Home Blog Page 595

काँग्रेसचे देशासाठी बलिदान आणि योगदान सर्वश्रुत:राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी-मल्लिकार्जुन खरगे

आपल्या खास शैलीत घेतला विरोधकांचा समाचार

गुरुकुंज मोझरी/प्रतिनिधी

जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे आणि ग्रामगीतेतून देशात एकता निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीत ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या विषारी घोषणा देणाऱ्या योगींच्या तोंडून अशी भाषा शोभत नाही.योगी म्हणजे मुखात राम आणि बगल मध्ये सुरी अशी लक्षणे तर ढोंगी साधूंची असल्याचा पलटवार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. गुरुदेवनगर गुरुकुंज मोझरी येथे शनिवारी यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मोहन प्रकाश, खा. बळवंत वानखडे,माजी खा. अनंत गुढे,तिवसा येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख (अमरावती विधानसभा) प्रा. वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे विधानसभा),डॉ.हेमंत चिमोटे (मेळघाट विधानसभा),बबलू देशमुख (अचलपूर विधानसभा) गिरीश करळे (मोर्शी, वरुड विधानसभा) सुनील खराटे (बडनेरा विधानसभा),गजानन लेवटे (दर्यापूर विधानसभा) यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना खरगे म्हणाले की, राष्ट्र एकसंघ राहण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचे मोठे बलिदान आहे. आरएसएस, भाजपने स्वातंत्र्यासाठी काय केले, भारताचा इतिहास लक्षात घेता काँग्रेसचे योगदान आणि बलिदान दिसून येते.इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आम्ही संविधानावर चालणारे लोकं आहोत मात्र विरोधकांची भाषा संविधान तोडणारी मनुस्मृती भाषा आहे.जुमलेबाज मोदी सरकारने ना पंधरा लाख दिले नाही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या दिल्या,ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. याउलट शेतीमालाचे भाव कमी झाले, बेरोजगारी वाढली, देशात अराजकता निर्माण केली.काँग्रेसने संविधान वाचवून लोकशाही जिवंत ठेवल्यामुळे आज मोदी प्रधानमंत्री झाले असे सांगून खरगे यांनी आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे नमूद केले.
संविधान असेल तर देशातील नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत त्यामुळे तोडण्याची भाषा करणाऱ्या व मनुस्मृतीवर चालणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. गुरुकुंज मोझरी येथे झालेल्या जाहीर सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. या सभेने विरोधकांचे धाबे दराने अशी चर्चा सभास्थळी होत

ये शेरनी है,किसिसे डरती नही

महाविकास आघाडीच्या उमेदवार व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या चवथ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यांनी मतदार संघात विविध योजना आणून सर्वच क्षेत्राचा विकास केला. त्या अतिशय योग्य उमेदवार असून यापुढेही त्या तुमच्या सेवेत राहून उत्तम काम करतील. तुमचा आशीर्वाद देऊन व तुमच्या मतांचा योग्य वापर करून यशोमती ठाकूर यांना निवडून द्या.यशोमती ठाकूर या नुसत्या उमेदवार नाहीत तर त्यांचे काँग्रेस पक्षासाठीही मोठे योगदान आहे. त्यांचे कामच त्यांचा धर्म आहे, लढाऊ महिला म्हणून त्या सर्वश्रुत असतांना ये शेरनी है किसिसे डरती नही असे म्हणत यशोमती ठाकूर यांचे भरभरून कौतुक केले.

नेत्यांनी मर्यादा जपावी

उठसुठ कुणीही काहीही बोलतात, पदाची गरीमा न ठेवता तसेच पक्षाची विचारसरणी झुगारून आज मोदींपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत विषारी भाषेचा वापर करतात. काल, परवा येथील एका मुलीने खासदाराला चपराशी संबोधले.यावरून त्यांच्या संस्काराची प्रचिती येते. बळवंत वानखडे यांना संविधानाने खासदार बनविले. बळवंत वानखडे हे जनतेचे, देशाचे, महापुरुषांचे शिपाई आहेत. उलट असे वक्तव्य करणाऱ्यांनी स्वतः अवलोकन करावे असे बोलल्यानेच आपण एकदा जेलवारी सुद्धा केलेली आहे त्यामुळे आपण भाषेचा योग्य वापर करावा व बोलतांना, काम करतांना आपली मर्यादा जपावी असा इशारा देत मल्लिकार्जुन खरगे यांनी नवनीत राणा यांना मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला.

हे फसनवीस सरकार-यशोमती ठाकूर

विद्यमान राज्यसरकारने जनतेची फसवणूक केली आहे.हे केवळ मतांसाठी शासनाच्या तिजोरीचा वापर करत असून फसव्या योजना राबवित आहेत. महिला असुरक्षित असून युवक बेरोजगार झालेत, शेतीमालाला भाव न देता त्यांचीही फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतनाचा विषय आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे आणि हे फसनविस सरकार लोकांना जातीपातीच्या राजकारणात अडकवून ठेवत आहे.
खोटे आमिषे दाखवून युवकांना फसविण्याचे प्रकार हे सरकार करत आहे अशी टीका करून यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्व समस्यांवर निघेल असे उपस्थितांना आश्वासन दिले.

मुंबई भाजपा कोकण विकास आघाडीच्या वतीने कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांना निवेदन

मुंबई दिनांक ९ नोव्हेंबर २०२४
कोकण रेल्वे संबंधी विविध समस्यांबाबत मुंबई भाजपा कोकण विकास आघाडीच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी कोकण विकास आघाडीचे सुहास आडिवरेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा स्तरावरून आलेल्या कोकणवासियांच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी केंद्र सरकारने ज्यादा रेल्वे गाड्या सोडल्यामुळे कोकणवासीयांचे हाल कायमचे संपले आहेत अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी दिली.

नवीन कोकण झोन निर्माण करण्यात यावा, होळी, गणपती आणि एप्रिल-मे-जून महिन्यात फेस्टिव्हल तथा हॉलिडे स्पेशल गाड्या जास्तीत जास्त सोडण्यात याव्यात, रेल्वे प्रकल्पाला जमिन दिलेल्या बऱ्याच प्रकल्पग्रस्तांना अद्याप रोजगार मिळालेला नाही; त्यांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करुन द्यावा, दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन नं. 50103 व रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर ट्रेन नं. 50104 ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर स्थानकातून सोडण्यात यावी, कोकणातील सर्वच स्थानकांवर छप्पर टाकण्यात यावे, राजापूर स्थानकाची पाहणी करुन तिथे Escalator बसवावा, सावंतवाडी स्थानक टर्मिनस म्हणून जाहीर करावे, कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते चिपळूण, मुंबई ते रत्नागिरी यासारख्या गाड्या जास्त सोडण्यात याव्यात, अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळते; यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, बऱ्याच स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर ठराविक लाईट असते ती संपूर्ण प्लॅटफॉर्मवर असावी, मुंबई ते सावंतवाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटाचा कोटा वाढवून मिळावा, वैभववाडी ते कोल्हापूर या नवीन रेल्वेमार्गाला चालना द्यावी, बांद्रा टर्मिनस ते मडगांव जाणारी गाडी क्र. 10115 ही आठवड्यातून दोनदा चालविली जाते; ती रोज चालवावी,
‘वंदे भारत’ सारख्या महत्वाच्या गाड्यांना राजापूर व चिपळूणला थांबविण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

महायुती सरकारने स्त्रियांच्या सक्षमीकरणावर भर दिल्याने राज्यात स्त्रियांच्या मतपेढीत वाढ – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

महायुती सरकारने स्त्रियांच्या आर्थिक विकासाचे दार उघडण्याचे कार्य केले.

पुणे दि.०९: आज पुणे येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या काही वर्षात स्त्रियांच्या सशक्तीकरणावर भर दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महिलांना राजकारणात संधी मिळावी यासाठी केंद्रात महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले आहे. यामुळे राज्यात पहिल्यांदाच महिलांची मतपेढी वाढल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची गंभीर दखल घेत त्या दृष्टीने प्रचाराची आखणी केल्याचे दिसत असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, विरोधकांकडून लाडक्या बहिण योजनेचा फक्त आर्थिक मोबदला महिलांना मिळतोय एवढाच अपप्रचार केला जात आहे. मात्र महायुती सरकारकडून लाडक्या बहिणीला समाजातील नागरिक म्हणून खरा हक्क मिळवून देण्यात आला आहे. स्त्रियांच्या आर्थिक विकासाचे दार उघडण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केले आहे. त्यामुळे स्त्रियांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागला आहे. तसेच स्त्रिया आता जागरूक झाल्याने त्या शासनाच्या योजना घरोघरी राबवून ‘योजना दूत’ बनल्या असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

याप्रसंगी युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत उपस्थित होते.

स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार पद्मभूषण के. एस. चित्रा, पद्मश्री साधना सरगम यांना जाहीर

पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणेतर्फे 15व्या स्व. राम कदम कलागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या मानकरी आहेत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण के. एस. चित्रा व पद्मश्री साधना सरगम. प्रत्येकी 1 लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार वितरण पुणे येथे होणार आहे, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

सांगीतिक क्षेत्रातील नावाजलेल्या व दिग्गज, प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार दर वर्षी प्रदान करण्यात येतो. गेल्या वर्षीच्या समारोहात महिला गायिकांना पुरस्कार देण्यात अशी घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण के. एस. चित्रा व पद्मश्री साधना सरगम यांची निवड करण्यात आली आहे.
यंदा पुरस्कार महिला कलाकारांना देण्यात येणार असल्यामुळे पुरस्कार वितरणाचे व्यासपीठ महिलांसाठी असणार आहे.
मराठी चित्रपट गीतांचे जादूगार आणि लावणी गीतांचे शहानशहा मानल्या जाणाऱ्या श्रेष्ठ संगीतकार स्व. रामभाऊ कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे तर्फे 2006 पासून स्व. राम कदम कलागौरव पुरस्कारने संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व दिग्गज कलाकारांना गौरविण्यात येत आहे. आज पर्यंत जगदीश खेबुडकर (2006), भास्कर चंदावरकर (2007), इनॉक डॅनियल्स (2008), सुलोचनाबाई चव्हाण (2009), चंद्रशेखर गाडगीळ (2010), अजय-अतुल (2011), उषा मंगेशकर (2012), अशोक पत्की (2013), सुरेश वाडकर (2014), यशवंत देव (2015), अरुण दाते (2016), अनुराधा पौडवाल (2017), राहुल देशपांडे, शंकर महादेवन (विभागून) (2020), अनुप जलोटा, जावेद अली (विभागून) (2023) यांचा समाव्ोश आहे.
पुरस्कारप्राप्त कलाकारांविषयी..
पद्मभूषण के. एस. चित्रा : संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात के. एस. चित्रा यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध गायक स्व. कृष्णन नायर यांच्या त्या कन्या. प्रा. डॉ. के. ओमान कुट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कर्नाटक शास्त्रीय संगीताचे शिक्षण पूर्ण केले. सिंधू भैरवी गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सहा राष्ट्रीय पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, ओरिसा या राज्यांनीही त्यांना सन्मानित केले आहे.चित्रा यांनी भारतीय विविध भाषांमधील 15 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

पद्मश्री साधना सरगम : गायनाचा वारसा आई निला घाणेकर यांच्याकडून मिळाला. संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे. गुरू कल्याणजी आनंदजी यांच्या मार्गदर्शनाखली पार्श्वगायनाची सुरुवात केली. तमिळ भाषेतील गाण्याकरीता पहिला राष्ट्रीय पुरस्कार 2001 मध्ये मिळाला. उत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून साधना सरगम यांना 55व्या फिल्म फेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरविण्यात आले आहे. व्ही. शांताराम पुरस्कार, संवेदना प्रतिष्ठान, सहयोग फाऊंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.

पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या बिलावर १० टक्के सवलत

मतदारांनी या सवलतीचा लाभ घ्यावा-जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे

पुणे, दि. ९ : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पूना होटेलियर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या ७४ हॉटेल्समध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या देयकावर २० व २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० टक्के सूट देण्यात येणार आहे, येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता पूना होटेलियर्स असोसिएशनने स्वत:हून पुढाकार घेतला आहे, याबाद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उपक्रमाबद्दल असोशिएनचे आभार मानले आहेत.

पूना हॉटेल असोसिएशनशी संलग्न हॉटेल्समध्ये या सवलतीचा लाभ घेण्याकरीता मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून देयकावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात ३३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत २ ऑक्टोबर २०२४ पासून दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात विशेष मोहिम राबवून एकूण ३३ लाख ८९ हजार ८९१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे.

मोहिमेदरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ६१ गुन्हे नोंदविण्यात आले असून दरम्यान एकूण ५८ आरोर्पीना अटक करण्यात आली. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एकूण २ चारचाकी व ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा कारखाना दोन वेळा उद्धवस्त केला आहे.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, सहायक दुय्यम निरीक्षक सुवास पोळ, जवान अशोक पाटील, संकेत वाजे, प्रविण सूर्यवंशी, सौरभ देवकर, जवान-नि-वाहन चालक केशव वामने यांनी सहभागी होते.

पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

१४ वा ‘मृदगंध पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबरला रंगणार
ठाणे-लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत  १४ व्या स्मृती दिनानिमित्त याहीवर्षी १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा. संपन्न होणार आहे.  

या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या  सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी श्री. पुरुषोत्तम बेर्डे (जीवनगौरव), श्री. ज्ञानेश महाराव (लेखक  व पत्रकार), श्रीमती सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र),  श्रीगौरी  सुरेश  सावंत (सामाजिक  क्षेत्र), श्री. आदेश बांदेकर (आभिनय व सूत्रसंचालक), श्रीमती सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती),  श्री रोहित राऊत  (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), श्रीमती दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती आसलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत.

बाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आनंदाच्या नवनव्या वाटा गवसल्या असं प्रतिपादन नंदेश  उमप यांनी केले. कला आपल्यासोबत एक संवेदना, उत्साह आणि ऊर्जा आणते. पिढ्यानपिढ्या जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा अर्थ आहे. विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्यात रंगारंग कार्यक्रम रंगणार असून श्री. तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं. श्री विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच श्रीमती सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज  श्री विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद  रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रोहिणी हटट्गंडी (अभिनेत्री), श्री.जयराज साळगावकर (संपादक कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त ठाणे) आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

आजपर्यंत विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्कार प्राप्त मान्यवर

पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम  जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री  डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले,  डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक  वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र  भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी  माटेगावकर हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

शिवाजीनगरचे नामांतर छत्रपती शिवाजीनगर करावे; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

पुण्यातील महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून देण्याचे केले आवाहन

पुणे, दि. ८: पुणे शहराचा मानबिंदू असलेल्या शिवाजीनगर या परिसराचे नामकरण छत्रपती शिवाजीनगर असे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली. नामांतरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान राखला जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच आजपासूनच आपण छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ असा उल्लेख करूया आणि महाराजांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करूया, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महायुतीच्या उमेदवारांसाठी शिवाजीनगरमध्ये निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधित करताना शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. मेट्रो रेल्वेचे काही टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने पुणेकरांचा रोजचा प्रवास सुकर झालेला आहे. लवकरच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, या भागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वडार समाजासाठी महामंडळाची निर्मिती केली आहे. समाजातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये या दृष्टीने महायुती सरकारने कार्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले.

लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, असा अपप्रचार विरोधक करत असल्याचा उल्लेख करून डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, जानेवारीपासून लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे यापुढे देखील लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहणार आहे, याबाबत कोणीही शंका बाळगू नये आणि विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये.

पुणेकर नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे पुणे शहरातून महायुतीचे सर्व उमेदवार निश्चितपणे बहुमताने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे, हडपसर विधानसभेचे उमेदवार आणि आमदार चेतन तुपे, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगीरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेश पांडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे, लहुशक्ती सेनेचे नितीन वायदंडे, रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून खाली खेचा: नाना पटोले

भाजपा नेत्याच्या पत्नीच्या हिऱ्यांची किंमत ६ महिन्यात २० लाखांनी वाढली, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाचा भाव मात्र वाढत नाही.

काँग्रेस मविआचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जालन्यात प्रचारसभा.

जालना, दि. ९ नोव्हेंबर २०२४
भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या दैवतांचा पावला पावलावर अपमान करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा रामदास स्वामी मोठे असल्याचे जाहीर सभेत सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आमच्या दैवतांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. अमित शाह यांचा निषेध करत ज्या गुजराती दरोडेखोरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्या त्या भाजपा युतीला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेस मविआचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्यासाठी प्रचारसभा घेतली, यावेळी नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आणि गुजरातच्या दरोडेखोरांनी महाराष्ट्राची प्रचंड मोठ्या प्रमाणात लुट केली. महाराष्ट्राची या दरोडेखारांच्या हातून सुटका करण्याची वेळ आता आली असून स्वाभिमानी जनता यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवेल. नरेंद्र मोदी १० वर्ष पंतप्रधानपदावर होते आता ११ वे वर्ष सुरु झाले पण नाशिकच्या सभेत त्यांना बटेंगे तो कटेंगे म्हणावे लागते एवढा कमजोर पंतप्रधान भारताने आजपर्यंत पाहिला नाही.

भाजपा सरकारच्या काळात कापूस, कांदा, सोयाबीनला भाव नाही त्यावर पंतप्रधान किंवा भाजपाचा एकही नेता बोलत नाही. खतांचे भाव वाढले, बियाणांचे भाव वाढवले, शेतकऱ्यांच्या साहित्यावर जीएसटी लावला व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. सोयाबिनचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. कापसाला भाव नाही आणि दुसरीकड़े मात्र महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले व आता भाजपामध्ये गेलेल्या नेत्याच्या पत्नीच्या हिऱ्यांची किंमत ६ महिन्यात ७६ लाखावरून ९६ लाख रुपये झाली. हिऱ्यांच्या किमीत सहा महिन्यांत वाढल्या पण कापूस, कांदा व सोयाबीनच्या किंमती मात्र वाढत नाहीत, अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली.

सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ३ पिस्टल ०६ राऊंड जप्त

पुणे -सराईत रेकॉर्डवरील २ गुन्हेगाराकडून ०३ पिस्टल ०६ राऊंड असा एकूण ०१,२२,४१०/- रु.चा. मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त करून त्यांना अटक केली आहे

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-या इसमांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई करणेचे आदेशीत करण्यात आले होते.त्याअनुषगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०२ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार युनिट हद्दीत गस्त करीत असताना दि.०९/११/२०२४ रोजी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी माहिती मिळाली की, गंगाधामकडे जाणा-या रोडवरती गुलटेकडी स्वारगेट पुणे येथे दोन इसम पिस्टल/अग्नीशस्त्र घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली.


हि बातमी युनिट ०२ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनिट कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट ०२ कडील अधिकरी व अमंलदार यांनी कारवाई केली असता अविनाश पोपट मोरे वय ३० वर्ष रा मेन बाजारपेठ शिरवळ पुणे आणि क्षितिज भाऊसाहेब भोसले वय २० वर्ष रा.मु पो वॉटर कॉलनी ता खंडाळा जि सातारा यांचेकडे ०३ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०६ जिवंत काडतुस असा १,२२,४१०/- रु.चा माल अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विनापरवाना जवळ बाळगून विक्रीकरीता पुण्यामध्ये घेवून आल्याबाबत कबुली दिली आहे त्यावरुन त्यांचेवर स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमाक ४८१/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि/आशिष कवठेकर, युनिट ०२, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा.पो.आयुक्त गुन्हे, गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-२, चे पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोउप-निरी. नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुंगत कांबळे, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, यांनी केली आहे.

बंधुत्वाचे नाते जपणारी देवदासी महिलांसोबत ‘आपुलकीची भाऊबीज’ 

जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजन
पुणे : समाज हे आपले मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येकाशी आपले नाते आदरपूर्वक जपले पाहिजे. आपल्या कुटुंबात आपण एकमेकांवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे समाजात देखील असते. एकमेकांवर अवलंबून एकमेकांना मदत करणारा समाजच जिवंत असतो, ही वृत्ती भारतीय समाजात आहे. भारतीय समाजाने ती टिकवून ठेवली आहे. नाती समृद्ध ठेवायची असतील तर सामाजिक जीवन जिवंत ठेवायला पाहिजे. सुख आणि दुःखाची देवाण-घेवाण ज्या समाजात असते तो समाज जिवंत असतो, असे मत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

जनता बँक पुणे स्टाफ वेल्फेअर असोसिएशन, जनता बँक पुणे कला क्रीडा मंडळ, जनता बँक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आपुलकीची भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार पेठेतील श्री नामदेव शिंपी समाज कार्यालयात देवदासी महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी  जनता बँकेचे अध्यक्ष रवींद्र  हेजीब,उपाध्यक्षा ॲड. अलका पेटकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, जनता वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष अभय ढमाले, कोषाध्यक्ष सचिन आंबेकर, शरद शिंदे, विजय धोत्रे,  अविनाश निरगुडे  उपस्थित होते.

स्मिता कुलकर्णी म्हणाल्या, कुटुंब आणि समाज चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल तर सहकार्य, समर्पण आणि त्याग आवश्यक आहे. जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित भाऊबीजेतून मायेची अनुभूती येते. चांगले काम केले तर समाज त्याला नकार देत नाही आणि काही काळाने हे काम समाजाचे होऊन जाते आणि समाज देखील त्यात योगदान देत असते. असेही त्यांनी सांगितले.

रवींद्र हेजीब म्हणाले, जनता बँकेचा समाजाप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम याचा भाग म्हणजे ही आपुलकीची भाऊबीज आहे, असेही त्यांनी सांगितले. ॲड अलका पेटकर म्हणाल्या, आत्ताचे जग हे डिजिटल झाले आहे. आपण सणाच्या शुभेच्छा व्हाट्सअप च्या माध्यमातून देतो. त्यामुळे प्रत्यक्ष भाऊबीज साजरी करून सामाजिक समरसता जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून साधली जात आहे. भाऊ आणि बहीण आपले सुख- दुःख एकमेकांसोबत वाटून घेतात. यातूनच हळूहळू समाज एकत्र येतो.

जगदीश कश्यप म्हणाले, सन १९४९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून जनता बँकेची स्थापना झाली. म्हणजे केवळ बँकिंग न करता आर्थिक मदती सोबतच सामाजिक बांधिलकी देखील बँकेच्या माध्यमातून जपली जाते.

किशोर चव्हाण म्हणाले, जनता बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून आपुलकीची भाऊबीज दरवर्षी साजरी केली जाते.जनता बँकेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने  बुधवार पेठेतील ७५ देवदासी भगिनींसोबत भाऊबीज साजरी करुन त्यांना धान्य किट ,मिठाई व साडीचोळी भेट देण्यात आले. सूत्र संचालन शरद शिंदे यांनी केले तर सचिन आंबेकर यांनी आभार मानले.

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील ७ मतदान केंद्र स्थलांतरीत

पुणे, दि. ९ : शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात पत्राशेड किंवा तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात आलेले ७ जुने मतदान केंद्र नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली आहेत. मतदारांनी झालेल्या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार मतदान केंद्रावर मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे.

यादी भाग ७४-स्पायसर कॉलेज प्राथमिक शाळा औंध हे मतदान केंद्र रोहन निलय-१ सहकारी हौसिंग सोसायटी येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. यादी भाग १३४-स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, मनपा, विद्यानिकेतन, विद्यापीठ गेट, गणेशखिंड रोड येथील मतदान केंद्र १० कस्तुरकुंज सहकारी हौसिंग सोसायटी येथे, यादी भाग ७६-पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथे असणारे मतदान केंद्र माऊंट व्हर्ट पीर्सस्टाईन सहकारी हौसिंग सोसायटी येथे, यादी भाग २५२ आणि २५३-सिंम्बॉयसिस कॉलेज, सेनापती बापट रस्ता येथील मतदान केंद्र कपिला सहकारी हौसिंग सोयायटी, गोखले नगर येथे तर यादी भाग ४६-आरोग्य कोठडीमध्ये असलेले मतदान केंद्र पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

यादी भाग १६२ आणि १६३-तात्पुरत्या पत्राशेडमध्ये असलेले मतदान केंद्र सेंट फ्रांसिस हायस्कूल, नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर येथे तर यादी भाग २६२-तात्पुरत्या पत्राशेडमध्ये असलेले मतदान केंद्र हे शासकीय तंत्रनिकेतन व वाणिज्य केंद्र, घोलेरोड येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे, असे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

वाहतुक सहायक पोलीस फौजदारासह ट्रॉफिक वॉर्डन अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे: नो पार्किंगमध्ये लावलेल्या चार चाकी गाडीला लावलेले जॅमर काढण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अॅन्टी करप्शन वाहतुक सहायक पोलीस फौजदारासह ट्रॉफिक वॉर्डनवर अॅन्टी करप्शनने कारवाई केली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी समर्थ वाहतुक विभाग,सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१ ) आणि ट्राफीक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८रा. कोंढवा) या दोन आरोपींविरुध्द गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ वाहतुक पोलिसांच्या हद्दीत फिर्यादी यांनी त्यांची चार चाकी नो पार्किंगमध्ये पार्क केली होती. नो पार्किंग केल्याप्रकरणी चार चाकीला जॅमर लावण्यात आले होते. चार चाकीवरील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. जॅमर काढायचे तर एक हजार रुपये द्यावे लागतील, असे आरोपी आगाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार फिर्यादी पैसे देण्यासाठी आले असता, सहायक फौजदार रोटे यांनी अनिस आगा (ट्राफीक वॉर्डन) कार्यालयात उपस्थित नसताना रोटे यांनी “अनिस आगा यांनी मागितलेले पैसे माझ्याकडे दे , ” असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शविली. एक हजार सांगत तडजोडीअंती ७०० रुपये स्वीकारले. फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (अॅन्टी करप्शन) तक्रार दिली होती. विभागाने तक्रारीची तडताळणी केली असता, हे सत्य बाहेर आले. तसेच लाच घेतल्याचे सिध्द झाले. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात रोटे आणि आगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अॅन्टी करप्शन विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती ( एजंट ) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.

तक्रारीसाठी…

-अॅन्टी करप्शन ब्युरो, ०२० २६१२२१३४ , २६१३२८०२ २६०५०४२३.

  • व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९ ३० ९९ ७७००. ई – मेल आयडी dyspacbpune@mahapolice.gov.in
  • वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
  • ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in bhara

देशाचे पंतप्रधान खोटे बोलतात, खोटं बोलं पण रेटून बोलं ही भाजपाची कार्यपद्धती.

बटेंगे, कटेंगेचे काम भारतीय जनता पक्षाचे, देशाच्या एकतेसाठी काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी बलिदान दिले.

महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी मविआचे बहुमताचे सरकार निवडून द्या.

नागपूर/मुंबई, दि. ९ नोव्हेंबर २०२४
काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व ११ वर्ष पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा असे आव्हान दिले.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, कर्नाटकात गृहज्योती योजनेअंतर्गत २०० युनिट वीज मोफत दिली जात असून त्यासाठी ९६५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातील आतापर्यंत ५१६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासासाठी ५०१५ कोटी रुपयांची तरतूद केली असून २१०९ कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. गृहलक्ष्मी योजनेसाठी महिलांना प्रति महिना २००० रुपये दिले जात असून २८ हजार ६०८ कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतुद केलेली आहे. या योजनेवर आतापर्यंत १३ हजार ४५१ कोटी खर्च झाले आहेत. अन्नभाग्य योजनेसाठी बीपीएल कुटुंबासटी ८०८० कोटींची तरतूद केली असून यातून २५८२ कोटी खर्च केले आहेत, बेरोजगार तरुणांसाठी युवानिधी योजनेअर्तंगत ६५० कोटी तरतूद आहे, त्यातून १०८ कोटी खर्च केले आहेत. पंतप्रधान मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे काही यंत्रणा नाही का, काहीही न पाहता, कोणतीही माहिती न घेता ते सर्रास खोटे बोलत आहेत.
भाजपाचे नेते भडकाऊ भाषण देत मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. भाजपाने विकास कामे सांगून व थेट मत मागावे. योगी आदित्यनाथ यांच्या, बटेंगे तो कटेंगे, हा नारा आरएसएसला आवडतो. त्याच्याविरोधी नरेंद्र मोदींनी, एक है तो सेफ है चा नारा सुरु केला. मोदी व योगी बसून नेमका कोणता नारा द्यायचे ते ठरवावे. मारनेवाले, बांटनवाले तुम्हीच आणि दुसऱ्यांना बचेंगे तो कटेंगे सांगतात. देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपाच्या कोणी बलिदान दिले ते सांगा? मोदी हे खोटं बोल पण रेटून बोल या नितीचा अवलंब करतात असेही खर्गे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात भाजपाने त्यांचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते सर्वांना कामाला लागले आहे. पण जनता आता त्यांना साथ देणार नाही. महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी मविआचे सरकार आणा असे आवाहनही खर्गे यांनी केले.
आज नागपुरात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी दीक्षाभूमिवर जाऊन अभिवादन केले.

खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली

देशाचे पंतप्रधान व भाजपाच्या खोटारडेपणाची काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांकडून चिरफाड.

गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का? गॅरंटींच्या पूर्ततेसाठी बजेटमध्ये तरतूद: सुखविंदर सुख्खू

महाराष्ट्राशी धोकेबाजी करणाऱ्या भाजपाच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका: रेवंत रेड्डी

काँग्रेसच्या गॅरंटींची अंमलबजावणी पाहण्यासाठी भाजपा नेत्यांनी कर्नाटकात यावे; विशेष विमान व बसेसची सोय करु: डी. के. शिवकुमार

मुंबई, दि. ९ नोव्हेंबर २०२४
काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उघडा करून भाजपाला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे, याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली.
टिळक भवनातील ऐतिहासिक पत्रकार परिषदेत बोलताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी भाजपाचा खोटेपणा उघड करताना सांगितले की, सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो. महाराष्ट्रा प्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली. काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जूनी पेन्शन योजना लागू केली. ज्यांना ५००० रुपये मिळत होते त्यांना आता ५० हजार रुपये मिळत आहेत. मक्याला प्रतिकिलो ३० रुपये, गहू ४० रुपये किलो तर गाईच्या दूधाला प्रति लिटर ४५ तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. ५८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. १८ वर्षांवरील मुलींना १५०० रुपये तर वैद्यकीय शिक्षण, पीएचडी करणाऱ्या मुलींनाही आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगत या गॅरंटींची पूर्तता करण्यासाठी महसूल उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत, असे सुख्खू यांनी सांगितले.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी यांनी स्वतंत्र तेलंगणाचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीच्य वेळी ६ गॅरंटी जाहिर केल्या होत्या. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांची कर्जमाफी दिली, याचा फायदा २२ लाख शेतकऱ्यांना झाला असून यासाठी बळीराजाला १८ कोटी रुपये वितरीत केले. १० महिन्यात ५० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. महालक्ष्मी योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरु केला असून आतापर्यंत बस महामंडळाला ३४०० कोटी रुपये दिले आहेत. ५९ लाख कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर दिले जात आहे. गृहज्योती योजनेअंतर्गत ५० लाख कुटुंबांना २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे. महालक्ष्मी योजनेसाठी दरवर्षी ४ हजार कोटी असे पाच वर्षांसाठी २० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून त्याची तरतूद केली आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरु केली जाणार आहे, असे रेवंत रेड्डी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात कर्जमाफी दिली नाही असे ट्विट केले होते पण मी त्यांना कर्जमाफीचा अहवाल पाठवल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. भाजपाकडे सांगण्यासारखे काहीही नाही म्हणून ते काँग्रेस विरोधात जनतेची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्र म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आठवतात पण या महान शक्तीशाली महाराष्ट्राला भाजपच्या शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा भाजपाच्या हातात देऊ नका, असे आवाहन रेवंत रेड्डी यांनी केले.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकात २२ दिवसांचा पदयात्रा केली, यावेळी जनतेला भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यातूनच कर्नाटकात ६ गॅरंटी देण्यात आल्या. काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी सुरु केली. कर्नाटकातील १ कोटी २२ लाख महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १ कोटी ६४ लाख कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. ४.०८ कोटी लोकांना ‘अन्नभाग्या’ योजनेअंतर्गत १० किलो मोफत तांदूळ दिले जात आहेत. ‘शक्ती’ योजनेतून आतापर्यंत ३२० कोटी महिलांनी मोफत बस प्रवास केला आहे. ‘युवा निधी’ योजनेद्वारे ५ लाख विद्यार्थ्यांना महिन्याला ३००० रुपये मिळत आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर ६० दिवसात या सर्व गॅरंटी लागू केल्या असून यासाठी ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. कर्नाटकाचे बजेट ३ लाख ६५ हजार कोटींचे असून देशातील अनेक भाजप शासित राज्यांपेक्षा कर्नाटकचा अर्थव्यवस्था उत्तम आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विशेष विमान व बससेची व्यवस्था करतो त्यांनी कर्नाटकात येऊन ३३ जिल्ह्यांचा प्रवास करून जनतेला या गॅरंटीबद्दल विचारून खात्री करुन घ्यावी, असे खुले आव्हान डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुठभर अरबपतींचे १२ लाख कोटी रुपये माफ करू शकतात तर काँग्रेस सरकारने गरिबांचे पैसे गरिबांनाच दिले तर भाजपाची पोटदुखी का होते? असा प्रतिसवाल यावेळी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी सादरीकरण करून काँग्रेस सरकारांनी दिलेल्या गॅरंटीची अंमलजाबणी केली आहे व किती लोकांना त्यांचा लाभ झाला आहे याची माहिती पत्रकारांना दिली.
या पत्रकार परिषदेला महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, यु. बी. व्यंकटेश, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रवक्ते चरणजित सप्रा आदी उपस्थित होते.