पुणे: नो पार्किंगमध्ये लावलेल्या चार चाकी गाडीला लावलेले जॅमर काढण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अॅन्टी करप्शन वाहतुक सहायक पोलीस फौजदारासह ट्रॉफिक वॉर्डनवर अॅन्टी करप्शनने कारवाई केली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी समर्थ वाहतुक विभाग,सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१ ) आणि ट्राफीक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८रा. कोंढवा) या दोन आरोपींविरुध्द गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ वाहतुक पोलिसांच्या हद्दीत फिर्यादी यांनी त्यांची चार चाकी नो पार्किंगमध्ये पार्क केली होती. नो पार्किंग केल्याप्रकरणी चार चाकीला जॅमर लावण्यात आले होते. चार चाकीवरील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. जॅमर काढायचे तर एक हजार रुपये द्यावे लागतील, असे आरोपी आगाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार फिर्यादी पैसे देण्यासाठी आले असता, सहायक फौजदार रोटे यांनी अनिस आगा (ट्राफीक वॉर्डन) कार्यालयात उपस्थित नसताना रोटे यांनी “अनिस आगा यांनी मागितलेले पैसे माझ्याकडे दे , ” असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शविली. एक हजार सांगत तडजोडीअंती ७०० रुपये स्वीकारले. फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (अॅन्टी करप्शन) तक्रार दिली होती. विभागाने तक्रारीची तडताळणी केली असता, हे सत्य बाहेर आले. तसेच लाच घेतल्याचे सिध्द झाले. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात रोटे आणि आगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अॅन्टी करप्शन विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती ( एजंट ) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
तक्रारीसाठी…
-अॅन्टी करप्शन ब्युरो, ०२० २६१२२१३४ , २६१३२८०२ २६०५०४२३.
- व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९ ३० ९९ ७७००. ई – मेल आयडी dyspacbpune@mahapolice.gov.in
- वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
- ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in bhara