मुंबई दिनांक ९ नोव्हेंबर २०२४
कोकण रेल्वे संबंधी विविध समस्यांबाबत मुंबई भाजपा कोकण विकास आघाडीच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी कोकण विकास आघाडीचे सुहास आडिवरेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हा स्तरावरून आलेल्या कोकणवासियांच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी केंद्र सरकारने ज्यादा रेल्वे गाड्या सोडल्यामुळे कोकणवासीयांचे हाल कायमचे संपले आहेत अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी दिली.
नवीन कोकण झोन निर्माण करण्यात यावा, होळी, गणपती आणि एप्रिल-मे-जून महिन्यात फेस्टिव्हल तथा हॉलिडे स्पेशल गाड्या जास्तीत जास्त सोडण्यात याव्यात, रेल्वे प्रकल्पाला जमिन दिलेल्या बऱ्याच प्रकल्पग्रस्तांना अद्याप रोजगार मिळालेला नाही; त्यांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करुन द्यावा, दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन नं. 50103 व रत्नागिरी ते दिवा पॅसेंजर ट्रेन नं. 50104 ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर स्थानकातून सोडण्यात यावी, कोकणातील सर्वच स्थानकांवर छप्पर टाकण्यात यावे, राजापूर स्थानकाची पाहणी करुन तिथे Escalator बसवावा, सावंतवाडी स्थानक टर्मिनस म्हणून जाहीर करावे, कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते चिपळूण, मुंबई ते रत्नागिरी यासारख्या गाड्या जास्त सोडण्यात याव्यात, अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळते; यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, बऱ्याच स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर ठराविक लाईट असते ती संपूर्ण प्लॅटफॉर्मवर असावी, मुंबई ते सावंतवाडी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटाचा कोटा वाढवून मिळावा, वैभववाडी ते कोल्हापूर या नवीन रेल्वेमार्गाला चालना द्यावी, बांद्रा टर्मिनस ते मडगांव जाणारी गाडी क्र. 10115 ही आठवड्यातून दोनदा चालविली जाते; ती रोज चालवावी,
‘वंदे भारत’ सारख्या महत्वाच्या गाड्यांना राजापूर व चिपळूणला थांबविण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.