सहयोगी संस्थेच्या वतीने आयोजन
पुणे : राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याणाचा हेतू अशा ५ संकल्पाद्वारे ५ वेळा रामरक्षा पठण मुलांनी केले. कुश लव रामायण गाती….स्वयंवर झाले सीतेचे…सेतू बांधा रे सागरी ही गीत रामायणातील गीते सादर करीत विश्वकल्याणासाठी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.
ग्रंथ पारायण दिंडी यांच्यासह भक्ती सुधा फाउंडेशन, चौफेर प्रतिष्ठान आणि समर्थ व्यासपीठ यांच्यावतीने लहान मुलांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठण आणि गीतरामायण पठणाचे आयोजन सारसबाग गणपती मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे, भक्ती सुधा फाउंडेशनचे आशिष केसकर, गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे उपस्थित होते. पांचजन्य शंख नाद पथकाने कार्यक्रमात शंख वादन केले.
कार्यक्रमात ८ ते १४ वयोगटातील बालकलाकारांकडून गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात हा गीतरामायणचा कार्यक्रम सादर झाला. पुण्यात घरोघरी आणि तुळशीबाग मंदिरात वर्षभर सुरू असलेल्या १३ लक्ष रामरक्षा पठणाची सांगता अयोध्येत २२ आणि २३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे, या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वीरेंद्र कुंटे म्हणाले, दिनांक २२ आणि २३ नोव्हेंबरला अयोध्येमध्ये प्रथमच सामूहिक रामरक्षाचा कार्यक्रम राम लल्लांच्या समोर होणार आहे. १३ लाख रामरक्षा आम्ही ग्रंथ पारायण दिंडीच्या माध्यमातून समर्पित करणार आहोत. दिनांक २२ नोव्हेंबर रोजी श्री दत्तप्रसाद जोग आणि सहकलाकार गोवा यांचे हिंदीतून व पुणे , बडोदा, चैन्नई येथील बालकलाकारांकडून मराठी असे प्रथमच हिंदी व मराठी दोन्ही भाषांमध्ये अयोध्येमध्ये गीत रामायण सादर होणार आहे. पाच संकल्प युक्त पाच वेळा राम रक्षा आणि पुन्हा भीमरूपी आणि नंतर श्रीराम जय राम जय राम असा गजर करणार आहोत.
आशिष केसकर म्हणाले, आपल्या राष्ट्राबद्दल एक आत्मियता निर्माण व्हावी, या हेतूने संकल्प करीत रामरक्षेचे पठण करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांगितीक परंपरेमध्ये गीत रामायण हा एक अनमोल हिरा आहे. ही संपत्ती ही पुढच्या पुढीकडे द्यावी या दृष्टीने बालचमूंकडून ही गीत रामायण बसवून घेतले आणि त्यांनी गीत रामायण सादर केले. यानंतर अयोध्येत राम मंदिरात हा कार्यक्रम ते सादर करणार आहेत.