माने यांनी नेतृत्व स्वीकारले आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेचे सर्व तपशीलवार नियोजन सुरु आहे. या कामात मनपा वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे सह. आयुक्त विजय नायकल, मंडळ अधिकारी प्रमोद भांड, आणि अधीक्षक विजय शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र मेहनत करत असून, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांना नियोजनानुसार नेमून त्यांना योग्य त्या सूचना देण्याचे काम हे अधिकारी करीत आहेत. या प्रक्रियेत नितीन पायगुडे, दत्तात्रय दुधाने, अजिंक्य खिरीड, विक्रांत पोकळे, प्रदीप शेलार, विशाल वरघडे, उमेश धावडे, योगेश गायकवाड, आणि वासुदेव दोडके हे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. निवडणूक यंत्रणेची सतत देखरेख, मतदारांच्या तक्रारींचे निराकरण, मतदानाच्या तयारीचे नियोजन, आणि आवश्यक कर्मचाऱ्यांचे नियोजन या सर्व कामांचा आढावा घेण्याचे जबाबदारी या विभागातील कर्मचारी आणि अधिकारी घेत आहेत.
निवडणूक प्रक्रियेत त्वरित निर्णय घेण्याचे आणि विविध विभागातील समन्वय साधण्याचे आव्हान स्वीकारताना अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अथक मेहनत घेत आहेत. गैरहजर किंवा अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. डॉ. यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रियेला यशस्वी करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने कार्य केले जात आहे. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांचे नियोजन व त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे काम करण्यात येत आहे.
खडकवासला विधानसभा निवडणुकीत वारजे क्षेत्रीय कार्यालयातील या कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून काम करत निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. या कार्यात मनपा क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी अहोरात्र काम करीत असून त्यांचा वेळेवर केलेला समर्पणशील सहभाग निवडणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी महत्वपूर्ण ठरत आहे.

संकल्प कसब्याच्या विकासाचा, निर्धार महायुतीच्या विजयाचा !

पुणे :कसबा मतदारसंघात आज महायुतीचा विजयसंकल्प मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. कसबा मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी आणि राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्धार करण्यात आला. महायुतीतील सर्वांची वज्रमूठ करत जोमाने काम करण्याचा संकल्प मेळाव्यात करण्यात आला.

यावेळी बोलताना धीरज घाटे म्हणाले, कसबा मतदारसंघात एकवटलेली महायुतीची ताकद बघितल्यानंतर आपले उमेदवार हेमंत रासने विजयी होणार हे निश्चित झालं आहे. लोकसभेच्या मताधिक्यापेक्षा अधिकचा लीड मिळेल. राज्यामध्ये लोककल्याणकारी महायुतीचे सरकार आणण्यासाठी जनता कसब्यातील आमदार विधानभवनात पाठवेल हा विश्वास आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, हेमंत रासने हे अत्यंत शांत आणि संयमी असून त्यांनी गेल्या 18 महिन्यांमध्ये केलेलं काम कौतुकास्पद आहे. पराभव झाल्यानंतर अनेक जण खचून जातात मात्र त्यांनी दुप्पट गतीने नागरिकांची सेवा केली. त्यामुळे कसब्यातील जनता त्यांना नक्की आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवेल हा विश्वास आहे.

या पदाधिकारी मेळाव्यास भाजप माजी राष्ट्रीय महामंत्री श्री. सी.टी. रवीजी, भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री धीरज घाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्री. दीपकभाऊ मानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष श्री.संजय सोनावणे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शनाताई त्रिगुनाईत, शिवसेना प्रदेश सचिव श्री. किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. कुणाल टिळक, रिपब्लिकन पक्ष (ए)चे नेते श्री. मंदारभाऊ जोशी, श्री. गौरव बापट, भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते श्री. संदीपजी खर्डेकर, मा. नगरसेवक अशोक येनपुरे, योगेश समेळ, मा. नगरसेविका आरती कोंढरे, अजय खेडेकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष नामदेव माळवदे, कसबा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र काकडे, श्री अजय दराडे, श्री निलेश जगताप, श्री कपिल जगताप, सरचिटणीस अमित कंक, चंद्रकांत पोटे, शिवसेनेचे सुधीर कुरूमकर, गणेश काची, प्रदीप गारटकर , दत्ताभाऊ सागरे, गौरव साइनकर, घनशाम भोसले, पुरुषोत्तम नांगरे, सुरेखाताई कदम, महेश शिंदे आदी महायुती आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंहगड रस्त्यावर प्रवास होणार गतिमान,एकात्मिक वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी: आमदार माधुरी मिसाळ

पुणे:सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोफ्लडी कमी करून प्रवास गतिमान व्हावा या उद्देशाने एकात्मिक वाहतूक आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करीत असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
राजाराम पूल, नवशा मारुती, सरीता नगरी, दत्तवाडी, पानमळा या परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद रिठे, अनिता कदम, राजू कदम, श्रीकांत पुजारी, प्रशांत दिवेकर, विनया बहुलीकर, दैविक विचारे, सुजीत सामदेकर, शिवाजी भागवत, अरुण वीर, परेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते यांचा या आराखड्यात एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राजाराम पूल चौकात 520 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. राजाराम पूल ते फनटाइम थिएटर, विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर आणि इंडियन ह्यूम पाईप गेट ते इनामदार चौक या उड्डाणपुलांचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे, उर्वरित काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल.
मिसाळ म्हणाल्या, उड्डाणपुलाच्या कामादरम्यान वाहतुकीची कोफ्लडी होऊ नये यासाठी कालव्याच्या कडेने धायरीपासून विश्रांतीनगर मार्गे जनता वसाहत, नीलायम टॉकीजपर्यंत, गंगा भाग्योदयपासून इंडियन ह्यूम पाईपच्या जागेतून सनसिटीकडे असे पर्यायी रस्ते करण्यात आले. याच परिसरातील रस्ता अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्सनुसार विकसित करण्यात आला. उड्डाणपुलामुळे वेळेची, इंधनाची बचत आणि वाहतुकीची कोफ्लडी कमी होत आहे.
मिसाळ पुढे म्हणाल्या,खडकवासला-स्वारगेट-खराडी या 25.56 किलोमीटर मार्गाच्या मेट्रो दुसऱ्या टप्प्याला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या पिलरचे काम उड्डाणपुलाच्या उभारणीतच करण्यात आले आहे. या मार्गावर एकूण 22 स्टेशन असून, 8 हजार 131 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु. ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल या ठिकाणी मेट्रोची स्टेशन्स होणार आहेत. त्यामुळे पर्वती विधानसभेतील सिंहगड रस्त्यावरील प्रत्येक प्रभागात मेट्रो पोहोचणार आहे.

दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या मॉर्निंग वॉक संवादात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

पुणे:दादा आमच्या लक्षात आहे… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!’ ही प्रतिक्रिया आहे; कोथरूड मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची! कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी तात्यासाहेब थोरात उद्यानात जाऊन मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांकडूनही चंद्रकांतदादा पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका ॲड. वासंती जाधव, हर्षाली माथवड, भाजपा नेते नवनाथ जाधव, गिरीश भेलके, बाळासाहेब टेमकर, अजित जगताप दिपक पवार यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भेटणारा प्रत्येक नागरिक दादांना शुभेच्छा देत होता. अनेक नागरिक दादा तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय! तुम्ही कोथरूडच्या घराघरात पोहोचले आहात, कोथरुडकरांचा एकच वादा चंद्रकांतदादा अशा प्रतिक्रिया देत होते. यावर चंद्रकांतदादांकडूनही कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी सर्वांनी अवश्य मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन केले.

वडगाव शेरीच्या विद्यमान आमदारांवर सुप्रिया सुळे यांची जोरदार टीका

विद्यमान आमदारांना मतदार धडा शिकवतील

‘तू तू ,मैं मैं ‘ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ :सुप्रिया सुळे

पुणे :

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे शंभर टक्के विजयी होतील,निष्क्रिय ठरलेल्या विद्यमान आमदारांचा मतदार धडा शिकवतील ,असा जोरदार विश्वास आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.८ नोव्हेंबर रोजी, सायंकाळी क्रांतिवीर लहुजी उस्ताद साळवे सभागृह, लक्ष्मी नगर, येरवडा येथे खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली , ज्यामुळे परिसरात आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले . राज्यातील सरकारने केलेली अनिर्बंध उधळपट्टी,भ्रष्टाचार,दिशाहीन कारभार,राज्याची झालेली पीछेहाट,वाचाळपणा,घसरलेली प्रचाराची पातळी आणि वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा निष्क्रिय पणा यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आसूड ओढले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,”मी याला संधी दिली,मी त्याला संधी दिली ‘,असे काही जण म्हणत असतात. पक्षाने संधी दिली,असे म्हणत नाहीत.आता तर अंडीपिल्ली बाहेर काढण्याची भाषा करतात.त्याच भाषेत बोलणे योग्य नाही.पण,तुम्ही मागचे काही काढणार असाल ,तर आम्हालाही तुमची काही माहिती आहे.’तू तू ,मैं मैं ‘ची लढाई करणार नाही ,पण ‘करारा’जबाब देऊ( चोख प्रत्यत्तर देऊ)

विद्यमान आमदाराने पाच वर्षात काय केले हे बोलण्यात काही अर्थ नाही.आता शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे.नवे विश्व उभारावे लागणार आहे.बापूसाहेब पठारे यांनी त्यांच्या परिसरात कोणताही अपघात झाला तर पोलीस स्टेशन ला न जाता हॉस्पिटलला जावे,असा शब्द मला द्यावा,असे आवाहन करताना विद्यमान आमदारांना लक्ष्य केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या सुषमा अंधारे,महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे ,प्रमुख पदाधिकारी या सभेला व्यासपीठावर उपस्थित होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,’ महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढत आहे. वडगाव शेरीत देखील ही एकी दिसत आहे, त्यातून बापूसाहेब पठारे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील

घणाघाती भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या ,वडगाव शेरीमध्ये बदमाश गिरी चालू आहे.विद्यमान आमदार राडारोडा टाकून पूर आणायचे काम करतात तर पठारे कुटुंबीय पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचे काम करत आहे.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.या मतदारसंघाचे आणि माझे भावनिक नाते असून मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे.थिल्लरपणाला हे मतदार थारा देणार नसून या मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी महाविकास आघडीच्या हाती देणार आहेत. नियोजनपूर्वक विकास करून सर्व पायाभूत सुविधा मार्गी लावून आधुनिक पुणे निर्माण करण्याचे वचन मी देत आहे.मतदारांना कायम उपलब्ध राहून उत्तरदायी राहीन,याचा पुनरुच्चार त्यांनी या सभेत केला.

खडकवासला मतदारसंघात दृष्टिहीन मतदारांसाठी ‘ब्रेल’मधून मतदार चिठ्ठी, विशेष मदतनीसाची सोय

पुणे: पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात यंदा 55 दृष्टिहीन मतदारांसाठी विशेष ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठी (स्लिप) उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 14 उमेदवार नशीब आजमावत असलेल्या या मतदारसंघात एकूण 507 मतदान केंद्रे असणार आहेत. दृष्टिहीन मतदारांच्या सोयीसाठी त्यांच्याकरिता वेगळे केंद्र न ठेवता, त्यांच्या राहण्याच्या पत्त्याच्या नोंदीनुसार जवळच्या मतदान केंद्रात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ज्या केंद्रांवर दृष्टिहीन मतदार असतील, त्या ठिकाणी ब्रेल लिपीत स्लिपसह मदतनीसाची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी विनोद हाके आणि सहाय्यक अधिकारी प्रदीप पारखी यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदाराला त्यांच्या मतदान केंद्राची माहिती असलेली चिठ्ठी (व्होटर स्लिप) दिली जाते. दृष्टिहीन मतदारांना यामध्ये अधिक सहकार्य मिळावे म्हणून खडकवासला मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेल लिपीतून चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे दृष्टिहीन मतदारांना मतदान प्रक्रियेत सहजता लाभेल आणि या विशेष सोयीमुळे त्यांना मतदान करता येईल. या मतदार चिठ्ठ्यांमुळे मतदारसंघातील दृष्टिहीन मतदारांना मतदानाच्या ठिकाणी अधिक सहकार्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा

पुणे, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ : महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विरोधक हे दुतोंडी असून समाजात ते जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यापासून आपण सावध राहायला हवे, असे ते यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजीनगर मतदार विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन गोखलेनगर परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे मैदानावर करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कोथरूड मतदार संघातील महायुतीचे उमदेवार चंद्रकांत पाटील, कसबा मतदार संघातील महायुतीचे उमदेवार हेमंत रासने, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आरपीआय (आठवले) गटाचे परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये असताना त्यांनी विकास बंद पाडला होता. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण सत्ता मिळवण्यासाठी अनैसर्गिक आघाडी झाली आणि त्यामधून महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले. जेव्हा हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये होते, तेव्हा राज्याचा विकास पूर्णपणे थांबला होता.” महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपच्या अनेक आमदारांनी वनवास दूर केल्याची भावना आपल्याकडे व्यक्त केल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सरकारने जनहिताचे निर्णय घेतले आहेत. सव्वा दोन वर्षात महायुतीने केलेले काम जनतेच्या हिताचेच राहिले आहे. युती सरकारच्या काळात सुरु झालेली लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे प्रयत्न सावत्र भावांनी केल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली. विधानसभेचे मतदान झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणारा असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

सिद्धार्थ शिरोळे हे लोकप्रिय, आदर्श आणि कार्यसम्राट आमदार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याने विधानसभेत केलेल्या कामाचे कौतुक केले. शिरोळे यांच्या घराला राजकीय वारसा आहे, त्यांचे वडील पुण्याचे खासदार होते हे सांगताना पुण्यातील सुज्ञ मतदार पुन्हा त्यांना विधानसभेत पाठवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्याकडे विशेष लक्ष आहे, म्हणून त्यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांची मंत्रीपदी नियुक्ती केली आहे. पुण्यात मेट्रोचा विकास होत आहे, इतकेच नाही तर उद्योग क्षेत्रात देखील ते पुढे चालले आहे. इथला वाहतुकीचा प्रश्न सोडवून पुणे हे ट्रॅफिकमुक्त करायचे असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. आमचे सरकार हे ‘कॉमन मॅन’चे सरकार आहे, त्यामुळे भविष्यात देखील त्याच पद्धतीने जनतेच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सिद्धार्थ शिरोळे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या मतदार संघात केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुणे विद्यापीठ चौकामध्ये सुरु असणारे उड्डाणपुलाचे काम वेगात सुरु असून येत्या जानेवारी महिन्यात त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महायुतीमधील घटक पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याची आवश्यकता : प्रशांत जगताप

कोंढवा-टिळेकरनगरवासियांचा प्रशांत जगताप यांना पाठिंबा

पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांना दिवसेंदिवस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी जगताप यांनी कोंढवा, टिळेकरनगर भागाचा झंझावाती प्रचारदौरा केला. या वेळी नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत करीत आम्ही तुमच्या व महाविकास आघाडीच्या पाठीशी असून, येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी आपल्याला विजयी करू, असा विश्वास दिला. या प्रचारयात्रेदरम्यान महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोंढव्यातील वीर येसाजी कामठे स्मारकास अभिवादन करून प्रचाराला सुरुवात झाली. आंबेडकर चौक, हनुमान चौक, भोलेनाथ चौक, शिवराज चौक, प्रतिभाताई पवार शाळा, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, काकडेवस्ती, साळवे गार्डन रोड, इस्कॉन चौक, राजमाता कॉलनी, गोकुळनगर, क्रांती चौक, अंबामाता चौक, राजीव गांधी नगर, हिरामण बनकर शाळा, डॉल्फिन चौक, अंबामाता मंदिर अशा मार्गाने हा दौरा पार पडला. प्रचारमार्गावरील मंदिरे, स्मारके यांना अभिवादन करीत, नागरिकांच्या गाठीभेटी, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली.
या प्रचार दौऱ्यात अनेक संस्था, संघटनांनी जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. चांदतारा चौक येथील हनीफभाई पठाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पठाणी समाज जगताप यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी दिला. गनिमी कावा युवा सेवा संघानेही जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या पायांवर उभ्या असलेल्या महाराष्ट्राला गद्दारीचा सुरुंग लावलेल्यांना धडा शिकवण्यासाठी विजय मिळवू, असा विश्वास जगताप यांनी या वेळी व्यक्त केला.

पक्षाचे युवक शहर कार्याध्यक्ष दीपक कामठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कामठे परिवाराने त्यांचे स्वागत केले. कामठे परिवार या संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ही माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हडपसरकरांचा मिळणारा प्रतिसाद व सहकाऱ्यांची ऊर्जा पाहून माझा आत्मविश्वास दुणावत आहे, असेही जगताप म्हणाले. हडपसरच्या विकासासाठी आपल्याला महाविकास आघाडी सरकार निवडून आणायचे आहे, असे आवाहन जगताप यांनी केले.

कँटोन्मेंटच्या विकासासाठी रमेश बागवे यांना विजयी करा — बाळासाहेब थोरात आणि सुप्रिया सुळे यांचे आवाहन

रमेश बागवे यांच्या मुख्य निवडणूक कचेरीचे दिमाखात उद्घाटन

पुणे : भाजपच्या सरकारच्या काळात कँटोन्मेंटचा विकास ठप्प झाला आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी जनतेने रमेश बागवे यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौकातील मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन बाळासाहेब थोरात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उमेदवार रमेश बागवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, जैनब बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे तसेच अजित दरेकर , अण्णा थोरात, आरिफ बागवान, संगीता तिवारी, विनोद मथुरावाला, संगीता पवार, मिलिंद अहिरे, जयंत किराड , भगवानराव वैराट, भीमराव पाटोळे, प्रसाद केदारी, रफीक शेख, करण मखवानी, जयकुमार राघवाचारी, राजाभाऊ चव्हाण, पोपट गायकवाड, रमेश अय्यर, विकास कांबळे, रशीद खिजर, मोहसीन नगरवाला, अतुल गोंदकर, प्रतीक कांबळे, सुरेश मखवाना यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आप, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीतील‌ सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करून विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

महायुतीच्या सरकारमुळे महागाई वाढली आहे. ईडीचा धाक दाखवून सत्तेत आलेले हे सरकार बदलणे काळाची गरज आहे. कँटोन्मेंटचा रखडलेला विकास केवळ महाविकास आघाडी करू शकते. या भागाच्या विकासासाठी जनतेने रमेशदादांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहन सुळे यांनी केले.

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत विकास ठप्प झाला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपच्या दोन आमदारांना दहा वर्षांत विकासनिधी आणता आला नाही. भाजपच्या माजी आमदारांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात आणि सध्याच्या आमदारांनी गेल्या पाच वर्षांत कँटोन्मेंटच्या जनतेसाठी काहीच काम केले नाही. त्यांनी केवळ स्वत:चा विकास केला आणि जाहिरातबाजी केली. कँटोन्मेंटच्या विकासाठी यंदा बदल गरजेचा आहे. कँटोन्मेंटला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील तर महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे. कँटोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही रमेश बागवे यांनी दिली.

कँटोन्मेंटचा विकास म्हणजे रमेशदादा

कोहिनूर हॉटेल, जाफरीन लाईन, कांबळे कोच हाऊस, कुरेशी नगर, भोपळे चौक, बाबाजान दर्गा, जान महमंद स्ट्रीट, कडबा फडई, कुंभारबावडी, न्यू मोदीखाना, गवळी गोठा, मोदीखाना परिसर, ट्रायलॅक हॉटेल, खाने मारुती मंदिर, डेक्कन टॉवर कन्याशाळा, सोलापूर बाजार चौकी या मार्गे रमेश बागवे यांची पदयात्रा शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘कँटोन्मेंटचा विकास म्हणजे रमेशदादा’, ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले होते. केदारीनगर, नेताजीनगर, माने वस्ती, आझाद नगर, शांतीनगर, विकासनगर, श्रीमंत महादजी शिंदे छत्री या भागात कार्यकर्त्यांच्या मोठया संख्येत सायंकाळी पदयात्रा निघाली.

भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा अपमान, रामदास स्वामींना शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा अमित शाहांचा प्रयत्न: नाना पटोले

महायुतीच्या कलंकीत चेहऱ्यांना महाराष्ट्राच्या सत्तेतून दूर करा: अमित देशमुख

नाना पटोले यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी लातूरमध्ये प्रचारसभा संपन्न.

मुंबई,लातूर दि. ८ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भारतीय जनता पक्षाने पुन्हा अपमान केला आहे. दोन दिवसापूर्वी भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, रामदास स्वामींनी छत्रपतींच्या सोबत तरुणांना उभे केले असे सांगून शिवाजी महाराजांपेक्षा रामदास स्वामी मोठे होते असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राज्याच्या झंझावाती प्रचारावर असलेल्या नाना पटोले यांची लातूरच्या गंजगोलाई भागात जाहीर सभा झाली. या सभेला माजी मंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अॅड किरण जाधव, फारुख शेख यांच्यासह मविआचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अठरापगड जातीच्या मावळ्यांची फौज उभी केली, त्यात मुस्लीमांसह सर्व जाती धर्माचे लोक होते. भाजपा जाणीवपूर्वक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे काम करत आहे. सामान्य जनतेच्या मुळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे प्रकार केला जात आहेत. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण भाजपा युती सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रश्न सोडवला नाही. मविआची सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रश्नावर निर्णय घेतला जाईल. सोयाबीनचे एक केंद्र लातूर जिल्ह्यात उभे करु तसेच शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्मारकही उभे केले जाईल असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरु असून याचे नेतृत्व नाना पटोले करत आहेत. महायुतीच्या सरकारवर तोफ डागत देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एकही काम केले नाही. जायकडवाडी, माजलगाव, उजनीवरून पाणी देण्याचे केवळ आश्वासन दिले पण पाणी काही आले नाही. भाजपाने बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे घर फोडले, काँग्रेसचे घर फोडण्याचाही प्रयत्न केला पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. महायुती सरकारने महाराष्ट्राला लुटून खाल्ले, भ्रष्ट लोकांना मंत्रीपदे देण्यात आली. आता महायुतीच्या कलंकीत चेहऱ्यांना महाराष्ट्राच्या सत्तेतून दूर करण्याचे वेळ आहे त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले.