नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ चे संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष लाँच करतील, अशी घोषणा भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाची इफको लिमिटेड आणि आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या (आयसीए) १३० वर्षांच्या इतिहासात इफकोच्या पुढाकाराने या जागतिक सहकार चळवळीच्या आयसीए महासभेचे आणि जागतिक सहकारी परिषदेचे आयोजन प्रथमच भारतात करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. अशिष कुमार भूतानी यांनी सांगितले की, सन्माननीय सहकार मंत्री अमित शाह २५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते जागतिक सहकारी परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आणि मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष निमित्त स्मरणीय टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात येईल.
इफको लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी म्हणाले की, भूतानचे सन्माननीय पंतप्रधान महामहिम दशो त्शेरिंग तोबगे जी आणि फिजीचे सन्माननीय उपपंतप्रधान महामहिम मानोआ कामिकामिका हेही या कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत भारत मंडपम, आयटीपीओ, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘सहकारी संस्था सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. तसेच सहकारासाठी पोषक धोरण आणि उद्योजकीय परिसंस्था सक्षम करणे,सर्वांसाठी समृद्धी निर्माण करण्यासाठी उद्देशपूर्ण नेतृत्व घडवणे आणि सहकारी ओळख मजबूत करणे या उपसंकल्पना असतील.
भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. अशिष कुमार भूतानी म्हणाले, “सहकारी संस्था सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात’ ही या कार्यक्रमाची संकल्पना असून भारत सरकारच्या ‘सहकार से समृद्धि’ या घोषवाक्याशी सुसंगत आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर आणि सन्माननीय सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सहकारी क्षेत्राने महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. सहकारी चळवळीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ५४ उपक्रम सुरू करण्यात आले, ज्यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. पीसीएएसचे संगणकीकरण असो किंवा ज्या क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांची राष्ट्रीय स्तरावर उपस्थिती नव्हती अशा क्षेत्रांमध्ये तीन नवीन सहकारी संस्थांची स्थापना असो, या सर्व प्रयत्नांमुळे भारत जागतिक सहकारी चळवळीच्या अग्रस्थानी पोहोचला आहे. यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या सहकारी क्षेत्रांपैकी एक म्हणून उभा राहिला आहे.”