पुणे: पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात यंदा 55 दृष्टिहीन मतदारांसाठी विशेष ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठी (स्लिप) उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 14 उमेदवार नशीब आजमावत असलेल्या या मतदारसंघात एकूण 507 मतदान केंद्रे असणार आहेत. दृष्टिहीन मतदारांच्या सोयीसाठी त्यांच्याकरिता वेगळे केंद्र न ठेवता, त्यांच्या राहण्याच्या पत्त्याच्या नोंदीनुसार जवळच्या मतदान केंद्रात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ज्या केंद्रांवर दृष्टिहीन मतदार असतील, त्या ठिकाणी ब्रेल लिपीत स्लिपसह मदतनीसाची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी विनोद हाके आणि सहाय्यक अधिकारी प्रदीप पारखी यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदाराला त्यांच्या मतदान केंद्राची माहिती असलेली चिठ्ठी (व्होटर स्लिप) दिली जाते. दृष्टिहीन मतदारांना यामध्ये अधिक सहकार्य मिळावे म्हणून खडकवासला मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेल लिपीतून चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे दृष्टिहीन मतदारांना मतदान प्रक्रियेत सहजता लाभेल आणि या विशेष सोयीमुळे त्यांना मतदान करता येईल. या मतदार चिठ्ठ्यांमुळे मतदारसंघातील दृष्टिहीन मतदारांना मतदानाच्या ठिकाणी अधिक सहकार्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.