Home Blog Page 566

‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाने करावयाचा वापर ‘ विषयावर होणार चर्चा  

पुणे:

स्टार्स  (स्किल्स ट्रेनिंग फॉर एडव्हान्समेंट इन रुरल सोसायटीज) या फोरम तर्फे  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाने करावयाचा वापर’  या विषयावर  पंधरावी  राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून  ‘बाएफ ‘ हि संस्था सहप्रायोजक आहेत . या बाईफ ( वारजे, पुणे)  येथे दि.६-७ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या या परिषदेला देशविदेशातून सामाजिक,उपजीविका,शिक्षण ,रोजगार ,ग्रामविकास  क्षेत्रातील अनेक संस्थांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.स्टार्स फोरम चे संचालक चैतन्य नाडकर्णी व व्यवस्थापक भक्ती तळवेलकर  यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली .
कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- AI ) विषयक माहिती,प्रत्यक्ष अनुभव,यशकथा,भवितव्य ,सामाजिक क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन अशा अनेक मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे.वैयक्तिक,व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.परिषदेच्या नाव नोंदणीसाठी ७७७४९९६१६४ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा bhakti.starsforumindia@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
६ डिसेंबर रोजी सकाळी ९. ३० वाजता परिषदेचे उद्घाटन होणार आहे .’एमकेसीएल’ संस्थेचे चीफ मेंटॉर डॉ.विवेक सावंत,स्टार्स फोरम चे अध्यक्ष अशोक कलबाग,बाएफ संस्थेचे  अध्यक्ष डॉ भारत काकडे, विश्वस्त चैतन्य नाडकर्णी हे उदघाटन सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.नंतरच्या सत्रात ,आय आय टी ,मुंबई चे प्राध्यापक गणेश रामकृष्णन,माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ राहुल कुलकर्णी,रवी बोटवे मार्गदर्शन करणार आहेत.  दुसऱ्या दिवशीच्या सत्रात दीपा चौधरी,डेव्हिड मेनेंजेस,डॉ.योगेश हरिभाऊ कुलकर्णी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

 *सामाजिक संस्थांसाठी कौशल्य विकासपर प्रशिक्षण*
मागील १५ वर्षात स्टार्स फोरमने अनेक राष्ट्रीय परिषदा, औद्योगिक कौशल्य विकासपर प्रशिक्षण कार्यक्रम आयॊजित केले आहेत. सर्व समाजेवी संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणे  व विविध कौशल्यांची देवाण घेवाण करणे हा  या फोरमचा उद्देश आहे.  आजपर्यंत देशभरातून ३०० हुन अधिक संस्था स्टार्स फोरम शी संलग्न होऊन या प्रयत्नात सहभागी झाल्या आहेत.   
ग्राम विकास व  उपजीविका या क्षेत्रात काम करणा-या संस्थानी, एकत्र प्रयत्न करुन ग्रामीण रोजगार निर्मितीकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या विषयातील विचार व कल्पना यांची  देवाण- घेवाण  करण्यासाठी  STARS Forum (Skills Training for Advancement in Rural Societies)- स्टार्स फोरम हि संस्था २०१० सालापासून कार्यरत आहे. ग्रामीण व निमशहरी  लोकांमध्ये असलेल्या कौशल्याचा योग्य वापर करून त्यांच्याकरता  उपजीविका निर्माण करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणणे व त्या करता विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे हे  या संस्थेचे  उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी स्टार्स फोरम आपली पंधरावी  वार्षिक राष्ट्रीय परिषद पुणे येथील  ‘बाएफ’ संस्थेमध्ये ६ व ७ डिसेम्बर रोजी आयोजित करत आहे.

रिक्स घेणाराच आयुष्यात यशस्वी होतो-नारायण सुब्रमण्यम

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या ‘मेराकी-२४’ ला प्रारंभ

पुणेः भविष्यकाळ हा डिजाईन क्षेत्रासाठी सुवर्णकाळ असणार आहे. डिजाइनर शिवाय सध्या कुठल्याही गोष्टीचे स्वरूप किंवा तिच्या अस्तित्वाची कल्पना करणे अशक्य आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतील गोष्टींना मूर्त स्वरूप देऊन स्पप्नांना सत्यात उतरविण्यासाठी सर्वोत्तम देत परिश्रम घ्यायला हवेत. आवडीच्या क्षेत्रात प्लॅन ‘बी’चाही विचार आपल्या मनाला शिवू न देता कष्ट केल्यास, यशाची प्राप्ती नक्कीच होते, असा विश्वास अल्ट्रावायलेट ऑटोमोटिव्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईन (आयओडी) तर्फे कोरेगाव पार्क येथील ‘कोपा’ माॅलमध्ये आयोजित ‘मेराकी-२४’ च्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, आयओडीचे संचालक डाॅ.नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता प्रा.आनंद बेल्हे, मीस युनिवर्स मध्य प्रदेश कोपाल मंडलोई, प्रा.अमित सिन्हा, प्रा.अर्शिया कपूर, शौनिक दत्ता राॅय आदी उपस्थित होते.प्रा.डाॅ. कराड हे यावेळी बोलताना म्हणाले, ‘मेराकी-२४’ हा इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे, प्रकल्पांचे सादरीकरण करणारा आमचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांशी त्यांना जोडले जाते. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव तर मिळतोच परंतु, त्यांचा आत्मविश्वास देखील उंचावतो. त्यामुळे ‘एमआयटी आयओडी’च्या या उपक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण डिजाईनर तयार होत आहेत. ‘मेराकी-२४’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण डिजाईन्सचे प्रदर्शन कोरेगाव पार्क येथील ‘कोपा’ माॅलध्ये शनिवार दि. २३ नोव्हेंबर सायंकाळपर्यंत नागरिकांना पाहण्यास उपलब्ध असेल. त्यासाठी नागरिकांना निशुल्क प्रवेश दिला जाईल. तसेच, यानिमित्ताने फॅशन डिजाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने फॅशन शो’चे देखील आयोजन करण्यात आले आहे. ज्याला पुणेकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन ‘आयओडी’चे संचालक डाॅ.ठाकूर यांनी केले आहे.

अहंकार, अज्ञानाचे वस्त्र काढून भगवंतासमोर जावे- कथाकार आनंद जोशी

-; श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे काळभैरवनाथ जयंती (जमाष्टमी) निमित्त श्री भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
पुणे : भगवंत एकच आहे, तो वेगळा नाही. त्याच्याकडे जाताना त्याची भक्ती करताना तुम्ही जसे आहात तसे त्याच्याकडे जा.  अहंकार, अज्ञानाचे वस्त्रहरण करून त्याच्याकडे जावे. तो आपल्या अंतरंगात वसला आहे, असे मत कथाकार आनंद जोशी यांनी व्यक्त केले.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती (जमाष्टमी) निमित्त श्री भागवत कथा सप्ताहाचे आयोजन मंदिरात करण्यात आले. यावेळी कथाकार आनंद जोशी यांनी भगवान श्रीकृष्ण, कृष्णाच्या बाललीला, ब्रह्मदेव आणि श्रीकृष्ण, वेणू गीत या कथेचे निरुपण केले.

आनंद जोशी म्हणाले, भगवंताच्या बासरी प्रमाणे प्रत्येकाने व्हावे. ती आतून पोकळ असल्यामुळे भगवंत तिला हव्या त्या पद्धतीने वाजवू शकतात. त्याच प्रमाणे भगवंताच्या चरणी लीन होण्याआधी मन निर्मळ असू द्या. आपण वरून कितीही स्वच्छ असलो तरी अंतरंगातून स्वच्छ आहोत का याचा विचार करा, असेही त्यांनी सांगितले.

काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५’ चे उद्घाटन

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ चे संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष लाँच करतील, अशी घोषणा भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाची इफको लिमिटेड आणि आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या (आयसीए) १३० वर्षांच्या इतिहासात इफकोच्या पुढाकाराने या जागतिक सहकार चळवळीच्या आयसीए महासभेचे आणि जागतिक सहकारी परिषदेचे आयोजन प्रथमच भारतात करण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. अशिष कुमार भूतानी यांनी सांगितले की, सन्माननीय सहकार मंत्री अमित शाह २५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते जागतिक सहकारी परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आणि मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष निमित्त स्मरणीय टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात येईल.

इफको लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी म्हणाले की, भूतानचे सन्माननीय पंतप्रधान महामहिम दशो त्शेरिंग तोबगे जी आणि फिजीचे सन्माननीय उपपंतप्रधान महामहिम मानोआ कामिकामिका हेही या कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भारत मंडपम, आयटीपीओ, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘सहकारी संस्था सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. तसेच सहकारासाठी पोषक धोरण आणि उद्योजकीय परिसंस्था सक्षम करणे,सर्वांसाठी समृद्धी निर्माण करण्यासाठी उद्देशपूर्ण नेतृत्व घडवणे आणि सहकारी ओळख मजबूत करणे या उपसंकल्पना असतील.

भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. अशिष कुमार भूतानी म्हणाले, “सहकारी संस्था सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात’ ही या कार्यक्रमाची संकल्पना असून भारत सरकारच्या ‘सहकार से समृद्धि’ या घोषवाक्याशी सुसंगत आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर आणि सन्माननीय सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सहकारी क्षेत्राने महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. सहकारी चळवळीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ५४ उपक्रम सुरू करण्यात आले, ज्यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. पीसीएएसचे संगणकीकरण असो किंवा ज्या क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांची राष्ट्रीय स्तरावर उपस्थिती नव्हती अशा क्षेत्रांमध्ये तीन नवीन सहकारी संस्थांची स्थापना असो, या सर्व प्रयत्नांमुळे भारत जागतिक सहकारी चळवळीच्या अग्रस्थानी पोहोचला आहे. यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या सहकारी क्षेत्रांपैकी एक म्हणून उभा राहिला आहे.”

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे

– विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची भूमिका महत्त्वाची,बाबर कांबळे यांचे प्रतिपादन

पिंपरी –राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. प्रशासनावर त्यांची मोठी पकड आहे. राज्य हिताचे निर्णय तत्काळ घेण्याची धमक आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांतर ते महत्वाची भूमिका पार पाडतील. तसेच अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा सर्व कष्टकऱ्यांची आहे, असे प्रतिपादन कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये कामगार, शेतकरी, कष्टकरी, रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर सह महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे अजित पवार आहेत. त्यांच्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. 23 तारखेला निवडणुकी संदर्भात निकाल येणार आहे. यामध्ये कोणाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशा प्रकारचे तर्क वितर्क काढले जात आहेत, याबाबत, कष्टकरी जनता आघाडी वतीने नुकताच राष्ट्रवादी– भाजप – शिवसेना – आरपीआय आठवले गट या महायुतीला पाठिंबा देण्यात आला होता.

याबाबत बाबा कांबळे म्हणाले विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 4 कोटी कष्टकरी जनता व संघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केले आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, भोसरी, या मतदारसंघात मी स्वतः प्रचार केला असून महाराष्ट्रात देखील आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रचार केला आहे. महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांचे कार्य असून, सर्वसामान्य कष्टकरी जनता सर्वसामान्य नागरिक यांनी मात्र अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त केली, असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

एक्झिट पोल सर्वे मध्ये अजितदादा पवार यांना अत्यंत कमी जागा दाखविल्या जात आहेत. मात्र पोलचा हा अंदाज २३ तारखेच्या निकालानंतर फेल गेल्याचे समजेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या कमीतकमी ४५ जागांवर यश मिळून आमदार होतील.
त्यानंतर मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे, असे वाक्य महाराष्ट्राला ऐकायला मिळेल असा विश्वास आहे
.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता आघाडी.

यशासाठी समर्पण व वचनबद्धता महत्त्वाची -न्यायमूर्ती जी. ए. सानप

एमआयटीत ४थ्या आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिसंवादाचे उद्घाटन

पुणे .-  यश मिळविण्यासाठी  जिद्द, समर्पण, कठोर  परिश्रम आणि वचनबद्धता हे महत्वाची आहे. असे उद्गार मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती  जी. ए. सानप यांनी काढले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लॉ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन  दिवसीय ४थ्या आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता  या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष  अ‍ॅड. संग्राम देसाई,  नामांकित विधिज्ञ अ‍ॅड. सुधाकर आव्हाड हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
 तसेच कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व स्कूल ऑफ लॉ च्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. पौर्णिमा इनामदार उपस्थित होते.
 ‘शांततेसाठी कायद्याची दिशा’ ह्या विषयावर  दोन दिवसीय परिसंवादात  कायदा समाजातील सौहार्द आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी कसा  प्रभावी साधन ठरू शकतो हे या परिसंवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जी. ए. सानप म्हणाले,  यश मिळवायचे असेल तर कष्ट, जिद्द, समर्पण यावर भर दिला पाहिजे.  माझ्या पालकांपासूनच मी कष्टाचे महत्त्व शिकलो. कष्टामुळे मी जीवनात यशस्वी झालो. यश मिळवण्यासाठी समर्पण आणि वचनबद्धता हे अत्यंत महत्वाचे आहे.
अ‍ॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले “जगात बऱ्याच ठिकाणी अशांतता आणि संघर्ष चालू आहे, अशा परिस्थितीत कायद्याचे शांततेसाठी एक साधन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. कायदा एक चौकट तयार करतो, ज्याद्वारे समाज आपले विवाद सोडवू शकतात, मानवाधिकारांचे रक्षण करू शकतात आणि न्याय प्रस्थापित करू शकतात. शांतता म्हणजे केवळ संघर्षाचा अभाव नाही, तर न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर असावा लागतो. कायद्याचे शासन हे सुनिश्चित करते की कोणीही कायद्यापासून वर नसतो आणि सर्व व्यक्तींना समान वागणूक दिली जाते. हा सिद्धांत समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कायदा हा संघर्षांचे निराकरण करण्याची आणि अधिकारांचे रक्षण करण्याची चौकट प्रदान करतो, जे सामाजिक स्थैर्य राखण्यासाठी आवश्यक आहे. व्यक्तींना त्यांच्या अधिकारांमध्ये सुरक्षिततेची भावना वाटणे आणि त्यांना न्याय मिळेल याची खात्री असणे अशी वातावरणाची निर्मिती कायद्याचे शासन करते ही सुरक्षा म्हणजे शांततेचा पाया.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले  “आजच्या जगात कायदा शांततेच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जशी कायदे समाजाला संरचना देतात, तसेच आध्यात्मिक तत्त्वे शरीर, मन, आत्मा आणि जीवनाला प्रोत्साहन देतात. ही तत्त्वे योग्य दिशा देतात, ज्यामुळे व्यक्तीला वैयक्तिक शांतता मिळते आणि ती शांतता सामाजिक आणि जागतिक शांततेला प्रोत्साहन देते.”
अ‍ॅड. संग्राम देसाई म्हणाले, “आपण वकील म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेचे प्रचारक म्हणून महत्त्वपूर्ण भागीदार आहोत. भारतीय घटनेने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांची जनजागृती करून कोणी पीडित झाले असेल तर कायद्याने दिलेल्या न्याय प्राप्त करण्याच्या प्रक्रिये बद्दल माहिती देऊ शकतात व समाजात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल.”
राहुल कराड यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर MIT-WPU च्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, “एमआयटी डब्ल्यूपीयूच्या उद्देश मुळात शिक्षणाच्या माध्यमातून पात्र आणि सक्षम व्यक्ती तयार करणे हा आहे, जे देशातील समस्यांचे निराकरण करू शकतात.”
डाॅ. आर.एम.चिटणीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

संविधान दिना निमित्त पुण्यात पार पडणार ‘भारतीय संविधान विचार संमेलन’

  • विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने आयोजन
  • सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व संविधान भेट देणार; परशुराम वाडेकर यांची माहिती

पुणे :  भारतीय संविधानाला यंदा ७५  वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे च्या वतीने ‘संविधान दिना निमित्त  भारतीय संविधान विचार संमेलन येत्या २६  नोव्हेंबर आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचा विषय ‘भारतीय संविधानाचे ७५ वर्षे .. विकास व वाटचाल’ असून यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते सहभागी होणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिव परशुराम वाडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, सुनिल महाजन, विठ्ठल गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. 

 भारतीय संविधान विचार संमेलना बद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे २६  नोव्हेंबर २०२४  रोजी दिवसभर विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत  सुप्रसिद्ध गायक विजय कावळे आणि पार्टी ‘संविधानाचा जलसा’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील, यानंतर सकाळी ११  वा. मुख्य उद्घाटन समारंभ होणार आहे, संमेलनाचे उद्घाटन  मा. न्यायमुर्ती (निवृत्त) अभय ठिपसे यांच्या हस्ते होणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी डी.आय.जी. सुधाकर सुराडकर असणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून  डॉ. सुरेंद्र जोंधळे (मुंबई) , इरफान इंजिनिअर ( मुंबई) , समाजवादी जन परिषदेच्या अखिल भारतीय अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर, ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोनार उपस्थित राहणार आहेत. 

दुपारी  २.३० ते ३.३० दरम्यान प्रकाश घोडके यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे, यामध्ये अंजली कुलकर्णी, वीरा राठोड, देवा झिंजाड, स्वप्निल चौधरी, सागर काकडे, जित्या जाली यांचा समावेश आहे, तर  सुत्रसंचालन सुमित गुणवंत करणार आहेत. 

संमेलनाच्या समारोपाचे सत्र दुपारी  ३.३० ते ६ वा. दरम्यान संपन्न होणार आहे, या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी  प्रा.डॉ. रोणकी राम (चंदीगड)  असणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून  ज्येष्ठ घटनातज्ज्ञ  प्रा. उल्हास बापट,  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,  अॅड. दिशा वाडेकर (दिल्ली) , ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे सहभागी होणार आहेत. 

पन्नासहून अधिक कलावंताचा समावेश असलेल्या ‘भारतीय संविधान का संगीतमय सकर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने भारतीय संविधान विचार संमेलनाचा समारोप होणार आहे, या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनिल महाजन यांची असून नृत्य दिग्दर्शन  निकिता मोघे, संहिता लेखन  सक्ष्‌मीकांत देशमुख यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संयोजन  दिपक म्हस्के, केतकी महाजन-बोरकर यांचे आहे तर संदीप उबाळे, सौरभ दफ्तरदार, रश्मी मोघे हे गायक आहेत, दृकश्राव्य  महेश लिमये तर अमृता ठाकुरदेसाई, नितीन पवार, तन्मय पवार, नितीन शिंदे, अपुर्व द्रविड, प्रकाश गुप्ते या वादकांचा यात सामवेश असून या कार्यक्रमाचे निवेदन महेंश गायकवाड करणार असल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. 

दरम्यान, या संमेलनात पुण्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व संविधान भेट दिले जाईल असे वाडेकर यांनी सांगितले.

विरोधकांना एकच भीती चंद्रकांतदादांना लीड किती ?

पुणे : राज्यात २८८ मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पाडले. गेल्या ३० वर्षातील सर्वाधिक मतदान यंदा महाराष्ट्रात विधानसभेला झाले आहे. याचा निकाल आता येत्या २३ तारखेला म्हणजे उद्या लागणार आहे. त्याआधी ठिकठिकाणी उमेदवारांचे विजयी बॅनर झळकले आहेत. अशातच पुण्यातील कोथरूड मतदारसंघात महायुतीकडून चंद्रकांतदादा पाटील तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्याआधी एक्झिट पोलनुसार या मतदारंसघात चंद्रकांत दादा पाटील यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे विरोधकांना एकच भीती चंद्रकांतदादांना लीड किती ? असा मॅसेज देखील मतदारसंघात आता फिरू लागला आहे.

महायुतीकडून उभे असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी चांगलाच जोर लावल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ ला विद्यमान आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ते विजयी होतील की नाही ? याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र त्यांचा त्यावेळी विजय झाला. आता कोथरूडमधील माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांना केंद्रात संधी मिळाल्याने संपुर्ण भाजप चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी एकवटल्याचे प्रचारात दिसून आले.

सुरूवातीपासून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चंद्रकांतदादा पाटलांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. तर मेधा कुलकर्णी यांनी देखील जोरदार प्रचार केला. त्याचसोबत महायुतीमधील सर्व घटक पक्ष चंद्रकांतदादांच्या प्रचारात सहभागी झालेत. चंद्रकांतदादा पाटील यांनीही मागच्या पाच वर्षात कोथरूडमधील जनतेचा विश्वास सार्थ ठरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक लीड भाजपला कोथरूड मतदारसंघात बघायला मिळेल, अशीही एका बाजूला चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना १००९४१ इतकी मते पडली होती. तर विरोधी उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना ३६, २७९ मते पडली होती. यात मेधा कुलकर्णी जवळपास ६४ हजार ६६२ मतांचा लीड घेऊन विजयी झाल्या होत्या. तर २०१९ साली चंद्रकांतदादा पाटील यांनी जवळपास १०५२४६ टक्के मत घेतली होती. त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा २५, ४९५ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदा मताधिक्यांची टक्केवारी वाढेल असा विश्वास व्यक्त केला जाऊ लागला आहे.

२१ व्या पशुगणनेस सोमवारपासून आरंभ

पुणे: राज्यात एकविसाव्या पशुगणनेस सोमवार २५ नोव्हेंबरपासून आरंभ होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहसंचालक सुषमा जाधव यांनी कळविली आहे. सर्व पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचूक व योग्य ती माहिती देण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर-कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या राज्यात आढळणाऱ्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुटादी पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे लक्षणीय योगदान आहे. शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकीची आवश्यकता असून ही माहिती गणनेच्या स्वरुपात गोळा केली जाते. पशुधनामध्ये महाराष्ट्र संपन्न राज्य असून देशामध्ये ७ व्या क्रमांकावर आहे. तसेच कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी यामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे.
पशुधनाच्या निरंतर विकासासाठी चांगल्या योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. पशुपालन पूरक उत्पन्ननिर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत आहे.

देशात १९१९ पासून दर ५ वर्षानी पशुगणना घेण्यात येत आहे. २०१९ मध्ये २० व्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यामध्ये एकूण ३ कोटी ३० लाख ८० हजार पशुधन असून मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कुटुंब घरगुती उद्योग व इतर संस्थांकडून पाळलेल्या गायवर्ग, म्हसवणे, मिथुन, याक, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी जसे की कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग तसेच इतर कुक्कुटपक्ष अशा सोळा प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय ( पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती गोळा करण्यात येणार आहे, असेही श्रीमती जाधव यांनी कळविले आहे.

आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात ७ कोटी रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने राज्यात सर्वाधिक ७ कोटी ६३ लाख ३४ हजार रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे २५ टक्के जप्तीची कारवाई पुणे जिल्ह्यात झाली असून उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. दिवसे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे जिल्ह्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांचे अभिनंदन केले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईच्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून विविध पथके तयार करण्यात आली. या पथकांनी केलेल्या कारवाईत १ हजार १०० गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २३४ वाहनासह ७ कोटी ६३ लाख ३४ हजार २३१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांत १ हजार ४२ वारस व ५८ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण बिअर ३ हजार ९५१ ब.लि., कॅप्स-३२, देशी दारू- ४ हजार ४९८ ब.लि. विदेशी दारू (राज्यातील)- ४ हजार ५२ ब.लि., विदेशी मद्य (परराज्यातील गोवा)- २३३ ब.लि, लेबल संख्या- १० हजार ९३० ब.लि., अवैद्य गावठी हातभट्टी दारू १ लाख १५ हजार ५६४, गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायन २ लाख ७९ हजार ३८० ब.लि, वाईन ४८५ ब.लि, ताडी ६ हजार २७५ लिटर व इतर ६२२ ब.लि तसेच २३४ वाहने असा एकूण ७ कोटी ६३ लाख ३४ हजार २३१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उद्या 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून या दिवशी सर्व विधानसभा मतदार संघांचे अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत कोरडा दिवस (ड्राय डे) घो‍षित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे अधीक्षक श्री. राजपूत यांनी केले आहे.

नवरसांच्या स्वरधुनींतून अजरामर ‘गीतरामायणा’चे पुनर्जागरण

विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे रंगले श्रीधर फडके यांचे भावपूर्ण सादरीकरण; रसिकांची उत्स्फूर्त दाद


पुणे : प्रत्येक देशवासियाच्या मनामनांत रुजलेल्या रामकथेला अजरामर शब्दसुरांत गुंफणाऱ्या ‘गीतरामायणा’चा पुन:प्रत्यय रसिकांनी शुक्रवारी सायंकाळी येथे घेतला. ‘सात स्वरांच्या स्वर्गामधुनी, नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी’ जणु अवतरल्याचा अनुभव रसिकांनी घेतला. ‘पुत्र सांगती चरित पित्याचे…’ या गदिमांच्या शब्दांची अनुभूती प्रख्यात गायक श्रीधर फडके यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांना दिली. 
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने ग. दि. माडगूळकर रचित, संगीतकार सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचे सादरीकरण श्रीधर फडके यांनी केले. टिळक स्मारक मंदिर येथे हाऊसफुल्ल गर्दीत हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांच्यासह समितीचे सर्व विश्वस्त, कार्यकर्ते, देणगीदार, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुप्रिया केळवकर यांनी स्वागत प्रास्ताविकात समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.
स्वये श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला गं सखे, सावळा गं रामचंद्र, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, चरण तुझे पाहिले आज मी शापमुक्त झाले, स्वयंवर झाले सीतेचे, जय गंगे जय भागीरथी, शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम, माता न तू वैरिणी, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, सेतू बांधा रे सागरी, प्रभो मज एकच वर द्यावा, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, गा बाळांनो श्रीरामायण अशी गीते श्रीधर फडके यांनी सादर केली. सुकन्या जोशी, अभिजीत मोडक यांचे ओघवते निवेदन, तर तुषार आंग्रे (तबला), ओंकार पाटणकर आणि प्रणव कुलकर्णी (की बोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्ये) रश्मी भंडारी, गौरी सनगळ, योगेश पीतांबरे (समूहस्वर) यांची पूरक साथसंगत लाभली.
रामकथा गीतांच्या माध्यमातून उलगडताना श्रीधर फडके यांनी गीतरामायणाशी संबंधित अनेक आठवणी सांगितल्या. ‘१९५५ साली पुणे आकाशवाणीवरून गीतरामायण प्रथम सादर झाले. तेव्हा तत्कालीन अनेक प्रसिद्ध गायक कलाकार त्यात सहभागी झाले होते. गजाननराव वाटवे, मालती पांडे, माणिक वर्मा, ललिता फडके, लता मंगेशकर… अशी अनेक नावे त्यात होती. कवी ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार गायक सुधीर फडके हे अद्वैत होते. दोघांनाही चित्रपट सृष्टीचा अनुभव असल्याने जे भाव गीतांत तेच भाव संगीत व गायनात दिसले.‌ गीताच्या प्रत्येक कडव्यात वेगळे चित्र गदिमांनी मांडले. गीतातील शब्दांना नेमक्या भावाचे कोंदण बाबूजींनी स्वरांतून दिले. अभिजात भारतीय संगीतातील रागांचा वापर केला आणि ‘अवघ्या आशा श्रीरामार्पण’ या भावनेने ते सदैव वावरले,’ असेही श्रीधर फडके म्हणाले.
प्रतापराव पवार म्हणाले, “ग्रामीण भागातून पुण्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलामुलींना विद्यार्थी साहाय्यक समितीचा मोठा आधार आहे. आज समितीमध्ये पाच वसतीगृहात 1100 विद्यार्थी निवास भोजन व व्यक्तिमत्त्व विकासाची सुविधा घेत आहेत. समितीचा कार्य विस्तार होत असून, अहिल्यानगर येथे एक मुलींचे व एक मुलांचे वसतिगृह सुरू झाले आहे. या सर्व कार्यात समितीचे देणगीदार, हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सांगीतिक कार्यक्रम आयोजिला जातो”.  

पुनीत बालन यांचा ‘रानटी’ आजपासून चित्रपटगृहात.

आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ चित्रपटात विष्णूची आणि त्याच्या जिगरबाज अंदाजाची कथा पहायला मिळणार आहे. ‘मारायला हत्यार कशाला पाहिजे मीच हत्यार आहे , मीच रानटी’ आहे अशी धमकी देत ‘विष्णू’ ने त्याच्या शत्रूंच्या मनात कशी दहशत निर्माण केली आहे? आपली मैत्री, प्रेम आणि कुटुंब यांच्या संरक्षणासाठी ‘विष्णू’ नेमकं काय करतो? कोणत्या नीतीचा अवलंब करून ‘विष्णू’ त्याच्या शत्रूंना कसं नेस्तनाबूत करणार? हे चित्रपटात पाहणं रंजक आहे. विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर रंगणारं सूडनाट्य प्रेक्षकांना आज प्रदर्शित झालेल्या ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर,नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम,अक्षया गुरव, कैलास वाघमारे,माधव देवचक्के, सुशांत शेलार,हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे.

अॅक्शन, इमोशन, ड्रामा, लव्ह, जबरदस्त संगीत, उत्कंठावर्धक कथानक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे केलेलं सादरीकरण यामुळे ‘रानटी’च्या रूपात मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेजच पहायला मिळणार आहे. ‘रानटी’ अॅक्शनपॅक्ड चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची ‘फूल टू ट्रीट’ असणार आहे. चित्रपटाचा वेग, निर्मितीमूल्य,त्याची मांडणी हे सगळं ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्यात दिग्दर्शक समित कक्कड यशस्वी झाले असून निर्माते पुनीत बालन यांची उत्तम साथ त्यांना लाभली आहे.

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचंलिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाचे उद्घाटन

    पुणे : वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी  व  महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्यावतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानवरती आधारित असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब हॉर्टीप्रोचे उपसंचालक डॉ. हर्षदीप सिंग, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, श्रद्धा रासने, विजय रासने तसेच  महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन, भाग्यश्री पाटील, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप, मोरेश्वर काळे, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, महानंद माने आदी मान्यवर उपस्थित होते.

निबे म्हणाले की  शेतीला पूरक असलेला फुलोत्पादन आणि बागायत हा व्यवसाय
शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून तो फायद्याचा आहे. शेतकऱ्यांनी आपला पारंपारिक व्यवसाय जपत फलोत्पादन आणि बागायत व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे. भारत हा कृषिप्रधान देश असून ज्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या शहरांमध्ये देखील हॉर्टीप्रोची संस्कृती रुजत आहे. घरातील गॅलरीमध्ये, अंगणात, परस बागेत विविध वाणाची फळझाडे आणि फुलझाडे मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत आणि याला मोठी मागणी आहे. म्हणून शेतकऱ्यांनी या व्यवसायाला जोड्या व्यवसाय म्हणून प्राधान्य द्यावे.

सदरील हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पहाण्यासाठी उपलब्ध आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले असून  हॉर्टिकल्चर तज्ञांनी शेतकरी आणि व्यावसायिकांना  हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

२२ ते २४ नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान (सिंचगर) येथे  सकाळी १० ते ७ पर्यंत सदरील प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीतजास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

विश्वाचे कल्याण ही संविधानाच्या शिकवणुकीची पहिली पायरी : डॉ. श्रीपाल सबनीस

धर्मांधता दूर होण्यासाठी संविधान संस्कृतीचा उद्घोष आवश्यक : डॉ. श्रीपाल सबनीस
भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान रत्न पुरस्काराने डॉ. श्रीपाल सबनीस, ॲड. शैलजा मोळक यांचा गौरव
भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीचा उपक्रम

पुणे : राजकीय क्षेत्रात लोकशाहीचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानाला अपेक्षित भारत घडविणे हे राज्यकर्त्यांचे आणि जनमानसांचे आद्य कर्तव्य आहे. आज समाजात धर्मांधता वाढली आहे. या धर्मांधता, संघर्षापासून दूर राहण्यासाठी संविधान संस्कृतीचा उद्घोष करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस आणि शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. शैलजा मोळक यांना संविधान रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, प्रा. रतनलाल सोनग्रा मंचावर होते. शाल, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. सबनीस म्हणाले, भारतीय संविधान म्हणजे सर्व संतांच्या संतत्त्वाची, महापुरुषांच्या चांगुलपणाची, सत्य-शहाणपण-विवेक आणि धर्मनिपरक्षेतेची बेरीज आहे. दु:खमुक्त मानवता हा समाजातील प्रत्येकाचा ध्येयवाद असला पाहिजे. आज विश्वात अशांती, उपासमार, अन्याय, शोषण आहे अशा सामाजिक परिस्थितीत भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशा-देशाला, माणसा-माणसाला जोडणे हे कार्य निश्चितच घडू शकते. संविधानाच्या संस्कृतीचा अंगिकार केल्यास संपूर्ण विश्वाला कवेत घेता येणे शक्य आहे. विश्वाचे कल्याण ही संविधानाच्या शिकवणुकीची पहिली पायरी आहे.

मधुकर भावे म्हणाले, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा पाया धरून रचलेले संविधान स्वीकारल्याशिवाय देश चालविता येणार नाही. संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मांना समान न्याय मिळू शकतो, परंतु आजच्या सामाजिक परिस्थितीत संविधानाचा अनादर करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. घटनेवर आधारित राजकारण आज होते आहे का या विषयी राज्यकर्त्यांनी विचार करणे आवश्यक आहे.
ॲड. शैलजा मोळक यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत संविधानाविषयी अभ्यास, वाचन तसेच त्यानुसार आचरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संविधानाच्या विचाराचा प्रचार व प्रसार व्हावा, जातपात-धर्मविरहित समाज एकत्र यावा यासाठी आपण अखंडित कार्यरत राहणार आहोत.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सचिन ईटकर यांनी संविधानाची उपयुक्तता सांगितली तर स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

पाकिस्तानात प्रवासी व्हॅनवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू

0

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवासी व्हॅनवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक जण जखमीही झाले आहेत. खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम खोऱ्यात ही घटना घडली. ही व्हॅन पेशावरहून कुर्रमच्या दिशेने जात होती. कुर्रम डीपीओनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याआधी मंगळवारी रात्री खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात लष्कराच्या चौकीवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तेथे सहा दहशतवादीही मारले गेले.

माहिती देताना पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने सांगितले की, दहशतवाद्यांनी चेक पोस्टच्या भिंतीवर वाहन घुसवले आणि त्यात ठेवलेल्या स्फोटकांद्वारे स्फोट घडवून आणला. या स्फोटात 12 जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल लष्करानेही 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला.16 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या पश्चिमेकडील बलुचिस्तान प्रांतात लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा दलाचे 7 जवान शहीद झाले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वृत्तसंस्था एएफपीने एका स्थानिक व्यक्तीच्या हवाल्याने सांगितले की, या हल्ल्यात 40 ते 50 बलुच बंडखोरांचा सहभाग होता.यादरम्यान बलुच बंडखोरांनी लष्कराच्या चौकीवर गोळीबार केला. या हल्ल्यात 7 जवान शहीद झाले असून 15 जवान जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी 9 नोव्हेंबरला स्फोट झाला. या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला होता, तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेनेही या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.बीएलएच्या प्रवक्त्याने सांगितले की, मजीद ब्रिगेड युनिटने हा आत्मघाती हल्ला केला आहे. त्यांचे टार्गेट इन्फंट्री स्कूलचे सैनिक होते, जे कोर्स पूर्ण करून जाफर एक्सप्रेसने पेशावरला जाणार होते. क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलचे प्रवक्ते वसीम बेग यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनला सांगितले की, मृतांमध्ये 14 लष्करी जवान आणि 12 नागरिकांचा समावेश आहे.