मतदारांनी या सवलतीचा लाभ घ्यावा-जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे
पुणे, दि. ९ : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पूना होटेलियर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या ७४ हॉटेल्समध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या देयकावर २० व २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० टक्के सूट देण्यात येणार आहे, येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता पूना होटेलियर्स असोसिएशनने स्वत:हून पुढाकार घेतला आहे, याबाद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उपक्रमाबद्दल असोशिएनचे आभार मानले आहेत.
पूना हॉटेल असोसिएशनशी संलग्न हॉटेल्समध्ये या सवलतीचा लाभ घेण्याकरीता मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून देयकावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.