पुण्यातील महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून देण्याचे केले आवाहन
पुणे, दि. ८: पुणे शहराचा मानबिंदू असलेल्या शिवाजीनगर या परिसराचे नामकरण छत्रपती शिवाजीनगर असे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली. नामांतरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान राखला जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच आजपासूनच आपण छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ असा उल्लेख करूया आणि महाराजांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करूया, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महायुतीच्या उमेदवारांसाठी शिवाजीनगरमध्ये निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधित करताना शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. मेट्रो रेल्वेचे काही टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने पुणेकरांचा रोजचा प्रवास सुकर झालेला आहे. लवकरच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, या भागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वडार समाजासाठी महामंडळाची निर्मिती केली आहे. समाजातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये या दृष्टीने महायुती सरकारने कार्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, असा अपप्रचार विरोधक करत असल्याचा उल्लेख करून डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, जानेवारीपासून लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे यापुढे देखील लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहणार आहे, याबाबत कोणीही शंका बाळगू नये आणि विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये.
पुणेकर नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे पुणे शहरातून महायुतीचे सर्व उमेदवार निश्चितपणे बहुमताने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर विधानसभेचे उमेदवार आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे, हडपसर विधानसभेचे उमेदवार आणि आमदार चेतन तुपे, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगीरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेश पांडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे, लहुशक्ती सेनेचे नितीन वायदंडे, रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.