विद्यमान आमदारांना मतदार धडा शिकवतील
‘तू तू ,मैं मैं ‘ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ :सुप्रिया सुळे
पुणे :
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे शंभर टक्के विजयी होतील,निष्क्रिय ठरलेल्या विद्यमान आमदारांचा मतदार धडा शिकवतील ,असा जोरदार विश्वास आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.८ नोव्हेंबर रोजी, सायंकाळी क्रांतिवीर लहुजी उस्ताद साळवे सभागृह, लक्ष्मी नगर, येरवडा येथे खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली , ज्यामुळे परिसरात आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले . राज्यातील सरकारने केलेली अनिर्बंध उधळपट्टी,भ्रष्टाचार,दिशाहीन कारभार,राज्याची झालेली पीछेहाट,वाचाळपणा,घसरलेली प्रचाराची पातळी आणि वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा निष्क्रिय पणा यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आसूड ओढले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,”मी याला संधी दिली,मी त्याला संधी दिली ‘,असे काही जण म्हणत असतात. पक्षाने संधी दिली,असे म्हणत नाहीत.आता तर अंडीपिल्ली बाहेर काढण्याची भाषा करतात.त्याच भाषेत बोलणे योग्य नाही.पण,तुम्ही मागचे काही काढणार असाल ,तर आम्हालाही तुमची काही माहिती आहे.’तू तू ,मैं मैं ‘ची लढाई करणार नाही ,पण ‘करारा’जबाब देऊ( चोख प्रत्यत्तर देऊ)
विद्यमान आमदाराने पाच वर्षात काय केले हे बोलण्यात काही अर्थ नाही.आता शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे.नवे विश्व उभारावे लागणार आहे.बापूसाहेब पठारे यांनी त्यांच्या परिसरात कोणताही अपघात झाला तर पोलीस स्टेशन ला न जाता हॉस्पिटलला जावे,असा शब्द मला द्यावा,असे आवाहन करताना विद्यमान आमदारांना लक्ष्य केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या सुषमा अंधारे,महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे ,प्रमुख पदाधिकारी या सभेला व्यासपीठावर उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,’ महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढत आहे. वडगाव शेरीत देखील ही एकी दिसत आहे, त्यातून बापूसाहेब पठारे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील
घणाघाती भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या ,वडगाव शेरीमध्ये बदमाश गिरी चालू आहे.विद्यमान आमदार राडारोडा टाकून पूर आणायचे काम करतात तर पठारे कुटुंबीय पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचे काम करत आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.या मतदारसंघाचे आणि माझे भावनिक नाते असून मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे.थिल्लरपणाला हे मतदार थारा देणार नसून या मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी महाविकास आघडीच्या हाती देणार आहेत. नियोजनपूर्वक विकास करून सर्व पायाभूत सुविधा मार्गी लावून आधुनिक पुणे निर्माण करण्याचे वचन मी देत आहे.मतदारांना कायम उपलब्ध राहून उत्तरदायी राहीन,याचा पुनरुच्चार त्यांनी या सभेत केला.